भल्या पहाटेच आबईने कि माईने... पण कोणीतरी मला उठवले असावे. काहीसा वैतागून डोळे चोळीतच बाहेर आलो. एका हातात कंदील व दुसऱ्या हातात असलेले डमरूसारखाच आवाज करणारे कुडमुडे वाजवत कोणीतरी दारात आला होता.
माई म्हणाली, "पांगूळ आलाय."
मी पाहिले, तर चांगला धडधाकट होता. दोन्हीही पाय व्यवस्थित असूनही हा पांगळा कसा? डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा आणि अंगावर कोट घातलेला... कपाळाला भस्माचे पट्टे होते. गळ्यात अनेक प्रकारच्या माळा होत्या. त्या माणसाने आपल्या कमरेला अडकवलेल्या पिशवीतील चिमुटभर भस्म माझ्या कपाळाला लावले.
दारावर मागायला येणारे अनेकजण पाहिले होते आतापर्यंत. त्यामध्ये मोरपिसांचा टोप घातलेले वासुदेव असायचे. माईने सूपभरून धान्य झोळीत टाकले की, माईच्या आई-वडिलाचे, सासू-सासर्याचे नाव विचारून "दान पावलं...!" म्हणून टाळ वाजवून नाचणारे वासुदेव पाहिले होते. त्यांच्या टोपातील एखादा मोरपीस पुस्तकात ठेवायला मिळाला, तर 'किती भारीच मज्जा!' असे वाटायचे. पुस्तकात मोरपंख ठेवला की, त्याचा मोर होतो. त्यावेळी आमची आपली तशी भोळी समजूत होती.
पोलिसांसारखे कपडे घालून येणारे रायरंद तर असे छान भारी काहीतरी बोलायचे. "लग्नाला चला... तुम्ही लग्नाला चला. सखूबाई ठकूबाई लग्नाला चला. लेकरं बांधा खुटीला अन् कोकरं घ्या काखेला...!" असले काहीएक गमतीदार बोलायला लागले की, हसून हसून बेजार व्हायचो. गळ्यात अडकवलेल्या बाजाच्या पेटीवर "चलो मच्छिंदर गोरख आया..." अशी नवनाथाची गाणी म्हणणारे नाथ यायचे. धुपाटणी घेऊन फिरणारे हिरव्या कपड्यातील फकीर यायचे. हलगीच्या ठेक्यावर गाणी म्हणणारे पोतराज यायचे. गुबूगुबू वाजवत नंदीवाले यायचे. आसुडाचे फटकारे अंगावर ओढत मरीआईवालेसुद्धा यायचे. पण सगळे यायचे ते दिवसाचे. असे पहाटे येणारा पांगूळ पहिल्यांदाच पाहिला होता. कुडमुडेवाला होता जणू तो. नंतर मुकूंदमामाने सांगितले की, याला 'पिंगळा' म्हणतात म्हणून. पिंगळा...! कुणाशीही बोलायचे नाही. दारात उभे राहून दान मागायचे नाही. सूर्य उगवण्यापूर्वीच फिरायचे, असा यांचा नियम. यांच्यापैकी कोणीतरी एक जण पहाटेच 'पिंगळा आला' हे गावात कळण्यासाठी गावाबाहेरील झाडावर चढून ओरडायचा. कुणाशीही न बोलणारे हे पिंगळे जे बोलतील; ते मात्र खरे होते, अशी लोकांची भावना होती.
अलिकडे बदलत्या काळाबरोबर अनेक लोककला व अनेक लोककलावंत नामशेष होऊन गेले आहेत. बहुरूपी व वासुदेव तेवढे तुरळक आढळतात. इथल्या संस्कृतीच्या नावाने कायम खडे फोडणारांना हे तरी माहीत आहे का? की कधीकाळी लोककलेचा एक समृद्ध वारसा आपण उशाशी घेऊन झोपत होतो. आणि आज पिढ्यान् पिढ्या जपलेली ही श्रीमंती काळाच्या प्रवाहात हरवून गेलीय. आज फक्त दंतकथा बनून राहिली आहे. केवळ आपल्या टिचभर पोटाची भूक भागवण्याच्या गरजेपलीकडे जाऊन सृजनवृत्तीचा... प्रतिभेचा अविष्कार होता या कलेत. समोरच्या माणसाच्या मनात शिरून आरसा दाखवण्याचे कौशल्य होते. पिढीजात अभ्यासाचे संचित होते.
