नवा डाव...!
आढ्याला भिरभिरणार्या चिमणीकडं बघून आबईला पोटात कालवल्यागत झालं. गेले काही दिवस आबईच्या आढ्याला एका चिमणाचिमणीनं घरटं बांधायला घेतलं होतं. ते बांधून झालं होतं. आता घरट्यात चिमणी अंडी देईल. लवकरच त्यातून पिलंही येतील. त्यांच्या चिवचिवाटानं घर भरून जाईल. पण थोडावेळ झाला. मघापासून काळ्या चोचीचा चिमणा काही दिसला नव्हता. चिमणी एकटीच भिरभिरत होती. तिचा कालवा चालला होता. आबईनं गुडघ्याभोवती घातलेली हाताची मिठी थोडी ढिली केली. गुडघ्यावर ठेवलेली हनुवटी वर उचलत पदरानं डोळ्याखाली जमलेलं पाणी हळूच टिपलं. हातातल्या पदराचा बोळा करून थोडावेळ तोंडात दाबून धरला अन् आलेला हुंदका मोठ्या निग्रहानं परतवला. काळजात पुरतं आभाळ दाटून आलेलं असलं तरी घर मात्र सुनंसुनं पडलं होतं. सगळ्या घरालाच दुखवट्याची कळा आली होती, त्यात दुपारच्या टायमाला ते जास्तच भकासवाणं वाटत होतं. का नसावं? ज्या घरातल्या ऐन जवानीतल्या तरण्याताठ्या मुलाला अकाली मरण यावं अन् उघड्या डोळ्यांनी जन्मदात्या आईलाच ते बघायची वेळ यावी. यापरतं दुःख ते कुठलं?
सकाळीच रमेशच्या तेराव्याचा विधी पार पडला. रमेश म्हणजे आबईचा थोरला लेक. त्यादिवशी सकाळी तालुक्याला गेलेला रमेश दिवलागणी झाली तरी परतला नाही. हायवेला भरधाव जाणाऱ्या कुठल्याशा मालट्रकनं रमेशच्या फटफटीला ठोकर दिली. रमेश काही परत आला नाही. आली ती बातमीच. घरात एकच हलकल्लोळ पसरला. गेल्या सालीच त्याचं हात पिवळं झालं होतं. अजून अंगावरची हळद बी पुरती उतरली नव्हती. दैवानं मात्र डाव साधला होता. करतुकीला आलेलं लेकरू उचलून नेलं होतं. सारा गाव हळहळला. कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरपण कधी पाय दिला नव्हता. म्हणून तर उभ्या गावानं या इलेक्शनच्या वेळी त्याला भरभरून मतांनी निवडून दिलं होतं. गावचा सरपंच होण्याचा मान अवघ्या पंचविशीत मिळाला होता. आता कुठं सुखाची सावली आली होती. नांदत्या घराला कुणाची तरी दृष्ट लागली अन् होत्याचं नव्हतं झालं.
कुणीतरी आत आलं. त्याची जाणीव होताच आबईनं वर बघितलं. कळंबकर पाहुणं होतं.
"आक्का, आता आम्ही बी निघावं म्हणतोय."
आबईनं फक्त होय म्हणून मान हलवली.
"तसं नव्हं. म्हणजे माझं काय म्हणणं होतं. आता इंदूलाबी न्यावं. तिला बी जरा..."
"बघा तिलाच इचारून. येत आसंल तर घिऊन जावा. तेवडाच चार दिस तिला बी बदल हुईल. जरा मन रमंल."
व्याही बाहेर जाताच जणुकाही लक्ष ठेवून असल्यासारखा गणामामा हळूच मांजराच्या पावलांनी आत येऊन आबईजवळ दबून बसला.
"आक्के, आमीबी आता निगावं म्हंतोय. म्हंजी बग.. तुला आसं सोडून जाया, मन काय होत न्हाई. पर काळजावर दगड ठीवून जाया तर पाह्यजेल. तवा आता तूच जरा धिरानं घी. तुलाच आता मन घट्ट कराया पाह्यजेल. आमचं काय गं! किती झालं तरी शेवटी आमी परकीच. पर तू आमाला काय अंतर द्यायाची न्हाई म्हना. आता सुरेशकडं बी बगाया नकू का? तुजाच तर आधार हाय. झालंच तर इंदूचं बी काय खरं न्हाई. म्हंजी कळंबकर सोयरं मगा म्हनीत होतं का तिला बी घिऊन जायचं म्हून. बराबर हाय म्हना त्यांचं बी. आता तिजंच कपाळ फुटकं निगालं..."
