Monday, 11 June 2018

अधुरी एक कहाणी...!!!

अधुरी एक कहाणी...


खूप अस्वस्थ... बेचैन वाटत राहतं... आतून कुठंतरी मन तुटत जातं... काही करावसं वाटत नाही... कुणाशी बोलावसं वाटत नाही... एकटं एकटं वाटत राहत राहतं... खूप विचार करूनही असं का होतंय, हेच कळत नाही...


छोडो यार! कुणीतरी आठवण काढत असेल.


पण कोण?


तू नक्कीच नसणार. आणि तुला माझी आठवण तरी का यावी?


आज तुझा वाढदिवस नाही का?


आज तू तुझ्या परिवारामध्ये खूप खूश असशील. असशील म्हणजे आहेच. अशीच खूश रहा. एवढ्या शुभेच्छा तर आजच्या दिवशी मी नक्कीच देऊ शकतो. वाटलं होतं, तुला फोन करावा... मोबाईल हातात घेतलाही होता. पण परत धीर नाही झाला. काय बोलणार नाही का? मग वाटलं, चार ओळींचा एखादा मेसेज टाकावा. टाईपही केल्या होत्या, त्यातल्या दोन ओळी... पण परत डिलीट करून टाकल्या. कारण त्या चार ओळींमध्ये मी व्यक्त होऊ शकलो नसतो.


गेल्या दहा वर्षांत तुझ्याबद्दल एक ओळही लिहिली नाही... तुला वाटलं असेल मी विसरून गेलोय.


पण आता लिहिलं... म्हणजे याचा अर्थ तुझी आठवण आली असा थोडीच आहे... मी तर तुला कधीच विसरून गेलोय...


जाऊ दे! मला नीट खोटंही बोलता येत नाही. तूच म्हणायचीस ना!


कबूल!


आज तुझी खूप आठवण येतेय. अगदी कबूल!


'ना है ये पाना... ना खोना भी है... तेरा ना होना जाने... क्यों होना भी है...' गाणं लागलंय. आजही हे गाणं लागलं की, असा बेचैन होतो. कधीकाळी हे गाणं ऐकलं की, डोळ्यांतून आभाळ वाहायला लागायचं. आता असं काही होत नाही. पण मन दाटून येतं, एवढं नक्की! खरं म्हणजे मला हे सगळं विसरून जायचंय. काही म्हणता काही आठवायला नकोय. पण नाही विसरता येत. आजही आभाळ भरून आलंय. मनही भरून आलंय...


भर पावसात तुझ्यासोबत खाल्लेल्या पाणीपुरीची चव अजून जिभेवर आहे. कशी विसरू शकेन मी ती ओली चव?


तुझ्या पार्किंगमध्ये येऊन हातात कोणतेही रंग नसताना दोन बोटं तुझ्या गालाला लावली होती...


आतापर्यंत प्रत्येकवेळी तू रंग खेळली असशील. पण मला खात्री आहे. मी लावलेला तो रंग अजूनही गेला नसेल. कसा विसरू शकेन मी तो रंग?


तू जवळ असलीस की, तुझ्या अंगाला येणारा कस्तुरीसारखा सुगंध... आजपर्यंत खूप शोधूनही सापडला नाही. तो सुगंध मी कसा विसरू शकेन?


पहिल्यांदा तुला मिठीत घेतले तो क्षणही विसरू


शकत नाही आणि आपण शेवटचं भेटलो; तेंव्हा तुझ्या डोळ्यातून ओघळलेल्या त्या आसवालाही विसरू शकत नाही. तरीसुद्धा मला हे सर्व विसरायचं आहे. म्हणूनच नाही लिहावंसं वाटत काहीच...


पण वाचणाराचं काय?


ते तर दोन शब्दांच्या मधल्या जागेतलंही वाचून काढतात!


तू माझ्या अॉफिसला जॉईन झालीस. पण मी तसा अॉफिसला कमीच असायचो. कायम साईटवर कामे चाललेली असायची. बाकी तुझ्या सेक्शनशी अधूनमधून काही काम असले; तरच माझा संबंध यायचा. अगदीच नाही तर मंथएंडला. तोही रिपोर्ट करण्यापुरताच. तू जॉईन झाल्यानंतरच्या पहिल्या मंथएंडला मी तुझ्या सेक्शनला आलो, तेंव्हाच तुला पहिल्यांदा पाहिले. तुझ्या अगोदर तिथे एक कार्टून होते. बाई फारच अघळपघळ होत्या. मीही तसा जॉलीबॉय होतो. त्यामुळे बरीचशी दिल्लगी चालायची. पण त्या दिवशी नेमकी तू दिसलीस. पाहता क्षणी प्रेमात पडलो वगैरे असली भंकस मी करणार नाही. तू इतर चारचौघींसारखी असलीस, तरी दोन गोष्टी तुझ्याकडे स्पेशल होत्या. एक तर तुझे चाफेकळीसारखे लांबसडक नाक... आणि दुसरे म्हणजे तुझे घारे डोळे. लहानपणी पाहिलेल्या निवडूंग सिनेमातील अर्चना जोगळेकरसारखी वाटलीस तू तेंव्हा. बास! यापेक्षा जास्त काहीच नाही. आजपर्यंत मी डझनभर तरी अफेअर केलेले होते. तू तरी काही त्यांच्यापेक्षा वेगळी नव्हतीस. अगदीच मग... 'नया पंछी आया है, जाल बिछाना पडेगा!' असा फारतर विचार नक्कीच मनात आला होता.