पुढे अनेक वर्षांनी भिमाशंकरच्या वाटेवर भटकंतीमध्ये अगदी अनपेक्षितपणे असे दोघेजण मला भेटले. आवर्जून गाडी थांबवून त्यांना मीच भेटलो. त्यांनी मग नेहमीच्या ठोकताळ्याप्रमाणे माझे भविष्यही सांगितले. काही पटणारे भूत-वर्तमान आणि आशा लावणारे भविष्य ऐकायला तेही त्यांच्या स्टाईलमध्ये बरे वाटत होते. स्वतः होऊन शंभर रुपये काढून दिले. आणखी मिळतील, या आशेने तेही रंगवून सांगत होते. माझा खरा इंटरेस्ट त्यांच्या भविष्यकथनात नसून त्यांच्या कलेत आहे, हे कळल्यावर पोटभर आशीर्वाद देऊन त्यांनी काढता पाय घेतला.
"जर भविष्य खरं झालं आन तू शिखर शिंगणापूरच्या म्हाधेवाला कधी आलाच; तर आवरजून भेट!" असे म्हणून थोडा भस्म आमच्या कपाळी लावला. सातारला असताना गावाकडे जाण्याचा तो तर माझा नेहमीचा रस्ता होता. भेटला वेळ कधी, तर नक्कीच भेटू; म्हणून मीही निरोप घेतला होता.
आता लहानपणी माझ्याकडे फारसा भूतकाळ होताच कुठे? भविष्यकाळाचे मात्र ढिगारे पडले होते. का कोण जाणे! पण या कुडमुडेवाल्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माईला म्हणाला, "आई, पोराला जपा. म्हाधेव हाये त्यो. साधाभोळा हाये, तेवढाच गरम डोक्याचा हाये. बाईच्या जातीपासनं अडचणी हायत्या त्याला. एक दिस लई मोठा कामदार हुईल. पन शेवटी संन्याशीच. जवळचं सगळं उधळून एक दिस मसणात जावून बसंल. देवाची नजर राहील त्याज्यावर. पन त्याज्या नावानं पाच सोमवार धरा."
असेच बरेच काहीबाही तो बोलत राहिला. माईने सुपभरून दाणे आणि दोन रुपयाची नोट दिल्यावर स्वारी निघून गेली. त्यावेळी त्याच्या बोलण्याचा अर्थ उमगेल असे वय माझे नसले; तरी माईच्या काळजीत भरच पडली असावी. पुढे बरेच दिवस ते जाणवत राहिले. आज त्यातील किती खरे ठरले आणि किती खोटे, हे सांगायचे अवघड आहे. पण ते चुकीचे होते, असे म्हणायला जीभ रेटत नाही. माधवमामा मात्र गालातल्या गालात हसत होता.
अरे हो! सांगायचे राहिलेच. गुढी पाडवा यावेळी रविवारला जोडून आला होता. त्याचवेळी आणखी दोन दिवसांची सुटी घेऊन माधवमामा घरी आला होता. तो खूप खुशीत होता. कंपनीमधील त्याचे काम पाहून त्याच्या मोठ्या साहेबांनी त्याला आपल्यासोबत गोव्याला न्यायचे ठरवले होते. त्यांच्या कंपनीचे एक फार मोठे काम तिथे चालणार होते. साहेबांना आपला असिस्टंट म्हणून माधवमामा हवा होता. पुढील एक वर्ष ते दोन वर्षे त्याला तिथे राहायला मिळणार होते. साहेब बराच अनुभवी आणि हुशार असल्यामुळे शिकण्यासारख्या बर्याच गोष्टी होत्या. सरकारी नोकरीपेक्षा खाजगी नोकरी करून पुढेमागे स्वतःचा व्यवसाय करण्याचा त्याचाही विचार असावा. एकदा गोव्याला गेल्यावर पुन्हा लवकर येता येणार नाही; म्हणूनच जाण्यापूर्वी तो घरी आला होता. तसेही तो शिकायला पुण्यालाच असल्यामुळे घरी खूप कमी असायचा. आता फरक एवढाच होता की, पुण्याऐवजी तो गोव्याला जाणार होता. गोवा म्हणे खूप लांब... तिकडे कोल्हापूरच्याही पुढे होते. इथे अजून कोल्हापूर कुठे आहे, हेच मला माहिती नव्हते. फक्त ऐकले होते. तिकडे म्हणे समुद्र आहे. खूप सारी नारळाची आणि आंब्याची झाडे आहेत. सुपारी, काजू, फणस अशी कधी न पाहिलेली फळे असतात. भेटकार्डावर पाहिलेला समुद्राचा देखावा म्हणजे गोवा. पाण्यावर आपल्या भल्यामोठ्या पांढऱ्या शिडात हवा भरून तरंगणारी नाव... माडांची किनार लाभलेल्या पदरावरती मावळतीच्या कि उगवतीच्या सूर्याची पसरलेली लाली... यालाच गोवा म्हणतात, अशी माझी धारणा होती. मामासोबत कधी जायला मिळाले; तर किती धमाल होईल ना!
