Monday, 2 October 2017

लागीर... (कविता)


बाहेरवसा... बाई झालाय कसा...
नाजूक जिवाला पडलाय फासा...
फडफड पापणी, काळीज धडधड
कोळ्याच्या जाळ्यात गावलाय मासा...

लागीर झालंय जिवाला माझ्या...
डोळ्यांत दाटलं चांदणं राजा...
वाजतोय पावा भूलली राधा...
सावळ्या सख्याची झालीय बाधा...

कदंब वृक्षाच्या खाली...
यमुनेच्या डोहावरती...
कन्हैयाची वाजे मुरली...
दुपार चांदण्याची झाली...
लागीर लागीर झालं जी...
पुरतं लागीर झालं जी...

अनामिका... (कथा)

#अनामिका...

          दोन तास झाले... गाडी तिच्या गतीने धावत होती. खिडकीतून येणाऱ्या थंड वार्‍यासोबत काही वेळापूर्वी होऊन गेलेल्या पावसाचा ओलसरपणा अजूनही जाणवत होता. राहून राहून तिचा विचारही तसाच काही केल्या त्याच्या डोक्यातून जायला तयार नव्हता.  आपल्या हातून जे काही घडले ते चूक होते का बरोबर? याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता. पण जे काही घडले; ते त्या वेळी... कुठंतरी आतून दोघांनाही ओढ होती हे खरं असलं तरी असं काही घडेल... असं त्या क्षणापर्यंत तरी दोघांनाही वाटले नव्हते. इतर कोणाला काय वाटेल, हा विषयच नव्हता. हा विषय फक्त दोघांपुरताच होता. पण खरंच हा विषय त्या दोघांपुरताच होता का? छे! यामध्ये तर अनेक धागे आहेत गुंफलेले. हा गुंता हलक्या हाताने सुटणारा नाही.
          तो घरातून बाहेर पडला तेंव्हा कुठे साडेआठ वाजले होते. टूरवर जाण्यासाठी म्हणून तो घरातून बाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी त्याची एक महत्त्वाची मिटींग होती. पण त्याची गाडी तर पहाटे चार वाजता होती. त्या गाडीने जाऊनही मिटींगच्या आधी चांगला तास दोन तास आधीच तो पोहचला असता. तसा बराच वेळ होता त्याच्याकडे. त्यामुळे तो गाडीच्या तासभर अगोदर जरी घरातून निघाला असता तरी चालण्यासारखे होते. पण रिझर्वेशन केलेले नसल्यामुळे अगोदरच मिळेल त्या गाडीने निघायचे असा विचार करून तो बाहेर पडला होता. अर्थात हे फक्त कारण होते. मुळातच पहाटे लवकर उठून जायचे एकतर त्याच्या नेहमीच जिवावर यायचे. त्यापेक्षा प्रवासात गाडीमध्ये झोप काढून लवकर पोहचायचे. लेट नाईट पोहचला तरी लॉजिंग करून निवांत झोप काढता येते. सकाळी आरामात फ्रेश होऊन मिटींगला पोहचता येते, असा सोईस्कर विचार करूनच तो बाहेर पडला होता. बरं खर्च अॉफिसकडून मिळतो. मग दगदग करा कशाला? स्टेशनला जाण्यासाठी तो टॅक्सीत असतानाच तिचा फोन आला. बस्! तेवढेच निमित्त त्याला पुरले आणि मग ड्रायव्हरला त्याने गाडी वळवायला सांगितली. टॅक्सी थांबली ती थेट तिच्या अपार्टमेंटच्या दारातच.
          डोअरबेलच्या बटनावर ठेवलेले बोट तिने दार उघडेपर्यंत त्याने काढलेच नाही. तिला एकदम सरप्राईज देण्याचा त्याचा विचार होता. पण त्याचं असं अचानक येणं तिला आश्चर्य वाटण्यासारखं असलं तरी तिच्यासाठी अनपेक्षित नक्कीच नसावं. दार ढकलून तो आत गेला; तरी तिच्या चेहऱ्यावर तसे काही दिसले नाही.
     "तुझी मिटींग उद्या आहे ना?"
     "बरं मग...? मला काय बाहेरूनच कटवायचा विचार आहे का तुझा?"
     "तू सरळ बोलणार आहेस का कधीतरी? बरं तू चहाकॉफी काही घेणार आहेस कि जेवणार आहेस? जेवणार असशील तर तू फ्रेश होईपर्यंत पटकन गरमागरम पोळ्या लाटते. पाच मिनिटांत पोळी मिळेल ताटात. तुझ्या आवडीची वांग्याची भाजी आहे."
     "तू जेवलेली नसणारच. जा तयार हो. आज आपण मस्तपैकी बाहेर जाऊया. कँडल लाईट डिनरचा मूड आहे माझा."
     "काही नको. अशीही लाईट गेलेली आहेच. इथेच टेबलवर मेणबत्ती लाव हवी तर आणखी एक. अशा पावसात बाहेर जाण्याची माझी बिलकुल इच्छा नाही."
          त्याच्या उत्तराची वाटही न पाहता ती किचनकडे वळली. तो बाथरूमकडे. यावेळी तो बॅग घेऊन बाहेर पडलाय म्हणजे तो जेवलेला नसणार अजून, हे तिला माहीत होते. तशी ती त्याला चांगली ओळखून होती.
     "तुझी उद्या मिटींग आहे ना?" त्याला जेवण वाढतच तिने पुन्हा विचारले.
