Saturday, 19 August 2017

चॅटींग... (कविता)


चॅटींग... 


हरवलेली एक कविता, आज आॅनलाईन भेटली...!
दोन शब्द बोलतानाही, थोडीसी धाकधूक वाटली...!

कव्हरपेज बदलले तरी, डीपी मात्र तोच आहे...!
गोजिरवाण्या नव्या घरात, छान अशी पोज आहे...!

हाय! हॅलो! हाऊ आर यू? केविलवाणे हसली होती...!
आशय सारा जुनाच होता, अक्षरे थोडी पुसली होती...!

डोळे भरून पहायचे होते, नजर मात्र झुकलेली...!
डायरीच्या पापण्यांमधून, दोन फुले सुकलेली..!

घशामधील आवंढा गिळत, कोकचा घोट घेतला...!
खूप काही बोलायचे होते, म्हणून थोडा पॉज घेतला...!

नेहमी शब्द गोठत, आज कीबोर्डवर बोटे रूतली...!
सुचलेच नाही काय बोलू, फक्त एक स्माईली टाकली...!

-- नंदकिशोर.

#काही_पाने...!

ती सध्या काय करते... (कविता)

#ती_सध्या_काय_करते?

पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट...

ती सध्या तिच्या संसारात सुखी आहे...

होय!!!
ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

सकाळ संध्याकाळ ती स्वयंपाक करते...
नवरोबाचा टिफीन भरून देऊन त्याला बाय करते...
मुलाबाळांचे उरकून त्यांना शाळेत नेऊन सोडते...
घरातील कामे उरकून उरलेल्या वेळात टि.व्ही.वरच्या सासबहूच्या सिरियल पाहते...
ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

इन्स्टॉलमेंटवर घेतलेल्या फ्लॅटचे व कारचे हप्ते फेडते
व उरलेल्या पैशातून...
अधूनमधून शॉपिंग करते... हॉटेलिंग करते...
नवरोबाला सुटी मिळाली की,
महिना दोन महिन्यातून आऊटींगलासुद्धा जाते...
आणि मग...
तिकडचे चारदोन फोटो फेसबुकला अपलोड करते...
ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

माझ्या सिगारेटला विरोध करणारी ती
नवरा फक्त अॉफिसमधल्या लोकांबरोबरच मोठ्या हॉटेलात बसून भारीतली ड्रिंक करतो.
याचे गोडवे गाते...
कधीकाळी माझ्यापेक्षा तब्बल पाच हजार रुपयांनी जास्त असलेल्या आणि आज माझ्यापेक्षा फक्त पंचवीस हजारांनी कमी असलेल्या पगारात नेटाने घर चालवते. मधल्या वेळात कुठे पार्टटाईम जॉब मिळेल का? याचा शोध घेते...
ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

प्रेमाने पोट भरत नाही.
यावर तिचा आजही गाढ विश्वास आहे...
संसारात ऊनसावली चालायचीच.
कधीतरी भारी दिवस येतील,
यावर तिची श्रद्धा आहे...
पण कातरवेळ झाली की,
तुळशीपुढे दिवा लावताना...
भूतकाळातल्या सावल्यांनी ती कासावीस होते...
बाकी ती तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

पूर्वीप्रमाणे ती गझल ऐकत नाही...
नाटक पाहत नाही...
अंधार चावट असतो म्हणून
ती सिनेमालाही जात नाही...
पाणीपुरी भंपक असते म्हणून
ती तिकडे ढुंकूनही पाहत नाही...
मंदिरात गेल्यावर ती थोडावेळ पायरीवरही बसत नाही...
चांदणं कधीकधी तापतेही म्हणून
माझी आठवण येईल असे ती काहीही करत नाही...
कारण ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

तिला माझ्या कवितेत स्वतःला शोधण्याची
अजिबात गरज नाही...
मिठीतल्या श्वासात धुके दाटण्याची तर
आवश्यकताही वाटत नाही...
मला आवडायचा म्हणून
आजही ती मोगरा माळत नाही...
मेंहदीला कुठे प्रेमाचा रंग असतो का?
म्हणून मेंहदीही लावत नाही...
मोकळ्या केसांच्या गंधाने
नवरा बेधुंद होईल यापेक्षा
माझी आठवण सलत राहील,
म्हणून ती ओले केसही मोकळे सोडत नाही...
तरीही ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

जाऊ द्या ना बाळासाहेब...
सोनू... पिलू... या शब्दांत काही चार्म आहे का?
ती तिच्या संसारात एकदम सुखी आहे...
मग आपणच झुरण्यात
काही राम आहे का?
तुमचा माऊथ अॉर्गन तिला आवडायचा म्हणून
अजून किती दिवस वाजवणार?
हरवून गेलेले सूर
अजूनही किती दिवस आळवणार?
तुमच्या पिल्लाचे डोळे तिच्यासारखेच आहेत...
पण त्या डोळ्यांतले जग फक्त तुमचे आहे...
ती तिच्या संसारात सुखी आहे...
तुम्ही तुमच्या संसारात सुखी आहात...
फक्त अर्धी रात्र सरूनही पापण्या नाहीच मिटल्या....
तर एक दिलासा हा असेल की,
अशाच कित्येक रात्री तिनेही जागवल्या असतील...

ती सध्या काय करते?
ती सध्या तिच्या संसारात सुखी आहे...
बस्!!! फिट्टमफाट!!!

- नंदकिशोर.
(5 जानेवारी 2017)
#काही_पाने...

आशा... (कविता)

#आशा...


"ध्येयवेड्यांना साद घालणारी
उत्तुंग शिखरं
अजून आहेत तिथेच...
स्वप्नांकडे घेऊन जाणाऱ्या
पाऊलवाटाही तशाच आहेत...

अजूनही
मायेची पखरण करणारी झाडं
उभीच आहेत रस्त्याच्या दुतर्फा...
तहानल्या जीवाला संजीवनी
देणारे झरे अजूनही वाहताहेत...

सूर्य अजूनही रेंगाळलाय
आकाशात
काळोखाला थोपवून धरत...
काळजातली वादळे शमवून
वाराही हळवा झालाय...

अजूनही निशाण हातातच आहे.

पण...

पण माझी पावलं मात्र थकली आहेत...
माझ्यावरती रूसली आहेत...!!!

किनाऱ्यावरचा दीपस्तंभ
अजूनही
निरोपासाठी हात हलवतोय...
नांगराने सोडलाय
वाळूचा सहवास...

फडफडणार्‍या शिडांनी
वादळ भरून घेतलंय
छातीभरून...
लाटाही गाताहेत
पुरुषार्थ चेतवणारी समरगीते...

वाट पाहताहेत वल्ही
मजबूत मनगटाच्या
घट्ट पकडीची...
खुणावताहेत दाही दिशा
कोलंबसाच्या वारसाला...

पण...

पण माझे हात मात्र थकले आहेत...
माझ्यावरती रूसले आहेत...!!!

.... तरीही,
तरीही मी मात्र थकलो नाही
आणि
नाहीत थकल्या माझ्या आशाही...

अजूनही वाटतेय,
कधीतरी हातपाय साथ देतील...
या सर्वांना मात देतील...!!!"

-- नंदकिशोर.
#काही_पाने...

Friday, 11 August 2017

माये... (कविता)


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

माये...!

माये तू एकट्या पडलेल्या वाटंनं
कित्येक उन्हाळे डोईवर घेऊन
चालत राह्यलीस नेटानं...
डोळ्यातलं पावसाळं पापण्याआड लपवून
झुंजत राह्यलीस परपंच्याच्या वावटळीशी...
शेतातलं तण भांगलताना
तुज्या तळहातावरच्या रेघोट्या बी पुसून गेल्या...
एकटीनं सगळी उस्तावार लावताना कपाळावरल्या घामासंगं
नशीबाचं भोगही पुसत राह्यलीस...
एकेक काडी जमवून घरटं बांधणार्‍या सुगरणीसारकं
एकेक दगड रचत राह्यलीस पोराच्या जिंदगानीचा...
अक्षराची ओळख नसताना बी
पोराच्या हातात पाटी पेन्शील देऊन
स्वतःच सटवीच्या हातानं
त्याचं नशीब लिहीत राह्यलीस...
काजाळलेल्या चिमणीच्या उजेडात मिसळायचा
तुझ्या पेटलेल्या चुलीचा तांबूस पिवळा जाळ...
मी काहीबाही वाचीत आसताना
तुझा कान माझ्याकडंच आसायचा...
पोथ्या पुराणाच्या भक्तीभावानं
तू ते ऐकत राह्यलीस...
एकेक काटकी चुलीत सारताना
खरकट्या हातानं डोळं पुसत राह्यलीस...
कधी तरी माजं पोर मोठं हुईल...
चार बुकं शिकून मास्तर हुईल...
माज्या डोईवरल्या उन्हाळ्यात
त्याची सावली ईल या आशेने
सपान पाहात राह्यलीस...
नवरा आसूनबी रंडक्यामुंडक्या बाईपरमान नांदण्याचं चांदनं झालं...
पन ईस्तव पदरात बांधून नेटानं हुबी राह्यलीस...
सुरकतलेला हात
नातवंडाच्या पाठीवरनं फिरवीत
'तुमचा बाप बी लई ड्यांबीस हुता' आसं सांगताना तुजा पदर डोळ्याला जातो माये...
पन त्या ड्यांबीस पोराचा बाप कसा होता
याचा चकार शबूदही
तुज्या तोंडातनं निगत न्हाई...
काळजातलं ऊन काळजातच गाडून
तू लडत राह्यलीस पावलाखालच्या काट्याकुट्यांशी...

-- श्री नंदकिशोर गायकवाड.

दुरावा... (कथा)

दुरावा...!


          "आपण एका श्वासाइतके जवळ असतानाही तुला एकटं एकटं वाटत असेल; तर तो माझा पराभव आहे."

"एकटेपणा असं नाही. पण एक पोकळी जाणवतेय."

          "कसली पोकळी...?"

"तेच तर कळत नाही. मला काय हवंय? काय नकोय? एवढ्या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं पण सापडत नाहीत. डोकं सुन्न झालंय. घुसमट होतेय मनाची."

          "घुसमट मनाची असते. मेंदूने विचार करून व्यवहार चालतात. नाती नाही. म्हणून मग मेंदूने नाही मनाने विचार कर. त्यालाच विचार. बाबारे! तुला नक्की काय हवंय? तुझ्या प्रश्नांची उत्तरे सापडतीलही कदाचित."

"कसलीच उत्तरं नाहीत माझ्याकडे. खूप विचार येतात डोक्यात. बोलता नाहीत येत कोणाला? बोलण्यासाठी कोणीच नसतं."

           "मग काय उपयोग आमच्या असण्याचा?"

"तू असतोस ना! जाणवतं मला ते."

          "तुला बोलायला कुणीही नसते; तर मग एवढे दिवस... एवढे महिने... एवढी वर्षे तासन् तास माझ्याशी काय बोललीस?"

"पूर्वी कसं मी तुला एवढ्या तेवढ्याही गोष्टी सांगायचे. पण आता वेळ नाही मिळत तुला पूर्वीसारखा. आता तू नसतोस, असं नाही. पण तुझा presenceही मला खूप महत्त्वाचा वाटतो."

           "बोलायला तर मी तेंव्हाही होतो... आताही आहे. मी तिथेच आहे; जिथे तू मला सोडून आलीस. आणि... आता तू जिथे आहेस; मी कुठेच नसतो तिथे. Online तर मी नेहमीच असतो. फक्त तुझ्या नेटवर्कमध्ये नसतो. Some congestions."

"याचा अर्थ तू माझ्यापासून लांब गेला आहेस, असं नाही म्हणत मी."
           "पर उतने पास भी नही है! लक्षात घे... I am your present, may be future; but not past."

"पण माझी वाट ही एकटीचीच आहे. तुझी मात्र फरपट होतेय माझ्यामुळे. तू नको मनाला लावून घेऊस."

            "मी नेहमीच तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी कुंपण आडवे आले."

"मला काहीच कळत नाहीय. खूप भरकटत चाललेय मी."

            "बाई गं! विनाकारण काहीच होत नाही. कुठेतरी काहीतरी कारण असतेच. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच."
"मला नाही कळत असलं काही."

            "काय?"

"काही नाही. सोडून दे तो विषय. काय अजून?"

            "अजून तर बरंच काही आहे. अजून किती पळणार आहेस? तुझ्या पळण्याने विषय संपणार नाहीच."

"मला माझंच काय चाललंय ते कळत नाही. तुझं बोलणं तर त्याहून नाही."

             "माझं बोलणं नाही कळू दे. तुझं तूच शोधायचा प्रयत्न कर. शब्द नाही कळले तर नजरेत नजर मिसळून बघ. नजर चोरणार असशील तर डोळे मिटून घे. आत शोध. सापडेल."

"काही नको."

             "निगाहें निगाहों से मिलाकर तो देखो...
              एक बार रिश्ता बनाकर तो देखो...
              हसरतें दिल मे दबानेसे क्या हासील होगा...
              अपने होंठ हिलाकर तो देखो...
              खामोशी से कब होती है खामोशियाँ पुरी...
              दिल की बात बताकर तो देखो...
              जो है दिल मे उसे करा दो बयाँ...
              खुद को एकबार जताकर तो देखो...
              आसमाँ सिमट जाएगा तुम्हारी आगोश मे...
              चाहत की बाहें फैलाकर तो देखो...!"

"बस्! झाली तुझी फिलॉसॉफी!"

             "जेंव्हा मी मनातलं सांगतो; तेंव्हा तुला ती फिलॉसॉफी वाटते. हेच ते कुंपण आहे... मला अडवणारे."

"तू तुझंच खरं करणार. मला थोडीच बोलून देणार आहेस."

             "बोलणं काय नुसत्या शब्दांनीच होते. माय डियर, बोलायला शब्द नसतात; तेंव्हा नजर बोलते. डोळे मिटले की स्पर्श बोलतात. कुणाच्या खांद्यावर डोके ठेवून काहीवेळ नुसते बसले तरी खूप बोलल्याचा फिल येतो. कधी अनुभवलंस तू हे."

"तुझा आवाज कळतो मला. जाणवतो.. ऐकू येतो मला... पण काय करू? मला 'ओ' देता येत नाही त्या आवाजाला."

