Thursday, 7 December 2017

माझा तू... (कविता)

जिव्हारी रूतलेला 
हवाहवासा काटा तू...
काळजात भरलेला
शब्दांचा साठा तू...

दुःखात उन्मळलेला 
भावनांचा ओढा तू...
नकळत ओघळलेला 
प्राजक्ताचा सडा तू...

माझ्यातच रमलेल्या 
श्वासांचा गाभा तू...
निराशेच्या तळाशी
जगण्याचा वादा तू...

आठवांच्या काळोखात
चकाकणारा पारा तू...
डोळ्यांतून पाझरलेला
आनंदाचा झरा तू...

आवेगात चाललेला 
हृदयाचा ठोका तू...
गहिवरल्या मनाला
श्रावणातला झोका तू...

माझ्यातच रुतलेला
कसं सांगू राजा तू...
कळत नाही अजूनही
तुझी मी कि माझा तू...
@boli


Wednesday, 6 December 2017

चक्रव्युह... (कथा)


चक्रव्युह...!


          मनासारखं आयुष्य जगायला मिळणं यासारखं सुख नाही. तुम्हाला जे जे हवं असतं, अगदी तसंच्या तसं सगळं मिळत असेल; तर तुम्ही नशीबवान आहात, यात काही शंकाच नाही. अगदी सरळधोपट नॅशनल हायवेला गाडी लागावी... थेट टॉप गियर... ब्रेकवरच्या पायाला काहीच काम नाही... दोन्ही हात स्टेअरिंगवर घेऊन वाजणार्‍या गाण्यासोबत हाताने ठेका धरावा... अगदी माझंही आयुष्य तसंच चाललं होतं. चांगल्या सुखवस्तू घरात जन्म झालेला. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत होत्या. त्यात तीन बहिणीच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा... लाड कोडकौतुक किती असावं? पुढे शाळेत जायला लागल्यावर वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. मराठी शाळा... हायस्कूल गाजवून झाल्यावर कॉलेजमध्येही नावाचा डंका वाजत होता. दिसायला दिलीपकुमारसारखा दिसतो, अशी कौतुकानं सगळी म्हणायची. पोरीसुद्धा मनातून झुरत असतील. पण असल्या गोष्टी करायला वेळ होता कोणाकडे? एकंदरीत नियतीनेही हेवा करावा, असे जीवन वाट्याला आले होते.
          लहानपणी गोष्टींची पुस्तकं आणि कॉलेजात कथाकादंबर्‍या वाचल्या असतील तेवढ्याच. बाकी खरी आवड वेगळीच होती. विज्ञान आणि अध्यात्म अशा दोन टोकाचे विषय वाचत राहिलो. विवेकानंदाप्रमाणे आपणही आजन्म संन्यासी बनून जगावे किंवा बाबा आमटेसारखे निःस्पृह, एवढीच कामना होती. गौतम बुद्धाची ओळख झाल्यावर एक ना एक दिवस आपणही सिद्धार्थसारखे घर सोडून जाणार, असे विचार डोक्यात घोळत असायचे. बाकी शाळेपासून काही मित्र होते, त्यापलीकडे जग माहीतच नव्हते. पण शेखर आयुष्यात आला आणि फुगलेल्या फुग्याला टाचणी लावायचे काम त्याने केले. मी उत्तर ध्रुव होतो; तर तो दक्षिण ध्रुव. मला वाटले होते, मी राम असेल; तर शेखर लक्ष्मण असेल. पण काळाची वाट उलगडत गेली; तशा आमच्या भूमिका बदलत गेल्या. मी राम नाही बलराम झालो आणि शेखर...
          मैं अमीर था... वह गरीब. मी वर्गात पहिला; तर तो बाकीच्या स्पर्धा कार्यक्रम गाजवून सोडत होता. मी पॅसिव्ह होतो; तर तो ॲक्टीव्ह होता. मी वाचत होतो; तो लिहित होता. मी अभ्यास करत होतो; तो नाटकातून स्टेजवर भूमिका जगत होता. मी स्मित होतो; तो खळखळून हसणारा धबधबा होता. लोकांच्या नजरेत आम्ही शहाणे असलो; तरी तो वेडा आहे, हे आम्हा दोघांनाही माहीत होते. मी झुळूक होतो; तो वादळी होता. मी हायवेला होतो; तर तो डोंगरदर्‍या पालथ्या घालत होता. मी पाऊस पाहायचो; तो पाऊस जगायचा. मी टाय बांधून असायचो; तो शर्टच्या