इतकावेळ नुसतंच हं हं करून ऐकणार्या आबईनं एकदम चमकून बघितलं तसा गणामामा सटपटला.
"म्हंजी मला तसं नव्हतं म्हनायचं. पर त्याला आता तुमीआमी काय करनार म्हना. लोकं चार तोंडानं कायबाय बोलत्याती झालं." सरकीचा कापूस काढावा तसा गणामामा एकेक धागा जुळवत म्हणाला.
जमिनीवर हाताचा भार देऊन आबई उठली. असं नुसतं बसून भागणार नाही. तिनं घरात कानोसा घेतला. चिमणीचं घरटं विस्कटलेलं होतं. चिमणीचा नुसता कालवा चालला होता. आबई बाहेर आली. पण इंदू कुठेच दिसली नाही. पायरीवर बोका आपले पाय मिशा चाटत बसला होता. त्याने एकदा ओठातल्या ओठांत गुरगूर केली. आबई न राहवून आत आली. माजघरात तिने डोकावून पाहिले. आत अंधारातून मुसमुसण्याचा आवाज आला. आबई उंबर्यातून आत पाऊल ठेवणार तेवढ्यात पायाजवळ तिला पिसं पडलेली दिसली. आबईच्या पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. आबईनं इंदूच्या खांद्यावर हात ठेवला. इंदू आबईच्या गळ्यात पडली.
"आत्या, मला नका ना पाठवू. मला नाही जायचं आप्पांसोबत. मी पांढऱ्या पायाची नाही हो. मला इथेच तुमच्याजवळ राहू द्या. पाया पडते तुमच्या. पण मला असं दूर लोटू नका."
आबई इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली.
धर्मातात्या गेले तेंव्हा रमेश चार वर्षाचा होता. सुरेश तर अजून बाळूत्यात होता. आबईवर आभाळ कोसळल्यागत झालं होतं. आधाराला माहेर हे असं. भाऊ म्हणून आश्रयाला जावं तर गणामामाचं काहीच खरं नव्हतं. सतरा पोतावर तेल घालीत फिरणारा गणामामाच आबईकडं राहायला आला. पण थोड्याच दिवसांत त्यानंबी रंग दाखवायला सुरुवात केली. खायचं प्यायचं अन् उरलेल्या वेळात गावच्या पारावर टवाळक्या करत बसायचं. मागून बिडी प्यायची लायकी नसताना मोठ्या मोठ्या लाखाच्या गप्पा हाणत त्यानं ह्याच्या त्याच्याकडनं हातउसनं म्हणून पैसे घ्यायला सुरुवात केली. एवढ्यावरच थांबलं असतं तर ठीक, पण गणा दारू प्यायला लागला... नाचणारणीकडं जायला लागला. गावाकडचं तर सगळं फुकून टाकलं होतं. पण याच्या कलागती इकडंपण सुरू झाल्या. विधवा बाईला कशाला दागिनं लागत्यात म्हणून एके दिवशी आबईच्याच डब्याला हात घातला. तेंव्हा मात्र आबई बिघडली. सरळ हात धरून घराबाहेर काढला. पुन्यांदा तुझ्या घराची पायरी शिवणार नाही, असा पण करून गेला; तरी कुत्र्याचं शेपूट सरळ होणार आहे का? वर्षा सहा महिन्याला फुकटची माया दाखवित यायचा. काहीबाही कारणं सांगून चार पैसे उकळून परत जायचा. पुढे आबईनं हात आखडून धरल्यावर पोटच्या पोरीला अलकीला आबईच्या पायावर टाकून खोट्यानाट्या आणाभाका घ्यायला लागला. एकंदरीत काय माहेराकडून आबईला कुठल्याही आधाराची अपेक्षा उरली नव्हती.