या चारदोन दिवसांत मागच्या सुट्टीतल्यासारखा मामा माझ्या वाट्याला आलाच नव्हता. एकतर दिवस कमीच होते. त्यात त्याच्यामागे धावपळ जास्त होती. मोठ्यामामांचे आणि त्याचे बरेच काही चालले होते. खरं तर मला त्याला खूप काही सांगायचे होते. पण जमत नव्हते. आमच्या शाळेत शिबिर येऊन गेले होते... माझा हात मोडला होता... मी शिरीषसोबत खूप धमाल करायचो... शिबिर संपल्यावर मला करमत नव्हते. म्हणून शब्बूआपाच्या घराकडून मी चकराही मारल्या होत्या... एकदा तिने मला घरात बोलावून घेऊन खाऊही दिला होता... आणिक सांगायचे तर बर्याच गप्पागोष्टी केल्या होत्या... माधवमामा कधी येणार? त्याचे पत्र आले का एवढ्यात एखादे? म्हणून चौकशी केली होती. पण हे सगळे माधवमामाला कसे सांगायचे, हेच कळत नव्हते. माधवमामा आला तसा निघून गेला. काहीच बोलला नाही. मीही काही सांगितले नाही. आता तो लवकर येणार नव्हता; म्हणून मलाच वाईट वाटले. शाळेला सुट्या लागल्यावर तर मला गेल्या उन्हाळासुट्टीची जास्तच आठवण येऊ लागली होती.
अक्षयतृतीया झाली. एकदोन दिवसांची छोटी यात्राही झाली. मुकूंदमामासोबत यात्रेतून फिरूनही आलो. पण ऊरुसासारखी मजा काही यावेळी आली नाही. या सुट्टीला मी आणि शुभाताई तिच्या मामाच्या गावाला गेलो होतो आठ दिवस. सोबत मोठीमामी होतीच. तिथे बरेचजण मला त्यांचा मुलगाच समजत होते. एकदोघे म्हणालेही.
"कुसूम, पोरगं चांगलंच मोठं झालं की तुझं."
मामीही हसून मला जवळ घ्यायची. माझ्या गालावरून हात फिरवून स्वतःच्या गालावर बोटं मोडायची.
"खाली बघा बया! नजर लागंल लेकराला माझ्या."