बाह्या मागे सारून मानेवर कॉलर उडवायचा. पण एक होते, साला! रक्ताच्या नात्यात करणार नाहीत, इतके भरभरून प्रेम करायचा. तिखट होते, पण शुद्ध होते. अगोदरच सुरुवातीला मी सांगितले, त्याप्रमाणे मनासारखं आयुष्य जगायला मिळणं यासारखं सुख नाही. तुम्हाला जे जे हवं असतं, अगदी तसंच्या तसं सगळं मिळत नव्हे तर घडून येत असेल; तर तुम्ही नशीबवान आहात, यात काही शंकाच नाही. अगदी घाटात गाडी लागावी आणि एका हाताने गियर व दुसऱ्या हाताने स्टेअरिंग पकडून पाय ए बी सी... अॅक्सिलेटर... ब्रेक... क्लच करत थेट टॉप गियरमध्ये गाडी सणकून वर काढावी... उजव्या हाताने स्टेअरिंग घेऊन वाजणार्‍या गाण्यासोबत डाव्या हाताने सणसणीत शीळ घालावी... असली फिलॉसॉफी त्याच्यासाठीच.
          शेखर आयुष्यात आला आणि सगळ्या व्याख्याच बदलून गेल्या. एकेक जुने मित्र गळून गेले. कधी नव्हे तो मी कॉलेजच्या कट्ट्यावर बसू लागलो. पाऊस सुरू झाला की, घराबाहेर पडून पावसात भिजू लागलो. रात्रीच्या अंधारात स्मशानाच्या पलीकडे जाऊन वाहत्या नदीच्या पात्रातल्या मधल्या खडकावर चांदण्यात निवांत पसरू लागलो. हा शहाणा खडकातले खेकडे पकडून तिथेच भाजायचा. माझ्याच गाडीवरून मलाच मागे बसवून गावभर फिरवून आणायचा. पावसात भिजल्यावर गरमागरम भजीसोबत हिरव्या मिरच्या व गरम चहा फुरका मारून प्यायला लागलो. हा नाकातून सिगारेटचा धूर काढायचा; तेंव्हा कँसरविषयी बौद्धिके घेऊन 'हे तुझे काम नाही रे, झेंडू!' म्हणून खळखळून हसायचा.
     "तुला नाही का कँसर होणार?" असे विचारल्यावर
     "सकाळ संध्याकाळ तासभर अंगातून घाम निघेस्तोवर व्यायाम करतोय रे! काय बिशाद हाय साल्याची. उपाशी मरेल तुझा तो कँसर माझ्याकडे आला तर." म्हणून माझ्याच पाठीवर दणका ठेवून द्यायचा. इकडे पोरी माझ्यासाठी झुरत असतीलही... हा माझ्याच गाडीवरून पोरी फिरवून आणायचा. 'गाडीचा अपमान नको रे व्हायला... तिलाही बरं वाटत असेल पोरगी बसल्यावर. काय काटा फायरिंग मारते. माहितीय!' असली याची बौद्धिके ऐकावी लागायची वरून.
          एकूण त्याच्यासोबत राहून मी बिघडत चाललो होतो आणि माझ्यासोबत राहून तो सुधारतोय, असे त्याला वाटत होते. कॉलेजची दोन वर्षे मजेत काढल्यानंतर त्याला साक्षात्कार झाला आणि तिसऱ्या वर्षाला असताना आम्ही दोघेही पुण्याला आलो. पुढील तीन वर्षांत कधी नव्हे ते सिरियस होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहिलो. फळही तसेच मिळाले अर्थात. कडक सॅल्यूट ठोकून तो पी.एस.आय.च्या ट्रेनिंगला गेला आणि मीही टाय बांधून प्रशासकीय अधिकारी झालो.  कुठल्या पोरीला लिहिली नसतील; अशी दर्दभरी लव्हलेटर ट्रेनिंगच्या काळात आम्ही एकमेकांना लिहित होतो. नोकरीवर हजर झाल्यानंतर वर्षभरातच घरच्यांनी माझ्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. अर्थातच दोनतीन ठिकाणी कांदेपोहे खाऊन झाल्यावर याने फायनल अॉर्डर काढली.
     "साल्या! तुझ्यासाठी हीच मुलगी चांगलीय. मरेपर्यंत तुला सोडणार नाही. माझी काळजी मिटली."
     "आता तुझं काय? तुलाही हंटरवाली शोधायला हवी."
     "पागल आहेस का तू? विकत दूध मिळत असताना दारात म्हैस कशाला कोण बांधेल? चारदोन प्रेमभंग... पाचसहा अफेअर केल्याशिवाय मी कसला लग्न करतोय...?"