            "तो आवाज खूप लांब आहे. इथं माझ्या छातीवरती डोकं ठेवून ऐक. बघ प्रयत्न करून."

"आता मात्र मला तुझ्या आवाजात आगाऊपणा जाणवतोय."

            "म्हणूनच अजूनही आपण तेवढेच दूर आहोत. जेवढे पूर्वी होतो. तुम्हा बायकांचा एक गोड गैरसमज आहे. सगळे पुरुष इथून तिथून सारखेच. मादी जवळ आली की, लागले पिसारा फुलवायला. यांना फक्त तुमचं शरीर हवं असतं. पण तुमच्या हे कधी लक्षात येते का? की तो पिसारा नाही, त्या मादीला फुलवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हो! मला कबूल आहे. भाषा काय फक्त मनाचीच असते? शरीराला काय भाषा नसते? ही ओढ काय फक्त शरीराचीच असते? दोन काठ एकत्र चालू शकतात. पण मला समांतर चालायला जमत नाही. मी पाण्यासारखा आहे... वाहणारा. दोन नद्या एकत्र आल्या कि पाणी मिसळणारच. ते वेगळे कसे राहील. दोन शरीरं एकत्र आल्यावर ती वेगळी कशी राहतील. ती आपापली स्वतंत्र अस्तित्व नाकारणारच."

"मी अजूनही तुझ्यात मिसळले नाही, असे का वाटते तुला?"

             "कारण! अजूनही तुला माझे अस्तित्व तुझ्यापासून वेगळे वाटतेय. होय! तुझ्या माझ्यामध्ये अजूनही एक न दिसणारे कुंपण आहे. जेंव्हा आपली दोन शरीरं एकमेकांत मिसळतील; तेंव्हा ती दोन राहून चालणार नाहीत. त्यांना एक होण्याची ओढ वाटली पाहिजे. मनाला एकत्र आणण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पहा. अमूर्त भावनांना मूर्त अनुभव मिळाला की, त्या आणखीन दृढ होतील. तुझा एकटेपणा माझ्यात विरघळून जाऊ दे. आपल्या मनातली पोकळी त्या उत्कटतेने भरून जाऊ दे. हवेत उडणार्‍या साबणी फेसाच्या फुग्याप्रमाणे शरीराचा जडपणा सोडून दे. विश्वाच्या या अनंत पोकळीत मन पिसासारखे विहरू दे. दोन शरीरंच नाही, तर सारे विश्वच तुझ्यात एकरूप झालेले तुला दिसेल."

- नंदकिशोर गायकवाड.
#मुसाफिर

प्रपोज... (कथा)

प्रपोज...!


"Hiii"
"Helloo..."
"कसे आहात?"
"छान!"
"काय करताय?"
"काहीच नाही. निवांत."
"मग! काही विशेष??"
"दुपारी तुमचा फोन आला होता. आता मेसेज आला. हेच विशेष..."
"का हो! कंटाळा आला ना?"
"कोणाचा?"
"नाही म्हणजे बोअर झालात ना?"
"बोअर? ते का म्हणून?"
"माझ्याशी बोलून."
"असे का वाटले?"
"तुम्ही offline झालात मध्येच. म्हणून तसं वाटलं."
"नाही. तसं काही नाही. मी प्रवासात आहे. त्यामुळे नेटवर्क गेले असेल."
"Okkk. Happy journy!!!"
"धन्यवाद...!"
"चला बाय."
"बरं... बाय..."
"आता कोण कंटाळले? बघा म्हणाले होते ना तुम्ही कंटाळलात म्हणून."
"नाही हो! तुम्ही बाय म्हणालात, म्हणून मीही बाय म्हणालो. मग कोण कंटाळले?"
"नाही नाही. मी कंटाळून नाही बाय केला. थोडीशी कामात आहे. घाईत होते म्हणून बाय केला."
"शाब्बास!"
"का? काय झालं?"
"बायका लई हुशार!!! त्यात तुम्ही तर फारच उशीर आहात!"
"लहानपणापासूनच..."
"अरे व्वा! कॉलर ताठ!!!"
"मग.. असायलाच हवी. पण असं का म्हणताय?"
"स्वतःला काही काम निघाले की, समोरच्याला कंटाळा आला का म्हणून विचारायचे. म्हणजे संवाद संपवण्याचे पातक तुमच्या माथी यायला नको. आपण गडबडीत असूनही मेसेज करायचा. वरून समोरच्याला काही अंदाज येऊ न देता. सगळे स्वतःच्या मनासारखे हवे, पण पुढच्याकडून वदवून घेणार."
"हा! हा! हा!"
"बरं ठीक आहे. चालू द्या तुमचे काम. माझं काय! मी प्रवासात आहे. अजूनही दोनेकतास निवांत आहे. बोलू परत कधी!"
"काही विशेष सांगणार आहात का?"
"मी काय सांगणार?"
"नाही. काही विशेष असेल, तर सांगा."
"कामात आहात ना! बोलू नंतर."
"नाही नाही. सांगा आता. झाले काम माझे."
"म्हटलं ना बायका लबाड असतात."
"सांगा हो आता. उगीच उत्सुकता ताणू नका."
"उद्या सांगतो. बाय."
"काही नको. आता माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका."
"बरं ठीकाय. विशेष काही नाही. एक गंमत सांगतो."
"सांगा काय सांगायचं ते पटकन."
"ऐका तर...
  ये उन दिनो की बात है...
  जब सर पर बाल हुआ करते थे...!"
"ओहो! आता तर सांगूनच टाका सगळी कहाणी."
"एक लडकी थी दिवानी सी..."
"एक लडके पर वो मरती थी... हे माहितीय मला. पुढे..."
"चोरी चोरी चुपके चुपके गलियों से गुजरती थी..."
"कुछ कहना था शायद उसको...
जाने किससे डरती थी...! हेसुद्धा माहितीय. पुढे...!!!"
"हो हो...! जरा सबुरीनं घ्या. किती घाई?"
"मोहब्बते पाहिलाय मी. त्याचं काय? सर पर बाल आणि मोहब्बतेचा डायलॉग याचा काय संबंध? बरं पुढे सांगा."
"एक नही, पुरे तीन साल मन ही मन मे मोहब्बत करती थी..."
"फिर क्या हुआ?"
"बातें हुई... मुलाकातें हुई..."
"और फिर...?"
"फिर क्या? एक दिन उसने पुछा..."
"क्या?"
"ये मोहब्बत क्या होती है? ये मुहब्बत कैसे होती है..."
"तो उसे क्या जबाब मिला?"
"उसने कहा... जो तुम करती हो! वही तो मोहब्बत है...!!!"
"मैं...?"
"अरे आप नही.. मैं उस लडकी की बात कर रहा हूँ... आपके मन मे क्या है? ये मैं कैसे बता सकता हूँ?"
"अच्छा अच्छा!!! वह लडकी भी मन ही मन खुश हुई होगी!"
"हां! शायद आपकी तरह! फिर लडके ने पुछा, क्या तुम भी मुझे चाहती हो?"
"अं......"
"सांगा ना..!"
"उस लडकीने क्या कहा?"
"तुम ही बताओ..."
"धत्! मला काय माहीत..!"
"म्हटलं ना बायका लबाड असतात. सांगा ना! तुम्हीच सांगा. काय उत्तर दिले असेल तिने?"
"लाजली असेल. उत्तर द्यायला शब्दही सुचले नसतील तिला. पण ते जाऊ द्या. तिने काय उत्तर दिले?"
"वह बोली..."
"क्या??"
"साल्या, तीन वर्षापासून वाट बघतेय, तू प्रपोज केंव्हा करतोस याची."
"ओह!!!"
"तात्पर्य काय? बायका स्वतःच्या मनातलं ओठावर येऊ देत नाहीत. तीन वर्षे वाट पाहण्यात घालवली. त्यापेक्षा स्वतःच त्याला मनमोकळेपणाने सांगितले असते तर काही बिघडले असते का?"
"तुम्हीच म्हटलं ना बायका लबाड असतात म्हणून. पण खरं सांगू का? आम्हाला हे तुमच्या तोंडून ऐकायचं असतं. म्हणून तर प्रत्येकवेळी एवढं बोलूनही आम्ही विचारत असतो, अजून काही? आणि तुम्ही खुशाल 'नाही' म्हणून सांगता."
"असू द्या तीन वर्षांनी का होईना... प्रपोज तर केले. बाय दि वे! मी आता दारात उभा आहे. दार उघडून आत घ्याल का?
"अगं बाई! काय हे!"
"सरप्राईज!!! Happy Marriage Anniversary!!!"

-- श्री नंदकिशोर गायकवाड.
#मुसाफिर

Thursday, 10 August 2017

समांतर... (कथा)

समांतर...!


          अखेर मौन असह्य झाल्यावर तो पुन्हा कुजबूजला.
     "सांगा ना!"
          आता त्याला काय उत्तर द्यावे, हेच तिला सुचेना. आपल्याकडून त्याला काहीतरी उत्तर हवंय आणि त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय त्याच्या मनाचे समाधान काही होणार नाही. हेही तिला ठाऊक होते. एवढा मोठा झाला असला तरी मनाने तो तेवढाच लहान आहे. म्हणून तर तो हट्टी आहे.
     "काय सांगणार? सांगण्यासारखं आता काही उरलंय का?"
     "असं का म्हणता? मी काही चुकीचे बोललो का? तसं असेल तर आय एक्स्ट्रीमली स्वारी! पण मला विचाराल; तर मी काही चुकीचं बोलतोय, असं किमान मला तरी वाटत नाही."
     "तुम्ही चुकीचे आहात, असं कुठं म्हणाले मी. पण तरीही तुम्ही भलताच हट्ट करताय, असं मात्र मला मनापासून वाटतंय. सोडून द्या तो हट्ट! आणि तसेही तुम्ही माझ्यापेक्षा लहानच आहात. बालहट्ट समजू शकते मी. आणि हो! आता तुम्ही माझं नाही ऐकलं; तर तुमचा कान पकडणं मला जड जाणार नाही. कळलं का?"
बळेच हसत तिने वातावरणातला ताण थोडा कमी करायचा प्रयत्न केला.
     "हो ठीक आहे. मला मान्य आहे. तेवढा अधिकार तर तुम्हाला नक्कीच आहे. पण फक्त एवढ्यापुरतेच कान पकडून विषय संपणार आहे का? मी 'असाच' आहे, हे तुम्हालाही चांगले माहितीय. म्हणून तर आयुष्यभर तो अधिकार तुमच्याकडेच राहावा, हीच माझी इच्छा आहे."
     "काय हा भलताच वेडेपणा! आता मी काय सांगतेय ते ऐकून घ्या. परवा आलेलं स्थळ चांगलंय. ती मुलगी मलाही आवडलीय. तुमची दोघांची जोडी छान शोभून दिसेल. तसाही आईंना मी शब्द दिलाय. तुम्हाला समजावून सांगून आणि नाही ऐकलं; तर तुमचा कान पकडून का होईना; पण तुमचा होकार मिळवायची जबाबदारी माझ्यावरच आहे. अर्थात त्यात माझाही स्वार्थ आहेच म्हणा! तुम्ही लग्नाला तयार झालात तर कुरवली म्हणून मनपसंत साडी मिळेल मलाही."
          आतापर्यंत टिकवून ठेवलेला त्याचा संयम आता मात्र ढासळत चालला होता. अरे! काय तडफड होतेय माझ्या जिवाची आणि हिला गंमत सुचतेय म्हणजे काय!
     "मी आवडत नाही का तुम्हाला? तसं असेल तर स्पष्ट सांगा. तुमचा नकार असला तरी मला चालेल. पण त्याचे कारणही मला कळावे, एवढी साधी अपेक्षाही मी ठेवू शकत नाही का?"
      "आता कसे समजावून सांगू तुम्हाला? मला तर काहीच समजेनासे झालेय."
      "नाही ना जमत. मग द्या सोडून. मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो. तुम्ही हवी ती शपथ घ्यायला सांगा मला. एक अक्षरही खोटे बोलत नाही. जेंव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना; तेंव्हाच... अगदी तेंव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो. गेली दोन वर्षे जसजसे आपण जवळ आलो ना! तसतसा मी तुमच्यामध्ये गुंतत गेलो. तुमच्याशिवाय मी आता दुसरा कुठला विचारही करू शकत नाही. प्लिज! समजून घ्या मला." तो काहीसा स्वप्नात हरवल्याप्रमाणे बोलत होता.
                        * * * * *
          कुणा एकावाचून आपले आयुष्य अपूर्ण राहावे, तर कुणामुळे ते पूर्ण व्हावे, हे शेवटी ज्याचे त्याचे प्राक्तनच ठरवत असते.
          साधारणपणे मार्चएंड झाला तरी पंधरा एप्रिलपर्यंत अॉफिसमध्ये कामाचा ढिगारा लागलेला असतो. कितीही मान मोडून काम करा. मान वर करायलाही फुरसत नसते. गेल्या चार दिवसांत कामातून फुरसत मिळालेली होती. आता काही दिवस निवांत वेळ काढायला मिळणार होता. या महिनाखेरीस दोनचार दिवस मित्रांसोबत कुठेतरी कोकणात काढायचे प्लॅनिंग होते. राहत असलेल्या ठिकाणापासून अॉफिस फारसे दूर नव्हते. वीसेक मिनिटे चालावे लागणार होते. आज काही घाईही नव्हती. त्यामुळे चौकातल्या ओळखीच्या गॅरेजवाल्याकडे बाईक सर्व्हिसिंगला देऊन चालतच अॉफिसला निघालो. दररोजच ज्या रस्त्याने जातो, तो रस्ता आज नव्यानेच पाहत होतो. रस्त्याच्या बाजूने असलेले गुलमोहर फुललेले होते. लालबुंद फुलांच्या गेंदानी झाडे तर भरून गेलेली होतीच. पण गळून गेलेल्या पाकळ्यांनी रस्ताही लाल झाला होता. आज रस्त्यावर वाहतूकही तुरळक होती. शाळेला निघालेली काही मुले आणि पायी जाणारा एखाददुसरा सोडला तर फुटपाथ मोकळाच होता. रस्त्याच्या कडेला खेळणार्‍या कुत्र्याच्या पिलांना पाहून थोडावेळ थांबावेसे वाटले. मस्त दिलीपकुमारप्रमाणे सुहाना सफर और ये मौसम हसीन... असं काहीतरी गुणगुणावसं वाटत होतं. रोजच्या धावपळीत आपण किती मोठ्या सुखाला मुकतो, याची आज प्रकर्षाने जाणीव होत होती.
          एक कॉर्नर पास केला आणि पुढे काही अंतरावर चाललेल्या एका व्यक्तीने लक्ष वेधले. लक्ष वेधावं असं काय बरं होतं? इतर चारचौघांसारखीच तर आकृती होती. त्यातही पाठमोरी. माणसासारखा माणूस. त्यात काय विशेष? पण लक्ष वेधलं जावं असं काहीतरी नक्कीच होतं. मी चालण्याचा थोडा वेग वाढवून दोघांमधले अंतर कमी केले. मग पुरेसे अंतर ठेवून चालणाऱ्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत चालत राहिलो. साधारणपणे पिवळसर म्हणता येईल असा सलवार कमीज. साडेपाच फुटापर्यंत तरी उंची असावी. त्या उंचीला साजेसे शरीर. पण माझे लक्ष आवर्जून खेचून घेतले होते ते केसांनी. पाठीवरून अगदी कमरेच्याही खाली येणारी लांबलचक वेणी नागिणीप्रमाणे दिसत होती. त्यात ती व्यक्ती एवढी शांतपणे चालत होती की, त्या चालण्यातही एक डौल होता. गजगामिनी...! बस् दुसरा शब्दच नाही. एखादा सुंदर चेहरा पाहून या वयात वेड लागणे म्हणजे चलता है! पण ज्या व्यक्तीचा चेहरा काळा आहे कि गोरा, तेही माहीत नाही, तरीही त्या व्यक्तीने लक्ष वेधून घेणे म्हणजे कौतुकच. एखाद्या सुंदर सुगंधी फुलाजवळ भुंग्याने गुणगुणत राहावे, तसे मन तिथेच रुंजी घालू लागले.
           अॉफिसचा शेवटचा कॉर्नर ओलांडूनही मी पुढे पुढेच चालत राहिलो. शेवटी चौकात सिग्नलला तिने रस्ता क्रॉस केला आणि मग मोठ्या नाइलाजाने मी परत फिरलो. मन अतृप्त राहिले. फक्त एकदाच तिचा चेहरा पाहायला मिळाला पाहिजे होता. दिवसभर अॉफिसच्या कामातूनही ते लांब केस काही केल्या मनातून जायला तयार नव्हते. तरी चौधरी म्हणाला ही, 'क्यों भई, बडे खोये खोये से लगते हो!'
'चौधरी, कभी किसी चलते हुए हाथी या शेर को पिछे से देखा है? बस् और एक बार देखने की तमन्ना है!' सायंकाळी घरी परत जाताना ती व्यक्ती परत दिसावी, या वेड्या आशेने अॉफिस सुटताच मी ओढीने निघालो. अॉफिसमधला अप्पा भोसले मला गाडीवरून घरी सोडतो म्हणाला. पण त्यालाही काहीतरी कारण सांगून मी सटकलो. सायंकाळी वर्दळ असूनही घरी पोहचेपर्यंत माझी नजर फक्त तिचाच शोध घेत होती. कितीतरी वेळा मी थांबून मागे वळूनही पाहिले. नाहीतर आपण उगीचच पुढे शोध घेत राहायचो आणि ते परब्रह्म आपल्या पाठीशी असायचे. तुम्हाला थोडे हसू येईल. कदाचित तुम्ही मला पागलही म्हणाल. पण एक दिवस नाही दोन दिवस नाही, पुढचा पूर्ण आठवडा मी अॉफिसला पायी चालतच येत जात राहिलो. पहिले दोन दिवस इच्छापूर्ती झाली नाही. पण तिसरा दिवस मात्र भाग्याचा ठरला. मग मात्र हे नित्याचेच झाले. साधारण दोनेक दिवसाच्या फरकाने पुन्हा दर्शन झाले. एवढे तर नक्की झाले की, ही गाडी डेली अपडाऊन करते.
          आठवडाभरानंतर मात्र पुन्हा बाईकने येणेजाणे सुरू झाले. पण आताशी तो एक छंदच झाला होता. जिथे गाडी ओव्हरटेक व्हायची, तिथे स्पीडाब्रेकर नसतानाही वेग हळूवार व्हायचा. तरीही काळजात धक्का बसायचाच.
     "वो किसी रेल सी गुजरती है...
      मैं किसी पुल सा थरथराता हूँ...!!!"