     "तूही बस ना!" तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी तो म्हणाला. त्याने सांगण्याची गरजही नव्हती. तिने स्वतःलाही वाढून घेतलेले होतेच. जेवण होईपर्यंत दोघे काही बोललेच नाहीत. खाताना मात्र तिचे लक्ष पूर्णपणे त्याच्याकडेच होते. इतरवेळी कायम बदमाशी करणारा हा जेवताना मात्र फारच इनोसन्ट वाटतो. प्रत्येक घास चाखतमाखत असा काही जेवतो की, आपले जेवण सोडून त्याच्याकडेच पाहत राहावे. त्याचे उरकले, तसे तिनेही हात आखडता घेतला. तसेही तिचे पोट भरले होते. प्रत्येकवेळी जेवणानेच पोट भरते, असे थोडीच असते.
     "तुझं होऊ दे सावकाश." हात धुताना तो इतकंच बोलला.
     "नाही. झालंय माझंही. अॉफिसहून आल्यावर खाल्लं होतं थोडंसं."
     "तू एक नंबरची बावळट आहेस. खात जा जरा तरी. एकदा आरशात बघ व्यवस्थित स्वतःला. मी सांगायला नकोय, पण काय मात्रं करून घेतलंस स्वतःचं ते कळेल तुलाच."
           तो उठून हॉलमध्ये गेला आणि ती शांतपणे सगळं आवरू लागली.
      "मी आलोय म्हणून तू एवढा तरी स्वयंपाक केलास. गरम करून वाढली असली तरी भाजी सकाळची होती, हे कळण्याइतपत अक्कल आहे मला." ती हॉलमध्ये आल्यावर तो बोलला. "फक्त जॅमबरोबर एकच चपाती खाल्लीस तू."
         आपण ज्याला इनोसन्ट समजत होतो, तो जेवताना आपल्यावर लक्ष ठेवून होता तर...
     "एखाद्याच्या ताटावर असं लक्ष द्यायचं असतं का? वाईट सवय आहे ही. पोटात दुखेल अशानं माझ्या."
     "तू अक्कल शिकवू नकोस मला. काही पोटात वगैरे दुखणार नाही तुझ्या. मी पोटभर जेवलोय. तसंही माझं लक्ष तुझ्यावर होतं, तुझ्या ताटावर नाही."
     "पहाटे गाडी होती ना तुझी?" विषय बदलत तिने विचारले.
     "मी आता निघावं... असं सुचवायचंय का तुला?"
      "नाही रे बाबा! मी सहजच विचारलं. तू बसू शकतोस पाहिजे तेवढा वेळ. नाहीतरी मी झोपत नाही एवढ्या लवकर."
     "माहितीय मला. तुझा वाटस्अपचा लास्ट सीन बाराच्या पुढेच असतो. म्हणूनच सांगितलं मघाशी. जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे थोडंसं. तुझ्यासाठी नाही, निदान नेहासाठी. बरं कधी जाणार आहेस तिला भेटायला? त्यापेक्षा तू आईलाच का आणत नाहीस इकडे? नेहा जवळ राहील तुझ्या त्यामुळे." कायम तुटकपणाने बोलणारा हा किती विचार करतोय आपला? या विचाराने तिला थोडे बरे वाटले.
     "तू आराम कर आता. तीनचा अलार्म लावतेय. उरकून गेलास तरी आरामात गाडी मिळेल. चालत गेलास तरी दहापंधरा मिनिटांत स्टेशनला पोचशील. मी आले असते सोडायला. पण तसंही तुझ्या वाढायला लागलेल्या पोटासाठी थोडंसं चालणं पाहिजेच."
      "बरं! पण हे माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे का?"
      "अरे बाबा! दर विकेंडला जाते मी आणि आईला इकडे आणून तिकडे बाबांचे कशाला हाल करू? दीपकचं एकदा का लग्न झालं की मग आई होईल मोकळी?"
      "हं.. तू काय ठरवलंय पुढं?"
      "पाहू. चल गुड नाईट." असं म्हणून ती उठलीही.
      "गुड नाईट काय?" त्याने आपला हात पुढे केला. "मला बरंच काही बोलायचं असतं आणि तू अशी पळत असतेस. ये बस अशी. झोपशील नंतर. निवांत बोलता येईल म्हणून आलोय मी इकडे." खरं म्हणजे तिचा हात हातात घेतला; पण तो सोडावासा वाटेना. तिनेच तो सोडवून घेतला.
     "कॉफी चालेल?" अशा पावसाळी वातावरणात मेणबत्तीच्या उजेडात काहीच न बोलता एकमेकांकडे नुसतेच पाहत कॉफी पिण्यात काही वेगळीच खुमारी असते... कॉफीची चव ठुमरीसारखी खुलत जाते.
     "माझ्या प्रश्नाचं तू अजूनही उत्तर दिलेले नाही."
     "जाऊ दे ना तो विषय. मला नाही बोलायचं त्या विषयावर."
     "प्रश्नांपासून दूर पळण्याने प्रश्न सुटणार आहेत का? तसं असेल तर सोडून देऊ आपण हा विषय. पण तरीही मला वाटतं. तू अजूनही परत एकदा विचार करावास. तुझ्यासाठी नाही... निदान नेहासाठी. म्हणजे 'आई' म्हणून तू कुठे कमी पडतेस, असं नाही म्हणायचं मला. पण लक्षात घे. या वयात तिला तुझ्याइतकीच तिच्या बाबांचीही गरज आहे."