          हे असं होतं. मी काही सांगायचं म्हटलं की, विषय शेखरपाशीच येऊन थांबतो. प्रत्येकवेळी असंच होतं. खरं म्हणजे मनापासून मला तो आवडत असला किंवा त्याच्याशिवाय माझी कुठलीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नसली... तरीही कधीतरी मनातून मग त्याच्याविषयी जेलसी वाटणार नाही का? मी जरा कुठे बाहेर कामासाठी निघालो की, घरचे म्हणायचे, 'शेखरला घेऊन जा बरोबर.' बाहेर कुठे एकटा दिसलो की, ओळखीचे विचारणार, 'आज एकटेच? जोडीदार कुठे सोडला?' त्याचे एकेक किस्से असे भन्नाट असायचे की, आपण त्याजागी का नव्हतो, असे वाटत राहायचे. बर्‍याचवेळा आम्ही दोघेही असलो तरी शेवटी तोच भाव खाऊन जायचा. पण एक गुण त्याच्याकडे नक्कीच होता. तो माझ्यासोबत गुंतला असेल तेवढा. बाकी गडी कशातच अडकून राहिला नाही. प्रत्येकवेळी बेधडकपणे आत घुसूनही सहीसलामत बाहेर पडण्याची त्याच्याकडे कला होती. महाभारतात असता; तर चक्रव्युहसुद्धा सहज भेदले असते त्याने.
          आम्हांला मानसशास्त्र शिकवायला एक मॅडम होत्या. पण शेवटपर्यंत त्यांचे मानसशास्त्र आमच्या डोक्यात काही शिरले नाही. एका संथ गतीने त्या बोलत राहायच्या. पहिल्या चार ओळी सोडल्यास कुणालाही त्यांचे बोलणे कळलं असेल, तर शप्पथ! हा गडी मात्र खिडकीत बसून हातातल्या घड्याळाच्या काचेने उन्हाचे कवडसे छतावर पाडायचा. त्याचा निवांत खेळ चाललेला असे. कधीतरी मग मॅडमच्या ते लक्षात यायचे.
     "कोण आहे रे तो?" असे विचारले की, एकदम निरागस चेहरा करून तो इतरांकडे पाहत राहायचा. वरून पुन्हा तोच इतरांना रागवायचा. "ज्यांना लक्ष द्यायचे नसेल; त्यांनी निघा बाहेर. अजिबात डिस्टर्ब करू नका. स्वारी मॅडम, तुम्ही शिकवा. आता कोणी आगाऊपणा करणार नाही."
          या मॅडम जेंव्हा रिटायर झाल्या; तेंव्हा विद्यार्थी मनोगतात कोणी बोलेल कि नाही, शंकाच होती. पण हा गडी अचानक उठून पुढे गेला आणि चांगली पंधरा मिनिटे बोलला. बोलणे जनरलच होते. म्हणजे कोणत्याही निरोप समारंभात खपले असते. पण हा असा इमोशनल होऊन बोलत होता की, सर्वांनाच वाटावे, हे फक्त आणि फक्त मॅडमसाठीच आहे. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही त्याला कँटिनमध्ये गाठलाच. त्याचे स्पष्टीकरण मात्र जबरदस्त होते. "अरे, सर्वात जास्त त्रास तर मीच त्यांना दिलाय. यापुढे त्रास देण्यासाठी त्या नसतील. जर एकही विद्यार्थी बोलला नसता, तर शेवटपर्यंत ही रुखरुख त्यांच्या मनाला टोचत राहिली असती. प्रवास कसाही असू दे... शेवट चांगला व्हायला हवा. तसेही त्यांचे फार उपकार आहेत माझ्यावर. वर्षभरात अनेकवेळा दांडी मारली. पण त्यांचा तास कधी चुकवला नाही. एकतरी विद्यार्थी मनापासून ऐकतोय, याचे त्यांना समाधान मिळत असेल आणि मागे बसून आपली लाईन क्लेअर झालेली असायची. जाताना तरी त्या समाधानाने जातील आणि माझ्या डोक्यावरून त्यांचे कर्जही उतरेल."