          नेहमीच्या पाहण्यातील असतील तर वाटेवरचे मैलाचे दगडही ओळखीचे होतात. इथे तर आम्ही हाडामांसाची जिवंत माणसं होतो. नुसते डोळे बंद केले; तरी ती जशीच्या तशी नजरेसमोर उभी राहायची. तिचे ते शांत संयत एकेक पाऊल टाकत चालणे आणि विशेषतः तिच्या लांब केसांनी मला मोहिनी घातली होती. तरीही तिचा चेहरा पाहण्याची मला विशेष उत्सुकता होती. एवढ्या आकर्षक व्यक्तिमत्वाची स्वामिनी दिसायला कशी असेल बरे? खरं म्हणजे अशा खेळात बर्‍याच वेळा भ्रमनिरास होण्याचीच शक्यता जास्त असते. परमेश्वर सगळ्यांना परिपूर्ण बनवत नाही. सुगंधी फुलांना रंग द्यायला विसरतो; तर सगळीच रंगीबेरंगी फुले सुगंधी कशी असतील? पण हा योगच काही और होता. ती खूप म्हणजे खूपच सुंदर होती... पाहणाराच्या काळजाचे पाणी पाणी होईल... असली अतिशयोक्ती नाही करणार. पण ती खरंच सुंदर होती. शेवटी सौंदर्य पाहणाऱ्या दृष्टीवर अवलंबून असते. प्रत्येकाच्या सौंदर्याच्या परिकल्पना भिन्न असतात. पण सर्वसाधारणपणे सरळ लांब नाक... किंचित उभट चेहरा... छान टपोरे डोळे... पुरेपूर उंची... तेवढेच सुडौल शरीर... अगदी अल्लड यौवना नसली तरी गद्धेपंचवीसमधले वय... अजून काय हवे?अगदी फार नसली तरीही कुणीही आवर्जून वळून पाहावे, इतकी सुंदर तर ती नक्कीच होती. मुळात तिच्या सौंदर्याने घायाळ होणारा मी नव्हतो. या बाह्यरेषेच्या पलीकडे मला भूरळ पाडणारे असे काहीतरी नक्कीच होते. चेहऱ्यावर कमालीचे शांत सोज्वळ भाव... आणि कुठेतरी जगाच्या या सगळ्या धावपळीपासून जाणवणारा तटस्थपणा सहज दिसून यायचा. ही सहजासहजी आलेली परिपक्वता नव्हती.
          प्रत्येकवेळी माझ्या मनातील भावना अधिकच गडद होत चालल्या होत्या. बर्‍याचदा येताजाता दिसल्यामुळे नजरा आता ओळखीच्या झाल्या होत्या. पण बोलणे तर दूरच साधे ओळखीचे स्माईल करण्याचेही धाडस मला होत नव्हते. ती नक्की काय करते हे तर माहीत नव्हते. कॉलेज करत असेल का? शक्यता कमीच. का कुठे एखादा जॉब करत असेल? तिथेच तर घोडे पेंड खात होते. एवढे तर नक्की होते की, ती राहायला माझ्याच परिसरात कुठेतरी होती... आणि तिचे दररोजचे जाण्यायेण्याचे ठिकाणही माझ्या अॉफिसपासून पुढे कुठेतरी होते. अर्थात तेही फार दूर नसावे. कारण दरवेळी ती चालत जातानाच दिसे. माझे फक्त तर्क चालले होते. अर्थात प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींपेक्षा मनाचा वेग भलताच असतो. मी मनातून कितीही कल्पना केल्या तरी तिच्याभोवती एक अदृश्य असे वर्तुळ होते. ते छेदणे माझ्यासाठी अवघड होते. त्यामुळे स्वतःला काळाच्या हाती सोपवून मी चाललो होतो. आणि काही करायचं म्हटलं तरी करणार काय? माझ्या एवढ्याशा गफलतीने हे स्वप्न काचेसारखे खळकन फुटून गेले असते. मला तेच नको होते.
          एकदा काही कामामुळे मला पोस्ट अॉफिसमध्ये जावे लागले. पाहिले तर तिथे ही भलीमोठी रांग. असं उगीचच ताटकळताना ती पुढे गर्दीत कुठेतरी आसपास असायला हवी होती. तेवढा वेळ सुसह्य झाला असता. माझे मनाचे खेळ सुरू झाले. ते तर नेहमीचेच झाले होते. अगर तू होती... तो ऐसा होता... तू होती तो वैसा होता... युँ जिंदगी गुजरती तेरे दिदार में... युँ तनहा ना रहते भरे बाज़ार में... अशाच स्वप्नरंजनात साधारण दहा मिनिटांनी मी काऊंटरजवळ पोहचलो.
"येस!"
          त्या छोट्याशा खिडकीतून आत वाकून पाहिले... आणि काय काम आहे, तेच आठवेना. म्हणजे मी पाहतच राहिलो. मग थोडा गडबडलो. शेवटी काही न सुचून बाजूला झालो. पाठीमागे उभ्या असलेल्या काकांना नंबर दिला. त्यांचे झाल्यावर मग मी माझ्या हातातील लिफाफा पुढे केला.
"रजिस्टर ए.डी."
एवढे म्हणतानाही मला माझ्या आवाजात कंप जाणवला. चक्क आतमध्ये ती बसलेली होती. तिथून बाहेर पडलो तरी माझ्या हृदयाची वाढलेली धडधड मलाच ऐकू येत होती. तिने मला पाहिले असेल का? पाहिले तरी ओळखले असेल का? ओळखले असेल तर आजची माझी गडबड पाहून काय विचार केला असेल तिने? मला तिच्याविषयी आकर्षण वाटत असले तरी ते माझ्या मनातल्या मनात. तिला माझ्याबद्दल माहीत असायलाच हवे, असे थोडीच आहे. मी स्वतःची समजूत घालत राहिलो. कुछ भी हो! मंझिल का पता तो चल गया था!
          पावसाळा सुरू झाल्यावर तर बाईकला बर्‍यापैकी विश्रांती दिलेली होती. कधीतरी जोराचा पाऊस यावा आणि आडोशाला नेमके आम्ही दोघेच असावे, अशा कल्पना करून झाल्या होत्या. कधीतरी तिने छत्री आणलेली नसावी... किंवा आपणच छत्री असूनही ती लपवून ठेवावी. असल्या सिनेमात शोभतील अशा रोमँटिक कल्पनाही मनात येत राहिल्या. पण पूर्ण पावसाळा उलटून गेला तरी ती वेळ काही साधली नाही. उलट पाऊस... रेनकोट... छत्री यामुळे दर्शन कमी झाले होते. आता पुढील मोहीम होती घर शोधण्याची. संध्याकाळी अॉफिसवरून आल्यानंतर फ्रेश होऊन बाहेर पडायचे. उगीचच इकडे तिकडे भटकत राहायचे. पण अमूक एका ठिकाणी ती सापडेल याची खात्री नव्हती. समजा मी तिच्या घरापुढे जाऊन जरी उभा राहिलो. त्यावेळी ती नेमकी बाहेर दिसली तर ठीक. अन्यथा ती येथेच राहत असेल हे कळण्याची सूतरामही शक्यता नव्हती. कदाचित तिथून कितीतरी वेळा गेलोही असेन. पण उगीचच ती कुठेतरी अचानक दिसेल असेच वाटत राहायचे. दिवस उलटत होते. पण आमची गाडी तिथेच अडून बसली होती. तसा काही एकमेकांना बोलण्याचा किंवा ओळख होण्याचा प्रसंग येत नव्हता. पोस्टातही महिन्याला एखादा हेलपाटा होत होता. तिने मात्र चेहऱ्यावर कधीच ओळख दाखवली नव्हती. उलट ती एवढी शांतपणे बोलायची की, त्यातही करारीपणा जाणवायचा. आमची विकेट तिथेच उडालेली. फक्त प्रगती एवढीच झालेली. पायी असेल त्या दिवशी अॉफिस सुटले की, पटकन पुढच्या चौकापर्यंत जायचे. तिथेच काहीतरी कारण काढून रेंगाळायचे. ती आली की, तिला थोडे पुढे जाऊ द्यायचे. मग आरामात तिचा पाठलाग सुरू व्हायचा.
           अशाच एका सांजवेळी...
मी थोडासा निवांतच होतो.
सगळं काही आलबेल चाललेलं होतं. कदाचित यामुळेच मी काहीसा बेसावध होतो. अॉफिसमधल्या अप्पा भोसलेने त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. सिंगल असल्याचा हा फायदा असतो. गाडी बाहेर काढायचा कंटाळा आलेला... त्यात अप्पा घराच्या थोडे पुढे जवळच राहायला होता. म्हणून मग पायीच निघालो. अप्पाच्या घराजवळ पोहचलो असेन नसेन... मस्त असा रातराणीचा सुगंध आला... श्वासात घेता येईल तेवढा सुगंध भरून घेत नकळत मान शेजारच्या कंपाऊंडकडे वळली. भिंतीच्या पलीकडे अंगणात चोरटी नजर गेली खरी... पण नजरबंदीचा खेळ व्हावा, तशी ती नजर तिथंच खिळून राहिली. नुसती नजरच नाही, वाटही पावलात अडखळली.
          तुळशीपुढे दिवा लावत होती ती. काळोखाच्या पार्श्वभूमीवर चेहऱ्यावर पसरलेला हातातल्या दिव्याचा प्रकाश... डोईवर घेतलेला पदर... चेहऱ्यावर शांत भाव. अगदी चित्रकाराने चित्र काढावे, असा तो क्षण फ्रेममध्ये आला होता. एवढं सगळं सुंदर असतानाही नजरेला काहीतरी खटकत होते. पण काय? ते तेवढ्या क्षणार्धात समजलेही नाही. माझी चाहूल तिला लागली असावी. तिने क्षणभरच नजर उचलून पाहिले. नजरानजर होताच मी काहीसा गडबडलो. तिथून पुढे चालू लागलो. तो दोष त्या वेळेचा होता... पाहणाऱ्या नजरेचा होता... कि नजर खिळवून ठेवणार्‍या त्या चेहऱ्याचा होता? सांगणं कठीण आहे. एवढ्या दिवसाच्या तपश्चर्येचे फळ मिळाले होते. सापडली तीही अप्पाच्या कॉलनीत. पहिल्या दिवशी पाहिले तेंव्हा हाच अप्पा भोसले गाडीवरून सोडतो म्हणाला होता. आलो असतो... तर अप्पाच्या घरचा चहाही मिळाला असता आणि गेले काही महिने असेच कोरडे गेले नसते. चलो देर से सही लेकिन दुरुस्त आए थे...
                      * * * * * * *
          जेवायला तो माझ्याकडे आला तेंव्हा स्वारी एका वेगळ्या धुंदीतच होती. आजच्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवली होती. पण त्याला या बाहेरच्या नशेची गरजच नव्हती. काही खास कारण दिसत होते. मी त्याला छेडलेही. मला म्हणाला, "आपण वर टेरेसवर बसू या का हवेला?"
ते ठीकही होते. जेवण तयार व्हायला तसा वेळच होता. आम्ही मस्त चांदण्यात मैफिल जमवली. दुसरा पेग भरला; तसा त्याने खुलासा केला.
"अप्पाराव, मला वाटतंय, मी प्रेमात पडलोय राव... येस! आय यम इन लव. क्यों आजकल निंद कम ख्वॉब जादा है... लगता है खुदा का कुछ नेक इरादा है... गेले काही महिने जिचा सावलीसारखा पाठलाग करतोय, चक्क! ती सापडावी आणि तीही तुमच्याच उशाला. कुछ ना कुछ तो चक्कर चला दो...!"
त्याने त्याची सगळी कहाणी सांगितल्यावर मी कपाळालाच हात लावला. अरे! दुसरी एखादी गोष्ट असती; तर बात निराळी होती. इकडची दुनिया तिकडे केली असती. पण... इथे तर सगळा लोच्या होऊन बसला होता. आता याची समजूत कशी काढायची, हाच प्रश्न होता. झटक्यात एक पेग टॉप टू बॉटम मारला. चिमूटभर चकणा तोंडात टाकत त्याला म्हणालो,
"भूल जाओ यार उसे... भलतीच स्वप्न पाहू नकोस. ये नही हो सकता..."
"का? का नाही होऊ शकत? काय प्रॉब्लेम आहे?"
"प्रॉब्लेम? अरे सगळीच प्रॉब्लेमची समस्या आहे."
            आता त्याला काय सांगू? ती मूळची साऊथ इंडियन आहे म्हणून सांगू? का तिचे लग्न झालेले आहे म्हणून सांगू? तेही इंटरकास्ट आहे म्हणून सांगू? का हे सांगू की ती एका छोट्या मुलीची आई आहे? काय सांगू? कसं सांगू मी याला... की तिच्या दुर्दैवाने तिने काय सोसलंय? त्याला हेही सांगू का की ती विधवा आहे? तू ज्या गोष्टी मिळवण्यासाठी स्वप्न पाहतोस ती गोष्ट कधीच घडू शकत नाही, हे कसे सांगू? त्याला एवढा मोठा धक्का देणे शक्य नव्हते. त्यामुळे थोडी कळ काढणे आवश्यक होते.
"चला तुमचे विमान आकाशात जायच्या आत आपण जेवून घेऊ. वैसे तुम्हारे दर्दे दिल का मरहम हम जरूर ढुँढेंगे..."