त्यानंतर बर्‍याच वेळा आपली भेट झाली. कधी लिफ्टमध्ये... कधी बसस्टॉपवर... कधी मधल्या ब्रेकमध्ये कॉफी घेताना... तरीसुद्धा आपली बर्‍यापैकी ओळख होऊनही आपल्यामध्ये काही जवळीक वाढावी, असे काही घडले नव्हते. एक फाईल घ्यायला मी तुझ्या सेक्शनला आलो होतो. तुझ्या पीसीमधून काही डाटा कॉपी करून घ्यायचा म्हणून मी तुझ्याजवळ आलो. मी तुझ्या पाठीमागे थोडासा वाकून स्क्रिनवर पाहत होतो. तुला कल्पनाही नव्हती. तू अचानक वर पाहिलेस. फक्त इतकेसे अंतर आपल्यामध्ये होते. बस्! त्या क्षणी ओठांवर ओठ टेकवावेसे वाटले होते. त्या दिवशी अजून एक शोध मला लागला होता. तुझ्या डोळ्यांपेक्षा व नाकापेक्षाही सुंदर तुझे ओठ आहेत.


मग मात्र माझे अॉफिसला येणेजाणे वाढले. वाढले म्हणजे मीच काही ना काही निमित्त काढून येऊ लागलो. माझी स्वतःची बाईक असतानाही अॉफिस सुटण्याची वेळ गाठून मी बसस्टॉपला थांबायचो. तू निघून गेलीस की, बाईक घेऊन मग मीही निघायचो. आपल्या बर्‍याचशा भेटी योगायोगाने झालेल्या नव्हत्या, हेही कबूल करतो मी. तब्बल सहा महिने गेल्यानंतर तुझ्याकडून कॉफीची अॉफर आली. आपण ठरवूनही जे होत नाही, ते असे योगायोगाने होते. त्यादिवशी मला उशीर झाला होता साईटवरून परतायला. तू भेटण्याची एक टक्काही शक्यता नव्हती. शेवटी नशिबालाच माझी दया आली असावी. काय योगायोग बघ ना! नेमका त्याच दिवशी तुलाही अॉफिसमधून बाहेर पडायला उशीर झाला होता. अचानक तुला बसस्टॉपवर पाहून मला जो आनंद झाला होता, तो मी शब्दांत सांगूच शकत नाही. सरळ तुझ्यासमोर बाईक आणून उभी केली. उशीर झाल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मी हेल्मेट काढताच तू ओळखीचे स्माईल दिले. माझ्यासाठी तेवढे पुरेसे होते.


"एक कप कॉफी मिळणार असेल, तर हवे तिथे सोडू शकतो. फक्त कॉफी घरची हवी."


एखादी शिकार करायची असेल; तर शिकारीच्या मागे जाळे घेऊन फिरायचे नसते. एका ठिकाणी जाळे लावून रानात हाकारे सोडून सावज जाळ्याकडे आणायचे असते. मला तुझ्याबद्दल कुछ तो होने लगा है, याची जाणीव न होऊ देता माझे आता तेच काम सुरू झाले होते. कॉफीच्या निमित्ताने तुझ्या घरी येऊन तुझ्या घरच्या लोकांशी ओळख करून घ्यायची आणि मग त्यांचे माझ्याबद्दल चांगले मत झाले की, मग फासे टाकायचा; माझा इरादा होता.


"घरी कोण कोण असतं?" तुझ्या आईने विचारलेल्या प्रश्नाला मी एक जादाची पुरवणी जोडली.


खरं म्हणजे माझे लग्न झालेले नसतानाही मी खोटे बोलतोय हे पाहून तू मोठे केलेले डोळे माझ्या नजरेतून सुटले नव्हते. पण मनातून मी मात्र हसलो होतो. हेच तर मला हवे होते. त्यानंतर बरेच दिवस तू पिच्छा पुरवलास. मी मात्र विषय टाळत राहिलो. बाण सोडायचा असेल तर एवढी दोरी तर ताणावी लागणार होती.


आठवतंय? शनिवार रविवारला जोडून सुट्टी आल्यामुळे अॉफिसमधल्या ग्रुपमध्ये कुठेतरी बाहेर फिरायला जायचे नियोजन चालले होते. म्हणतात ना! आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस. तुझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ मिळणार असल्यामुळे मी पुढाकार घेऊन मुळशी, ताम्हिणीमार्गे रायगड करून हरिहरेश्वरला जायचे. तिथून मुरूड जंजिरा करून परतीचा प्रवास असे एका मुक्कामाचे नियोजन केले. नाही हो करत करत पंधरा ते सोळा लोक तयार झाले. काय धमाल केली होती ना आपण! कोणी काय... कोणी काय... काय काय पदार्थ आणले होते खायला... शेवटपर्यंत काय खातोय, तेच कळत नव्हते. देवकुंड धबधब्यावर तर एकालाही कोरडा ठेवला नाही. तू नंतर मला विचारले होतेस ना? 'मध्येच आम्ही कुठे गेलो होतो म्हणून?'


