आपल्याला पडलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला कुठे माहीत असतात? सातवीत असताना स्कॉलरशिप परीक्षेमधील गणिते सोडवण्याची एक नवीनच पद्धत गुरुजींनी आम्हांला शिकवली होती. माहीत नसलेल्या उत्तरासाठी 'एक्स' मानायचा. जी पदे माहीत आहेत; त्यांची योग्य क्रमाने मांडणी करून तिरकस गुणाकार केला की, हवे असलेले उत्तर सापडते. या अमानवी शक्तींसाठी 'एक्स' मानून उत्तर सापडेल कि नाही, कोणास ठाऊक! तुमचा जर देवावर विश्वास असेल; तर भूताखेतांना तुम्ही कोणत्या तोंडाने नाकारणार? खरं म्हणजे मी आस्तिक आहे का नास्तिक ते मलाच माहीत नाही; पण मी सृष्टीनियंत्याला मानतो. एक अमूर्त अशी शक्ती या विश्वाच्या पाठीमागे असल्याशिवाय हे सर्व इतके व्यवस्थित चाललेय तरी कसे? तुम्ही त्याला परमेश्वर म्हणा... अल्ला म्हणा... गॉड म्हणा... याने काय फरक पडतो? तुम्ही त्याला काय म्हणताय? तुमच्यालेखी तो कसा आहे? तुम्ही त्याला कोणत्या स्वरूपात गृहीत धरलेय? याने तरी काय फरक पडतो? पण अशी एखादी शक्ती तर असायलाच हवी.
आपल्या बापजाद्यांनी पिढीजात जतन करून ठेवलेल्या ज्ञानामध्ये पंचमहाभूते सांगितली आहेत. आमच्या आधुनिक विज्ञानालाही ते मान्य आहे. पहा ना! किती गंमत आहे! पदार्थाच्या अवस्थांपैकी स्थायू, द्रव, वायू हीच अनुक्रमे भू, जल, वायू अशी महाभूते मानली आहेत. हे विश्व या घटकांनीच तर बनलेले आहे. याशिवाय असणारे तेज म्हणजे प्रकाश मानला आहे. तरीही शेवटी सांगितलेले पाचवे तत्त्व काय आहे? आकाश ही तर अमूर्त कल्पना आहे. पण या अथांग आकाशामध्ये अनेक प्रकारच्या लहरी, तरंग आहेत. आपण ज्याची कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न ऊर्जेने संपूर्ण विश्व भरलेले आहे. या ऊर्जेमुळेच या विश्वात चैतन्य भरलेले आहे. हे चैतन्य जसे ब्रह्मांडी आहे, तसेच ते पिंडी आहे. शरीरात मन कुठे आहे, हे सांगता येत नाही... आत्मा दाखवता येत नाही. तरीही शरीरातील चैतन्य संपले की, शरीर अचेतन होते. निघून जाणारी ही ऊर्जा म्हणजेच जर आत्मा असेल; तर परमात्मा म्हणजेसुद्धा हेच ते विश्वातील चैतन्य असावे.
तुमच्या भावभावना, विचारांच्याही काही लहरी, तरंग किंवा तत्सम रूपातील काहीएक स्वरूप असेलच ना! तुमचे मूर्त शरीर आणि अमूर्त भावना यांच्यात काही ताळमेळ असेलच ना! मूर्त शरीराला आरंभ आणि अंत आहे. पण त्या अमूर्त ऊर्जेचे काय? ती कुठे जात असेल? भूतकाळातील घटना आठवणींच्या रूपात वर्तमानात डोकावत राहतात. पण काळाचे हे अवशेष केवळ आठवणींपुरतेच असतील, असे कसे म्हणता येईल? ही ऊर्जा धनात्मक असते; तशी ऋणात्मकही असते. भूतकाळात घडून गेलेल्या आहेत म्हणूनच कदाचित त्याला भूत म्हटले असावे. आपण मात्र आपल्या कल्पनेने त्याला वेगवेगळी रूपे दिली. शेवटी हे सारे मनाचेच खेळ. मी भूताखेतांचे स्पष्टीकरण देतोय, अशातला भाग नाही. पण त्याशिवायही अशा कितीतरी गोष्टी आहेत; ज्या आपल्याला नेणीवेतून नाही, तर जाणिवेतून कळतात. आपल्या मनाच्या पटलावर कुठल्यातरी अनामिक प्रोजेक्टरमधून काही प्रकाशित होत राहते. अशाच काही प्रकाश सावल्यांमधून आपण हवा तसा चित्रपट पाहतो. अर्थात असे मला आपले वाटते. असेच असेल असेही नाही. शेवटी हाही तर्कच... अंदाज पंचे दागवदर्शे.
