Monday, 29 February 2016

४...

         आठवणी सुरू झाल्या की, वर्तमानकाळ भूतकाळात विरघळायला सुरुवात होते. जोशी मॅडमची आठवण ही त्यातलीच. ही माणसं माझ्या आयुष्यात का आली? यांच्या येण्याने फार काही झाले नाही; पण काहीकाळ तरी आयुष्य ढवळून निघाले. नकळतपणे या आठवणी मला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. ज्यावेळी जगणं म्हणजे काय असतं हेही कळत नव्हते... आणि ते कळत नसतानाही जगण्याची ओढ वाटू लागली. जगण्याचे वेड लागले.
          आठवणींच्या या प्रवाहासोबत वाहत असताना काळाचे अनेक पदर उलगडत मी मागे मागे जातो. नकळत सुरू होतो पुन्हा एकदा स्वतःचाचा शोध... मी कोण आहे..? मी काय आहे..? मी कसा आहे..? यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मी का आहे...??? असे अनेक प्रश्न वाढत जातात. प्रश्नाच्या पतंगाला खेचता खेचता दोरा मागे साठत राहतो... प्रश्नांची भेंडोळी वाढत जातात. गुंता होत जातो. हा गुंता काही केल्या सुटत नाही. भारीच वाढत जातो. नदीच्या वरच्या अंगाला असाच कधीतरी मी पतंग उडवत राहायचो. खरं तर पतंग हा केवळ बहाणा असे. वेणू आलेली असायची नदीवर धुणे धुवायला. त्यासाठी खटाटोप चाललेला असे. कपडे सुकायला टाकण्यासाठी ती कुरणात यायची आणि मग पतंगाला ढिल मिळत राहायची. त्यावेळी दोरा सांभाळण्यासाठी सोबतीला बल्लू असायचा. आता हा गुंता एकट्यालाच सोडवावा लागतोय. चक्रव्युहात अडकलेला सौभद्र बनून मी त्याला भेदू पाहतोय... अन् मीच तो युगंधर श्रीकृष्ण बनून त्याचे उत्तर देतोय. माझ्या प्रत्येक श्वासातून भगवद्गीतेचे शब्द बाहेर पडताहेत...! प्रत्येकवेळी मी कोणीतरी असतो. कोणाचा नातू... कोणाचा तरी मुलगा... कोणाचा तरी मित्र... कोणाचा प्रियकरही असतो आणि कोणाचा शत्रूही असू शकतो... पुढे मी कोणाचा तरी पती होतो... अशाच गुंत्यात गुंतत जातो आणि कोणाचा तरी बापही बनतो. जरी कायम मी कोणाकडून काहीतरी शिकत राहतो... कोणाचा गुरू होतो. कोणाला मी चेस करत गेलो... कोणी मलाच फॉलो करत राहते. मी कोणाचा तरी कोणी असताना स्वतःपुरता कोण आहे? हेच कळलेले नसते. अगदीच मग स्वतःचा शोध सुरू राहतो.
          चंद्रशेखर हे तर नाव झाले. पण हे लेबल चिकटण्याअगोदर मी होतोच की. पण फारसे काही आठवत नाही. मागे मागे जाताना जन्मापर्यंत जाऊन पोहचतो. कदाचित त्याच्याही अगोदर... त्याच्याही अगोदर. त्याच्याही अगोदर काहीतरी असेलच. पण सगळ्याच गोष्टी कुठे आपल्याला कळतात. आयुष्यभर तसे तर माणसाला काहीच कळत नाही. आपल्याला बरेच काही कळत नाही, हे मला मात्र फार लवकर कळले. असो. असेच मागे जायचे म्हटले तर... शिवरायांचा मावळा बनून कधीतरी सह्याद्रीच्या कडेकपारीतून फिरलो असेन... "बुद्धं सरणं गच्छामि!" म्हणत तथागतांचा संदेश घेऊन तिबेटमध्येही पोहचलो असेन... गुहांमधून राहणाऱ्या आदिम मानवांच्याही अगोदर... अगदी एका अणूचे शरीर धारण करण्याच्याही पूर्वी... ब्रह्मांडाची निर्मिती ज्या प्रलंयकारी स्फोटातून झाली तिथपर्यंत पोहचता येईल. कोणी सांगावे त्यापूर्वीही काही असेलच ना! पण आता काही काही आठवत नाही. तरीही कधीतरी अशाच एका आठवणींच्या गावात मी जाऊन पोहचतो.