     "हेच नको असते मला. तू असं इमोशनली ब्लॅकमेलिंग करतोस आणि मग मी हिप्नोटाईज झाल्यासारखी त्यावर विचार करायला लागते. पण याबाबतीत मात्र मी ठाम आहे. तुझ्यासारखी फिलॉसॉफी मला जमत नाही. तरीही ऐक. आपल्या बुद्धीला पटो अथवा न पटो... काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. तसेच हेही समज. डिव्होर्स त्याला हवा होता, मला नाही. तुला हेही माहीत आहे की, तसंही मला त्याच्यासोबत आयुष्य काढणं अवघड झाले होते. आणि हो! तू म्हणतोस अगदी तसंच मीही नेहासाठीच सगळं काही सहन करत होते. तू सांगितल्याप्रमाणे मी कितीतरी गोष्टीत अॅडजस्टमेंट करत होतेच ना! तुझ्यातले दहा टक्के जरी त्याच्याकडे समजूतदारपणा असताना तरीही मी एवढ्या टोकाचा निर्णय घेतला नसता. तेंव्हा हा विषय माझ्यासाठी इथेच संपलाय."
     "ओके. आय अॅग्री... मग आता पुढे काय करायचं ठरवलंस तू? का तोही विषय संपला?"
     "डोंट वरी... तुला माझी काळजी वाटते, हे माहितीय मला. माझ्या संसाराचं जे व्हायचं, ते झालंय; पण आयुष्यभर तुझ्यावर ओझं नाही बनणार मी. कॉफी संपली की, रिकामा कप बाजूला ठेवायचा असतो. तो असाच हातात धरून बसल्यामुळे पुन्हा भरत नाही." एवढं बोलून ती हसायला लागली. तेंव्हा त्याच्या लक्षात आले की, खरंच कॉफी संपली होती आणि कितीतरी वेळ तो नुसताच कप हातात धरून बसला होता. तिनेही हा विषय कपासारखा हळूच बाजूला केला.
          तिचे लग्न होऊन आज सात वर्षे होऊन गेली होती. चार वर्षाची एक गोंडस चिमुरडीही आहे. इतर संसारात असते, तशी किरकोळ कुरबुर सोडली; तर जगाच्या दृष्टीने अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार चालला होता. तशातच ध्यानीमनी नसतानाही अचानक त्यांची भेट झाली. म्हणजे तोपर्यंत ते पूर्णपणे अनोळखी होते असेही नाही. त्याच्या सेक्शनमध्ये तिच्या एकदोन मैत्रिणी होत्या... तर तिच्या सेक्शनमध्येही अधूनमधून त्याचे येणेजाणे असायचे. जातायेता कधीकधी लिफ्टमध्ये नजरभेट व्हायची. त्यातच तिच्या मैत्रिणींसोबत हा बर्‍याचवेळा दिसे. एकदोनवेळा तिने तिच्या एका मैत्रिणीला त्याच्या बाईकवरही पाहिले होते. मैत्रीणही बर्‍याचदा त्याच्याबद्दल सांगायची. दोघांमध्ये असू शकेल काही. शौकिन मिजाज वाटतो एकूण. असेच तिचे मत बनले होते. पण लवकरच तिच्या लक्षात आले की, त्याच्या बोलक्या स्वभावामुळे आणि कायम सोडावॉटरच्या बाटलीप्रमाणे ओसंडून वाहणाऱ्या हसण्यामुळे तो सर्वांशीच तशाच खुल्या दिलाने राहतो. एका कामाच्या निमित्ताने दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. तीच पहिली भेट. ती कायम आपल्याच कोषात राहणारी असल्यामुळे या भेटीचे तिला काही विशेष वाटले नाही. पण लक्षात मात्र राहिला हा. इतरांशी कायम हँसीमजाक करणारा असूनही तिच्यासोबत तो किती अदबीने बोलत होता.
           त्यानंतर त्यांची भेट होत राहिली आणि ओळखही वाढत गेली. पण त्याने कधीही मर्यादा ओलांडली नाही आणि त्याच्या वागण्यात तिलाही काही खोट जाणवली नाही. आपल्या मुलाच्या वाढदिवसाची त्याने संपूर्ण अॉफिसला पार्टी दिली; तेंव्हा तीही मैत्रिणीसोबत त्याच्या घरी पहिल्यांदाच गेली होती. त्याने अगत्याने तिची घरच्यांसोबत ओळख करून दिली. आणखी एक गोष्ट तिला लक्षात आली. म्हणजे तिला हसूच आले. तो चक्क त्याच्या बायकोला 'अहो-जाहो' करत होता. बायकोला काय म्हणत होता तर... मॅनेजर. वरून साहेबांदेखत सांगतो कसा!
     "आपसे डर नही लगता साहब, लेकिन इस मॅनेजरसे डरना पडता है... आप नाराज हो जाओगे, तो खाली नौकरी खतरे में हैं... अगर ये रुठ गए तो, जानपर बनती है..." पण त्याच्या वागण्यातून तर तसे कुठेही जाणवत नव्हते. उलट मेड फॉर इच अदर अशीच जोडी होती. ती तशी चारचौघीत उठून दिसणारी असली, तरी त्याची बायको तिच्यापेक्षाही सुंदर होती. पार्टी संपेपर्यंत तिला थांबणे शक्य नव्हते. म्हणून ती लवकरच निघाली. तो तिला टॅक्सीत बसवून द्यायला स्वतः आला होता. खरंतर तो तिला एकटीने पाठवायला तयार नव्हता. 'मॅनेजरने सांगितलंय, पार्सल घरपोच करा म्हणून.' पण तिने त्याला 'मी जाईन व्यवस्थित. तुम्ही जा. सगळे खोळंबले असतील.' म्हणून परत पाठवले. तिथून पुढे मात्र एक झाले. नकळत सुरू झाली एक तुलना. जगाच्या नजरेत सुखात चाललेला आपला संसार वरून वाटतो तितका सुखाचा नाही, याची जाणीव तिला होऊ लागली. वरवरचे एकेक पापुद्रे निघू लागले.