"माई, तुम्ही कधी भूत पाहिलेय का हो?"
मला माहीत होते की, हा प्रश्न ऐकून माई माझ्याकडे असे काही पाहतील की, जणू त्या खरंच भूत पाहत आहेत.
"हो...!"
आता विस्मयाने पाहण्याची पाळी माझी होती. अशा काही उत्तराची मलाच अपेक्षा नव्हती. त्यामुळे भूत पाहिल्यासारखा मीच माईकडे पाहू लागलो.
"काय म्हणालात?"
"तेच, जे तुम्ही ऐकलेत."
"यू मीन... म्हणजे तुम्ही खरंच भूत पाहिलंत? माय गॉड... विश्वास नाही बसत. खरंच सांगताय ना? केंव्हा? कुठे?"
माई शांतपणे माझ्याकडे पाहत राहिल्या.
"हे काय माझ्या समोर आहे. मला तरी वाटते की, यापेक्षा वेगळे भूत या जगात असूच शकत नाही."
"ओहो! हे होय? मग ठीक आहे. मला वाटलं..."
"काय वाटलं? आणि हा काय भलताच प्रश्न?"
"तो असाच. गंमत वाटली म्हणून सहजच विचारले. जाऊ द्या. सोडून द्या तो विषय."
माई हसल्या.
या उन्हाळा सुट्टीत शब्बूआपाचे लग्न झाले. ती तिच्या सासरी गेली. मी मोठ्या मामासोबत गेलो होतो तिच्या लग्नाला. मला आपले उगीचच काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहिले. जे वाटत राहिले; त्यासाठी 'एक्स' मानून त्याचे उत्तर सापडेल का?
सातवीमध्ये गेलो आणि सोनारगुरुजींची बदली झाली. ते जाणार याचे दुःख असले; तरी ते आता नवीन शाळेत मुख्याध्यापक म्हणून जाणार होते. त्यांना निरोप देताना प्रत्येक विद्यार्थी भावनाविवश झाला होता. डोळ्यांतून आसवांचे महापूर वाहत होते. विद्यार्थीच काय पण जाताना गुरुजींनाही त्यांच्या भावनांना बांध घालणे जमले नाही. त्यांचेही डोळे डबडबले होते. विभागावरील स्पर्धेसाठी आम्हांला पुण्याला जायचे होते; पण सोनारगुरुजी गेल्यावर हौसेने ही जबाबदारी घ्यायला कोणतेच शिक्षक तयार नव्हते. शेवटी पुणे दौरा ढेपाळला. आमच्या नाटकाचा हा अंक संपला होता. नवीन अंक येथूनच सुरू होणार होता.
सोनारगुरुजी गेले आणि पवारगुरुजी आले. चौथीत स्कॉलरशिप परीक्षेमुळे या अभ्यासाची गोडी लागली होतीच. यशाची झलकही दुरून का होईना पाहिली होती. सातवीत पुन्हा नव्याने स्कॉलरशिपची तयारी सुरू झाली. यावेळी अभ्यास खूप अवघड होता. पण एक चांगले झाले होते. नवीन आलेल्या पवारगुरुजींमुळे अंकगणित व भौमितिक रचनांची मला गंमत वाटू लागली. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, क्षेत्रफळ, घनफळ असले एकेक नवीनच प्रकार होते. लसावि, मसावि, काळ काम वेग, संख्यारेषा असल्या अंकगणितातल्या भन्नाट गमती आणि त्यातही गुरुजी उत्तर काढण्यासाठी 'एक्स' मानून तिरकस गुणाकार करायचे त्याची गंमत वाटू लागली. मी माझ्या अनेक प्रश्नांसाठी असा 'एक्स' मानू लागलो. माझ्या परीने उत्तरे मिळविण्यासाठी धडपडू लागलो. हा वेडेपणा असेलही. पण त्यातही मजा होती. जगण्यासाठी मला कायम वेगवेगळे खाद्य हवे असायचे... ते या वेडेपणातून मिळायचे. जुने प्रश्न सुटो अथवा न सुटो. मी नव्या प्रश्नांच्या शोधात भटकू लागलो.