          खरं म्हणजे शेखर असा आगाऊ होता; पण आपली मर्यादा त्याने कधीच ओलांडली नाही. एकदा भूगोलाचे सर कशावरून तरी भडकले होते. कोणीतरी मध्येच हसले. नेहमीप्रमाणे संशय शेखरवर गेला. त्याने परोपरीने सांगूनही सरांनी त्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले. शब्दाने शब्द वाढत गेला.
'तू पास होऊन दाखव,' म्हणून सरांनी चॅलेंज केले. 'नुसतं पास नाही; तर तुमच्या विषयात वर्गात पहिला येऊन दाखवतो,' असे म्हणून तो बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ दहाबारा विद्यार्थी बाहेर पडले. त्यात मुलीही होत्या, हे विशेष. यथावकाश वर्ष संपले. मी बोर्डाच्या यादीत झळकलो. पण माझे यश शेखरने झाकोळून टाकले. भूगोलात त्याने मला मागे टाकले होते आणि कॉलेजात पहिला येण्याचा पण पूर्ण केला होता. डिपार्टमेंटला जाऊन सरांना निकाल दाखवून वर त्यांचे आभार मानूनही तो आला. माझ्या बोर्डात येण्याचे जेवढे कौतुक झाले; तेवढेच कायम कट्ट्यावर बसणारा एक विद्यार्थी विषयात पहिला आला म्हणून शेखरचेही झाले.
          आयुष्यातल्या प्रत्येक पहिल्या गोष्टीचं माणसाला अप्रुप असतं. पण शेखरने हा आनंद मला सहजासहजी मिळू दिला नाही. संपूर्ण कॉलेज संपेपर्यंत मी प्रेमात पडलो नाही. पडलो नाही म्हणण्यापेक्षा त्याने पडू दिले नाही. एक मुलगी आवडली होती. हा तिच्यावरून मला चिडवायला लागला. तिला तर थेट वहिनी म्हणून हाक मारायचा. ती नुसतं हसायची. पण माझे काही धाडस झाले नाही बोलण्याचे. या पठ्ठ्याने तिच्या मैत्रिणीलाच अडवले. तीपण तशी पुढचीच होती. सरळ सांगितले, "त्यांचा प्रॉब्लेम ते पाहून घेतील. तू तुझे बोल."
हाही म्हणाला, "तुझ्याशी बोलायला निमित्त पाहिजे म्हणून त्यांचा विषय काढला. विचारायचं तर तुलाच होतं." आमची कहाणी काही पुढे गेली नाही. पण त्याची कहाणी सुरू झाली. तेंव्हापासून त्या दोघीही आमच्या ग्रुपमध्ये मिसळायला लागल्या. आमची मैत्री झाली. पण पुढे काही वाढवण्याचे धाडस मलाच झाले नाही. पाहता पाहता दोन वर्षे गेली. तिचे लग्न ठरले. माझ्या मनला किती पीळ पडला असेल? तरीसुद्धा हा बहाद्दर मला तिच्या लग्नाला घेऊन गेला. वर सगळ्या मित्रांच्या वतीने भलेमोठे गिफ्ट देऊन मला तिच्याशेजारी उभे करून फोटोसुद्धा काढले. निर्लज्जपणा किती करावा? सगळे मित्र दणकून जेवले. घरचे कार्य समजून मलाही माझ्या घशाखाली घास उतरत नव्हता तरीही आग्रह करून खाऊ घातले. याचे किस्से ऐकून मी चरफडत राहिलो आणि हा मात्र माझ्या जखमेवर मीठ चोळत राहिला..."हे बघ झेंडू, दिल अपनी जगह और बिल अपनी जगह. एवढी लाईन क्लियर होती. तू थोडे धाडस केले असते; तर ही वेळ आली असती का? मुळात हा प्रेमभंग वगैरे काही नाही. आणि समजा... समजा तुला तसे वाटत असेलच; तर दोन कश मार. धुरासोबत दुःख हलके होईल. यापुढे तू फक्त अभ्यास कर. ये तेरे बस की बात नही!"