"अरे! दोस्त लोकांच्या काही गमती असतात." तेंव्हाही तुला हेच उत्तर दिले होते.


देवकुंड सोडल्यावर गाण्याच्या भेंड्यांची तर अशी काय जुगलबंदी चालली होती! सुरुवातीला मी थोडा शांतच बसलो होतो. सगळे थकले की, आपली शस्त्रे बाहेर काढायची होती मला. रायगड पायी चढायचे नियोजन होते. गाणी म्हणत गप्पा मारत वर पोहचलो तरी थकवा फारसा जाणवला नाही. शेवटी शेवटी तर मी जुनी ठेवणीतील गाणी सुरू केली. एकेक मेंबर गळून गेला. शेवटपर्यंत फक्त आपण दोघेच उरलो होतो. बाकीचे फक्त सुरात सूर मिसळत होते. बाकीचे फक्त गाणी म्हणत होते. आपण खरंच फक्त गाणी म्हणत होतो का? शब्दाशब्दांतून एकमेकांकडे पाहत चेहऱ्यावर बदलणारे भाव बरंच काही सांगत होते. 'आँखों ही आँखों में इशारा हो गया' म्हणताना मी नकळत डावा डोळा झाकला होता... तर तुही 'ना ना करते प्यार हाय मैं कर गई' म्हणून दोन्ही हातांनी चेहरा झाकून लाजली होतीस. मला वाटतं एवढे पुरेसे होते आपल्याला.


परत खाली उतरताना अंधार पडला होता. वर जाताना एकत्र ग्रुपमध्ये गेलो असलो तरी येताना मात्र थकलेली मंडळी मागे पडू लागली. आपण दोघेच गप्पांच्या नादात सर्वांना सोडून वेगळे झालो. पुन्हा एकदा तू तोच प्रश्न विचारला. मी मग नाटकीपणे सांगितले की, "होय! खरंय ते. मी गुपचूप लग्न केलेय. घरीही अजून माहीत नाही. योग्य वेळ आली की, सांगणार आहोत." गंमत म्हणजे नेमका त्याचवेळी एका मैत्रिणीचा फोन आला होता. मला विचारले कोण आहे म्हणून. मी मजाकमध्ये सांगितले, "आहे तुझी सवत." तुला मी बायको बोलतेय. तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून सांगून फोन दिला. तिनेही तुझी गंमत केली. तू मात्र गडबडून जाऊन फोन ठेवून दिला. तिथून खाली येईपर्यंत तू माझ्या न झालेल्या प्रेमविवाहाची गोष्ट ऐकत होतीस. कुठेतरी करपल्याचा वास येईपर्यंत मीही रंगवून सांगत राहिलो. अंधारातून चालताना आधारासाठी हातात घेतलेला हात नकळत तू सोडून दिलास आणि मी पुन्हा हसलो.


"का हसलात?"


दुसऱ्या दिवशी हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सगळे मनमुराद खेळत होते. मी मात्र डोंगर प्रदक्षिणा करायचे ठरवले. या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. येथून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. तूही माझ्यासोबत यायला लगेचच तयार झालीस. अशावेळी तुझ्या सोबतीने फिरण्याचा आनंद स्वर्गीय होता. येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमत होता. त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसत होती. आपणही त्याच तरंगलहरीवर झोके घेत चालत होतो. या सागराचे संगीत ऐकताना मनाला मिळणारी शांतता अकल्पित होती. आयुष्यातील चिंता, काळज्यांना तात्पुरता का होईना पूर्णविराम मिळाला होता. मी नकळत थांबलो आणि एक पाऊल मागे येऊन तुझ्या डोळ्यांत पाहिले; तेंव्हा तुझीही अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. एक खेळ म्हणून सुरू केलेला डाव आता वेगळ्याच वळणावर आला होता.


"मी काल खोटं बोललो. माझं लग्न वगैरे काही झालेले नाही. पण आज... आता... याक्षणी मला लग्न करावेसे वाटतेय. आतापर्यंत मी फ्लर्ट करत होतो. आज मी मनापासून सांगतोय... आणि अगदी खरं!"


काय होतेय हे कळायच्या आत तू मला मिठी मारलीस आणि का कोण जाणे पण रडायला लागलीस. यापेक्षा शुद्ध आणि पवित्र दुसरे काही असूच शकत नाही.


