दुरावा...!
"आपण एका श्वासाइतके जवळ असतानाही तुला एकटं एकटं वाटत असेल; तर तो माझा पराभव आहे."
"एकटेपणा असं नाही. पण एक पोकळी जाणवतेय."
"कसली पोकळी...?"
"तेच तर कळत नाही. मला काय हवंय? काय नकोय? एवढ्या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं पण सापडत नाहीत. डोकं सुन्न झालंय. घुसमट होतेय मनाची."
"घुसमट मनाची असते. मेंदूने विचार करून व्यवहार चालतात. नाती नाही. म्हणून मग मेंदूने नाही मनाने विचार कर. त्यालाच विचार. बाबारे! तुला नक्की काय हवंय? तुझ्या प्रश्नांची उत्तरे सापडतीलही कदाचित."
"कसलीच उत्तरं नाहीत माझ्याकडे. खूप विचार येतात डोक्यात. बोलता नाहीत येत कोणाला? बोलण्यासाठी कोणीच नसतं."
"मग काय उपयोग आमच्या असण्याचा?"
"तू असतोस ना! जाणवतं मला ते."
"तुला बोलायला कुणीही नसते; तर मग एवढे दिवस... एवढे महिने... एवढी वर्षे तासन् तास माझ्याशी काय बोललीस?"
"पूर्वी कसं मी तुला एवढ्या तेवढ्याही गोष्टी सांगायचे. पण आता वेळ नाही मिळत तुला पूर्वीसारखा. आता तू नसतोस, असं नाही. पण तुझा presenceही मला खूप महत्त्वाचा वाटतो."
"बोलायला तर मी तेंव्हाही होतो... आताही आहे. मी तिथेच आहे; जिथे तू मला सोडून आलीस. आणि... आता तू जिथे आहेस; मी कुठेच नसतो तिथे. Online तर मी नेहमीच असतो. फक्त तुझ्या नेटवर्कमध्ये नसतो. Some congestions."
"याचा अर्थ तू माझ्यापासून लांब गेला आहेस, असं नाही म्हणत मी."
"पर उतने पास भी नही है! लक्षात घे... I am your present, may be future; but not past."
"पण माझी वाट ही एकटीचीच आहे. तुझी मात्र फरपट होतेय माझ्यामुळे. तू नको मनाला लावून घेऊस."
"मी नेहमीच तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी कुंपण आडवे आले."
"मला काहीच कळत नाहीय. खूप भरकटत चाललेय मी."
"बाई गं! विनाकारण काहीच होत नाही. कुठेतरी काहीतरी कारण असतेच. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच."
"मला नाही कळत असलं काही."
"काय?"
"काही नाही. सोडून दे तो विषय. काय अजून?"
"अजून तर बरंच काही आहे. अजून किती पळणार आहेस? तुझ्या पळण्याने विषय संपणार नाहीच."
"मला माझंच काय चाललंय ते कळत नाही. तुझं बोलणं तर त्याहून नाही."
"माझं बोलणं नाही कळू दे. तुझं तूच शोधायचा प्रयत्न कर. शब्द नाही कळले तर नजरेत नजर मिसळून बघ. नजर चोरणार असशील तर डोळे मिटून घे. आत शोध. सापडेल."
"काही नको."
"निगाहें निगाहों से मिलाकर तो देखो...
एक बार रिश्ता बनाकर तो देखो...
हसरतें दिल मे दबानेसे क्या हासील होगा...
अपने होंठ हिलाकर तो देखो...
खामोशी से कब होती है खामोशियाँ पुरी...
दिल की बात बताकर तो देखो...
जो है दिल मे उसे करा दो बयाँ...
खुद को एकबार जताकर तो देखो...
आसमाँ सिमट जाएगा तुम्हारी आगोश मे...
चाहत की बाहें फैलाकर तो देखो...!"
"बस्! झाली तुझी फिलॉसॉफी!"
"जेंव्हा मी मनातलं सांगतो; तेंव्हा तुला ती फिलॉसॉफी वाटते. हेच ते कुंपण आहे... मला अडवणारे."
"तू तुझंच खरं करणार. मला थोडीच बोलून देणार आहेस."
"बोलणं काय नुसत्या शब्दांनीच होते. माय डियर, बोलायला शब्द नसतात; तेंव्हा नजर बोलते. डोळे मिटले की स्पर्श बोलतात. कुणाच्या खांद्यावर डोके ठेवून काहीवेळ नुसते बसले तरी खूप बोलल्याचा फिल येतो. कधी अनुभवलंस तू हे."
"तुझा आवाज कळतो मला. जाणवतो.. ऐकू येतो मला... पण काय करू? मला 'ओ' देता येत नाही त्या आवाजाला."
"तो आवाज खूप लांब आहे. इथं माझ्या छातीवरती डोकं ठेवून ऐक. बघ प्रयत्न करून."
"आता मात्र मला तुझ्या आवाजात आगाऊपणा जाणवतोय."
"म्हणूनच अजूनही आपण तेवढेच दूर आहोत. जेवढे पूर्वी होतो. तुम्हा बायकांचा एक गोड गैरसमज आहे. सगळे पुरुष इथून तिथून सारखेच. मादी जवळ आली की, लागले पिसारा फुलवायला. यांना फक्त तुमचं शरीर हवं असतं. पण तुमच्या हे कधी लक्षात येते का? की तो पिसारा नाही, त्या मादीला फुलवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हो! मला कबूल आहे. भाषा काय फक्त मनाचीच असते? शरीराला काय भाषा नसते? ही ओढ काय फक्त शरीराचीच असते? दोन काठ एकत्र चालू शकतात. पण मला समांतर चालायला जमत नाही. मी पाण्यासारखा आहे... वाहणारा. दोन नद्या एकत्र आल्या कि पाणी मिसळणारच. ते वेगळे कसे राहील. दोन शरीरं एकत्र आल्यावर ती वेगळी कशी राहतील. ती आपापली स्वतंत्र अस्तित्व नाकारणारच."
"मी अजूनही तुझ्यात मिसळले नाही, असे का वाटते तुला?"
"कारण! अजूनही तुला माझे अस्तित्व तुझ्यापासून वेगळे वाटतेय. होय! तुझ्या माझ्यामध्ये अजूनही एक न दिसणारे कुंपण आहे. जेंव्हा आपली दोन शरीरं एकमेकांत मिसळतील; तेंव्हा ती दोन राहून चालणार नाहीत. त्यांना एक होण्याची ओढ वाटली पाहिजे. मनाला एकत्र आणण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पहा. अमूर्त भावनांना मूर्त अनुभव मिळाला की, त्या आणखीन दृढ होतील. तुझा एकटेपणा माझ्यात विरघळून जाऊ दे. आपल्या मनातली पोकळी त्या उत्कटतेने भरून जाऊ दे. हवेत उडणार्या साबणी फेसाच्या फुग्याप्रमाणे शरीराचा जडपणा सोडून दे. विश्वाच्या या अनंत पोकळीत मन पिसासारखे विहरू दे. दोन शरीरंच नाही, तर सारे विश्वच तुझ्यात एकरूप झालेले तुला दिसेल."
- नंदकिशोर गायकवाड.
#मुसाफिर

No comments:
Post a Comment