           जयेश म्हणजे तिचा नवरा. पुरुष असूनही भलताच सुंदर. अर्थात त्याचं स्वतःचंही तसंच मत होतं. 'अरे लग्नापूर्वी पोरी कायम आपल्यावर फिदा असायच्या. एहसान मानो! मी तुला पसंत केली.' हे पालुपद तो कायम तिला ऐकवायचा. आतापर्यंत तिला हे कौतुकाचं वाटायचं. पण आता यात त्याचा इगो लपलाय... हे तिला जाणवू लागलं. हळूहळू मग बर्‍याच गोष्टी तिच्या लक्षात येऊ लागल्या. आपल्या मोबाईलचा पासवर्ड त्याला माहीत आहे. पण त्याच्या मोबाईलला आपण कधीही हात लावू शकत नाही. आपण स्वतः कमवत असूनही आपले डेबीटकार्ड त्याच्याकडेच आहे. आपल्याला हवे असतील; तेंव्हा आणि तितके तो आपल्याला पैसे देतो. पण त्याच्या खर्चाची आपल्याला कुठलीही कल्पना नसते. त्याला मित्र आहेत. आपल्याला मैत्रिणी. पण त्याच्या मैत्रिणी आपण चालवून घेत असलो, तरी आपला एखादा मित्र त्याला चालेल का? आपला फोन वेटींगला आला तरी खोदून खोदून विचारतो. सहज घेतल्यासारखा करून आपले वाटस्अप, कॉललॉग पाहत असतो. आपण प्रत्येकवेळी त्याला विचारून सांगून प्रत्येक काम करतो... पण तो मात्र प्रत्येकवेळी आपल्याला गृहीत धरून चालतो. अर्थात प्रत्येक संसारात असेच असते, अशी स्वतःची समजूत घालत राहिले तरी काही प्रश्न नव्याने उभे राहिले होते. प्रश्न नवे नव्हते. नव्याने लक्षात आले होते एवढंच. लग्नापूर्वी तासन् तास गप्पा मारूनही कंटाळा येत नव्हता. आता बोलण्यासारखं आमच्यामध्ये काही राहिलंय का? एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी पूर्वी किती आटापिटा केला. आता या बावळटपणातला चार्म कुठेतरी उरलाय का? ज्या एका निसटत्या स्पर्शानेही अंगावर रोमांच उभे राहत; त्याच शरीरांना एकमेकांची गरज किती उरावी? भूक लागली की, ओरबाडून खाण्याइतकीच? एकमेकांना समजून घेण्यासाठी राहू द्या; स्वतःलाच काय हवंय, हे जाणून घेण्यासाठी तरी आपण वेळ देतोय का?
          घरांत मुल आले, तेंव्हा ती मुलात गुंतून गेली. घरातले करता करता आपण फारच अजागळ झालो होतो. हे कळेपर्यंत नवरा विशिष्ट अंतरावर पोहचला होता. आता मुल मोठे झाल्यावर वेळ मिळू लागला; तर तिला नवरा दुरावल्यासारखा वाटतोय. जोडीदाराला पूर्वीसारखे आपले आकर्षण वाटत नाही. तोही बहुधा कुठेतरी बाहेर गुंतला आहे, अशी शंकाही आहे. त्यामुळेच आला जवळ तरी फक्त मोकळे होण्यापुरतेच. ही उदासिनता वाढवण्यात मग नकळतपणे दोघेही हातभार लावत राहिले आणि नात्यातील अंतर वाढतच गेले.
          आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी ताजमहाल बांधावा, ही अपेक्षा नसते. पण अगदी लहानसहान गोष्टींतही पाखरांसारखे कायम पिसारा फुलवून भोवती रूंजी घालावी. ही स्वाभाविक भावना आहे. जीव गुदमरून टाकणारी मिठी हवीच आहे... पण येताजाता होणारा दिलासा देणारा स्पर्श कायम हवा असतो. दैनंदिन व्यवहारात जसे गृहीत धरले जाते; तसेच आपल्यावाचून त्याचेही काही अडते, ही भावनाही सुखावणारी असते. आपल्या जोडीदारालाही काही भावना आहेत... त्याचीही काहीएक भूक आहे... आपलीच तेवढी भूक भागवण्यापलीकडेही त्याचे आपल्या जीवनात स्थान आहे. ही जाणीव हवी असते. आणि नेमके हेच घडत नसावे त्यांच्यामध्ये. दुर्दैव म्हणा हवे तर! पण जसजसा काळ उलगडत जातो; तसतशी नात्याचीही सवय होऊन जाते... आणि सवय मग ती कशाचीही असो. वाईटच! आपण सवयीने समोरच्याला गृहीत धरायला लागतो... अपेक्षांचे ओझे सुरू होते. नात्यामधली ओढ संपली की, ओढाताण सुरू होते.
             नात्यांमधली ही ओढाताण एकदा का सुरू झाली की, जी नाती कधीकाळी तुमची जगण्याची प्रेरणा होती; तीच नाती पायातील बंधने होतात. बरं नात्याचीही सवय झाल्यामुळे सहजासहजी तोडताही येत नाहीत. नात्यामधला चार्म संपला की, हीच नाती चर्मरोगाप्रमाणे खाजवत राहतात. आणि शिक्षा हीच की, उघडपणे खाजवताही येत नाहीत. त्यामुळेच जगाच्या दृष्टीने दृष्ट लागण्यासारखा संसार चाललेला असतो आणि तो समज तसाच टिकून राहावा, यासाठी आपण त्याची किंमत मोजत राहतो. 