मला आबईच्या जोडीने अजून एक आई मिळाल्यासारखे वाटत होते. काय खोटे होते? कृष्णालाही अशीच एक यशोदामैया होतीच की. तशीच मलाही कुसुममामी भेटली होती. मामीच्या घरी शेतात आमराई होती. आठवडाभर दिवसच्या दिवस मी नुसता चरत होतो. किती आंबे खाल्ले, याचे मोजमापच नाही. मामीच्या भावांची चिल्लरपार्टी भरपूर होती. त्यात आमच्या दोघांची भर पडली. दुपारी आमचा बराचसा वेळ आमराईतच जायचा. घरी मला काही गोष्टींची पुस्तके सापडली होती. आमराईत पाडाचे आंबे खात खात बुंध्याशी बसून ती सगळी पुस्तके मी वाचून काढली. एका अद्भूत दुनियेत जाण्याची गुरुकिल्ली मला सापडली होती. यावेळी मला जी त्यांची बाधा झाली ती आयुष्यभर पुरली. मी अक्षरशः पुस्तकांच्या प्रेमात पडलो. झपाटूनच गेलो म्हणा ना! त्या पुस्तकांतून मला अनेक न पाहिलेली माणसं, स्थळं भेटली. मी त्यांच्यात इतका हरवून गेलो की, स्वतःलाही त्यांच्यापैकीच एक समजू लागलो. माझ्याही जीवनात असेच काही अद्भूत घडावे, मला ते जवळून अनुभवता यावे, अशी स्वप्ने मी उघड्या डोळ्यांनीही पाहू लागलो. या वाचलेल्या गोष्टींमुळे माझ्याही कल्पनेला पंख फुटू लागले.
चौथीचे वर्ष सुरू झाले. परंतु आता आम्हांला सरकारवाड्यातील शाळेत जायची गरज उरली नव्हती. वेशीच्या बाहेर शाळेसाठी एक छान सिमेंटकाँक्रेटची इमारत उभी राहिली होती. शाळेचे स्थलांतर हक्काच्या जागेत झाले. नवी इमारत मिळाली. नव्या वर्गासोबतच नवीन शिक्षकही मिळाले. धोतरवाले, विजारवाले गुरुजी इकडे आलेच नाहीत. नव्या वर्गाला पँट शर्ट घालणारे, केसांचा चांगला भांग पाडणारे व महत्त्वाचे म्हणजे इतिहासातील गोष्टी सांगणारे नवीन गुरुजी मिळाले. आतापर्यंतच्या गुरुजींपेक्षा हे प्रकरण वेगळेच होते. पण भारी होते. त्यांचे नाव सोनारगुरुजी. सतत काहीतरी नवीन चाललेले असे त्यांचे. पहाटे उठून ते आम्हांला व्यायाम करायला सांगत. अगदी ते स्वतः उठून दोन मैलापर्यंत धावायला जात. त्यांना भूतांची अजिबात भीती वाटत नव्हती. अमावस्येच्या रात्री बारा वाजताही ते पैज लावून स्मशानभूमीत जाऊन येत. मोठ्या वर्गातील मुलांना ते इंग्रजी नावाचा भयानक अवघड विषय शिकवायचे. हा अवघड विषय फक्त तेच शिकवू शकतात, यावर मुलांचीच नव्हे; तर इतर गुरुजींही श्रद्धा होती. आमच्या वर्गाला इंग्लिश नव्हते. ते आमचे वर्गशिक्षकही नव्हते. तरीही ते आमच्या वर्गाला शिकवणार होते. नेहमीच्या अभ्यासाशिवाय स्कॉलरशिप नावाचा असाच काहीतरी भयंकर प्रकार असतो, हे शुभाताईमुळे कळलेले होते. अर्थात या स्कॉलरशिपचा शोधही या गुरुजींनीच लावलेला होता. दररोज सकाळी व संध्याकाळी ते शाळेत स्कॉलरशिपचा जादा तास घेणार होते. यावर्षीपासून शाळेची वेळ बदलली होती. अकरा ते पाच. आम्ही मात्र नऊ ते साडेसात असे शाळेत अडकणार होतो. जोडीला सातवीची मुलेही असणार होती.