त्या स्वर्गीय क्षणार्धात माझे आयुष्य बदलून गेले. पुढे आपण जंजिरा पाहिला... अगदी पालीच्या गणपतीला जोडीने पाया पडलो. कोणीतरी मला सांगितले होते की, घारे डोळे लबाड असतात. पण मला मात्र ते सागरासारखे अथांग वाटू लागले होते. यानंतर आपली जवळीक वाढतच गेली. पुण्यात आल्यानंतर तर आपण कित्येक वेळा भेटलो... विकेंडला फिरायला गेलो. तासन् तास फोनवर बोललो. मेसेजवर मेसेज पाठवून रात्री जागवल्या. तुझे पाणीपुरीचे वेड असो वा हातावरची मेंहदी असो... तुझ्या पायातले पैंजण असो वा तुझ्या केसांना येणारा गंध असो... मी वेडा झालो होतो.


अलीकडे घरच्यांना माझ्या लग्नाची काळजी लागलेली होती. पाहायला आलेल्या कुणीही मला पसंत केलं असतं. नापसंतीचा प्रश्नच नव्हता. बाबांच्या अपेक्षा मात्र थोड्या जास्तच होत्या. त्यांना माणसं कशी तोलामोलाची हवी होती. मला काय हवंय? याच्याशी त्यांना काहीएक देणंघेणं नव्हतं. त्यांच्या मनासारखं स्थळ मिळालं की, मी फक्त होकार द्यायचा... अर्थात तोही विचारला तर! अशा परिस्थितीत नेमका तू माझ्या आयुष्यात आलास. हे प्रेम वगैरे मला न परवडणारी चैन होती. माझ्या एका चुलत बहिणीने ही चूक केली होती. काय रामायण महाभारत घडले होते त्यानंतर. त्यामुळेच मी प्रेमात वगैरे पडण्याचा प्रश्नच नव्हता. प्रेमविवाह तर स्वप्नातही येणार नाही. पण तुझ्याशी ओळख झाली आणि मी नकळतपणे हरवत गेले. तू म्हणजे एक कधीही न सुटणारं कोडं होतास. आजही ते कोडं मला सुटलेलं नाही. तुझी प्रत्येक गोष्ट भन्नाट असायची. तसा तुझ्या बर्‍याच गोष्टींचा रागही यायचा. तू जेंव्हा अॉफिसमध्ये यायचास; तेंव्हा इतर मुलींशी इतका अघळपघळ बोलायचास. अरे! कधीकधी चक्क तू त्यांच्या डब्यात जेवायचास. त्यात तू तुझं लग्न झालंय म्हणून सांगितलंस; तेंव्हा तर मला आश्चर्य वाटलं होतं. मग तू तुझी प्रेमकहाणीही सांगितलीस. खरं म्हणजे तुझ्याकडे मी ओढली जावे, याची एक टक्काही शक्यता नव्हती.


कितीतरी गोष्टी आपल्याही नकळत घडून जातात. त्याचा ठसा मात्र आयुष्यभर टिकून राहतो. किती साध्या साध्या गोष्टी असतात. परंतु आपण मात्र हळूहळू त्यात गुंतत जातो. मी तुझ्यात कधी गुंतत गेले, ते मलाही कळलं नाही. खरं म्हणजे किती सहजपणे तू मला प्रपोज केलं होतंस... त्याहीपेक्षा जास्त म्हणजे हे सुख मला आयुष्यभर मिळू शकणार नाही, या जाणिवेनेच माझ्या डोळ्यांत पाणी आलं होतं. तुझ्यासोबत जेवढा वेळ मला मिळाला, तो अगदी स्वप्नातल्या सारखा होता. वाटतो तितका तू डँबीस नाही, हे तेंव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. तरीसुद्धा तू वेडा आहेस. याची मात्र मला कायम भीती वाटायची. तुझं स्मोकिंग करणं मला आवडलं नव्हतं. तुला सांगून काही उपयोग होणार नव्हता. तरीदेखील मी तुला सांगितलं. तर अगदी साळसूदपणे काय म्हणालास आठवतंय का?


"होठों को आदत सी हो गई है... अब आप अपनी सौतन की जगह लेना चाहती हो तो कश या किस... आपका फैसला...!"


तुझा वाढदिवस... मी काय काय ठरवले होते. पण नेमका तू अचानक गावाला निघून गेलास. मला प्रॉमिस केलं होतंस म्हणून आलासही. पण किती उशिरा? मी बाहेरही येऊ शकत नव्हते. तरीसुद्धा काही निमित्त काढून दहा मिनिटांसाठी बाहेर आले. गुपचूप तुला विश करून तुझे गिफ्ट तुझ्या हातात ठेवले. पण तू मात्र मलाच गिफ्ट देऊन गेलास. आजही तुझ्या उष्टावलेल्या केकची चव माझ्या ओठांवर आहे. एकाच ग्लासमधून पिलेल्या मस्तानीची चव असो वा तुझ्या हातून खाल्लेल्या पाणीपुरीची चव असो... तुझ्यासोबत बाईकवरून फिरताना तुझ्या पाठीवर डोकं टेकवून नुसतं भटकत राहावं, असं वाटायचं. हे सगळं माझ्यासाठी स्वप्नासारखं होतं. पण स्वप्नं कितीही गोड असली तरी शेवटी डोळे तर उघडावेच लागतात.