नांदत्या घरात राहावं तर भावभावकीनं नको नको करून सोडल्यालं. एकटी बाई करती काय? हात जोडून बघितलं. शेती वाट्यानं देऊन बघितलं. पण आयतं प्रेत सापडल्यावर किती बी हाकललं म्हणून गिधाडं जात्याती होय. फक्त इस्टेटीचा विषय असता तर गोष्ट वेगळी होती. पण आता नवाच प्रकार सुरू झाला होता. एकटीदुकटी बाईमाणूस बघून जातायेता लाळ गाळणार्या नजरा पार उंबर्यापर्यंत डोकावू लागल्या. तरण्या पोरांच्या तक्रारी घेऊन मामंजी म्हणत बापाच्या वयाच्या माणसापर्यंत गेल्यावर धीर देणारे हात पाठीवर पडू लागले. पण पाठीवरच्या हाताचा स्पर्श आबईनं तेंव्हाच ओळखला. गटारीतल्या किड्याची वळवळ पाठीवरून खाली घसरू लागल्यावर आबई सावरली. आता आपल्यालाच पदर खोचून उभं राहावं लागणार हे ओळखून तिने शेवटी धाडस केले. रोजंदारीच्या गड्याबरोबर तीच वावरात उतरली. नांगरण्यापासून पाणी धरण्यापर्यंत... कापणीपासून खळ्यातलं दाणं घरी आणण्यापर्यंत गड्याला मागं सारील अशी शेतात खपू लागली. मग मात्र लोकांच्या नजरा बदलल्या. वाघिणीपुढं तरसांनी माना टाकल्या. कायम हाताशी उघडा कोयता घेऊन तिने प्रपंचाचा गाडा मार्गावर आणला.
पोरं मोठी होऊ लागली. कमरंएवढी पोरं डोक्याच्या वर चालली तशी आबईची चिंता मिटली. रमेश बारावीपर्यंतच शिकला. मग मात्र आईच्या हातातला कासरा त्यानं आपल्या हातात घेतला. पुढं शिक्षण घेतलं नसलं तरी बुद्धीनं तेज होता. तालमीतल्या लाल मातीत घुसळून अंग पोलादासारखं लालबुंद झालं होता. गडी स्वभावानं मवाळ होता पण नजरेत जरब धर्मातात्याचीच होती. पुढे सुरेश शहरात शिकायला गेला. तेंव्हा धाकल्याला मात्र त्यानं काही कमी पडू दिलं नव्हतं. तोपण बुद्धीला तेज होताच. त्यातच आईचं रूप घेऊन जन्मलेला. कधीकधी आबईच आई असूनबी नजर लागू नये, म्हणून तो घरी आला की, मिठमिरच्या उतरून टाकायची. बघता बघता सुरेशनं वकिलीचं शिक्षण घेतलं. शहरात हापीस टाकलं. इकडं रमेशबी गावातल्या चार जाणत्या लोकांच्यात उठायबसायला लागला होता. त्यातच त्याचं डोकं बघून लोकांनी त्याला पुढं केला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा राहिला अन् छप्पर फाडके मतांनी निवडून पण आला. सरपंच झाला. सोसायटीवर आला. दूध डेअरी सुरू केली. कारखान्याला ऊस जायला लागला. राहतं घर पाडून वाडा बांधला. सगळ्यात चांगलं होतं की, साधं सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नव्हतं. आबईचा वनवास आता संपला होता.
इंदूच्या डोक्यातून हात फिरवताना आबईला गतकाळ आठवत होता. गेल्या लगीनसराईत रमेशच्या लग्नाचा बार उडवून दिला, तेंव्हा बावरलेली... काहीशी घाबरलेली इंदू घरी आली. अगदी नक्षत्रासारखी नजर लागावी अशी दिसत होती. आबईच्या पाया पडायला इंदू खाली वाकली अन् आबईनं तिला आपल्या मिठीत घेतली. त्यादिवशी आबईला मुलगी मिळाली आणि इंदूला आई. इनमीन घरात तीन माणसं. पण इंदूच्या येण्याने घराचा चौकोन पूर्ण झाला. इंदूला आपण सासरी नव्हे तर दुसऱ्या माहेरातच आल्यासारखे वाटत होते. मनमिळाऊ नवरा, मायाळू सासू आणि सावलीसारखी सोबत करणारा दिर यापेक्षा अजून काय हवे? सगळं काही आलबेल चाललंय असं वाटत असतानाच नशीब कूस बदलते. रमेशच्या अकाली जाण्याने संसाराचा सारा सारिपाटच उधळून लावला होता. किती स्वप्नं पाहिली असतील...? किती कल्पना रंगवल्या असतील...? पण या प्रश्नांना उत्तरे नव्हती. होते फक्त प्रश्न... प्रश्न... आणि जबडा पसरून बसलेले फक्त प्रश्न...