          एकंदरीत पहिले प्रेम... पहिला प्रेमभंग... आणि पहिली सिगारेट... पण पहिलेपणाचे सुख काही मला मिळू दिले नाही. ग्रॅज्युशनची तीन वर्षे संपेपर्यंत बाकीचे उद्योग सांभाळून आमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालूच होता. त्यातच गुंतवून घेतल्यामुळे ते दुःख फारसे जाणवले नाही. पुढील दोनच वर्षांत मी पोस्ट काढली. त्यानंतर वर्षभरात शेखरही सुटला. नाशिकला ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्याला पोस्टींग मिळाली ती थेट यवतमाळच. त्यामानाने माझी ड्युटी चांगली होती. एकतर शहरात सगळ्या सुविधा होत्या. सिस्टीममध्ये रुळायला मलाही फार वेळ लागला नाही. कितीही 'नाही' 'नको' म्हटलं; तरी वरकमाई मिळत होती. प्रापंचिक जीवनातली नव्याची नवलाई मला मानवली होती. आमच्या गाठीभेटी हळूहळू कमी होत गेल्या. शेखरही फार बदलत चालला होता. भेटल्यावर तो असं काही बोलायचा की, हा तोच शेखर आहे का? असा प्रश्न पडायचा.
"झेंडू, अरे, त्या दुर्गम भागात आहे म्हणून मी वैतागलेलो नाही. वरकमाईचा प्रश्नच नाही. वाईट वाटते ते एवढ्यासाठी की, ज्या लोकांच्या विरोधात आम्ही उभे राहतो, ते या सिस्टीमचे बळी असतात. त्यात स्वार्थासाठी त्यांना भडकवले जाते, ते वेगळेच. अरे, ज्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही; त्यांना अत्याधुनिक शस्त्रे आणि लढाईचे ट्रेनिंग मिळतेय. ते लोक आम्हांलाच त्यांचा शत्रू समजतात; कारण त्यांच्या दृष्टीने आम्हीच सिस्टीम आहोत. मध्यंतरी मी हेमलकशाला जाऊन आलो. असंच काहीतरी या लोकांसाठी आपणही चांगलं करावं, असं वाटतं. पण सिस्टीममध्ये राहून मर्यादा आहेत. वर पुन्हा ज्यांच्यासाठी करायचं; त्यांना आमच्यावर विश्वास नाही.
          या संघर्षात नेहमी कुणाचा ना कुणाचा बळी जातो. फक्त कधी तो या बाजूचा असतो; तर कधी त्या बाजूचा. पण हे बळी जाणे कुणाच्या हिताचे आहे? हे कधीच थांबणार नाही का? असा एखादा पूल उभारला गेला पाहिजे; ज्यामुळे दोन्ही बाजू जोडल्या जातील. पण इथे मोठा मासा लहान माशाला गिळतोय. सत्तेचे गुलाम होऊन आम्ही मात्र आमची कातडी वाचवण्यासाठी धडपडतोय. रावणाला दहा डोकी होती असे म्हणतात. आज प्रत्येकाला एक डोके हवे आहे...
स्वतःसाठी विचार करायला नव्हे; तर कुठल्याही गोष्टींचे खापर फोडता यावे म्हणून...!!!
दहा डोक्याचा रावण परवडला. त्याला निदान दहाच डोकी होती. या सिस्टीममध्ये लाखो करोडो डोकी आहेत."
          शेखर सांगतोय त्यात चुकीचे काय आहे? संघर्ष तर आमच्या इथेही आहे. त्यात एक डोके माझेही आहे. खोटं सांगत नाही. महिन्याला येणारा पगार खात्यावर जमा होतोय. काढायची गरजच पडत नाही. तरीही सगळा खर्च आरामात चाललाय. गृहलक्ष्मी आनंदात आहे. वैभवलक्ष्मीची कृपा आहे. विशेष म्हणजे दोन्ही फुगत चालल्या आहेत. हवे ते मिळतेय. राजेशाही थाट आहे नुसता. सरकारी गाडी दिमतीला असतानाही दहा लाखाची कार घेतलीय. राहायला सरकारी निवासस्थान असले; तरी दोन ठिकाणी फ्लॅट आहेत. सगळी कामे करायला नोकर आहेत. शॉपिंग हॉटेलिंग नेहमीचंच आहे. आता सरकारी अधिकारी म्हटलं की, चार मोठ्या लोकांत उठबस असते. सुरुवात कधी झाली आठवतही नाही. पण आता रात्र नशेतच जाते. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण आवर्जून घरीच घेतो अजूनही. सुट्टी दिवशी मुलांसाठी वेळ देतो. सिस्टीम मला कळलीय. पण शेखरला कळत नाहीये. कळून घ्यायची त्याची मानसिकता नाही. अजूनही लग्न केलेले नाही. बरेच आहे. पूर्वी तुपाशी होता, आता उपाशी आहे. छे! उपाशी कसला राहतोय. जंगल मे मंगल करत असेल, स्साला! आतापर्यंत बर्‍याच नाठाळ घोड्यांना लगाम लावलाय त्याने. आता जंगली घोड्यांवर मज्जा चालली असेल. उगाचच का पुळका येतोय त्यांचा.
           शेवटी जे व्हायचे तेच झाले. कुठल्या तरी पुढाऱ्यावर हात उचलला त्याने. बातमीत अंगावर धावून गेला, एवढंच लिहिलंय. पण मला खात्री आहे, चारदोन तरी वाजवल्या असतील त्याने. फोन केला बातमीमागची बातमी ऐकण्यासाठी. कुठल्याशा जंगली पोरीला धरले होते म्हणे त्याने. अरे बाबा, हत्ती चालतो, तेंव्हा पायाखाली किडामुंगी यायचीच. तुला चिडायला एवढं काय झालं? बरं तू कशाला कायदा हातात घेतला? तसा पुढारी लोकलच आहे. पण सत्ताधारी पक्षाचा आहे. त्यामुळेच मिडियानेही लावून धरलेय. निलंबन झाले. प्रथेप्रमाणे चौकशी समिती नेमली. किती झाले तरी माझा मित्र आहे. सहजासहजी तो चक्रव्युहात अडकणार नाही. पण मित्र म्हणून मलाही हालचाल करावीच लागली. चारदोन ठिकाणी फोन फिरवले. फिल्डिंग लावली. आणि त्याला घेऊन थेट मंत्रालय गाठले. साहेबांनी थोडे आढेवेढे घेतले. मग पी.ए. ला वशिला लावून रात्री एकटाच त्यांच्या बंगल्यावर गेलो. इंपोर्टेड स्कॉच गिफ्ट म्हणून नेली होती. चार पेग झाले तेंव्हा त्यांनी शब्द दिला. म्हणले, 'सध्या वातावरण तापलेले आहे. थोडे दिवस जाऊ दे. तोपर्यंत रजेवर पाठवतो सक्तीच्या. तुम्ही तयारी ठेवा. बदलूनच आणू इकडे. फक्त काम जरासं जड हाये, याची जाणीव राहू द्या. कसं?'
             याला सिस्टीम म्हणतात. पाण्यात राहून माशांशी वैर करा. पण मगरींशी दोस्ती पाहिजे. प्रत्येकाला पोट आहे. फक्त समोरच्या माणसाची भूक ओळखता आली पाहिजे. कुणाला पोटाची असते, तर कुणाला पोटाखालची. कॉलेजात तो हिरो होता. आज मी हिरो आणि तो झिरो ठरला. तेंव्हा मुठीची भाषा करायचा. खरी हुशारी तर ही आहे की, मूठ दाबता आली पाहिजे. साहेबांची मूठ दाबली असली; तरी विरोधी पक्षातल्या तिथल्या लोकल पुढाऱ्यांना सांगून काही गोष्टी उकरून काढल्यावर शेवटी वर्षभराने केस मागे घेतली गेली. शेखर निर्दोष सुटला. कामावर रुजू झाला. एवढंच नाहीतर ट्रान्सफरही केली.