स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासात मन रमण्याचे हेही कारण असावे. पवार गुरुजींनी एक चांगले केले होते, लेखनापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर दिला होता. तुम्ही जेवढ्या जास्त शंका घेऊन विचारण्यासाठी याल, तेवढा तुमचा अभ्यास जास्त झाला, असे सूत्रच मांडले होते. लिखाणाची नाहीतरी मला नावडच होती. मी हुरूपाने अभ्यासाला लागलो. यावर्षी मी स्पर्धांमधून जास्त सहभाग घेतलाच नाही. तरीही एक संधी मिळालीच. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचा एक कार्यकर्ता शाळेत आला होता. त्यांनी आम्हांला जादूचे प्रयोग करून दाखवले. हा केवळ करमणुकीचा कार्यक्रम नव्हता. प्रत्येकवेळी त्यामागील शास्त्रीय कारण व हातचलाखी कशी केले जाते, हे समजावून सांगितले. त्या आलेल्या पाहुण्यांना हाताखाली मदतीसाठी एक विद्यार्थी हवा होता. मुख्याध्यापक गुरुजींनी थेट वर्गातून मलाच बोलावून घेतले. त्यामुळे जवळून हे सगळे पाहता व अनुभवता आले. अंगात येणे हे ढोंग आहे, असे त्यांनी सांगितले. ज्याच्या अंगात आलेय, त्याला टाचणी टोचवा. अंगातील देव पळून जाईल. अशीही गंमत करायला सांगितले होते. यामुळे तर मी आणखीन नवनवीन प्रश्नांच्या शोधात गुरफटू लागलो.
पाहता पाहता दिवाळी आली. माधवमामा गोव्यातील काम संपवून परत आला होता. यानंतर तो आता पुण्यात राहणार होता. पण सध्यातरी चांगले पंधरा दिवस गावी राहण्याच्या तयारीनेच तो आला होता.
या ऊरुसाच्यावेळी शब्बूआपा आणि तिचा नवराही आले होते. शब्बूआपा आवर्जून सगळ्यांना भेटायला घरी आली होती. ती चक्क काळ्या रंगाचा बुरखा नेसून आली होती. आता तिच्यात बदल झाला होता. ती आता चांगलीच गोरीगोमटी आणि गरगरीत दिसू लागली होती. मोठीमामी तिला म्हणालीही,
"लगीन चांगलंच मानवल्यावनी दिसतंय, शब्बू."
शब्बूआपा फक्त हसली. नेमका त्याचवेळी माधवमामा घरी आला होता. आपा त्याच्याशीही अगदी हसून बोलली. मामाकडे पाहून मामीला म्हणालीही,
"यांच्या शादीची काय तयारी झाली का नाही? का हमारे उधर पाहायची एखादी?"
मामा उगीचच कावराबावरा झाला. सगळे हसून बोलत होते. मला मात्र सगळ्यांचा विनाकारण राग येत होता. जाताना ती मला तिच्या घरी चल म्हणाली. मी मनातून धूसफुसतच होतो. तरीही ती मला हाताला धरून तिच्या घरी घेऊन गेलीच. खरं म्हणजे मला शब्बूआपाच्या नवर्याला पाहायचे होते. तोही चांगला गोरागोमटा होता. सिनेमातल्या हिरोसारखा त्याने मधून भांग पाडलेला होता. मानेवर केस वाढवलेले होते. तो माझ्याशी हसून बोलला; तरीही तो मला आवडला नाही. मी लगेचच घरी निघून आलो.
पहिली सहामाही होईपर्यंत मी अभ्यासात चांगलीच गती घेतली होती. तरीही वर्गातील पाच-सहाजण कायम स्पर्धेत होते. यामध्ये मुलीही होत्या. काही झाले तरी मुलींना आपल्या पुढे जाऊ द्यायचे नाही, हा मुलांचा हट्ट होता. तरीही मुलांच्या पुढे जाण्यासाठी मुली जिद्दीने धडपडत होत्या. वर्गातील अभ्यासाकडे कोणाचेही लक्ष नव्हते. सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त स्कॉलरशिपचाच अभ्यास चालला होता. शाळा सुटल्यावरही पटकन घरी जाऊन यायचे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत पुन्हा शाळेतच अभ्यासाला थांबायचे. पवार गुरुजींची अचानक चक्कर असायची. अभ्यास सोडून टिवल्याबावल्या चाललेल्या दिसल्या की, 'का रे फोकणीच्या!' अशी हाक आणि जोडीला पाठीवरून शाबासकीची थाप पडायची. अभ्यासिकेला थांबलेच पाहिजे असे बंधन नसे. त्यामुळे ज्याला अभ्यासच करायचाय, अशीच मुले थांबत. काही जुने विद्यार्थीही अभ्यासाला यायचे. एकूणच मग इमानदारीत अभ्यास चालायचा.