ज्या इंदूमुळे घराला घरपण आलं... त्याच इंदूला पांढऱ्या पायाची... फुटक्या कपाळाची... अजून काय काय म्हणून घ्यावं लागंल? ती इंदू गळ्यात पडून म्हणतीय, मला दूर लोटू नका. आबईला काही सुचंना झालं. पोरी, आता तुला मी कोणत्या तोंडानं धीर देऊ? हे कपाळकरंटेपण मीसुद्धा भोगलंय. एकतर हे बाईपण म्हणजे फार मोठी सत्त्वपरीक्षा असती... सतीचं वाण असतंय. त्यात पुन्हा असं नशीब फाटलं, तर झाकायचं कुठे... आणि दाखवायचे कुठे...? आत आणि बाहेर दोन्हीकडं आग असते. एक जळू देत नाही अन् दुसरी विझू देत नाही. दिवसा वैर्यानला कमी नसती अन् रात स्वतःच वैरीण होऊन येती. आताशी सतीची चिता तू बघितली, पण सतीचं जळणं अजून बघितल्यालं नाही.
आठपंधरा दिवसांसाठी गेलेली इंदू चार दिवसांत परत आली. हळूहळू सुरेशने घराचा कारभार हातात घेतला. आबई मात्र आताशा पहिल्यासारखी कुठल्याही कामात लक्ष देत नव्हती. रात्री अपरात्री उठून बसत होती. पायाचं मुटकुळं पोटाशी घेऊन झोपलेल्या इंदूच्या अंगावरचं पांघरून नीट करून दिव्याच्या उजेडात तिच्या चेहऱ्याकडं बघत बसायची. आता फक्त अंधार उरला होता. गणामामाचा काही घरातून पाय निघत नव्हता. त्याला आता नवीनच स्वप्नं पडायला लागली होती. अलकीला सुरेशच्या गळ्यात अडकवली तर आयुष्यभराची ददात मिटणार होती. मासिक झाले. दिवस उलटत गेले. वातावरणातला ताण जरा हलका झाल्याचा अंदाज घेऊन त्यानं आबईकडं विषय काढला. वर्षश्राद्धाच्या आत लग्न कार्य नाही केलं, तर पुढं तीन वर्षे काही कार्ये करता येणार नाहीत याची भीतीही दाखवली. बघता बघता शेवटचं मासिक जवळ आलं. सुरेशचं बघायला पाहिजे. पण आबईचा काही निर्णय होत नव्हता. गणामामाचं पण बरोबरच होतं. परक्या घरची पोरगी सून म्हणून आली तर... आपलं कसं बी निभून जाईल. पण इंदूचं काय...?
आबई झोपेतून दचकून जागी झाली ती बडबडतच. सारं अंग घामानं डबडबून गेलं होतं. डोळ्यांत पाणी दाटून आलेलं होतं तिच्या. तिच्या स्वप्नात रमेश आला होता. जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला होता. इथं... इथं सोप्यात होता भिंतीला टेकून उभा. आबईचा मुठभर जीव सुपासारखा झाला होता. पण तो काही बोलायला तयारच नव्हता. नुसता खाली मान घालून पायाच्या अंगठ्यानं जमिनीला टोकरीत होता.
"बोल की रं माझ्या बाळा! का रुसलाईस माज्यावर. माजं काई चुकलं का? आरं आई हाय तुजी मी. आसा गप्प का?"
आबई लाख मिनत्या करत होती. पण गडी काही तोंड उघडायला तयार नव्हता.
"पाह्यजेल तर काय चुकलं आसलं तर पाया पडती तुज्या. पन आसा मुका होऊ नकू. तुला शपत हाय बग माजी."