          शेखरची बदली झाली ती थेट सोलापूरला. तो सोलापूरला गेला. एकूण शेखरची गाडी रुळावर आल्यामुळे मी खूश होतो. पण त्याचा मूळचा स्वभाव मी बदलू शकत नव्हतो. सोलापूरसारख्या ठिकाणी तो त्याचा स्वभाव त्याच्या फायद्याचाच ठरला. एकतर महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रची सिमारेषा असल्यामुळे सोलापूर तिन्ही लोकांनी गजबजलेले. पूर्वीचा ऐतिहासिक वारसा असला तरी जातीय रंग होताच. पण हा गडी बुलेटवरून कमरेला पिस्तूल अडकवून बिनधास्तपणे फिरायचा. जरा गोंधळ दिसला की, हातात काठी घेऊन सगळ्यांच्या पुढे घुसायचा. लवकरच त्याने गुन्हेगारी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. लोकल पुढाऱ्यांना हाताशी धरून कामात येणारे अडथळे दूर केले. मीही बदली होऊन लातूरला आलो. आमच्या भेटीगाठी होऊ लागल्या. एकूण सगळे व्यवस्थित सुरू झाले. थोड्याच दिवसांत त्याला प्रमोशन मिळाले पुण्यात. आमच्या आयुष्याला या पुण्यातूनच आकार आला होता. मागच्या अनुभवाने शहाणा झालेल्या शेखरने पुण्यात आल्यावर आपला वट बसवला. पुण्यातही रुळायला त्याला फार वेळ लागला नाही.  
          सगळे व्यवस्थित चाललेय, असे वाटत असले तरी मी मात्र पिण्याच्या आहारी गेलो होतो. नशेत असताना मला माझ्यात पण काही कमी नाही, हे कळायला लागले. उगीचच शेखर मला झेंडू म्हणतो. मी झेंडू नाही. त्याच्यासारखे बिनधास्त मीही जगू शकतो. तो जे काही करू शकतो, ते तर मलाही अवघड नाही. म्हणून मग मीही नशेत असलो की, शेखरसारखे आयुष्य जगण्यासाठी अट्टहास करू लागलो. असतील नसतील तेवढ्या सगळ्या गोष्टी करायच्याच, हा चंगच बांधला होता. अर्थात रात्रीची नशा संपली की, सगळा फुगा फुटून जायचा. दिवसा मी माझ्या भूमिकेत आलेलो असायचो. शेखर मला खूप समजावून सांगायचा. "दोस्ता, हवं तसं जग. पण प्रत्येकाला एक मर्यादा असते, हे विसरू नकोस. आयुष्यातील आनंद घ्यायला हवाच. पण तो घोड्यावर बसून. घोडा उरावर घेऊन नाही. तू जे काही करतोस किंवा करणार आहेस, ते तुझ्या मनापासून कर. नशेच्या आहारी जाऊन नाही. सध्या तू जे काही करतोस; ते तू करतोय, असे तुला वाटते. पण ते तू नाही, तुझ्या पोटातील दारू करतेय, हे तुझ्या लक्षात येत नाही किंवा ते समजून घेण्याची तुझी तयारी नाही."
"तुझी फिलॉसॉफी तुझ्याकडेच ठेव. मला नाही कुणाची पर्वा." शेखरची वाक्ये मी शेखरच्याच तोंडावर फेकत होतो. मला कुणाचीच काय शेखरचीही पर्वा राहिलेली नव्हती. मी माझी तर सोडा पण घरच्याचीही पर्वा करायचे सोडून दिले होते. मला फक्त हवे तसे जगण्यासाठी निमित्त हवे होते. ज्या गोष्टी केल्याने इज्जत जाते म्हणतात, त्या गोष्टी करण्यात वेगळीच शान असते, हे मला कळले होते. इज्जत तो अबतक बहूत थी... अब बेइज्जत होकर मी सगळ्यांवर अगदी स्वतःवरही सूड उगवत होतो. खूप आयुष्य वाया घालवले आतापर्यंत. आता नाही. मला हे सुख टोचायला लागले होते. ज्याची कल्पनाही केली नव्हती, अशा गोष्टी करून बसलेला शेखर मला शहाणपण शिकवतोय. काय त्याचे वाईट झाले, ते माझे होणार आहे.
          काही कामानिमित्त मी पुण्यात आलो होतो. मीसुद्धा चक्रव्युह भेदू शकतो. मी स्वतः तयार करेन आणि भेदून दाखवेन. अशा नशेतच आणि डोक्यात छर्र ठेवून मी निघालो. आजपर्यंत राहिलेली एक गोष्ट मला हवी होती. सुख आणि समाधान. गेल्या कित्येक दिवसांत मला ती मिळाली नव्हती. एकटा पडलो होतो मी. ज्यांच्यासाठी मी एवढे कमावलेय, त्यांना त्याची किंमतच नाही. माणसापेक्षा वस्तूचे मोल यांना अधिक आहे. विशेषतः बायको. कपडेलत्ते दागिने हवे... दिले. घर हवे... दिले... महागडे फर्निचर हवे... दिले. मागा काय हवे ते... देतो. देण्याची ताकद आहे. पण मला काय मिळाले? शेजारी झोपलो तरी तिला वास येतो, म्हणून तोंड फिरवून झोपते. जवळ जायचे म्हटलं की, दारू पिल्यावरच तुम्हाला हे धंदे सुचतात, म्हणून झिडकारून टाकते. चल जाऊ दे. तुझ्यात तरी काय राहिलंय आता. मैद्याचं पोतं झालीस तू. कातडी बघ. दोन लेकरं झाली तर लोंबायला लागलीय. मला सुख हवंय. आनंद हवाय. मलाही प्रेम करायचंय. अरेच्चा! शेखरच्या नादात माझं ते राहूनच गेलं. आता नाही. आता मी पूर्ण करेन माझ्या सगळ्या इच्छा. गाडी पार्क करून लटपटणार्‍या पावलांनी मी जिन्याचा कठडा धरून वर चढू लागलो. तोंडातली सिगारेट फेकून दिली. या सिगारेटमुळे मला दम लागतोय कि माझंही वजन वाढलंय अलीकडे? छे! अजूनही आपली रग टिकून आहे. असले छपन्न जिने चढू शकतो मी.
          "आओ शाब! बैठो. अरे छोरे, कहाँ मर गया लौंडा? चल शाब को पकडकर सोपे पे बिठा... बोलो शाब, क्या खिदमद करू आपकी? आप सिर्फ उंगली दिखाओ... आज की रात रंगीन बना दूँगी...!"
           तोंडाला भयानक मेकअप चोपडलेल्या पोरी फिदीफिदी हसत होत्या. छ्या! असल्या नको. असली पाहिजेल. काय म्हणायचा शेखर? फिगर पाह्यजे... जिगर पागल करणारी. मी उठून आत गेलो. एकेक चेहरा बघत पुढे पुढे चाललो. तेवढ्यात माझे लक्ष गेले. म्हणून एक पाऊल मागे येऊन पुन्हा पाहिले. गॅलरीत ती पाठमोरी उभी होती. पिंजऱ्यातल्या पोपटाशी बोलत.
      "आँटी, यईच्य होना अपनेको..." खिशातून पाचशेच्या दोनचार नोटा आँटीच्या हातात दिल्या.
      "ये हिना, चल सँभाल अपने मजनू को... शाब, आडवान्स तो मिल गया... पुरी रात बैठना है तो अलगसे देना अपनी खुशीसे..." हसत आँटी निघून गेली आणि हिनाच्या खांद्यावर हात टाकून मी तिच्या खोलीत गेलो. कितीतरी वेळ मी पित होतो आणि माझ्या नजरेत आपल्या घार्‍या डोळ्यांनी पाहत ती पेग भरत होती. तिच्या शरीराची ऊब पांघरूण मी झोपी केंव्हा गेलो, ते मलाही कळले नाही. जाग आली तेंव्हा सकाळचे फटफटीत ऊन पडले होते.