          तो दिवस तर मी टाळला. त्यानंतर तो वारंवार माझ्याकडे येत राहिला. जसजसे दिवस उलटत चालले होते, तसतसा तो तिच्या विचारात अधिकाधिक गुरफटत चालला होता. त्याचे माझ्याकडे येणेजाणे तिच्यापासून लपून राहिले नव्हते. तसे तिचेही आमच्याकडे येणे जाणे असायचे. आम्ही तर निमित्तमात्र होतो. तिलाही आता त्याच्या अस्तित्वाची जाणीव झालेली होती. नजरेला नजरेची ओळख झालेली होती. पण तिने आपल्याभोवती एक अदृश्य अशी लक्ष्मणरेषा ओढलेली होती. त्यामुळे त्यांची ही कहाणी यापुढे जाऊ शकत नव्हती. आम्ही उभयतांनी वेळकाळ पाहत पाहत तिच्याविषयी सगळे त्याच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला होता. आम्हांला वाटले होते, तिच्या भूतकाळाबद्दल कळल्यावर तो बदलेल. पण झाले उलटेच. तो तिच्यापासून दुरावण्याऐवजी तिच्याकडे अधिकच ओढला गेला होता. खरं म्हणजे त्याने तिच्यात एवढे गुंतू नये, असेच मला वाटत होते. यातून तो काहीच साध्य करणार नव्हता. तिच्याही आयुष्यात नियतीने काय कमी गोंधळ मांडून ठेवला होता. त्यात अजून भर नको. ते दोघेही अशा ठिकाणी उभे होते. जिथून एका ठिकाणी येणे शक्य नव्हते. रेल्वेच्या रुळाप्रमाणे फक्त समांतर चालू शकतील, पण एक होऊ शकत नाहीत.
            एक दिवस आमच्या 'हि'ने वेगळाच मुद्दा मांडला. तिने आपले संपूर्ण आयुष्य असे एकटीने का काढावे? तिला तिचे आयुष्य नव्याने नाही का सुरू करता येणार? हा मुद्दा विचार करण्यासारखा असला; तरी सहज बोलण्याइतपत ही गोष्ट सोपी नव्हती. सर्व गोष्टींची कल्पना येऊनही तो त्याच्या विचारांवर ठाम होता. पण त्याच्या घरचे हे सगळे स्वीकारणार नाहीत. चांगल्या मोठ्या घरचा त्यातही एकुलता एक. त्याच्याकडून घरच्या लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा असणार. हे सगळे ऐकल्यावर त्यांची काय रिअॅक्शन येईल, याची कल्पनाच न केलेली बरी. पण मुळात हे सगळे याच्या बाजूने झाले. तिचे काय? शेवटी सगळा एकतर्फी मामला होता.
          एके दिवशी तो बाईकवरून चालला होता. काहीतरी गडबड झाली. कॉर्नरला गाडी स्लीप झाली. तो पडला. अपेक्षेपेक्षा जास्तच मार लागला. मित्र म्हणून मग मीच जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलो. त्याला आत घेऊन नर्सने मला बाहेर हाकलले. त्यामुळे आतमध्ये काय चाललंय हे मला दिसत नसले तरी एका गोष्टीने मीच हादरलो. आमच्या मागोमाग तीही तिथे आली होती. माझ्याकडे लक्ष जाताच ती थोडी गडबडली. पण तिथेच माझ्या बाजूला उभी राहिली. तो बाहेर येईपर्यंत तिची चाललेली चलबिचल नजरेतून सुटणारी नव्हती. तिच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला बदलणारे भाव मात्र बरेच काही सांगून जात होते. यापुढे माझी काळजी मिटलेली होती. आता मला काही करण्याची गरज राहिली नाही. ही 'श्टोरी' आता तिच्या वळणाने चालणार होती.
         तो बाहेर आला तेंव्हा त्याच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती. हाताला थोडेसे फ्रॅक्चर असल्यामुळे डॉक्टरांनी हात गळ्यात अडकवलेला होता. जसा तो बाहेर आला, मी काही बोलण्या अगोदरच ती पुढे झेपावली. तिच्या डोळ्यांत काळजी दिसत होती.
     "काय झालं?"
           मी काही बोलण्यासाठी तोंड उघडण्याअगोदरच तो म्हणाला, "नथिंग! गाडी स्लीप... किरकोळ आहे सगळं."
      "हं...बी केअरफूल!"
           संध्याकाळी तिला त्याच्या घरी नेऊन सोडण्याची शेवटची जबाबदारी पार पाडून तिने त्याच्यासाठी आणलेले सफरचंद खात आलटून पालटून मी दोघांकडे पाहतच राहिलो.
                     * * * * * * *
          मी त्याच्याकडे एवढी का ओढली जावे, हे माझ्यासाठीच आश्चर्य होते. रस्त्याने जातायेता तो दिसायचा... तो आवर्जून माझी वाट पाहतो... नकळत मला सोबत करतो, हे मला जाणवले होते. पण मी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले होते. तो पोस्टात आला, तेंव्हा तर मुद्दाम निमित्त काढूनच आलाय, याची खात्रीच झाली होती. पण तो समोर आल्यावर मला पाहून इतका गडबडला की, माझे तिथे असणे त्याला अनपेक्षित होते. त्याची ती अवस्था पाहून मलाच हसू आले. त्या दिवशी तर मी तुळशीजवळ दिवा लावत होते. अचानक तो मला दिसला. तो मला शोधत आला असेल, असे वाटत नाही मला. तरीही तो आला होता. पण म्हणून मला त्याच्याबद्दल काहीएक का वाटावे? तो आशाताईंच्या घरी येतो, हे कळल्यावर माझेही त्यांच्याकडे जाणे का वाढावे? त्याच्याबद्दल आकर्षण वाटायला मी काही अल्लड नाही. एका छोट्याशा मुलीची आई आहे मी. मुळात अरविंदच्या अकाली जाण्यामुळे माझ्या आयुष्यात काय कमी उलथापालथ झालीय का? का अरविंदवरचे प्रेम अचानक आटून गेलेय, म्हणून मी अशी याच्याकडे ओढली गेले. मुळात याच्याबद्दल माझ्या मनात एवढा विचारच का यावा? आपण कुठेतरी चुकतोय, हे कळूनही का सावरू शकलो नाही स्वतःला? त्या दिवशी त्याचा अॅक्सिडेंट झाला. चूक आपलीच होती. काही कारण नसताना अचानक मीच रस्त्यावर आडवी आले. त्याने ब्रेक मारला. आपल्याला वाचवण्याच्या नादात तोच पडला. मुळात अपराधी भावनेने त्याला पाहण्यासाठी मागोमाग हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी किती घाबरून गेले होते. अप्पांना काय वाटले असेल?
           पुढे एकमेकांशी ओळख झाली. येणेजाणे वाढले. आपण खरं तर त्याला वेळीच दूर ठेवायला हवे होते. पण खोटं कशाला सांगू. गुंतत गेले मी त्याच्यात. त्याच्याही नकळत मी त्याच्यामध्ये अरविंदला शोधत राहिले. गार्गीला तर किती लळा लागलाय त्याचा. तो तिच्यासोबत खेळतो. तिला फिरायला बाहेर घेऊन जातो. अरविंद असता तर त्याने जे केले असते, ते सगळे हा करतो. कदाचित त्यामुळेच असेल. माझ्यासाठी नाही. गार्गीसाठी तो माझ्या आयुष्यात आला. फक्त गार्गीसाठी? नाही. मी त्याला एवढे जवळ येऊ द्यायला नको होते. त्याला गुंतवून ठेवायला नको होते. पण त्यानेही कधी गैरफायदा घेतला नाही. किती रिस्पेक्टली वागत राहिला. आजपर्यंत अनेक पुरुष पाहिले. अॉफिसमध्येही. बाहेरही. आसपासही. एकटी म्हणून जवळ यायला पाहणारे... सहानुभूतीच्या नावाखाली ओशट स्पर्श करणारे... विनाकारण मवाळ होणारे... डोळ्यांतून त्यांची लालसा टिपकत राहते. पण याने साधा चुकार स्पर्शही कधी केला नाही. अदबीने वागत राहिला. देता येईल तेवढा आनंदच दिला. साध्या साध्या बोलण्यातून मला हसवण्यासाठी धडपडत राहिला. माझ्या पूर्वायुष्याविषयी चुकूनही बोलला नाही. हे असं आहे. त्याच्याविषयी विचार करायला लागले की, त्याच्यात अजून गुंतून जाते. एका स्त्री आणि पुरुषामध्ये निखळ नातं असू शकत नाही का?
           आज आपण आपल्याच हाताने स्वतःवर ही वेळ आणलीय. एवढे दिवस... एवढे महिने... अगदी वर्ष उलटून गेले. आता त्याला माझ्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. त्याला वाटतेय, मी त्याच्यासोबत आयुष्य काढावे. त्याचंही चुकतंय असं नाही. उलट मी विधवा आहे... एका मुलीची आई आहे, हे माहीत असूनही मनाचा मोठेपणा दाखवून तो मला लग्नासाठी विचारतोय. पण मला हे शक्य नाही. कसं समजावून सांगू त्याला? मीच माझ्या स्वार्थापोटी विणलेल्या मोहपाशात स्वतःही अडकले आणि त्यालाही अडकवले. मला कळायला हवं होतं... आपण शेवटपर्यंत त्याला साथ करू शकणार नाही. ही कहाणीही अधुरीच राहणार. आपण आपल्या नाही, निदान त्याच्या तरी मनाचा विचार करायला पाहिजे होता. या सगळ्यात त्याचा काय दोष? आपल्या चुकीची शिक्षा त्याने का भोगावी? त्याला किती यातना होतील? पण आता बस्! यापेक्षा जास्त ताणण्यात अर्थ नाही. हे सगळं कुठंतरी थांबायला हवं.
                       * * * * * * *
     "चला. आपण निघूया. गार्गी घरी वाट पाहत असेल. निघायला हवं."
     "एकंदरीत तुम्ही उत्तर द्यायचंच नाही, असं ठरवलेलं दिसतंय. मी यातच तुमचा नकार समजावा का?"
     "हो!" मोठ्या निग्रहाने तिने उत्तर दिले. "तसं समजा. पण यापुढे मला तुमच्यासोबत तुमच्या वाटेने चालणे शक्य नाही. ही माझी एकटीची वाट आहे. मलाच चालायला हवी. तुमच्याकडून मी सोबतीची अपेक्षा ठेवू शकत नाही. हवं तर या तापलेल्या वाटेवर तुम्ही सावलीसारखे भेटलात, असं समजा. माफ करा, पण आता मला पुढे निघायला हवं."
     "हं...!" त्याने एक सुस्कारा सोडला.
     "तुम्ही कधी विचारलं नाही आणि मीही कधी सांगितलं नाही. पण आता मी तुम्हाला अंधारात ठेवू शकत नाही. तसं केलं तर ती माझीच प्रतारणा ठरेल. गार्गीचे बाबा कसे गेले माहितेय?"
     "नाही. पण ते जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही."
      "तुम्हाला नाही, पण मला आवश्यकता वाटतेय म्हणून सांगते..." क्षणभर थांबून सगळे अवसान गोळा करत ती म्हणाली, "एडस्!"
      "काय...?" जवळजवळ तो किंचाळलाच.
      "हो!"
           काळ जागेवरच गोठून गेलाय कि काय? असे त्याला झाले. तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्या एका शब्दाने तो पार गारठून गेला होता. आजपर्यंत त्याने हा शब्द कितीतरी वेळा ऐकला होता... उच्चारला होता. पण हा भयंकर राक्षस आपल्याच उंबरठ्यावर येऊन बसला असेल, याची त्याला पहिल्यांदा जाणीव झाली. अंगावरून कुणी संपूर्ण कातडी ओरबाडून काढली कि काय? असे त्याला वाटू लागले. डोके सुन्न झाले. थोडावेळ अशाच बधीरपणात गेल्यावर नाही नाही ते विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. पण तेवढ्यात अंधारातूनही प्रकाशाची तिरीप दिसावी, तसा त्याला आशेचा किरण दिसला. तो काहीसा चाचरत म्हणाला.
      "पण... म्हणून... तु म्हा ला? आपण हवी तर तुमची टेस्ट करून घेऊ."
       "त्याची आवश्यकता नाही. गार्गीचे बाबा गेले. जाताना खूप काही ठेवून गेले. गार्गी आहे... त्यांच्या आठवणी आहेत. कदाचित त्याचा आजारही असेल. मला तो कुणालाही द्यायचा नाही. स्वार्थी समजा हवं तर... पण हे ओझं मलाच पेलावं लागेल."
             तिने हात जोडले... आणि ती उठून चालू लागली. तो तिच्या पाठमोर्‍या शरीराकडे पाहतच राहिला. कुठेतरी एक टिटवी त्याच्या काळजाला घरं पाडत ओरडत गेली. त्याच्या डोळ्यांतून ओघळलेला आसवाचा थेंब गालावर येऊनही तो पुसण्याचेही त्याला भान उरले नव्हते...!