             माई सांगायची गोष्टीत तसं... अगदी तसंच... एक होतं गाव. इतर चारदोन गावासारखंच. असं कशाला? तुम्हालाही एखादा गाव असेलच की. अगदी तसंच.
           ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाचा एक चेहरा मोहरा असतो. काही माणसं नाकीडोळी तरतरीत असतात... काही सुबक देखणी असतात... तर काही चारचौघात मिसळून जातात... एवढं मात्र नक्की की, वेडावाकडा का असेना पण प्रत्येकाला एक चेहरा असतो. त्याप्रमाणे प्रत्येक गावाचाही तोंडवळा असतो.
           कोणाच्या गावाला डोंगराची पार्श्वभूमी असेल... कोणाचा झाडाझुडपांच्या हिरवाईने नटलेला असेल... कोणाच्या डोक्यावर छपरांची गरिबी असेल... तर कोणाच्या कौलारू रूबाब असेल... कोणी टोलेजंग इमारतीचा डौल मिरवत असेल... कोणी एखाद्या नदीकाठी... अगदी ओढ्याकाठीही असेल. कोणाच्या उशाशी एखादे धरण... पाझरतलाव... अगदी समुद्रकिनाराही असेल. तर कोणी अगदीच ओसाड माळरानावर पसारा मांडला असेल. काही गावं वसल्यासारखी असतात.. तर काही विस्कटल्यासारखी.
          असं म्हणतात, आपण जो चित्रपट पाहतो. तो बनवण्याच्याही आधी दिग्दर्शकाच्या डोक्यात असतो. त्याची प्रत्येक फ्रेम... प्रत्येक अँगल ठरलेला असतो. तालुक्याच्या गावाहून निघाल्यावर उत्तरेला चालता चालता पहिल्यांदा दूर मेंढशिंग माळावर पोहचतो तिथून गावाचे पहिले दर्शन होते. प्राकृतिक नकाशामध्ये मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला वेगळे करणाऱ्या सह्याद्रीच्याच बालाघाटच्या रांगा आहेत. यातीलच चारदोन डोंगर उशाशी घेऊन फिकट निळसर हिरव्या पार्श्वभूमीवर हिरव्या झाडाझुडपांची शाल पांघरून विसावलेली घरं दिसू लागतात. तिथेच पावलं थबकतात. माझ्यासमोर एक फ्रेम लागते... कॅमेर्‍याची जागा... त्याचा अँगल ठरलेला आहे. याच फ्रेममधून मी गावाकडं खूप वेळा पाहिलंय... प्रत्यक्षही आणि कल्पनेतही! याच मातीतून तयार झालेल्या शरीरातील कणन् कण एका अनामिक ओढीने मोहरून जातो. एक चुंबक मला खेचू लागतो. प्रत्यक्ष गावात पोहचण्याच्या अगोदरच जिथं माझे भावबंध जुळलेले आहेत, त्या जागा मला खुणावू लागतात. आपल्या मिठीत घेण्यासाठी हात पसरतात. तिथंच या चित्रपटाला सुरुवात होते...

          सायलेन्स... साऊंड... कॅमेरा... अॅॅक्शन!!!

          अंगावर पांघरूण घेऊन झोपलेला माणूस आपल्याला दिसतो. पण त्याच्या डोळ्यांत चाललेला स्वप्नाचा चित्रपट तो सोडून कोणालाही दिसत नाही. तसंच काहीसं होतं. दुरून झाडीत लपलेला गाव आपल्याला दिसतो. पण तिथं लपलेले माझे आठवणींचे साक्षीदार माझ्याशिवाय कोणालाच दिसत नसतील. काय नसते तिथे??? खूप... खूप काहीतरी असते. काळाच्या ओघात कदाचित त्याच्या पुसट पाणरेघाही उरल्या नसतील. सर्व पाऊलखुणा मिटून गेल्या असतील. पण मन मोठे वेडे असते. डोळ्यांनी न दिसणाऱ्या कितीतरी गोष्टी त्याला दिसतातच. माझी वाटही न पाहता केंव्हाच ते तिथे पोहचलेले असते...