अखेर माझ्या आईवडिलांना त्यांच्या मनासारखे स्थळ सापडले. माझ्या होकार नकाराचा प्रश्न होताच कुठे? बाबा गावाला जाऊन सर्व काही फायनल करून आलेले. तुला हे सर्व कसं सांगायचं? हा माझ्यापुढे प्रश्न होता. मुळात मी काय करू? हा त्याहून मोठा प्रश्न होता. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून प्रेमाची आहुती देणं आणि तुझ्यावर प्रेम करणं असे दोनच पर्याय माझ्याकडे होते... काय करावे तेच सुचत नव्हते. तुझ्यासोबत आयुष्य घालवण्याची इच्छा तर होती... पण धाडस नव्हते. तू अगदी बरोबर म्हणतोस... मला कुठे जायचे हे कधीच माहीत नसते... कायम गोंधळून गेलेली असाते. पण काय करू मी तरी...? एवढी गुंतागुंत वाढवून ठेवली होती मी माझ्याच हाताने... तुला तर सगळेच माहीत आहे... आतल्या आत किती गुदमरून गेली होते मी... मी इतकी हतबल झाली,होते की, सारं नियतीच्या हातात ठेऊन रोज अश्रू गाळत होते... खूप सोपं होतं तुझ्यासोबत पुढे जाणं... तुझ्या आनंदासाठी किंबहुना आपल्या आनंदासाठी...


पण...


परंतु...


या शब्दांजवळ गाडी अडकून पडली होती. तुला हे सर्व कळल्यावर तुझी प्रतिक्रिया काय असेल, याची मला अजून भीती वाटू लागली...


जेंव्हा तो मुलगा मला पाहायला आला; तेंव्हाच मी त्याला पाहिले होते. त्याच दिवशी मी घाबरत घाबरत तुला हे सगळे सांगितले; तेंव्हा तुझी प्रतिक्रिया एवढीच होती... "तुला पसंत आहे का?"


खरंच तो मला पसंत होता का?


"तुझ्यासारखाच उंच होता... सावळा होता... पण तो शांत वाटला. अगदी अप टू डेट राहणीमान होते त्याचे. पण म्हणून मी त्याला पसंत करावे का?"


"काय करतो?"


बँकेत आहे. परमनंट. पंचवीस हजार पगार आहे. घरचेही चांगले आहे. शेतीवाडी वगैरे आहे म्हणत होते बाबा."


"मग बरंच आहे की... माझ्यापेक्षा पाच हजाराने पगार जास्तच आहे. माझ्या घरी म्हणशील तर तुझ्या बाबांना पसंत पडेल, अशी परिस्थिती नाही. महत्त्वाचे म्हणजे तो तुझ्या जातीतला आहे."


"हो ना! बाकी परिस्थिती वगैरे बाबांना कनव्हेन्स करता आले असते. पण आपल्या इंटरकास्ट मॅरेजला बाबाच काय पण आमच्या घरी कोणीच तयार होणार नाही. माझ्या चुलत बहिणीने तर जातीतल्या मुलाशी लग्न केले होते. तरीसुद्धा लव्हमॅरेज चालले नाही घरात. तिला परत आणून जबरदस्तीने लग्न लावले तिचे. काय झाले शेवटी? त्याला तर मारहाण केलीच. पण माझ्या बहिणीनेही पेटवून घेऊन सुसाईड केली. आपल्याही बाबतीत असे काही घडू नये, याची भीती वाटतेय मला."


"तुझ्या घरच्यांचे सोड. तुला चालतोय का परजातीचा?"


"मी तुझी जात पाहून प्रेम केलेय का? माझंच चुकलं. आपण वेळीच सावरायला हवं होतं. ही वेळ आलीच नसती आपल्यावर. मला खरंच तू खूप आवडतोस रे... पण मला धीर होत नाही. काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. पुढील महिन्यात माझा साखरपुडा आहे."


"तुझा माझ्यावर विश्वास असेल; तर बघ. माझ्या घरातून तुला घेऊन जावं, एवढी कुणाची ताकद नाही. मी जिवंत असेपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. पण हा निर्णय आपल्याला नाही... तुला घ्यायचाय! तुझा निर्णय मला मान्य असेल. आलीस तर शेवटच्या श्वासापर्यंत... नाहीस तर आपण कधी भेटलो होतो, हेच विसरून जायचं. चुकून कधी अनोळख्या वाटेवर भेटलोच... तर ओळखसुद्धा दाखवायची नाही."


"किती कठोर आहेस रे तू? जर चुकून नाइलाजाने मला आपल्या हिताचाच विचार करून उलट निर्णय घ्यायची वेळ आली तर...? भेटणारही नाहीस पुन्हा? आपले प्रेम तू एवढ्या सहज विसरू शकतोस तरी कसा? मला तुझ्या असल्या वेडेपणाचीच भीती वाटत आलीय कायम."