(समाप्त)


-- श्री नंदकिशोर गायकवाड.


Wednesday, 9 August 2017

अबोली... (कथा)

अबोली...!


          खरं म्हणजे प्रेम काय असतं... हे कळण्याचं ते वय नव्हतंच. आतातरी फार कळलंय असं कुठेय? पण तरीही त्या नकळत्या वयातच मला कुणाची तरी ओढ लागली होती. नुकतंच कुठे तेरावं वर्ष संपून चौदावं लागलं होतं. वर्गातील मुलामुलींचा एकमेकांच्या जोड्या जुळवून चिडवण्याचा उद्योग चाले. मला अशी कुणासोबतच जोडी नको होती. मी माझ्याच मनात एक गुपित जपलेलं होतं. मी ते कुण्णाला कुण्णाला सांगणार नव्हते. अगदी माझ्या जवळच्या मैत्रिणींनासुद्धा. का सांगू? त्यांना कळलं असतं तर कदाचित त्यांनी मलाच वेड्यात काढलं असतं. म्हणून माझी ही जमाडीगंमत मी माझ्याच मनात लपवून ठेवली होती.
            पाहता पाहता दहावी संपली. आता मी मोठी झाले होते. आता मी कॉलेजात जाणार होते. तरीही एका गोष्टीचा मला राग आलेला होता. अरे एवढ्या दिवसांत त्या माणसाला मात्र माझी ही ओढाताण कळलेली नव्हती. का कळूनही न कळल्याचे नाटक चालले होते. राग येईल नाही तर काय? मग मी त्याच्यापासून दूर जायचं ठरवलं. अकरावीला मी मावशीकडे पुण्याला आले. इथल्या नव्या वातावरणात मी अगदी हरवून गेले. गावापेक्षा इकडचे वातावरण फारच वेगळे होते. मुलंमुली अगदी एकत्रित राहायची. फारच मोकळेपणा होता वागण्याबोलण्यामध्ये. सुरुवातीला मी लाजले बुजले. पण हळूहळू मला सवय झाली त्याची. अनेक नवनवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या. काही हायहॅलोपुरते होते, तर काही अगदी जिवलग बनले होते. कधीकधी गावाकडची आठवण यायची. पण तेवढ्यापुरतीच. इथल्या वातावरणाने माझ्यावर मोहिनीच घातली होती म्हणा ना! रोज काही ना काही नवे असायचे.
           बारावीचा शेवटचा पेपर झाला त्यादिवशी आमच्या सर्व ग्रुपने असाच गेटटुगेदर ठरवला होता. सारसबागेत आम्ही गेलो होतो. भेळ खाल्ली. पाणीपुरी, कचोरी, रगडा अगदी काय हवे ते खाल्ले. शेवटी आईस्क्रिमसुद्धा खाल्ली. निघताना तर अगदी फुगे आणि बुढ्ढी के बालसुद्धा घेतले. निकालाच्या दिवशी सर्वांनी पुन्हा भेटायचे कबूल करून सायंकाळी सर्वजण आपापल्या मार्गाने पांगले. सुमित मात्र मला घरापर्यंत सोडण्यासाठी आला होता. घर जसजसे जवळ येऊ लागले, तसतसा तो अबोल होत गेला. तो बोलायचं केंव्हा थांबला ते माझ्याही ध्यानात आले नाही. मी मात्र एकटीच बडबडत राहिले. मुळातच सुमित काही बोलका नव्हताच. त्यामुळे असेल कदाचित. घराच्या शेवटच्या कॉर्नरला आम्ही पोहचलो, तेंव्हा तो थांबला. आपण पोहचलो हे ध्यानात येऊन मी बोलायची थांबले. त्याच्याकडे एक स्मित टाकत, "भेटूया निकालादिवशी!" असे म्हणून बाय केला व पुढे निघाले. चार पावलं गेले असेल नसेल. तेवढ्यात सुमितने हाक मारली म्हणून वळून पाहिले आणि मी थक्कच झाले. तो पुतळ्यासारखा जागेवरच खिळून उभा होता. पण त्याचे डोळे मात्र पाण्याने डबडले होते. कोणत्याही क्षणी पापण्यांचा बांध फोडून ते वाहिले असते. मला सुचेनाच. मी काय करावे ते. कशीबशी दोन पावलं परत आले.
      "काय रे? काय झालं?"
      "मला तू आवडतेस."
बस्! एवढेच बोलून मागे फिरून तो निघून गेला.
          त्या दिवशी असे काही घडेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. नाही म्हणायला, सुमित माझ्याबाबतीत जरा जास्तच हळवा आहे, याची जाणीव होती तशी. बाकीच्या दोस्तांमध्ये सुमित थोडा वेगळाच होता. एकतर घरची परिस्थिती तशी बेताचीच. कायम जबाबदारी डोक्यावर असलेल्या पोक्त माणसांसारखा वागायचा. शिक्षण पुरे झाले की, लवकरच मला स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल, असं काहीसं म्हणायचा. आताही या वयात तो कुठेकुठे काही कामं करून चार पैसे मिळवायचा. माझी आणि त्याची ओळख होईपर्यंत तो आमच्याच काय कुठल्याही ग्रुपमध्ये नव्हता. पण माझ्याशी मैत्री झाल्यानंतर तो हळूहळू आमच्यात मिसळू लागला. इतरांशी तो जास्त क्लोज गेला नाही. पण माझ्यासोबत असला की, बराचसा मोकळा व्हायचा. त्याच्या बर्‍याच गोष्टी त्याने मला सांगितल्या होत्या. मला म्हणायचा, तुझ्याशी बोलायला लागलो की, मला तुझ्यात माझी आजी दिसते. आई तर कधी पाहिली नाहीच. पण तीही तशीच असेल.
          एवढ्या दिवसांत तो तसं काही बोलला नव्हता. त्यादिवशी मात्र त्याने मनातले बोलायचे धाडस केले. मी त्याला काय उत्तर द्यायला हवं होतं? तसेही काही ऐकून घ्यायला तो थांबलाच कुठे? पण घडलेल्या त्या प्रसंगाने मी मात्र आतून बाहेरून हलले होते. सुमित त्याच्या मनातलं बोलला असला, तरी माझ्या मनात नेमके काय चाललंय हे त्याला कसे माहीत असेल? मला तरी ते नक्की सांगता आले असते का? पुन्हा माझा गोंधळ उडाला. मलाच कळेना, मला नेमके काय हवेय?
          सुट्या असल्याने मी घरी आले. निकाल लागून पुढील कॉलेज वगैरे सुरू व्हायला खूप अवकाश होता. फक्त वेळ घालवायचं चाललं होतं. पण घरी आल्यानंतर एक गोष्ट झाली. अनेक जुने क्लासमेट भेटले. जुन्या हक्काच्या मैत्रिणी भेटल्या. त्यांचे जग आता खूप बदलले होते. माझेही बदलले होते. पण काहीतरी खासच बदलेलं नव्हतं. तीच ओढ पुन्हा जाणवू लागली. यात बरेच दिवस गेले. पण मन काही स्वस्थ बसू देत नव्हते. शेवटी एके दिवशी मनाचा हिय्या करून मी शाळेत गेले. मैदानावर फेरफटका मारला. शिपाईमामांना मस्का मारून माझ्या प्रत्येक वर्गात जाऊन आले. अगदी माझ्या बाकावर बसून आले. बरेचसे जुने शिक्षक भेटले. त्यांच्याशी बोलले. नमस्कारसुद्धा केला. देशमुख मॅडमनी जुन्या सवयीने हातावर खडीसाखर ठेवली. ती तोंडात घोळवत बाहेर पडले. पण काहीतरी हरवून गेलेले सापडत नव्हते. विचारणार तरी कोणाला? काही गोष्टी एकदम साध्या असतात. पण तुमच्या मनातून त्या स्पेशल असतात. त्यामुळे तो विषय काढायचं म्हटलं तरी उगीचच तुमचं काळीज धडधडतं. माझंही तसंच झालं होतं. त्यामुळे चौकशी करण्याचे काही धाडस झाले नाही. पण गेटमधून बाहेर पडताना उगीचच हळहळ वाटत राहिली.
          शाळेत जाऊन आल्यापासून काहीतरी मनातलं गप्प बसू देत नव्हते. कुणाला सांगताही येत नव्हते. मग मैत्रिणींकडून आडून आडून चौकशी सुरू झाली. जुन्या आठवणी निघाल्या की, सगळ्याजणी भरभरून बोलायच्या. पण नेमका विषय आला की, माझी धडधड सुरू व्हायची. सगळे विषय झाले. मला नको असलेले आणि अगदी मला हवे असलेलेसुद्धा. आमचा वर्ग... आमच्या वर्गातील गमतीजमती... आमची ट्रिप... आमचे शिक्षक... त्यांच्या नकला... आमची भांडणं... रुसवे फुगवे... स्पर्धा... ईर्ष्या... हेवेदावे... शिक्षा... कधीतरी झालेली फजिती... ऐकलेल्या गोष्टी... सांस्कृतिक कार्यक्रम... जसजशी आठवणींची पानं उलटत गेली, मी आणखी गुंतत गेले.
           अपेक्षित गोष्टी अनपेक्षितपणे समोर आल्या की, सुखद धक्का बसतो. त्याच्याबाबतीत काहीसं तसंच झालं होतं. शहरात आला म्हणून पोशाख थोडासा व्यवस्थित होता एवढंच. पण तो लेंगा पायजमा आणि कोपरापर्यंत मुडपलेला शर्ट घालून आला असता तर जास्त चांगला दिसला असता. सावळ्या रंगाचा... कुरळ्या केसांचा... त्याची मराठवाड्याकडची भाषा आणि वरचा ओठ झाकतील अशा मिशा... तशीच उंची... आणि राठ वाटणाऱ्या चेहऱ्यावर मिष्किल भाव... वर्गात आला तेंव्हा सर्वांनाच वाटलं आता याला शेंड्या लावणं सहज सोपं आहे. पण पहिला तास केंव्हा संपला कळलंच नाही. हसता हसता भावनिक केंव्हा झालो, हे सांगता येणार नाही. त्याच्या डोळ्यांत काहीतरी जादू होती. अगदी पुढच्या माणसाच्या आतमध्ये डोकावणारी नजर काळजाचा ठाव घ्यायची. हे एक वेगळेच रसायन होते.
          आज पाच वर्षांनंतर तो अचानक समोर आला; तेंव्हा 'तो' हाच का? असा प्रश्न पडावा इतका बदलला होता. अगदी इन वगैरे करून अपटूडेट कपड्यातला... फ्रेमलेस चष्मा लावलेला... व्यायामही करत असावा. बोलण्यात शहरीपणा आला असला तरी मिष्किलपणा तोच होता. तो खूप बदलला होता. पण चष्म्याआडूनही त्याची नजर तशीच करारी होती. उन्हाचा कवडसा पडावा, तशा भावछटा सरसर बदलत होत्या. वैशूने सांगितले, त्याने नोकरी सोडलीय म्हणून. प्रशासनाशी म्हणे त्याचे पटले नाही. कसे पटेल? त्याचा हेकेखोरपणाच त्याला नडला असेल. पण आता त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. तशी आता मला त्याला भेटण्याची उत्सुकता होती. म्हणून मग वैशूसोबत त्याच्या अॉफिसवर गेले. छोटेच परंतु मस्त अॉफिस बनवले होते. बाहेर गाडीही उभी होती. एकूण प्रगती बरी दिसतेय. पण अॉफिसमध्ये काम करणारी मुलगी बघून तिचा आणि त्याचाही रागच आला. फटाकडीच होती. तो मात्र आपल्या कामात मग्न होता. चांगले बोलला आमच्याशी. निघताना वैशू त्याच्या पाया पडली. हो... जुने विद्यार्थी ना! का एवढा रिस्पेक्ट देतात त्याला कुणास ठाऊक! खडूस साला! मी शाळेत होते तेंव्हा माझ्यावर किती ओरडला होता. सर्वांसमोर माझा अपमान केला होता. आता मात्र काही झालंच नाही, असं वागत होता. पण मग मी त्याला का भेटायला आले? मी काही पाया पडले नाही. पण तरीही मनातून काही वेगळेच वाटत होते.
          एकदाच नाही. त्यानंतर मी त्याला भेटायला बर्‍याचदा त्याच्या अॉफिसला गेले. एकदोनवेळा वैशू सोबत आली होती. पण मग नंतर मीच एकटी जायचे. निवांत असेल, तर बरं बोलायचा. पण गडबडीत असेल, तर अगदी सहज कटवायचा. खडूस! एकदा मीच त्याला म्हणाले. मला पुढील कॉलेज करत करत एखादा पार्ट टाईम जॉब करायचाय. खरं तर त्या फटाकडीला त्याने तिथून हाकलून मलाच तिच्या जागेवर जॉब मिळावा, असे का कोण जाणे मनातून वाटत राहिले. त्याने मात्र अगदी सहज 'आपण शोधू तुझ्यासाठी एखादा चांगला जॉब' म्हणून माझी समजूत काढली. हवं तर तोपर्यंत तू येथे येऊ शकतेस, असं मात्र बिलकूल म्हणाला नाही.
            निकालासाठी चार दिवस पुण्याला गेले खरी. एवढ्यात एक गोष्ट मात्र माझ्या अजूनही लक्षात आली नव्हती. मी चक्क पुढे पुण्याला राहण्याचे टाळून तिथेच राहायचे नकळत ठरवून मोकळी झाले होते. या चार दिवसांत सुमित भेटलाही. मी त्याच्याशी खूप मनमोकळेपणाने वागले. त्याच्या प्रश्नाचे काही उत्तर द्यायला हवे, हेही माझ्या लक्षात आले नाही. मी ते जवळजवळ विसरून गेले होते. दुसरी गोष्ट म्हणजे या चार दिवसांत जेंव्हा जेंव्हा आम्ही भेटलो, तेंव्हा तेंव्हा मी सुमितला फक्त 'त्याच्या'विषयीच बोलत राहिले. सुमित मला बसवून द्यायला स्टेशनवर आला होता. गाडी सुटताना त्याने मला 'त्याचा' नंबर मागितला.
     "मला आवडेल त्यांच्याशी बोलायला. माणूस फार रॉयल वाटतो. पुढेमागे मला कामासाठी मदतही मिळेल त्यांची." सुमितचे स्पष्टीकरण काही मला पटले नसले तरी त्याचा नंबर मात्र दिला.
            आम्ही वारंवार भेटत होतो. फोन वगैरे चालूच होते. तो फार मनमोकळेपणाने बोलायचा. मला मात्र काहीच सुचत नव्हते. हळूहळू मी बहुतेक त्याच्यात गुरफटत चालले होते. पण त्याला मात्र तशी कधी जाणीव होऊ दिली नव्हती. कधीतरी तोच म्हणायचा. एवढी बडबडणारी मी पण मध्येच कुठे हरवून जातेस? मला तरी काय माहीत. ऊनपावसाच्या खेळाबरोबर माझ्या मनात कल्पनेचा खेळ सुरू झाला होता. एकदा त्याच्या गाडीतून वैशू, मी आणखी वैशूचा मोठा भाऊ होता सोबत... आम्ही कोयनानगरला गेलो होतो. मला त्याच्या शेजारी बसायचं होतं. त्याला ड्रायव्हिंग करताना गुपचूप पाहायचं होतं. पण मी मागेच बसले. दिवसभर आम्ही खूप भटकलो. खूप एन्जॉय केला. गप्पा तर इतक्या झाल्या. कुठल्याही विषयावर त्याच्याकडे बोलण्यासारखे काही तरी असायचेच. मध्येच एकदा त्याला एक फोन आला. फोन काय नेहमीच येतात. पण त्याने कट केला. परत फोन. परत कट. तिसऱ्यावेळी मात्र त्याने कॉल रिसिव्ह केला. पण गाडी साईडला घेऊन तो बाजूला जाऊन बराच वेळ फोनवर बोलत होता. परत आला तेंव्हा हसतहसत 'स्वारी' म्हणाला. पण त्याचे हे हसणे नेहमीप्रमाणे नव्हते, हे मात्र लगेचच जाणवले. मग बराचवेळ कोणीच काही बोलले नाही. शेवटी भैय्यानेच विचारले. "काय झालं सर?"
अगोदर त्याने शांतपणे नथिंग स्पेशल म्हणून मान हलवली. पण लगेचच त्याचा मिष्किलपणा जागा झाला. चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. "या आठवड्यात माझा प्रेमभंग होणार बहुतेक."
     "सर, तुम्ही आणि प्रेम?"
     "हो रे बाबा! करायला नको ती चूक करून बसलो. माझी एक जुनी मैत्रीण आहे. तिचा साखरपुडा आहे. आणि ती शहाणी मला इनव्हिटेशन देतीय. मग काय? आमचा देवदास होणार. सो तुम्हाला एक फुकटचा सल्ला आहे. डोन्ट प्ले धीस सिली गेम." आणि हसत सुटला.