          आता मला कोणाचीही गरज राहिली नव्हती. मी स्वतंत्र होतो. मला माझे अस्तित्व होते. माझ्या गरजा मला कळलेल्या होत्या... आणि त्या पूर्ण कशा करायच्या हेही मला कळलेले होते. आजपर्यंत मी उगीचच प्रत्येक गोष्टीचा बाऊ करत जगत होतो. आजपर्यंत मी माझे आयुष्य फुकाच घालवले होते. आता मला माझ्या जगण्याची वाट सापडली होती. माझ्या भूतकाळात जे काही होते, ते सारे निरर्थक होते. माझ्या भविष्यकाळात स्वर्ग निर्माण करण्याची ताकद माझ्याकडेच होती. माझ्यासाठी फक्त माझा वर्तमानकाळ महत्त्वाचा होता. तो मला पुरेपूर उपभोगायचा होता. या जगात जर खरे सत्य काय असेल; तर तो फक्त उपभोग...
          मला राग आला होता माझ्या घरच्यांचा. घरात एवढी लक्ष्मी नांदत होती. पण त्यांना त्याचा उपभोग घेता आला नाही. अध्यात्माच्या नावाखाली स्वतःची फसवणूक करून घेत राहिले. मलाही कधी मोकळेपणानं जगू दिले नाही. कायम मला बांधून ठेवले. एवढं करून कसला मोक्ष आणि कसली स्वर्गप्राप्ती होणार होती यांना? अरे स्वर्गाचे सुख तर इथेच आहे. मला राग आला होता माझ्यावर लादलेल्या संस्कारांचा... खरे जीवन तर मला आता कुठे कळायला लागले होते. मला राग आला होता शेखरचा. स्वतः कायम सुख उपभोगत राहिला. मला मात्र झेंडू म्हणून हिनवत राहिला. पण त्याला जे जे सुख आजपर्यंत मिळाले, ते ते मी यापुढे ओरबाडून घेईन. आता माझ्या मनात आग पेटलेली होती. या आगीची भूक पूर्ण करण्यासाठी मला ती कायम पेटती ठेवायला लागेल. त्यासाठी मग लागेल ती आहुती त्यात टाकत राहीन. पहिली आहुती मी दिली होती. माझ्यावर असणाऱ्या सर्व दृश्य आणि अदृश्य बंधनांना झुगारून मी पहिली आहुती त्यांचीच दिली होती. मला आता माझ्या सुखापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही.
          यानंतर वरचेवर माझी पुण्याला कामे निघू लागली. पण एकदाही मी शेखरला भेटलो नाही. त्याला माझ्या येण्याजाण्याची कल्पनाही येऊ दिली नाही. अर्थात तशी गरजही नव्हती. मला हवे ते सर्व सुख मला मिळत होते. इतके दिवस या सुखापासून दूर राहिल्याचा मला पश्चात्ताप होत होता. म्हणूनच मला राहून गेलेल्या सर्व सुखाची पुरेपूर कसर काढायची होती. माझ्या बदनामीची मला कसलीही पर्वा नव्हाती. तसेही मला ओळखणारे होतेच कोण? माझ्या वारंवार येण्याजाण्यामुळे मी आता नेहमीचे गिऱ्हाईक झालो होतो. आता हिनाला भेटण्यासाठी त्या बदनाम पायऱ्या चढण्याची गरज उरलेली नव्हती. आँटीला तिची बिदागी मिळण्याशी मतलब होता. मी पुण्यात असलो की, मी ज्या हॉटेलमध्ये थांबायचो, तिथे हिनाच मला भेटायला यायची. दोन दोन दिवस रात्र आम्ही एकत्र असूनही मन काही भरत नव्हते. जेवढे सुख तिने मला दिले असेल, तेवढे सुख मला कदाचित कुठे मिळाले असेल. मदिरा आणि मदिराक्षी यापुढे स्वर्गसुद्धा झक मारत असेल. एकदोनवेळा हिनाच्या इच्छेखातर लोणावळा माथेरानही फिरून आलो. गोव्याला जायला निघालो, तेंव्हा दोन दिवस महाबळेश्वरमध्ये घालवून तिथूनच परत आलो. मग शेखरला हे सगळे सांगायची गरजच काय?