फेब्रुवारी महिना उजाडला. अशाच एका रविवारी परीक्षेसाठी आम्ही तालुक्याच्या गावी बार्शीला गेलो. आतापर्यंत स्पर्धांच्या निमित्ताने अनेकदा बार्शीला येणेजाणे झाले असल्यामुळे बार्शी नवीन राहिले नव्हते. परीक्षाकेंद्रावर पोहचल्यावर आम्ही अगोदर जाऊन आपापले बैठक क्रमांक कोणत्या वर्गात आले आहेत? त्यातही कोणत्या ओळीत? मागे कि पुढे? बाक व्यवस्थित आहेत का? खिडकीजवळ आहे का? आपल्या खोलीत मित्रांपैकी कोण कोण आलेय? अशी काळजीपूर्वक तपासणी केली. मग समाधानाने सामुहिक भोजनाचा कार्यक्रम पार पाडला. दिवसभरात तीन पेपर होते. पहिला मराठीचा असल्यामुळे सर्वांनाच सोपा गेला. त्यामुळे सगळेच खुशीत. मधल्या ब्रेकमध्ये बाहेरच्या गाडीवर नुसती झुंबड उडाली. परंतु दुसरा नेमका गणिताचा पेपर होता. पेपर देऊन बाहेर येताना प्रत्येकाचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. यावेळी मात्र सगळेच गुपचूप झाडाखाली बसून राहिले. प्रत्येकालाच पेपर अवघड गेला होता. मला तर वेळच पुरला नाही. तरी बरे सगळे सोपे प्रश्न अगोदरच सोडवले होते.
तिसरा बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर होता. माझा सगळ्यात आवडता विषय. पण पेपर सुरू होण्याची वेळ झाली आणि कोणीतरी एकजण पालक किंवा शिक्षक असावेत, ते आमच्या पर्यवेक्षकांना भेटून काहीतरी कानाफूसी करून गेले. जाताना कोपऱ्यातल्या एका मुलाकडे बोट दाखवून गेले. काहीतरी पाणी मुरत होते. पेपर सुरू झाला तरी माझे सगळे लक्ष पर्यवेक्षकाकडेच. शासनाने पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांना नेमले होते आणि मी बिनपगारी फूल अधिकारी बनून त्यांच्यावरच लक्ष ठेवून बसलो होतो. ते मात्र शांतपणे आपले काम करत बसले होते. जवळजवळ वीस मिनिटांनी त्यांचे काम उरकल्यावर ते वर्गात फिरत फिरत त्या कोपऱ्यातल्या बाकाजवळ गेले. मी सावध झालो. माझा पेपर सोडवायचे राहिले बाजूला. आता काय घडतेय, इकडे माझे लक्ष लागले. माझा संशय खरा ठरला. एक कागदाचा तुकडा ज्यावर त्यांनी उत्तरे काढलेली होती, त्यांनी त्या मुलाच्या पेपरवर ठेवला आणि जसे काही घडलेच नाही, अशा अविर्भावात पुढे सरकले. मी मोठ्याने ओरडलो.
"ओ सर, तो कागद उचला अगोदर. नाहीतर आमच्या गुरुजींनाच बोलीवतो."
मला काय झाले होते कोण जाणे! मी खूप मोठे धाडस केले होते. आजपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडायचे. पहिल्यांदाच विद्यार्थी शिक्षकावर ओरडत होता. त्या सरांनाही हे अनपेक्षित असावे. तेही गडबडले. पटकन मागे जाऊन त्यांनी कागद उचलला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिला. माझ्याकडे डोळे मोठे करून पाहत होते. मी मोठा शहाणपणा केलेला होता. आता राहिलेल्या वेळात मला माझाही पेपर पूर्ण करायचा होता. त्यामुळे त्यांच्या मोठ्या डोळ्यांकडे कशाला पाहत बसतोय. भरभर प्रश्न सोडवत राहिलो. अर्थात आवडीचा विषय असल्यामुळे पेपर पूर्ण झालाही. आता काय प्रकाश पडणार ते निकाल लागल्यावरच कळणार होते. पेपर झाल्यावर मी गुरुजींना भेटून घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनाही माझ्या या उद्योगाचे कौतुक वाटण्याऐवजी गंमतच वाटली असेल.