          मी मनातून चिडले होते. केंव्हापासून मला याच्याविषयी काहीतरी वाटतंय. आणि हा खुशाल अगोदरच एंगेज होता. माझ्याशी त्याला काही देणंघेणंच नाही. मी पुढचा आठवडाभर त्याला भेटणे तर दूरच. पण साधा फोनही केला नाही. नंतर मग न राहवून मीच त्याच्या अॉफिसला गेले. आणि त्याचे त्याला काहीच नाही. उलट मलाच म्हणाला, "स्वारी यार! या आठवड्यात मी फारच बिजी होतो. फोनपण नाही करू शकलो. पण तुझ्याकडे जेवायला केंव्हा येऊ तेवढं सांग. मेसचं खाऊन कंटाळा आलाय. तसंही वैशूकडे दोनतीनवेळा झालंय. आता तुझ्या मम्मीच्या हातचं खाऊ घाल. तसंही वैशूसारखं तुला तर काय बनवायला जमणार नाही. मी तुझ्या मम्मीच्या हातचेच खाईन."
याच्या याच गोष्टींचा मला राग येतो. काहीच झालं नाही, असा वागतो. समजूत काढणे दूरच. विषय असा अलगद बाजूला सारून पुढच्याची हवाच काढून टाकतो. मग काय त्याच्या अॉफिसवरची कॉफी डोसून आम्ही घरी.
          या दोन वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा राग कधीच संपून गेला होता. मी त्यांच्यापेक्षा आठनऊ वर्षांनी लहान असूनही आमची छान मैत्री झाली होती. एकमेकांच्या हरवण्याच्या जागा आम्हांला कळत होत्या. ते बोलायला लागले की मी हरवून जायचे. मी अबोल झाले की, ते ओळखायचे. वरून पुन्हा हसतहसत म्हणायचे, "बच्चू, तू अजूनही लहानच आहेस. उगीचच वयापेक्षा जास्त पोक्तपणा आणू नकोस. तुझं काय माहीत नाही. पण मी तुला तुझ्यापेक्षाही चांगलं ओळखतो."
पण जे त्यांना ओळखता आले नव्हते किंवा त्यांनी तसे दाखवले होते... ते शेवटी त्यांना सांगावे लागले... तीच तेंव्हापासूनची अनामिक ओढ... आणि त्यांच्या त्या जुन्या मैत्रिणीचा फोन आल्यावर माझी होणारी तडफड...
          त्या नकळत्या वयात वाटणारी ओढ आता वयाप्रमाणे अधिकाधिक पक्व होत चालली होती. मी प्रेमात पडले होते कि नाही हे मलाही सांगता येणार नाही. तरी मनातून कुठेतरी ते मला आवडत होते. अगदीच मी त्यांच्या प्रेमात आकंठ वगैरे बुडाले होते, असं नाही म्हणणार. परंतु त्यांचा सहवास मला आवडायचा. त्यांचं दिलखुलास हसणं... त्यांचं बोलणं... त्यांचं वागणं... त्यांचं रागावणं... त्यांचं बोटात चावी फिरवणं... त्यांचं मध्येच गुणगुणणं... खुशीत असले की शीळ घालणं... काय काय सांगू? त्यांचं नुसतंच जवळ असणंही मला आवडायचं. त्यांची प्रत्येकच गोष्ट आवडत होती असंही नाही. बाहेर गेल्यावर त्यांना सिगारेट ओढताना पाहिलं होतं काहीवेळा. ते नाही आवडलं. पण गाडीला टेकून ते असे काही तल्लीन होऊन कुठंतरी एकटक पाहत उभे असायचे की, तो धूरही धुक्यासारखा स्वप्नाळू वाटला. ते समोर नसतानाही; ते सारं काही दिसायचं. त्यांच्याशी बोलताना वेळ अगदी पंख लावून उडून जाई. बोलण्यासारखं काही असावंच असंही नव्हतं. न बोलताही खूप काहीतरी हितगुज चाललेलं असायचं. या अर्थाने म्हणाल; तर हो! मी प्रेमात पडले होते. होते...? ते तर आजही आहे. मुळात हे सारं कबूल करण्यापेक्षा ते सारं लपवण्याचीच धडपड जास्त होती. अर्थातच हे सारे मनातून. त्यांच्यासोबत असताना एक एक क्षण मी जगत होते. पण हे सर्व त्यांना सांगावेसे वाटूनही भीती वाटायची. न जाणो त्यांच्या मनात असं काही नसेल. माझ्या भावना त्यांना समजल्या; तर ते गैरसमज करून घेतील... कदाचित दुरावतीलही. म्हणून कायम हे सारं खोलवर मनात गाडून टाकत राहिले.
          एक गोष्ट मात्र माझ्या मनासारखी झाली होती. मला कुठेच हवा तसा जॉब मिळाला नाही. उलट त्यांच्या अॉफिसमध्ये कामाचा व्याप वाढलेला होता. आठवड्यातून चार दिवस ते बाहेरच असायचे. त्यामुळे मीच स्वतः होऊन कॉलेज सुटले की, अॉफिसला जायला सुरुवात केली होती. त्यांच्या गैरहजेरीत त्यांनी न सांगताही अनेक कामे मीच करत होते. ते असोत नसोत मीही त्या अॉफिसचा एक भाग बनले होते. त्यांनाही आता माझ्या असण्याची सवय झाली होती. कामातून वेळ मिळाला की, त्यांना माझ्या कॉलेजची आठवण यायची. साधारण कुठेतरी बाहेर जाण्याचा मूड आहे, हे मग माझ्या लक्षात यायचे. तसं तर मी कॉलेजला नियमित जात होते. मग एखादा दिवस मी कॉलेजला दांडी मारायचे. तो दिवस आम्ही बाहेरच काढायचो. कुठेतरी छान फिरून यायचो. एखाद्या दिवशी उशीर झाला तर ते मला सोडवायला घरी यायचे. कधी जेवायला नाही थांबले तरी आईच्या हातचा गोड चहा पिऊन आजीशी, बाबांशी थोडेफार बोलून निघत. त्यामुळे घरचेही त्यांच्या बाबतीत निश्चिंत होते. पण घरच्यांचा हा विश्वासच आमच्यासाठी खूप मोठा अडथळा होता. ही मर्यादा ओलांडणे ना मला शक्य होते... ना त्यांना. आम्ही एकाच मार्गाने जात होतो... पण दोन समांतर रेघांसारखे... सहज हात पुढे केले असते; तर हातातही आले असते. पण... तोच त्यांचा लादलेला विश्वास जपण्यासाठी मनातून मी स्वतःचा बळी देत राहिले...
          पाचगणीच्या पठारावर गाडी उभी होती. अर्थातच गाडीत आम्ही दोघेही होतो. यावर्षीचा पावसाळा बेभानपणे कोसळत होता. संपूर्ण पठार ढगांची दुलई पांघरून शांत झोपलेले होते. त्या पांघरूणाखाली आम्ही... अवघ्या काही फुटांपलीकडे काहीच दिसत नव्हते. आम्ही आणि सभोवतालचे जग यामध्ये धुक्याचा आंतरपाट पसरलेला होता. पाऊस सुरू असूनही एक ऊबदारपणा होता. गाडीत 'नभ उतरू आलं...' सारखी गाणी हलक्या आवाजात पार्श्वसंगीताचा आभास निर्माण करत होती. काळही असाच गोठून जावा... आणि हे क्षण असेच आठवणींच्या कुपीत बंद करून ठेवावेत, असे वाटत होते. आम्ही मात्र चक्क तासभर तरी विशेष काही न बोलताच निवांत बसलो होतो.
          बराच वेळ ते नुसतंच एकटकपणे माझ्याकडे पाहत राहिले. त्यांना काही बोलायचं होतं का? त्यांच्या नजरेची जाणीव होऊन मी अस्वस्थपणे ओढणीशी चाळा करावा तशी धुक्याच्या चादरीशी खेळत राहिले. वाटलं गाडीतून उतरावं... पावसात भिजावं... पण हे मौन संपवावं एकदाचं. खूप काही बोलण्यासारखे होते. ते काहीच बोलले नाहीत. आणि मी माझी ओढ बोलून दाखवू शकत नव्हते. पण मला एक कळत नव्हते की, मला त्यांच्याबद्दल इतक्या सार्‍या फिलिंग्ज असताना त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल का? आम्ही एवढा वेळ एकत्र असतो... एकमेकांशी इतक्या सार्‍या गोष्टी बोलतो... एकमेकांचा सहवास हवा असतो... ते बस् एवढ्यापुरतेच मर्यादित आहे का? आम्ही आयुष्यभरासाठी एकत्रित राहू शकत नाही का? मुळात आपण कोणाच्या तरी इतके जवळ का जातो??? तसे तर आपण अगदी 'कोणा'च्याही जवळ जातच नाही. जिथे ओढ वाटते; तिथेच आपण समर्पण करतो.... स्वतः होऊन स्वतःला विसरतो. कारण त्या नात्यांमध्ये आपलेपणाची ऊब असते. या उबार्‍याच्याच तर आपण शोधात असतो. अशी हक्काची जागा मिळाली की, आपण विसावतो. आपल्याही नकळत आपल्यालाच विसरतो. हा 'हळवा कोपरा' आपण प्राणापलीकडे जपतो.
           तो एकांत... ते धुंद वातावरण... त्यांनी नुसते हात पसरले असते तरी मी नकळत त्यांच्या मिठीत विसावले असते. आमच्यातले अंतर क्षणार्धात गळून गेले असते. ती वेळच अशी होती की, आमच्या दोघांपैकी कोणीही एकाने थोडे मनात आणले असते तर... पण या जर... तर... मध्येच आपण का अडकून पडतो? मनातले भाव कधीतरी ओठातून... स्पर्शातून... अगदीच नाहीतरी नजरेतून व्यक्त होऊ द्यावेत. भावनांनाही संजीवनी मिळते...
नाहीतर मग आहेच दडपून टाकलेल्या भावनांसाठी काळजाची कबर. अश्रूंची दोन फुले आणि अगतिक सुस्कारा सोडून मोकळे व्हावे लागते! 
           त्यांच्या मनात काय असेल? त्यांना काय वाटत असेल? नसेलच काही तर नाराज तर होणार नाहीत ना? असेल तर ते व्यक्त का होत नाहीत. आता त्यांनी माझा हात जरी हातात घेतला असता तरी मी पूर्ण विरघळून त्यांच्यात सामावले असते. पण मी त्यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतः मात्र व्यक्त झाले नाही.
      "काही बोलणार आहेस का?"
      पण मी काहीच बोलू शकले नाही. त्यांच्या नजरेला नजर देण्याचेही धाडस झाले नाही. मी फक्त नाही म्हणून मान हलवली. पुन्हा मौनाचा पदर धरला. थोडावेळ थांबून आम्ही परत फिरलो. वाटेने ते काही काही बोलत होते. पण मी मात्र जीव नसलेल्या बाहुलीसारखी फक्त ऐकत होते. त्यातले कानात किती शिरले कोणास ठाऊक!
       "तुला माझा राग येत असेल ना! साहजिकच आहे. तुला वाटत असेल, काय पत्थरदिल माणूस आहे. मला वाटतं, मी तुला जे सांगतोय ते तुला समजून घेता येईल की नाही, माहीत नाही. पण तुझ्या मनात असलेल्या माझ्याबद्दलच्या भावना मी समजू शकतो. आपल्याला एखाद्या गोष्टीचे आकर्षण वाटते, ते चूक नाही. पण ते व्यक्त करता येईलच असेही नाही. आपल्याला काही मर्यादा असतात. कधीकधी वाटतं उधळून द्यावं, हे सारं. पण या मर्यादाच आपल्याला बांधून ठेवतात. बघ ना! किती गंमत आहे. मलाही कुणाविषयी तरी असंच काहीसं वाटायचं. पण नशिबाने आमच्या वाटा वेगवेगळ्या लिहिलेल्या होत्या. मी अजूनही तिला विसरू शकत नाही. आणि तुझा तो... कोण? आय थिंक सुमीत... त्यालाही तू आवडत होतीस. पण तू माझ्यात एवढी गुंतत गेलीस की, आज त्याच्यापासून तू खूप दूर निघून आलीस. खरं म्हणजे यात दोष कोणाचाच नव्हता... आता प्रश्न एवढाच आहे की, मला तुझ्याबद्दल काय वाटते?"
          "तुला माझा राग येत असेल ना! साहजिकच आहे. तुला वाटत असेल, काय पत्थरदिल माणूस आहे. मला वाटतं, मी तुला जे सांगतोय ते तुला समजून घेता येईल की नाही, माहीत नाही. पण तुझ्या मनात असलेल्या माझ्याबद्दलच्या भावना मी समजू शकतो. आपल्याला एखाद्या गोष्टीचे आकर्षण वाटते, ते चूक नाही. पण ते व्यक्त करता येईलच असेही नाही. आपल्याला काही मर्यादा असतात. कधीकधी वाटतं उधळून द्यावं, हे सारं. पण या मर्यादाच आपल्याला बांधून ठेवतात. बघ ना! किती गंमत आहे. मलाही कुणाविषयी तरी असंच काहीसं वाटायचं. पण नशिबाने आमच्या वाटा वेगवेगळ्या लिहिलेल्या होत्या. मी अजूनही तिला विसरू शकत नाही. आणि तुझा तो... कोण? आय थिंक सुमीत... त्यालाही तू आवडत होतीस. पण तू माझ्यात एवढी गुंतत गेलीस की, आज त्याच्यापासून तू खूप दूर निघून आलीस. खरं म्हणजे यात दोष कोणाचाच नव्हता... आता प्रश्न एवढाच आहे की, मला तुझ्याबद्दल काय वाटते?"
          बोलता बोलता त्यांनी माझ्याकडे वळून पाहिले होते. ते गालातल्या गालात हसल्याचाही मला भास झाला. आतापर्यंत मला असे वाटत होते की, ते माझे असूनही कधीच माझे नाहीत. पण आता मात्र माझ्या जिवात जीव आला होता. पुढे ते काय बोलणार हे ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते. तेवढ्यात त्यांनी आपला गियरवरचा डावा हात उचलून माझ्या हातावर ठेवला. तो किंचित दाबल्यासारखा वाटला. त्यामध्ये आश्वासकता होती. क्षणभरासाठी हृदयाची वाढलेली धडधड जागेवरच थांबलीय कि काय असे वाटले. तळहाताला आणि तळपायाला किंचित घामाचा ओलावा जाणवला.
       "वुईल यू मॅरी मी...?"
       ...आणि एकदम संपूर्ण शरीर पिसासारखं हलकं होऊन हवेत तरंगतेय असे जाणवलं...
एक सेकंद... दोन सेकंद... तीन सेकंद... चार... पाच... दहा... बारा... आणि एक मोठा दणका बसल्याचा भास झाला. संवेदना कि वेदना...???
          मी हलकेच पापण्या उघडल्या. पण लगेचच मिटल्या. एक वेदना सणसणत मस्तकातून गेली. घशातून आवाजही निघेना. जीव गुदमरल्यासारखा झाला होता... हातपाय बांधून टाकल्यासारखे वाटत होते. संपूर्ण शरीरातून मणामणाचे ओझे झाले होते. कुणीतरी बोलल्याचा, मोठमोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. पण हा त्यांचा आवाज नव्हता...
... मोठ्या कष्टाने डोळे उघडले तेंव्हा आई बाबा समोर बसलेले दिसले. मी हॉस्पिटलमध्ये होते. शेजारी डॉक्टर नर्सही दिसत होत्या. मी शुद्धीवर आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हळूहळू सभोवतालच्या परिस्थितीचा मला अंदाज येऊ लागला होता...
 ...हातापायाला बँडेज जखडलेले होते. नंंतर मला समजले तब्बल छत्तीस तासांनंतर मी डोळे उघडले होते.
          नाती ही हळुवारपणे फुलासारखी उमलत जातात. एकेक पाकळी उलगडत जाते. पण एक दिवस ती गळूनही जातात. आमच्या नात्याचेही तसेच काहीसे झाले. दोष फुलांचा नाही... आहे तोपर्यंत ती सुगंध देतात. पण मागे उरतात ते काटे... ते मात्र टोचत राहतात. पसरणीच्या घाटातून उतरत असताना गाडी तुटलेल्या कठड्याला पार करून थेट खाली गेली होती. गाडीचा भुगा झाला होता. मी वाचले होते. पण ते...? असे का...? उत्तर कितीही हवेहवेसे वाटणारे असले तरी सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नसतात.
          चित्र विस्कटले होते...  मौन ओथंबले होते... एक अबोली फुलण्याआधीच मिटली होती... म्हणून मी तशीच ओठ मिटून डोळे मिटून पडून राहिले. शेवट अनपेक्षित होता. तो त्यांच्याकडून इतक्या सहजपणे येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.