या नवीन अभ्यासात खूप गमतीजमती होत्या. उतारा, कविता, संवाद सर्वकाही तिथेच असे. फक्त उत्तरे शोधायचे काम असल्यामुळे पाठांतर करण्याची गरज नव्हती. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, आलंकारिक, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे एक एक तोळामासा मोजून घ्यावेत, अशा शब्दांचा खजिनाच हाती लागला होता. एवढ्या सगळ्या प्रकारची गणिते असू शकतात, हा आम्हांला लागलेला ताजाच शोध होता. पण आमचे गुरुजी भलतेच हुशार होते. अगदी आभाळातील चांदण्यांही मोजता येतील, अशा गणिताच्या क्लृप्त्या त्यांच्याकडे असत. खूप सारी कोडी असलेला बुद्धिमापन चाचणी एवढा एकच विषय अभ्यासात असावा, असे म्हणण्याइतपत त्याची गोडी लागली होती. वर्गातील अभ्यासापेक्षा स्कॉलरशिपच्या अभ्यासाची गोडी वाटू लागली होती. पण एक अडचण निर्माण झाली होती. हात मोडल्यापासून लेखन खूप कमी आले होते. लिहायचा खूपच कंटाळा यायचा आणि गुरुजी मात्र डझनवारी कागदांची भलीमोठी वही तयार करून सगळे प्रश्न लिहायला लावायचे. कितीही प्रश्न सोडवले; तरी त्यांचे समाधान काही व्हायचे नाही. त्यामुळे नाइलाजाने या परीक्षेचा नाद सोडायचा, या निर्णयापर्यंत मी येऊन पोहचलो होतो. माझ्यासारखीच बर्याच जणांची हीच अवस्था होती. माझी जरा जास्तच गोची झाली होती. एकतर हा नवीन अभ्यास मला खूप आवडला होता. पण लेखनाला वैतागून टाटा बायबाय करायची वेळ आली होती. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली होती. काय करावे तेच समजत नव्हते.
निर्णय घेण्याची वेळ मात्र आलीच नाही. गुरुजींनी अगोदरच मोठ्यामामांना भेटून "पोरगं हुशार आहे. स्कॉलरशिपला बसवा. पास झालं तर दरवर्षी स्कॉलरशिप मिळेल." म्हणून सांगितले होते. आता माघार घेण्याचा प्रश्न उरलाच नव्हता. बरं लेखनाचे कारण सांगू शकत नव्हतो. हे कारण ऐकून गुरुजीच काय पण मामांनीही मला धुतले असते. शेवटी जमेल तसे लिहीत गेलो. वहीच आणली नाही... घरीच विसरली... गैरहजर मित्राने वही नेलीय... अशा बहाण्यावर दिवाळीपर्यंत वेळ मारून नेत होतो. वर्गातील अभ्यासातली गती पाहून गुरुजींनाही ते खरेच वाटत राहिले. निळीच्या भांड्यात पडलेला कोल्हा किती दिवस निळा दिसणार? पाऊस कधीतरी पडणारच. काहीजण यामुळे दुःखी होते. त्यांना लिहावे लागते, या त्रासापेक्षा मी यातून सुटलोय, याचेच दुःख जास्त होते. त्यांनी गुरुजींकडे कागाळी केली. तेंव्हा दोन दिवस बसून एकसारखे लिहूनही वही काही पूर्ण होण्याचे नाव घेईना. मग मोडलेला हात कसा दुखतोय, याचे नाटक रंगवले. त्यापेक्षा आपल्याला ते स्कॉलरशिपच नको, हे माईच्या गळी चांगलेच उतरवले.
"गुरुजी, पोरगं आजून बारकं हाय वं. एवढा अभ्यास एकदम कसा झेपंल त्याला. त्यात त्याजा हात मोडल्याला हाय. जरा कलानं घ्या. नाहीतर ती परीक्षा कसली हाय ती नकू त्याला. हाय तीच अभ्यास बास झाला."
एवढी मात्रा लागू पडली. मी परीक्षा द्यायलाच हवी, हा गुरुजींचा आग्रह होता. त्यामुळे मग लेखनात सवलत मिळाली. पण रोजच्या रोज नियमित उदाहरणे सोडवायची व पाठांतर करायचे या अटीवर. वर्षाच्या शेवटी परीक्षा झाली. पेपरही चांगले गेले आणि यथावकाश निकालही लागला. दोघेचौघेच पास झाले होते. त्यात मीही चांगल्या मार्कांनी पास झालो. पण गुणवत्ता यादीपर्यंत पोहचण्यासाठी थोड्या टाचा वर करायला पाहिजे होत्या. ते विसरलो. त्यामुळे ती गुणवत्ता यादी का काय ते काही दिसली नाही. तरीही आपल्यामध्ये थोडीफार गुणवत्ता असल्याचा साक्षात्कार मला झाला होता. वर्गातील पोरांना ते नाही पटले; तरी शाळेतल्या गुरुजींचाही त्यावर विश्वास बसला होता.
(क्रमशः)