त्यानंतर तू थेट मला घराजवळ सोडलेस. जाताना वळूनही पाहिले नाहीस साधे. मी वेड्यारखी फक्त पाहतच राहिले. पुढचे दोनतीन दिवस नीट बोललाही नाहीस माझ्याशी. फोनही उचलत नव्हतास. बहुधा गावी गेला होतास ना पुन्हा. माघारी आल्यावर मला फोन करून भेटायला बोलावले; तेंव्हा तर मी घाबरून गेले होते. तुला कसं समजावून सांगावं, हेच मला कळत नव्हतं. मुळात मीच अजून कुठलाही निर्णय घेऊ शकले नव्हते. दोन गोष्टी या काळात घडल्या होत्या. परंतु तुझ्या सणकी स्वभावामुळे तुला सांगण्याचा धीर झाला नाही. एक म्हणजे दररोज संध्याकाळी मला माझ्या होणाऱ्या नवर्‍याचा फोन येत होता... दुसरे म्हणजे तू नसताना तो मला भेटून गेला होता. तुला काही सांगण्याआधीच तू मला 'स्वारी' म्हणालास आणि माझ्याकडे आठ दिवसांची वेळ मागितली. या आठ दिवसांत मी तुला भेटू शकणार नव्हते नि फोनसुद्धा करायचा नव्हता. हे असले कठोर निर्णय तूच घेऊ शकतोस.


"मी हे आठ दिवस तुझ्याशिवाय कशी राहू शकते?"


"माझ्याशिवाय आयुष्य काढण्यापेक्षा आठ दिवस फार जास्त नाहीत. तुलाही सवय व्हायला हवीच ना!"


मला नंतर समजले की, तू चक्क! तुझ्या घरी जाऊन तुझ्या घरच्या लोकांना आपल्याबद्दल सर्व सांगितले होतेस. या धक्क्याने तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते. ते आठ दिवस तू हॉस्पिटलमध्येच होतास. अरे किती वेडा आहेस तू! आपले लग्न झालेले नसतानाही तू आपण लग्न केलेय म्हणून खोटेच सांगितलेस. आज तुझ्या आईची ही अवस्था झाली, याला तुझा मूर्खपणाच कारणीभूत होता. माझ्याही घरी असे काही कळले तर त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण होईल. याआधी बाबांना एक मेजर अॅटॅक येऊन गेलेला आहे. माझ्या भावाला बहुधा आपल्याबद्दल कुणकुण लागली असावी. त्याने तुला फोन केला होता. पण नेमका त्यावेळी तू घरी नव्हतास, हे एक बरं झालं! तुला कळल्यावर तू किती चिडला होतास. तू थोडासुद्धा शांतपणे विचार करायला तयार नव्हतास. अशा परिस्थितीत मी तुझ्यासोबत कसे आयुष्य काढू शकणार होते? तुझ्याशिवाय ते आठ दिवस मी कसे काढले असतील, याची थोडीतरी कल्पना तुला होती का? एक मुलगी असूनही मी माझे सर्वस्व तुला दिलेले होते. ते काय माझे तुझ्यावर प्रेम असल्याशिवाय? तुझी चिडचिड मला समजत होती. पण मलाही समजून घ्यावे, असे कधी तुला वाटले नाही का?


शिकार करण्यासाठी म्हणून कोळ्याने जाळे विणावे आणि स्वतःच्याही नकळत स्वतःच त्यात अडकून पडावं... असंच काहीसं माझंही झालं होतं. आजपर्यंत प्रेमाकडं केवळ एक खेळ म्हणून मी पाहत होतो. पण या खेळात माझीच विकेट पडली होती. मी हळूहळू तुझ्यात एवढा गुंतत गेलो होतो की, आता त्यातून बाहेर पडणे माझ्यासाठी अवघड झाले होते. खरं म्हणजे तुझे लग्न ठरल्याचे कळले आणि त्याक्षणी मी आतून कुठेतरी हललो. आपल्या हक्काची एखादी गोष्ट कुणीतरी हिरावून घ्यावी... इतकी की, आपल्यालाच ती परकी होऊन जावी. हे परकेपणच अंगावर धावून येत होते. एखादे लहान मूल आपल्या खेळात मश्गूल होऊन जावे... जगाचाही त्याला विसर पडावा आणि तेवढ्यात त्याचे खेळणेच कुणी काढून घेतल्यानंतर त्याची जी आदळआपट सुरू होते... अगदी तशीच अवस्था माझीही झाली होती. फक्त फरक एवढाच होता की, माझी ही तडफड आतल्या आत चालू होती. कुणाला दाखवताही येत नव्हती. तुझाही निर्णय होत नव्हता. निदान तुला तसं वाटत होतं. खरं म्हणजे तुझा निर्णय झाला होता. सध्या तुझ्या दृष्टीने माझ्यापेक्षा तुझ्या होणाऱ्या नवर्‍याचे पारडे जड होते. तुझ्या बोलण्यातून ते जाणवत होते. मी माझ्या घरात एवढे रामायण होऊनही फक्त तुझा माझाच विचार करत होतो. तुला मात्र तुझ्या घरचा प्रश्न सोडवता येत नव्हता. तू कुणालाही दुखवायला तयार नव्हती. माझ्याबरोबर आल्यानंतर येणाऱ्या अडचणींपेक्षा घरच्यांनी ठरवल्याप्रमाणे लग्न करून सर्वांचेच समाधान करण्याचा तुझा प्रयत्न तुझ्यासाठी जास्त सोपा होता.