वेडावला होता जीव...
तुझ्यातून सुटताना...
कारे माझ्या मिठीत नाहीस...
आज नव्याने फुलताना...

(समाप्त)

-- नंदकिशोर गायकवाड.

नवा डाव... (कथा)

नवा डाव...!


           आढ्याला भिरभिरणार्‍या चिमणीकडं बघून आबईला पोटात कालवल्यागत झालं. गेले काही दिवस आबईच्या आढ्याला एका चिमणाचिमणीनं घरटं बांधायला घेतलं होतं. ते बांधून झालं होतं. आता घरट्यात चिमणी अंडी देईल. लवकरच त्यातून पिलंही येतील. त्यांच्या चिवचिवाटानं घर भरून जाईल. पण थोडावेळ झाला. मघापासून काळ्या चोचीचा चिमणा काही दिसला नव्हता. चिमणी एकटीच भिरभिरत होती. तिचा कालवा चालला होता. आबईनं गुडघ्याभोवती घातलेली हाताची मिठी थोडी ढिली केली. गुडघ्यावर ठेवलेली हनुवटी वर उचलत पदरानं डोळ्याखाली जमलेलं पाणी हळूच टिपलं. हातातल्या पदराचा बोळा करून थोडावेळ तोंडात दाबून धरला अन् आलेला हुंदका मोठ्या निग्रहानं परतवला. काळजात पुरतं आभाळ दाटून आलेलं असलं तरी घर मात्र सुनंसुनं पडलं होतं. सगळ्या घरालाच दुखवट्याची कळा आली होती, त्यात दुपारच्या टायमाला ते जास्तच भकासवाणं वाटत होतं. का नसावं? ज्या घरातल्या ऐन जवानीतल्या तरण्याताठ्या मुलाला अकाली मरण यावं अन् उघड्या डोळ्यांनी जन्मदात्या आईलाच ते बघायची वेळ यावी. यापरतं दुःख ते कुठलं?
          सकाळीच रमेशच्या तेराव्याचा विधी पार पडला. रमेश म्हणजे आबईचा थोरला लेक. त्यादिवशी सकाळी तालुक्याला गेलेला रमेश दिवलागणी झाली तरी परतला नाही. हायवेला भरधाव जाणाऱ्या कुठल्याशा मालट्रकनं रमेशच्या फटफटीला ठोकर दिली. रमेश काही परत आला नाही. आली ती बातमीच. घरात एकच हलकल्लोळ पसरला. गेल्या सालीच त्याचं हात पिवळं झालं होतं. अजून अंगावरची हळद बी पुरती उतरली नव्हती. दैवानं मात्र डाव साधला होता. करतुकीला आलेलं लेकरू उचलून नेलं होतं. सारा गाव हळहळला. कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरपण कधी पाय दिला नव्हता. म्हणून तर उभ्या गावानं या इलेक्शनच्या वेळी त्याला भरभरून मतांनी निवडून दिलं होतं. गावचा सरपंच होण्याचा मान अवघ्या पंचविशीत मिळाला होता. आता कुठं सुखाची सावली आली होती. नांदत्या घराला कुणाची तरी दृष्ट लागली अन् होत्याचं नव्हतं झालं.
          कुणीतरी आत आलं. त्याची जाणीव होताच आबईनं वर बघितलं. कळंबकर पाहुणं होतं.
     "आक्का, आता आम्ही बी निघावं म्हणतोय."
आबईनं फक्त होय म्हणून मान हलवली.
    "तसं नव्हं. म्हणजे माझं काय म्हणणं होतं. आता इंदूलाबी न्यावं. तिला बी जरा..."
     "बघा तिलाच इचारून. येत आसंल तर घिऊन जावा. तेवडाच चार दिस तिला बी बदल हुईल. जरा मन रमंल."
          व्याही बाहेर जाताच जणुकाही लक्ष ठेवून असल्यासारखा गणामामा हळूच मांजराच्या पावलांनी आत येऊन आबईजवळ दबून बसला.
     "आक्के, आमीबी आता निगावं म्हंतोय. म्हंजी बग.. तुला आसं सोडून जाया, मन काय होत न्हाई. पर काळजावर दगड ठीवून जाया तर पाह्यजेल. तवा आता तूच जरा धिरानं घी. तुलाच आता मन घट्ट कराया पाह्यजेल. आमचं काय गं! किती झालं तरी शेवटी आमी परकीच. पर तू आमाला काय अंतर द्यायाची न्हाई म्हना. आता सुरेशकडं बी बगाया नकू का? तुजाच तर आधार हाय. झालंच तर इंदूचं बी काय खरं न्हाई. म्हंजी कळंबकर सोयरं मगा म्हनीत होतं का तिला बी घिऊन जायचं म्हून. बराबर हाय म्हना त्यांचं बी. आता तिजंच कपाळ फुटकं निगालं..." 
          इतकावेळ नुसतंच हं हं करून ऐकणार्‍या आबईनं एकदम चमकून बघितलं तसा गणामामा सटपटला.
     "म्हंजी मला तसं नव्हतं म्हनायचं. पर त्याला आता तुमीआमी काय करनार म्हना. लोकं चार तोंडानं कायबाय बोलत्याती झालं." सरकीचा कापूस काढावा तसा गणामामा एकेक धागा जुळवत म्हणाला.
          जमिनीवर हाताचा भार देऊन आबई उठली. असं नुसतं बसून भागणार नाही. तिनं घरात कानोसा घेतला. चिमणीचं घरटं विस्कटलेलं होतं. चिमणीचा नुसता कालवा चालला होता. आबई बाहेर आली. पण इंदू कुठेच दिसली नाही. पायरीवर बोका आपले पाय मिशा चाटत बसला होता. त्याने एकदा ओठातल्या ओठांत गुरगूर केली. आबई न राहवून आत आली. माजघरात तिने डोकावून पाहिले. आत अंधारातून मुसमुसण्याचा आवाज आला. आबई उंबर्‍यातून आत पाऊल ठेवणार तेवढ्यात पायाजवळ तिला पिसं पडलेली दिसली. आबईच्या पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. आबईनं इंदूच्या खांद्यावर हात ठेवला. इंदू आबईच्या गळ्यात पडली.
     "आत्या, मला नका ना पाठवू. मला नाही जायचं आप्पांसोबत. मी पांढऱ्या पायाची नाही हो. मला इथेच तुमच्याजवळ राहू द्या. पाया पडते तुमच्या. पण मला असं दूर लोटू नका."
आबई इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली.
          धर्मातात्या गेले तेंव्हा रमेश चार वर्षाचा होता. सुरेश तर अजून बाळूत्यात होता. आबईवर आभाळ कोसळल्यागत झालं होतं. आधाराला माहेर हे असं. भाऊ म्हणून आश्रयाला जावं तर गणामामाचं काहीच खरं नव्हतं. सतरा पोतावर तेल घालीत फिरणारा गणामामाच आबईकडं राहायला आला. पण थोड्याच दिवसांत त्यानंबी रंग दाखवायला सुरुवात केली. खायचं प्यायचं अन् उरलेल्या वेळात गावच्या पारावर टवाळक्या करत बसायचं. मागून बिडी प्यायची लायकी नसताना मोठ्या मोठ्या लाखाच्या गप्पा हाणत त्यानं ह्याच्या त्याच्याकडनं हातउसनं म्हणून पैसे घ्यायला सुरुवात केली. एवढ्यावरच थांबलं असतं तर ठीक, पण गणा दारू प्यायला लागला... नाचणारणीकडं जायला लागला. गावाकडचं तर सगळं फुकून टाकलं होतं. पण याच्या कलागती इकडंपण सुरू झाल्या. विधवा बाईला कशाला दागिनं लागत्यात म्हणून एके दिवशी आबईच्याच डब्याला हात घातला. तेंव्हा मात्र आबई बिघडली. सरळ हात धरून घराबाहेर काढला. पुन्यांदा तुझ्या घराची पायरी शिवणार नाही, असा पण करून गेला; तरी कुत्र्याचं शेपूट सरळ होणार आहे का? वर्षा सहा महिन्याला फुकटची माया दाखवित यायचा. काहीबाही कारणं सांगून चार पैसे उकळून परत जायचा. पुढे आबईनं हात आखडून धरल्यावर पोटच्या पोरीला अलकीला आबईच्या पायावर टाकून खोट्यानाट्या आणाभाका घ्यायला लागला. एकंदरीत काय माहेराकडून आबईला कुठल्याही आधाराची अपेक्षा उरली नव्हती.
          नांदत्या घरात राहावं तर भावभावकीनं नको नको करून सोडल्यालं. एकटी बाई करती काय? हात जोडून बघितलं. शेती वाट्यानं देऊन बघितलं. पण आयतं प्रेत सापडल्यावर किती बी हाकललं म्हणून गिधाडं जात्याती होय. फक्त इस्टेटीचा विषय असता तर गोष्ट वेगळी होती. पण आता नवाच प्रकार सुरू झाला होता. एकटीदुकटी बाईमाणूस बघून जातायेता लाळ गाळणार्‍या नजरा पार उंबर्‍यापर्यंत डोकावू लागल्या. तरण्या पोरांच्या तक्रारी घेऊन मामंजी म्हणत बापाच्या वयाच्या माणसापर्यंत गेल्यावर धीर देणारे हात पाठीवर पडू लागले. पण पाठीवरच्या हाताचा स्पर्श आबईनं तेंव्हाच ओळखला. गटारीतल्या किड्याची वळवळ पाठीवरून खाली घसरू लागल्यावर आबई सावरली. आता आपल्यालाच पदर खोचून उभं राहावं लागणार हे ओळखून तिने शेवटी धाडस केले. रोजंदारीच्या गड्याबरोबर तीच वावरात उतरली. नांगरण्यापासून पाणी धरण्यापर्यंत... कापणीपासून खळ्यातलं दाणं घरी आणण्यापर्यंत गड्याला मागं सारील अशी शेतात खपू लागली. मग मात्र लोकांच्या नजरा बदलल्या. वाघिणीपुढं तरसांनी माना टाकल्या. कायम हाताशी उघडा कोयता घेऊन तिने प्रपंचाचा गाडा मार्गावर आणला.