स्कॉलरशिपची परीक्षा झाल्यावर आता वर्गातील अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे होते. मार्च महिन्यात सकाळची शाळा आणि दुपारी सुट्टी असे. मी माझ्यापुरते नियोजन बनवून टाकले होते. शाळेतून आले की, जेवण करायचे आणि एक छोटी सतरंजी आणि अभ्यासाचे साहित्य घेऊन बाहेर पडायचे. पिंपळेश्वराचे मंदिर संगमावर होते. तिथे जवळच नदीवर एक छोटासा बंधारा बांधलेला होता. नदीला लागूनच करंज्याची झाडे होती. एक भले मोठे चिंचेचे झाड होते. तिथल्या गर्द सावलीत आमचा तळ पडे. अभ्यासासाठी चांगली निवांत जागा होती. दुपारच्या ऊन्हाच्या वेळीही चांगली सावली पडायची. कधीकधी तिथेही झोपायला म्हातारी माणसे यायची. ऊन्हे उतरली की, मग मी बंधार्याच्या सावलीत खडकावर पाण्यात पाय सोडून बसायचो. खूप गंमत वाटायची अभ्यास करताना. छोट्याशा चिंगळ्या पायाला गुदगुल्या करायच्या. त्यांना काहीतरी खायला मिळेल या आशेने पायाला चिकटायच्या. कधी इथे तर कधी तिथे असा अभ्यास चाललेला होता.
माझे वेळापत्रक चांगले चालले होते. परीक्षेपूर्वी ताजा ताजा अभ्यास होत होता. पण कधीकधी बाकीचे गडीही अभ्यासाला यायचे. मग अभ्यास सोडून बाकीचेच उद्योग चालू व्हायचे. दिवसभर नुसता हैदोस होत राहायचा. मग मला दुसरी जागा शोधणे गरजेचे बनले. नदीच्या वरच्या अंगाला बामणाचा मळा होता. तिथेच बामणाची मोसंबीची लिंबोणीची बाग होती. राखणीची कुत्री फार तिखट होती. तिकडे कोणालाही फिरकू द्यायची नाहीत. बामणही फार फाटक्या तोंडाचा होता. पोरं जाम टरकून असायची. एके दिवशी असाच बंधार्यावर अभ्यास करत बसलो असताना बामणाचा गणू आला. वयाने वाढूनही भोळसट राहिलेला बामणाचा हा पोरगा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. वसतीला तो मळ्यातच असायचा. लग्नाचा विषय काढला की, गणोबा भलतेच खूश होत. तशी तर बर्याच वेळा जातायेता आमची भेट व्हायची. मला चांगली संधी मिळाली. मी गणासोबतच बोलतबोलत मळ्यात गेलो. लिंबोणीच्या बागेत झाडाच्या पोटाशी गर्द सावलीत गपगार वाटू लागले. मी शांतपणे पडून वाचत राहिलो.
जरा वेळाने बामण आल्यावर त्यांनी विचारले,
"कोण आहे रे तिथे?"
पण माझ्याअगोदरच गणोबाने माझी बाजू सावरून नेली.
"कोणी नाही, दादा. मीच चल म्हटले त्याला बागेत अभ्यासाला. मला वसतीवर तेवढीच सोबत."
नाहीतरी बंधार्यावर अभ्यास करताना अनेकदा त्यांनीही मला पाहिलेले होतेच. बसतोय ना शांतपणे अभ्यास करत, मग बसू द्या. उलट पोरालाही वसतीवर सोबतच होते. म्हणून मग तेही दुर्लक्ष करू लागले. अभ्यासाला जागाच अशी भारी सापडली होती की, बस्! पुढे अनेक वर्षे मी याच ठिकाणी अभ्यासाला येत राहिलो. गणोबा त्याचे काम करत राहायचा. मी काही झाडाच्या पोटातून बाहेर पडायचे नाव घेत नसे. सायंकाळी ऊन्हे पिवळी तांबडी होऊ लागली की, बागेतून बाहेर पडायचो. विहिरीवर पांढऱ्या चाफ्याचे झाड होते, त्याला टेकून धावेवरच्या दगडी कठड्यावर बसायचो. मावळतीचे पिवळे ऊन, विहिरीचा दगडी कठडा आणि पाने कमीच पण पांढऱ्या फुलांनी भरून गेलेले चाफ्याचे ते वेडेवाकडे झाड... असे ते चित्र आजही मी विसरू शकत नाही. परीक्षा संपल्यानंतरही मी मळ्यात जात राहिलो. गोष्टींची पुस्तके वाचली. दुपारची छान झोप काढली. पण ऊन्हाचे ते दिवस आणि बामणाचा मळा यांचे एक अतूट नाते तयार झाले होते. उन्हाळा सुरू झाला की, आजही मला बामणाचा मळाच डोळ्यासमोर दिसतो.
(क्रमशः)