मग मात्र त्यानं मान वर करून बघितलं. डोळं पाण्यानं भरून आलं होतं.
"आबई, असं मनाला लावून घेऊ नको. तुझं काही चुकलेलं नाही. उलट मीच तुझ्या पायाजवळ एक मागणं घेऊन आलोय. आबई, सगळं ठीक होईल गं! पण तुझ्या इंदूला अंतर देऊ नको. तुला तर माहितीय, फार हळवी आहे गं ती. तिच्यानं आयुष्य निभणार नाही. माझा जीव घुटमळतोय गं! माझा काय पायच निघंना झालाय इथनं"
आणि तो जसा आला तसा निघून गेला. त्याला हाका मारतच आबई जागी झाली. पुन्हा काही सकाळपर्यंतआबईच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळ झाली तरी कितीतरी वेळ ती नुसती अंथरूणावर बसून राहिली होती. एवढा उशीर झाला तरी आबई अजून कशी उठली नाही. म्हणून सुरेश माजघरात आला, तर आबई नुसती आढ्याकडं बघत बसल्याली. सुरेशनं तिच्या जवळ बसत तिचा हात हातात घेतला.
"का गं आबई, तब्येत बरी नाही का तुझी? उठ बरं! तूच अशी हातपाय गाळून बसली तर आम्ही काय करावं?"
आबईनं नुसतं 'बरी हाय' म्हणून मान हलवली. जरा वेळ तशीच बसून एक सुस्कारा सोडला. काहीएक मनाशी गाठ मारत आबईनंच उलट सुरेशचा हात हातात घेतला.
"बापू, दादा आलता रं सपनात. लई कष्टी झाला हुता. आईचं काळीज हाय रं! काई उमगना गेलंय. पर आता सगळ्याची येवस्ता लावल्याबिगर त्याला मोकळीक न्हाई. म्या काय म्हंती, तुजा माज्यावर भरोसा हाय का?"
"आबई, अगं असं का परक्यासारखं म्हणतेस? मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का?"
"मग ऐक. गना म्हनतोय ते बी बरुबर हाय. येवडा म्हयनाच हाय. तुजं लगीन करून द्याया पाह्यजेल. पुन्ना तीन वरीस काय हालचाल करता यायची न्हाई."
"अगं थांबेन की मी तेवढं. मी कुठं गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय. बरं ही वेळ आहे का असला विचार करण्याची? तू नको माझी काळजी करू. होईल सर्व व्यवस्थित."
"व्हय. पर तवर म्या जगंल का मरंल? मलाच म्हाईत न्हाई. तवा आताच काय तो सोक्षमोक्ष लावाय लागंल. तुजी हौसमौज न्हाई करता याची अशा येळंला. पन तरीबी तुजं आपून उरकून टाकू."
"तुझ्या मनासारखं होईल; पण असलं काही बोलू नकोस."
"मग ठीक हाय. बोल हाय का कुनी तुज्या मनात?"
"नाही नाही. तसं काही नाही. तू म्हणशील ती पूर्व दिशा."
"मग वचन दी मला. माजा शब्द मोडनार न्हाईस."
* * * * *
निवद ठेवल्याबरोबर निवदाला कावळा शिवला. आबईच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं. आबईनं भरल्या डोळ्यांनी एकदा कावळ्याकडं बघितलं अन् भुईला हात टेकवून नमस्कार केला. नजर फिरवून तिनं एकदा सुरेशकडं आणि एकदा इंदूकडं बघितलं. डोळे भरलेले असतानाही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. इंदूच्या हातात नव्याने हिरवा चुडा भरला होता. कपाळावर पुन्हा कुंकू लागलं होतं. आता तिला कुणीही पांढऱ्या कपाळाची म्हणून हिणवणार नव्हते. आबई मनाशीच म्हणाली, 'आता चिमणी परत घरटं बांधंल.' तिनं नवा डाव नव्यानं मांडला होता. नवी विटी होती... नवा दांडू होता... नवा गडी होता आणि राज्यसुद्धा नवीन होते.
-- श्री नंदकिशोर गायकवाड.


No comments:
Post a Comment