           सुखाच्या सागरात असा आकंठ बुडालेला असताना माझ्या सुखाला कोणाची तरी नजर लागली असावी. मला अलीकडे छातीत आणि पोटात दुखू लागले होते. मध्यंतरी एकदोनवेळा कावीळही झाली होती. हॉस्पिटलमध्ये गेलो की, तेवढ्यापुरतेच बरे वाटायचे. पण यावेळी आजारी पडलो; तेंव्हा चांगले पंधरा दिवस अंथरूणावर पडून होतो. बायको असायची जवळ. पण मला ती जवळ नसेल, तेवढे बरे वाटायचे. शेखरही येऊन भेटून गेला. पण यावेळी त्याला भेटूनही मला म्हणावा असा आनंद झाला नाही. उलट हा अजून काय शहाणपण शिकवतोय, याचीच काळजी लागली होती. तरी जाताना म्हणालाच, "जरा लवकर बरा हो रे! तुला जरा वेगळ्या पद्धतीने समजावून सांगावे लागेल, असे दिसतेय."
साल्याचा अजून दांडगावा काही जात नाही. कोणीही मला समजून घेऊ शकत नाही. ना माझे आईबाप समजू शकले... ना माझी बायको... हा शेखर समजून घेईल असे वाटायचे... पण हिना सोडली तर मला कोणीही समजून घेऊ शकत नाही. तिच्या मांडीवर डोके ठेवून दिवसभर पडून राहिलो तरी वेळेचे भान राहत नाही. तिच्या केसांचा नुसता सुगंधही माझ्या भोवतालच्या सर्व परिस्थितीचा विसर पडायला भाग पाडतो. तिच्या लांबसडक बोटांनी तिने नुसता स्पर्श केला तरी मी विरघळून जातो. एकदा का बरा झालो की, हिनाला भेटायलाच हवे होते. पण डॉक्टर काही सोडायला तयार नव्हते.
          कामावर हजर झाल्यानंतर सर्व काही सुरळीत व्हायला महिना गेला. त्यानंतर इकडची सगळी व्यवस्था लावून मी पुण्याला गेलो. अर्थातच मी फोन करताच हिना मला भेटायला हॉटेलवर आली. 
तासाभरानंतर काय गडबड झाली कोणास ठाऊक! पण हॉटेलमध्ये धावपळ गोंधळ सुरू झाला. दार वाजले म्हणून मी दार उघडायला गेलो खरा! पण दारात शेखरला पाहून मी चक्रावलोच. मी काही बोलायच्या आतच मला आत ढकलून शेखरने बाहेरून दार बंद केले. हिना तर बाथरुममध्ये जाऊन लपली होती. खूपवेळ बाहेरचा कालवा ऐकू येत राहिला. मलाही काही सुचत नव्हते. काहीतरी गडबड झाली होती, एवढे नक्कीच! खूप वेळाने सर्व शांत झाल्यावर दार उघडल्याचा आवाज आला. तो शेखरच होता. मी काही बोलायच्या अगोदरच त्याच्या राठ हाताची थप्पड माझ्या गालावर बसली होती. दिवसाही डोळ्यांसमोर काजवे चमकले.

          
          त्या दिवसानंतर मी शेखरला भेटायचे टाळले ते टाळलेच. तोच कधीतरी येऊन जाई. मी चक्रव्युहात घुसलो खरा. पण ते भेदण्याचे मला जमले नाही. डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी दारू सोडली. सोडली म्हणण्यापेक्षा सोडावी लागली. तब्बल तीन महिने व्यसन मुक्ती केंद्रात काढावे लागले. हिनाशी संपर्क करायचा प्रयत्न केल्यावर हिनाने पुणे सोडल्याचे आँटीकडून कळले. यातही शेखरचाच हात असावा, असा माझा दाट संशय आहे. पण अलीकडे मला शेखरची जास्त भीती वाटते. माझ्या लीव्हरपेक्षाही...!!!


(समाप्त)

- श्री नंदकिशोर गायकवाड.