जग त्याच्या गतीने त्याच्या नियमाने चालते...


ते आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या इच्छेनुसार चालावे, हा अट्टहास व्यर्थ...!


तुझा निर्णय मी मान्य केला असला तरी अजूनही काही चमत्कार घडेल आणि विस्कटलेले स्वप्न पुन्हा जुळून येईल, अशी वेडी आशा मनाला वाटत होती. मी पुन्हा पुन्हा तुझ्या निर्णयावर तू फेरविचार करावास, म्हणून तुला कनव्हेन्स करत होतो. तू मात्र हळूहळू तुझा निर्णय आपल्या दोघांच्याही कसा हिताचा आहे, हे माझ्या गळी उतरवत होतीस. तसतशी माझी तडफड वाढली होती. तुझ्या मैत्रिणीनेही तुझ्याच बाजूने कौल दिला होता. आणि माझे मित्र? त्यांनी तर इकडे आळंदीत सगळी सेटींग लावली होती. एकदा तुला उचलले की, त्यांचे काम सुरू होणार होते. पण तूच या गोष्टीला तयार नव्हतीस. मला मात्र तू स्वतः निर्णय घ्यायला हवा होता. कुठलीही जबरदस्ती नको होती. आता हातावर हात ठेवून भागणार नव्हते. शेवटी काहीतरी डोके लावावे लागणार होते. तू निर्णय घ्यायला तयार नाहीस. मग परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळावी लागणार असे दिसू लागले.


मी तुझ्या होणाऱ्या नवरोबाला भेटून वस्तुस्थिती त्याच्या कानांवर घालून त्यानेच हे लग्न करण्यासाठी नकार कळवायचा, असा प्लॅन केला. तुला मात्र कुठूनतरी याची कुणकुण लागली. कदाचित मीच तुला हे बोलून गेलो असेन. तू मात्र अशी काही भडकलीस की, आपणच काहीतरी खूप मोठा धोका पत्करतोय असे वाटले. "जर त्यांना यातले काही कळले आणि माझ्या घरात काही वादळ उठले; तर मी त्यालाच काय तुलाही मिळणार नाही. जिवाचे काहीही बरेवाईट करून घेईन. तुला मी सुखी व्हावे, असे वाटत असेल; तर मला विसरून जा." बस्! ती आपली शेवटची भेट ठरली. यापुढे एकमेकांमध्ये अजिबात गुंतायचे नाही, आपलं तसं अगोदरच ठरलं होतं. आणि आपण वेगळे झालो; तेंव्हादेखील यापुढे आपण पूर्णपणे अनोळखी व्हायचं. चुकूनही एकमेकांच्या वाटेवर यायचे नाही, असा कठोर निर्णय घेतला होता. तरीदेखील तुझ्याबाबतीत मी आजही एवढे हळवे का व्हावे? त्यानंतर तुझे तुला हवे तसे लग्न झाले. मी आलो होतो लग्नाला. मी काही वेडावाकडा प्रकार त्यावेळी करणार नव्हतोच. तरीसुद्धा तुझ्या भावाचे मित्र माझ्यावर लक्ष ठेवून का होते? सदैव माझ्या आसपास का घुटमळत होते? तुम्हा दोघांना शुभेच्छा द्यायला मी स्टेजवर आलो; तेंव्हा तर मला समोर बघून तुझ्याही काळजाचा ठोका चुकला होता ना? तुम्हांला शुभेच्छा देऊन मी तडक बाहेर पडलो. मला खात्री होती आणि आजही आहे... मी दिसेनासा होईपर्यंत तुझी नजर माझ्यावरच होती.


एवढ्या वर्षांत आपण पुन्हा कधीच एकमेकांसमोर आलो नाही. चुकून तुला कधी... कुठे... दिसलो असेनही. सुरुवातीला काही दिवस तुझे मेसेज आलेही. तुला माझी खूप आठवण येते... तू खूप सुखात आहेस... तुझा नवरोबा खूप समजूतदार आहे... मी फारसे दुःख मानू नये... मीही लग्न करून सुखी व्हावे... आणि आजपर्यंतचे सर्व मेसेज, फोटो डिलीट करून टाकावे इत्यादी वगैरे... वगैरे...


माझे काय गं...? पहिले काही दिवस मी एकांतवासात गेलो... एकटा असताना खूप रडलो... डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली... दाढी वाढली... सिगारेटी फुंकून... दारू पिऊन देवदास झालो... या सगळ्या नाटकाचा कंटाळा आल्यावर लग्न करून मोकळा झालो.


भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी...


अर्ध्या वरती डाव मोडला अधुरी एक कहाणी...


असंच ना? छे! हे खरं नाही.


ग्रेट नेपोलियन बोनापार्टलाही एक मुलगी आवडली होती. त्याने तिला प्रपोजही केले होते. त्यावेळी तो एक साधा सैनिक होता. तिने एका अधिकाऱ्यासोबत लग्न केले. ती म्हणाली होती, तो तुझ्यापेक्षा उंच आहे.