         दिवसेंदिवस जयेशचे वागणे विचित्र होत चालले होते. एकीकडे तिने नोकरी करावी, चार पैसे कमवून आणावे, असे त्याला वाटत असले तरीही पुरुषत्व गाजवण्याची एकही संधी सोडायला तो तयार नव्हता. आवाज चढवून बोलण्याने त्याचे समाधान होत नसावे; म्हणून कि काय... हात उचलण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. अलीकडे तर तो कमालीचा संशयी बनला होता. त्याच्या दृष्टीने आपण बायकोच्या सगळ्या गरजा भागवतोय. तिला काय कमी आहे? शेवटी प्रत्येक गोष्ट तो गृहीत धरून चाललेला होता. पण शारीरिक... भौतिक गरजांच्या पलीकडेही काही जग असते, हेच तो विसरलेला होता. अधूनमधून त्याच्यातील 'नर' जागा होई. आपल्याला हवे असलेले सुख देण्याघेण्यापेक्षा ओरबाडून खाण्यात त्याला आसुरी आनंद मिळत होता. मादीला तिच्याभोवती रुंजी घालत हळुवारपणे फुलवायचे असते. भूक तर प्रत्येकालाच असते. पण कोणतीही गोष्ट चवीने खाणे, हीसुद्धा एक कला असते. असली फिलॉसॉफी त्याला मानवणारी नव्हती. हे असे केवळ जन्माने पुरुष असण्यात कसले आलेय पुरुषत्व? कितीतरी वेळा गॅलरीत उभे राहून फोनवर तो बोलत असताना पलीकडं कुणीतरी मुलगी किंवा स्त्रीच असते, एव्हाना हे तिच्या लक्षात आले होते. पण तिने दुर्लक्ष केले होते. सोसायटीतील काही ठरावीक बायकांशी त्याचे अघळपघळ बोलणे... पैसे दिले की कामवाल्या बाईकडूनही हवं ते मिळवता येऊ शकते, ही त्याची चीप मेंटॅलिटी हळूहळू तिच्या लक्षात आली होती. तरीही ती दुर्लक्ष करत राहिली. आपल्याला अनेक मैत्रिणी आहेत हे सांगताना दिसणारा त्याचा पुरुषी अहंकार बायकोचा एखादा मित्र सहन करणे शक्य नव्हते. येथेच त्यांच्यामध्ये पहिली ठिणगी पडली. त्याने तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. पण तिची प्रतिक्रिया अतिशय थंड होती.
     "ठीक आहे. मिळेल."
           त्याला वाटलं होतं... ती रडेल... पडेल... जोरात भांडेल... त्याच्या हातापाया पडेल... असं करू नको, म्हणून विनवणी करेल. पण असं काहीच झालं नाही. तिने वेगळे व्हायचे ठरवले. त्याच्यासोबत लादलेला संसार आता तिलाही नको झाला होता. खरं तर तिच्या मनातून काहीतरी प्रचंड उलथापालथ चाललेली होती; तरीही ती शांत होती. हे सगळं एवढ्यावरच थांबलं असतं; तर ठीक होतं. पण एकीकडे तिच्या संसारात दुरावा वाढत चालला होता; तर दुसरीकडे या दोघांमधील जवळीक वाढत चाललेली होती... संसारातील दुरावा वाढल्यामुळे यांची जवळीक वाढली होती कि यांची जवळीक वाढल्याने संसारात दुरावा वाढला होता... नेमके कशामुळे काय घडत होते? हे सांगणं अवघड आहे. पण दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. हळूहळू ती त्याच्यामध्ये गुंतत चालली होती. त्याचं हलकंफुलकं बोलणंही तिच्या अंगावर रोमांच फुलवू लागले. नवर्‍याच्या हुकमी स्पर्शापेक्षा त्याचा चोरटा स्पर्श अधिक आश्वासक वाटू लागला. त्याला आवडते म्हणून हातावर काढलेल्या मेहंदीच्या नक्षीपेक्षा मेहंदीचा गंध जास्त बेधुंद करतो, हे त्याचे तत्त्वज्ञान तिच्यासाठी नवीनच होते. हॉटेलमध्ये गेल्यावर "काय घेऊया?" या प्रश्नातून आपल्याला गृहीत धरले जातेय, यापेक्षा आपल्या अपेक्षा समजून घेऊन अधिकार स्वातंत्र्य जपले जातेय, हे तिच्यासाठी कदाचित जास्त सुखावणारे होते. त्याला भेटताना कित्येक वर्षांनतर तिचे काळीज पुन्हा पुन्हा चोरटेपणाने धडधडले; तेंव्हा आपण अजूनही जिवंत आहोत, याची तिला नव्याने जाणीव झाली. समागमाच्या रात्रींपेक्षा काही वेळासाठी त्याचे तिच्या मांडीवर डोके ठेवून पहुडणे जास्त आश्वासक वाटले. म्हणूनच मग 'माझ्या संसारात मी सुखी नाही' हे सांगायलाही स्वतःच्याच जोडीदारापेक्षा तिला तो जवळचा वाटला. तिने असा टोकाचा निर्णय घेऊ नये, म्हणून तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी त्याला त्याचाही संसार होता. त्याहीपेक्षा या दोघांमधल्या हळव्या नात्याला व्यभिचाराचा शिक्का बसू नये, असेही त्याला वाटत होते.
