Saturday, 19 August 2017

आशा... (कविता)

#आशा...


"ध्येयवेड्यांना साद घालणारी
उत्तुंग शिखरं
अजून आहेत तिथेच...
स्वप्नांकडे घेऊन जाणाऱ्या
पाऊलवाटाही तशाच आहेत...

अजूनही
मायेची पखरण करणारी झाडं
उभीच आहेत रस्त्याच्या दुतर्फा...
तहानल्या जीवाला संजीवनी
देणारे झरे अजूनही वाहताहेत...

सूर्य अजूनही रेंगाळलाय
आकाशात
काळोखाला थोपवून धरत...
काळजातली वादळे शमवून
वाराही हळवा झालाय...

अजूनही निशाण हातातच आहे.

पण...

पण माझी पावलं मात्र थकली आहेत...
माझ्यावरती रूसली आहेत...!!!

किनाऱ्यावरचा दीपस्तंभ
अजूनही
निरोपासाठी हात हलवतोय...
नांगराने सोडलाय
वाळूचा सहवास...

फडफडणार्‍या शिडांनी
वादळ भरून घेतलंय
छातीभरून...
लाटाही गाताहेत
पुरुषार्थ चेतवणारी समरगीते...

वाट पाहताहेत वल्ही
मजबूत मनगटाच्या
घट्ट पकडीची...
खुणावताहेत दाही दिशा
कोलंबसाच्या वारसाला...

पण...

पण माझे हात मात्र थकले आहेत...
माझ्यावरती रूसले आहेत...!!!

.... तरीही,
तरीही मी मात्र थकलो नाही
आणि
नाहीत थकल्या माझ्या आशाही...

अजूनही वाटतेय,
कधीतरी हातपाय साथ देतील...
या सर्वांना मात देतील...!!!"

-- नंदकिशोर.
#काही_पाने...

No comments:

Post a Comment