          पोरं मोठी होऊ लागली. कमरंएवढी पोरं डोक्याच्या वर चालली तशी आबईची चिंता मिटली. रमेश बारावीपर्यंतच शिकला. मग मात्र आईच्या हातातला कासरा त्यानं आपल्या हातात घेतला. पुढं शिक्षण घेतलं नसलं तरी बुद्धीनं तेज होता. तालमीतल्या लाल मातीत घुसळून अंग पोलादासारखं लालबुंद झालं होता. गडी स्वभावानं मवाळ होता पण नजरेत जरब धर्मातात्याचीच होती. पुढे सुरेश शहरात शिकायला गेला. तेंव्हा धाकल्याला मात्र त्यानं काही कमी पडू दिलं नव्हतं. तोपण बुद्धीला तेज होताच. त्यातच आईचं रूप घेऊन जन्मलेला. कधीकधी आबईच आई असूनबी नजर लागू नये, म्हणून तो घरी आला की, मिठमिरच्या उतरून टाकायची. बघता बघता सुरेशनं वकिलीचं शिक्षण घेतलं. शहरात हापीस टाकलं. इकडं रमेशबी गावातल्या चार जाणत्या लोकांच्यात उठायबसायला लागला होता. त्यातच त्याचं डोकं बघून लोकांनी त्याला पुढं केला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा राहिला अन् छप्पर फाडके मतांनी निवडून पण आला. सरपंच झाला. सोसायटीवर आला. दूध डेअरी सुरू केली. कारखान्याला ऊस जायला लागला. राहतं घर पाडून वाडा बांधला. सगळ्यात चांगलं होतं की, साधं सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नव्हतं. आबईचा वनवास आता संपला होता.
          इंदूच्या डोक्यातून हात फिरवताना आबईला गतकाळ आठवत होता. गेल्या लगीनसराईत रमेशच्या लग्नाचा बार उडवून दिला, तेंव्हा बावरलेली... काहीशी घाबरलेली इंदू घरी आली. अगदी नक्षत्रासारखी नजर लागावी अशी दिसत होती. आबईच्या पाया पडायला इंदू खाली वाकली अन् आबईनं तिला आपल्या मिठीत घेतली. त्यादिवशी आबईला मुलगी मिळाली आणि इंदूला आई. इनमीन घरात तीन माणसं. पण इंदूच्या येण्याने घराचा चौकोन पूर्ण झाला. इंदूला आपण सासरी नव्हे तर दुसऱ्या माहेरातच आल्यासारखे वाटत होते. मनमिळाऊ नवरा, मायाळू सासू आणि सावलीसारखी सोबत करणारा दिर यापेक्षा अजून काय हवे? सगळं काही आलबेल चाललंय असं वाटत असतानाच नशीब कूस बदलते. रमेशच्या अकाली जाण्याने संसाराचा सारा सारिपाटच उधळून लावला होता. किती स्वप्नं पाहिली असतील...? किती कल्पना रंगवल्या असतील...? पण या प्रश्नांना उत्तरे नव्हती. होते फक्त प्रश्न... प्रश्न... आणि जबडा पसरून बसलेले फक्त प्रश्न...
          ज्या इंदूमुळे घराला घरपण आलं... त्याच इंदूला पांढऱ्या पायाची... फुटक्या कपाळाची... अजून काय काय म्हणून घ्यावं लागंल? ती इंदू गळ्यात पडून म्हणतीय, मला दूर लोटू नका. आबईला काही सुचंना झालं. पोरी, आता तुला मी कोणत्या तोंडानं धीर देऊ? हे कपाळकरंटेपण मीसुद्धा भोगलंय. एकतर हे बाईपण म्हणजे फार मोठी सत्त्वपरीक्षा असती... सतीचं वाण असतंय. त्यात पुन्हा असं नशीब फाटलं, तर झाकायचं कुठे... आणि दाखवायचे कुठे...? आत आणि बाहेर दोन्हीकडं आग असते. एक जळू देत नाही अन् दुसरी विझू देत नाही. दिवसा वैर्‍यानला कमी नसती अन् रात स्वतःच वैरीण होऊन येती. आताशी सतीची चिता तू बघितली, पण सतीचं जळणं अजून बघितल्यालं नाही.
            आठपंधरा दिवसांसाठी गेलेली इंदू चार दिवसांत परत आली. हळूहळू सुरेशने घराचा कारभार हातात घेतला. आबई मात्र आताशा पहिल्यासारखी कुठल्याही कामात लक्ष देत नव्हती. रात्री अपरात्री उठून बसत होती. पायाचं मुटकुळं पोटाशी घेऊन झोपलेल्या इंदूच्या अंगावरचं पांघरून नीट करून दिव्याच्या उजेडात तिच्या चेहऱ्याकडं बघत बसायची. आता फक्त अंधार उरला होता. गणामामाचा काही घरातून पाय निघत नव्हता. त्याला आता नवीनच स्वप्नं पडायला लागली होती. अलकीला सुरेशच्या गळ्यात अडकवली तर आयुष्यभराची ददात मिटणार होती. मासिक झाले. दिवस उलटत गेले. वातावरणातला ताण जरा हलका झाल्याचा अंदाज घेऊन त्यानं आबईकडं विषय काढला. वर्षश्राद्धाच्या आत लग्न कार्य नाही केलं, तर पुढं तीन वर्षे काही कार्ये करता येणार नाहीत याची भीतीही दाखवली. बघता बघता शेवटचं मासिक जवळ आलं. सुरेशचं बघायला पाहिजे. पण आबईचा काही निर्णय होत नव्हता. गणामामाचं पण बरोबरच होतं. परक्या घरची पोरगी सून म्हणून आली तर... आपलं कसं बी निभून जाईल. पण इंदूचं काय...?
         आबई झोपेतून दचकून जागी झाली ती बडबडतच. सारं अंग घामानं डबडबून गेलं होतं. डोळ्यांत पाणी दाटून आलेलं होतं तिच्या. तिच्या स्वप्नात रमेश आला होता. जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला होता. इथं... इथं सोप्यात होता भिंतीला टेकून उभा. आबईचा मुठभर जीव सुपासारखा झाला होता. पण तो काही बोलायला तयारच नव्हता. नुसता खाली मान घालून पायाच्या अंगठ्यानं जमिनीला टोकरीत होता.
     "बोल की रं माझ्या बाळा! का रुसलाईस माज्यावर. माजं काई चुकलं का? आरं आई हाय तुजी मी. आसा गप्प का?"
           आबई लाख मिनत्या करत होती. पण गडी काही तोंड उघडायला तयार नव्हता.
     "पाह्यजेल तर काय चुकलं आसलं तर पाया पडती तुज्या. पन आसा मुका होऊ नकू. तुला शपत हाय बग माजी."
            मग मात्र त्यानं मान वर करून बघितलं. डोळं पाण्यानं भरून आलं होतं.
     "आबई, असं मनाला लावून घेऊ नको. तुझं काही चुकलेलं नाही. उलट मीच तुझ्या पायाजवळ एक मागणं घेऊन आलोय. आबई, सगळं ठीक होईल गं! पण तुझ्या इंदूला अंतर देऊ नको. तुला तर माहितीय, फार हळवी आहे गं ती. तिच्यानं आयुष्य निभणार नाही. माझा जीव घुटमळतोय गं! माझा काय पायच निघंना झालाय इथनं"
          आणि तो जसा आला तसा निघून गेला. त्याला हाका मारतच आबई जागी झाली. पुन्हा काही सकाळपर्यंतआबईच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळ झाली तरी कितीतरी वेळ ती नुसती अंथरूणावर बसून राहिली होती. एवढा उशीर झाला तरी आबई अजून कशी उठली नाही. म्हणून सुरेश माजघरात आला, तर आबई नुसती आढ्याकडं बघत बसल्याली. सुरेशनं तिच्या जवळ बसत तिचा हात हातात घेतला.
     "का गं आबई, तब्येत बरी नाही का तुझी? उठ बरं! तूच अशी हातपाय गाळून बसली तर आम्ही काय करावं?"
     आबईनं नुसतं 'बरी हाय' म्हणून मान हलवली. जरा वेळ तशीच बसून एक सुस्कारा सोडला. काहीएक मनाशी गाठ मारत आबईनंच उलट सुरेशचा हात हातात घेतला.
     "बापू, दादा आलता रं सपनात. लई कष्टी झाला हुता. आईचं काळीज हाय रं! काई उमगना गेलंय. पर आता सगळ्याची येवस्ता लावल्याबिगर त्याला मोकळीक न्हाई. म्या काय म्हंती, तुजा माज्यावर भरोसा हाय का?"
     "आबई, अगं असं का परक्यासारखं म्हणतेस? मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का?"
     "मग ऐक. गना म्हनतोय ते बी बरुबर हाय. येवडा म्हयनाच हाय. तुजं लगीन करून द्याया पाह्यजेल. पुन्ना तीन वरीस काय हालचाल करता यायची न्हाई."
     "अगं थांबेन की मी तेवढं. मी कुठं गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय. बरं ही वेळ आहे का असला विचार करण्याची? तू नको माझी काळजी करू. होईल सर्व व्यवस्थित."
     "व्हय. पर तवर म्या जगंल का मरंल? मलाच म्हाईत न्हाई. तवा आताच काय तो सोक्षमोक्ष लावाय लागंल. तुजी हौसमौज न्हाई करता याची अशा येळंला. पन तरीबी तुजं आपून उरकून टाकू."
     "तुझ्या मनासारखं होईल; पण असलं काही बोलू नकोस."
     "मग ठीक हाय. बोल हाय का कुनी तुज्या मनात?"
     "नाही नाही. तसं काही नाही. तू म्हणशील ती पूर्व दिशा."
     "मग वचन दी मला. माजा शब्द मोडनार न्हाईस."
                        * * * * *
           निवद ठेवल्याबरोबर निवदाला कावळा शिवला. आबईच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं. आबईनं भरल्या डोळ्यांनी एकदा कावळ्याकडं बघितलं अन् भुईला हात टेकवून नमस्कार केला. नजर फिरवून तिनं एकदा सुरेशकडं आणि एकदा इंदूकडं बघितलं. डोळे भरलेले असतानाही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. इंदूच्या हातात नव्याने हिरवा चुडा भरला होता. कपाळावर पुन्हा कुंकू लागलं होतं. आता तिला कुणीही पांढऱ्या कपाळाची म्हणून हिणवणार नव्हते. आबई मनाशीच म्हणाली, 'आता चिमणी परत घरटं बांधंल.' तिनं नवा डाव नव्यानं मांडला होता. नवी विटी होती... नवा दांडू होता... नवा गडी होता आणि राज्यसुद्धा नवीन होते.

(समाप्त)

-- श्री नंदकिशोर गायकवाड.