          पाऊस चालूच होता. अधूनमधून विजाही चमकत होत्या. पण आभाळ आता बरेचसे मोकळे झाल्यासारखे वाटत होते. वातावरणातील तणाव खूपच कमी झाला होता. तिच्या मांडीवर डोके ठेवून तो सोफ्यावर शांत पडला होता. तर त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना आपण काय काय हरवून बसलोय, ही तिची वेदना होती. परमेश्वराने जयेशसोबत जन्माची गाठ मारण्यापेक्षा याच्यासोबत आपले आयुष्य का जोडले नाही, याचाच ती विचार करत होती. तसेही जयेश चुकीचा वागला. पण आपण याक्षणी काय करतोय? हीसुद्धा प्रतारणाच नाही का? असेलही. प्रतारणा करायला त्याच्याशी आता नाते कुठे राहिलेय? जोपर्यंत होते तोपर्यंत आपण प्रामाणिक राहिलोच ना! आता यापुढे कोणाला काही वाटो... कुठल्याही स्पष्टीकरणासाठी जगायचे नाही. आपली वाट आहे... आपण हवे तसे चालायचे. इतर कोणासाठी नाही, स्वतःसाठी... नेहासाठी जगायचे.
          नात्यांमध्ये नेहमीच ओढ असायला हवी. मग एवढासाही दुरावा नकोसा होतो. 'जवळ ये' म्हणून सांगायला लागत नाही. अंतरे गळून पडतात. जसजशी ओढ वाढत जाईल; तसतसे श्वासाइतके अंतरही जास्त वाटायला लागते. बोललेले शब्द दुरून आल्यासारखे वाटतात. स्पर्शच जास्त जवळचे वाटू लागतात. शंभर शब्दांनी जे साधत नाही; ते एका साध्या स्पर्शानेही जमून जाते. कदाचित म्हणूनच की काय! आईच्या कुशीत असेल अथवा प्रिय व्यक्तीच्या मिठीत असेल; जगात सर्वांत जास्त सुरक्षितता तिथेच जाणवते. ओढ जितकी जास्त; दुरावा तितकाच कमी होऊ लागतो. शरीराचेही द्वैत नकोसे होते. दोन शरीरांना एक व्हावेसे वाटते. तुम्हाला ही शारिरिक कामना वाटेलही कदाचित. पण इथे केवळ शरीरांचे मिलन नसते. तिथे एकात्मतेची भावना असते. शरीर तर फक्त माध्यम उरते. ओढ तर दोन आत्म्यांना असते... एक होण्याची. आत्म्याची आत्म्याशी असो वा परमात्म्याशी... ओढ ही असायलाच हवी.
          आधीच पावसाळी वातावरण... त्यात मेणबत्तीचा तांबूसपिवळा उजेड खोलीभर पसरालेला होता. भिंतीवरच्या सावल्या स्तब्ध झाल्या असल्या तरी मनातील सावल्या फेर धरून नाचत होत्या. मोबाईलमधील एफेमवर रात्र रंगत जाणारी गाणी तुमच्या मनातल्या अंधाराला अधिक लोभसवाणं करून टाकतात. एकेक सूर... एकेक शब्द काळजात घर करत जातो. बालसुब्रमण्यमच्या आवाजातील 'आ के तेरी बाहों में... हर शाम लगे सिंधुरी... मेरे मनको महकाए तेरे मन की कस्तूरी...' या गाण्यातील तर शब्द न् शब्द घायाळ करत चालले होते. त्याच्या स्पर्शाने ती विरघळत चालली होती. तिचे मोकळे सोडलेले केस त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्या केसांच्या गंधाने तो धुंद होऊ लागला होता. नकळतपणे त्याचा उजवा हात तिच्या मानेवर गेला आणि हाताची ओढ मानेला जाणवू लागली.
          मुळात आपण कोणाच्या तरी इतके जवळ का जातो??? तसे तर आपण अगदी 'कोणा'च्याही जवळ जातच नाही. जिथे ओढ वाटते; तिथेच आपण समर्पण करतो.... स्वतः होऊन स्वतःला विसरतो. कारण त्या नात्यांमध्ये आपलेपणाची ऊब असते. या उबार्‍याच्याच तर आपण शोधात असतो. अशी हक्काची जागा मिळाली की, आपण विसावतो. आपल्याही नकळत आपल्यालाच विसरतो. आपण ज्याच्यावर हक्क दाखवतो; गंमत म्हणजे त्या सात-बाराला आपले नाव कधीच लावता येत नाही. हे माहीत असूनही हा 'हळवा कोपरा' आपण प्राणापलीकडे जपतो.
          "महकी हवायें उड़ता आँचल,
           लट घुंघराले काले बादल,
           प्रेम सुधा नैनों से बरसे,
          पी लेने को जीवन तरसे
     बाहों में कस लेने दे, प्रीत का चुंबन देने दे
     इन अधरों से छलक न जाए यौवन रस अंगूरी..."
           जयेशच्या मिठीतल्या जबरदस्तीने वैतागलेली ती आता मात्र कापरासारखी हवेत विरघळत चालली होती. शरीर हवेवर पिसासारखे अलगद तरंगत चालले होते. ओठ मिटलेले होते. डोळे अर्धवट मिटले होते. भावनांना मात्र पंख फुटले होते. सारं आभाळ मिटीत भरून घेऊन आपल्या लांबसडक बोटांत त्याची दणकट बोटे केंव्हा गुंफली गेली ते तिलाही कळले नाही.