नेपोलियन इटलीचा सम्राट झाला होता, त्या कार्यक्रमात ती इतर लोकांबरोबर त्याला शुभेच्छा द्यायला स्टेजवर गेली; तेंव्हा त्याने तिला हळूच एकच प्रश्न विचारला होता...


अजूनही तो माझ्यापेक्षा उंच आहे का?


तिने समोर मैदानावर पाहिले; तेंव्हा संपूर्ण सेना नेपोलियनला सलामी देऊन उभी होती... अगदी तिचा अधिकारी नवराही...!


#ती_सध्या_काय_करते?


पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट...


ती सध्या तिच्या संसारात सुखी आहे...


होय!!!


ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...


सकाळ संध्याकाळ ती स्वयंपाक करते...


नवरोबाचा टिफीन भरून देऊन त्याला बाय करते...


मुलाबाळांचे उरकून त्यांना शाळेत नेऊन सोडते...


घरातील कामे उरकून उरलेल्या वेळात टि.व्ही.वरच्या सासबहूच्या सिरियल पाहते...


ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...


इन्स्टॉलमेंटवर घेतलेल्या फ्लॅटचे व कारचे हप्ते फेडते


व उरलेल्या पैशातून...


अधूनमधून शॉपिंग करते... हॉटेलिंग करते...


नवरोबाला सुटी मिळाली की,


महिना दोन महिन्यातून आऊटींगलासुद्धा जाते...


आणि मग...


तिकडचे चारदोन फोटो फेसबुकला अपलोड करते...


ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...


माझ्या सिगारेटला विरोध करणारी ती


नवरा फक्त अॉफिसमधल्या लोकांबरोबरच मोठ्या हॉटेलात बसून भारीतली ड्रिंक करतो.


याचे गोडवे गाते...


कधीकाळी माझ्यापेक्षा तब्बल पाच हजार रुपयांनी जास्त असलेल्या आणि आज माझ्यापेक्षा फक्त पंचवीस हजारांनी कमी असलेल्या पगारात नेटाने घर चालवते. मधल्या वेळात कुठे पार्टटाईम जॉब मिळेल का? याचा शोध घेते...


ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...


प्रेमाने पोट भरत नाही.


यावर तिचा आजही गाढ विश्वास आहे...


संसारात ऊनसावली चालायचीच.


कधीतरी भारी दिवस येतील,


यावर तिची श्रद्धा आहे...


पण कातरवेळ झाली की,


तुळशीपुढे दिवा लावताना...


भूतकाळातल्या सावल्यांनी ती कासावीस होते...


बाकी ती तिच्या संसारात एकदम सुखी आहे...


पूर्वीप्रमाणे ती गझल ऐकत नाही...


नाटक पाहत नाही...


अंधार चावट असतो म्हणून


ती सिनेमालाही जात नाही...


पाणीपुरी भंपक असते म्हणून


ती तिकडे ढुंकूनही पाहत नाही...


मंदिरात गेल्यावर ती थोडावेळ पायरीवरही बसत नाही...


चांदणं कधीकधी तापतेही म्हणून


माझी आठवण येईल असे ती काहीही करत नाही...


कारण ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...


तिला माझ्या कवितेत स्वतःला शोधण्याची


अजिबात गरज नाही...


मिठीतल्या श्वासात धुके दाटण्याची तर


आवश्यकताही वाटत नाही...


मला आवडायचा म्हणून


आजही ती मोगरा माळत नाही...


मेंहदीला कुठे प्रेमाचा रंग असतो का?


म्हणून मेंहदीही लावत नाही...


मोकळ्या केसांच्या गंधाने


नवरा बेधुंद होईल यापेक्षा


माझी आठवण सलत राहील,


म्हणून ती ओले केसही मोकळे सोडत नाही...


तरीही ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...


जाऊ द्या ना बाळासाहेब...


सोनू... पिलू... या शब्दांत काही चार्म आहे का?


ती तिच्या संसारात एकदम सुखी आहे...


मग आपणच झुरण्यात


काही राम आहे का?


तुमचा माऊथ अॉर्गन तिला आवडायचा म्हणून


अजून किती दिवस वाजवणार?


हरवून गेलेले सूर


अजूनही किती दिवस आळवणार?


तुमच्या पिल्लाचे डोळे तिच्यासारखेच आहेत...


पण त्या डोळ्यांतले जग फक्त तुमचे आहे...


ती तिच्या संसारात सुखी आहे...


तुम्ही तुमच्या संसारात सुखी आहात...


फक्त अर्धी रात्र सरूनही पापण्या नाहीच मिटल्या....


तर एक दिलासा हा असेल की,


अशाच कित्येक रात्री तिनेही जागवल्या असतील...


ती सध्या काय करते?


ती सध्या तिच्या संसारात सुखी आहे...


बस्!!! फिट्टमफाट!!!


- नंदकिशोर.


(समाप्त)


(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात असेही घडत असेलच. त्यामुळे साधर्म्य आढळल्यास हाही निव्वळ योगायोग समजायला काय हरकत आहे.)