          हा तिच्या एकटीचाच प्रश्न होता की थोड्याफार प्रमाणात...? खिडकीतून बाहेर पाहिले; तर गाडीच्या शेजारून धावणारे रूळही असेच समांतर धावत होते. एकत्र चालूनही एकमेकांना कधीच न मिळणारे. आताही त्याच्या आसपास अनेकजण आहेत. आपण सगळे सहप्रवासी असलो; तरी एकमेकांना कायम अपरिचित. एखादेदुसरे स्माईल... चारदोन वाक्यांची देवाणघेवाण... यापलीकडे आपल्यात काय नाते आहे? संसारातही यापलीकडे काय वेगळे घडतेय? प्रत्येक गोष्टीत आपण कायम एकमेकांना गृहीत धरून चाललोय. तिने त्या क्षणार्धात आपले सर्वस्व उधळून दिले... कोणतीही अपेक्षा न ठेवता. अलार्म वाजला तेंव्हा ती स्वतःहून बाजूला झाली. दोन धागे गुंतत जातात. गाठी बसत जातात. पण तिने सरगाठ आपल्या हातात ठेवली होती. तो गुंता कसा सोडवावा, याचा विचार करत होता आणि तिने एका क्षणात गुंता सोडवला होता. दार बंद करून घेताना तिने स्वतः होऊन मिठी मारली.
     "तू जा आता. गाडी आहे तुझी. ती सोडून चालणार नाही तुला. आणि हो फार विचार करू नकोस. जे घडलं यात तुझा काही दोष नाही. तुझे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे. फक्त यापुढे वसुलीसाठी स्वतः होऊन कधीही येऊ नकोस. आपले नाते वाहत्या पाण्यासारखेच राहू दे. साचून राहिले तर सडून जाईल."
           गाडी स्टेशनवर थांबली. आभाळ स्वच्छ होते. झक्कास ऊन पडले होते. त्यालाही त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. या सर्व तिच्या लाईफ पार्टनरकडूनच अपेक्षा होत्या. फक्त तिथे पूर्ण न झाल्यामुळे त्याच्या रूपाने तिला पर्याय सापडला होता. त्यामुळेच संसारात कितीही असमाधानी असली; तरी तिला संसार सुटणार नव्हता. आणि तिचा नवरा...? त्याला काय हवे असते, ते तिला कळले असावे. फक्त तिच्या संसारात तो तिसरा कोन झाला होता. आणि तिचा नवरा कुठे तरी भलत्याच त्रिकोणात अडकला होता. त्याच्याही संसाराचा त्रिकोण होऊन चालणार नव्हते. तिलाच काय? पण त्यालाही तो सुटून उपयोगाचे नव्हते. उलट मित्र म्हणून तो टिकवून ठेवण्यासाठी हलक्या हातानेच हा गुंता सोडवावा लागणार होता. अशा नाजूक वळणार तिला दूर करण्याने प्रश्न सुटणार नव्हता. तो नसेल; तर ती रिकामी जागा कोणी दुसराच भरणार नाही कशावरून???
           "ऐक सखे...! मी मित्र तरी आहे... तो शिकारी असला तर...??? ही व्यथा फक्त तुझीच नाही... माझीही आहे.... माझ्या बायकोची आहे आणि तशीच तुझ्या नवर्‍याचीही आहे. तुम्हा बायकांनाच काय पुरुषांनाही आपल्यावर उत्कटतेने प्रेम करणारे कोणीतरी हवेच असते. म्हणूनच कदाचित हातात चॉकलेट असूनही बिस्किटाचा मोह सुटत नाही. हे नाते म्हणजे एक दिव्य आहे... तेही साधेसुधे नाही... अगदीच अग्निदिव्य आहे. नाते जोडणे एकवेळ सोपे आहे; परंतु शेवटपर्यंत पतीपत्नीपेक्षा प्रियकर-प्रेयसी बनून सांभाळणे फार खडतर आहे. मी 'शेवटपर्यंत' म्हणालो, नाही का?
हं! हं!! हं!!!
शेवट!!!!
माय डियर! मुळातच 'शेवट येणे' हा तर या नात्याचा आणि आपलाही पराभवच आहे."

-- श्री नंदकिशोर गायकवाड.

#मुसाफिर

सरफरोशी की तमन्ना...

      "सरफ़रोशी की तमन्ना...!!!
(स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन बलिदान करायला निघालेल्या शहिदांचे मनोगत मांडणारे हे गीत आजही मला तितक्याच तडफेने साद घालत असते. त्याच गीताचा आशय असणारा हा स्वैर अनुवाद नाही; परंतु प्रेरणा तीच आहे.)

विद्रोहाची पेटली ठिणगी, आज काळजात आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।धृ।।

विश्वास ज्यांच्या मदतीचा ते, हात बांधून उभे आहेत...।
नव्हती आशा कधीही केली, ते सारे पाठीशी आहेत...।।
परीक्षा तर ही खर्‍या-खोट्यांची, आज जो साथ आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।१।।

घात करण्या शत्रू टपला, मोका तो शोधून आहे...।
छातीवर तो वार झेलण्या, श्वास मी रोखून आहे...।।
मरणाची भीती कुणाला, शीर तर हातात आहे....।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।२।।

आतापासून काय सांगू, हे गरजणार्‍या नभा...।
शत्रूचे ते रक्त चाटण्या, आतुर झाल्या या जिभा...।।
विस्तवाचे वाण सतीचे, आज बांधले पदरात आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।३।।

अन्यायाच्या वादळाने, ठिणगी ही विझणार नाही...।
स्वाभिमानी रक्त आमुचे, मान ही झुकणार नाही...।।
पेटला वणवा क्रांतिचा, दहशत जंगलात आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।४।।

विद्रोहाची पेटली ठिणगी, आज काळजात आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।
                               -- श्री नंदकिशोर गायकवाड.