           मी जिथे उभा असतो; तिथून माझ्या आणि गावाच्या दरम्यान जनसेवा हायस्कूल दिसू लागते. जोशी मॅडम, माझे जिवाभावाचे मित्र केशव, सुध्या, मनाचा हळवा कोपरा व्यापून टाकणारी वेणू, मी गाजवलेल्या स्पर्धा आणि अशा बर्‍याच गोष्टींचा ठेवा तिथे लपवून ठेवला आहे. थोडे पुढे गेले की, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र लागते. इथे काहीतरी हरवलेय माझे... त्याच्या थोडे पुढे ओढा आणि हायस्कूलमध्ये असताना मधल्या सुट्टीत बोरे खायला जायचो. वेणूसोबत खाल्लेल्या त्या ओढ्याच्या काठावरच्या बोरांची चव अजून जिभेवर आहे. गावाच्या दोन्ही बाजूंनी वाहत येऊन एकमेकींना बिलगणार्‍या नद्यांचा संगम... संगमाच्या जरा वरच्या अंगाला असलेल्या बामणाच्या मळ्यातील चाफ्याचे झाड... या झाडाला मी जेवढ्या वेळा भेटलो; ती कायम मावळतीची वेळ असायची. म्हणून असेल कदाचित. पण मला या झाडाचा रंग कायम मावळतीच्या सूर्यासोबत मिसळून गेलेला दिसतो. नदीच्या त्या अंगाला असणारा चिंचेखालचा महादेव... आणि ज्याच्या खांद्यावर मी खेळलो तो दगडी नंदी... अलीकडच्या बाजूची आमराई... साती आसरा असलेला मुंज्या डोह... डोहाच्या वरची टेकाडावरील दगडी चौपाळ... आठवणीमध्येसुद्धा गुढ धुके निर्माण करतात. असंच चालतचालत वर गेले की, भेटते भले मोठे बाभूळबन. त्याच्या आणखी थोडे पुढे पसरट पात्रात पसरलेले मोठमोठे खडक... या खडकांवरूनच कित्येक रात्री चांदण्यात मनमुराद पडून राहिलोय. तिथेच तर तारुण्यातील कित्येक नवथर स्वप्न रंगवलीत मी. एक ना अनेक अशी कितीतरी ठिकाणे मला खुणावत असतात.
          जरासा कॅमेरा फिरवला की, याच पार्श्वभूमीवर इतरही चारपाच गावं दिसू लागतात... वडगाव, पिंपरी, चिंचवली, उंबरी, कारी, पांगरी. या सगळ्या गोतावळ्यात वसलेले हे गाव अगदी ठळकपणे उठून दिसते. या सगळ्या भाऊबंदातील थोरलेपणाचा मान त्याने कायम जपलाय. कायम एकमेकांची शेपटी धरून ही भावंडे मोठी झाली. यात्रा, जत्रा, उरुस, सणवार असो कि दुखले खुपलेपण. एकाला सर्दी झाली की, सर्वांचीच नाके गळायला सुरू व्हायची. आणि एखाद्याला पेपरमिंटची गोळी मिळाली तरी चिमणीच्या दाताने नखभर तुकडा प्रत्येकाच्याच जिभेवर पडायचा. एकेकाळी आठवडी बाजार याच गावात भरायचा. पिंपळेश्वराची अक्षयतृतीयेला भरणारी यात्रा आणि दिवाळीनंतर भरणारा सर्वांत मोठा उरुस अशा दोन उत्सवाचे हे गाव म्हणजे आसपासच्या पंचक्रोशीतील हे मध्यवर्ती गाव. शाळा, हायस्कूल इथेच... मोठा दवाखाना... बँका... सोसायट्या इथेच. त्यामुळे राजकारणाचं वारं इथूनच फिरू लागलं. कोणी उभे राहायचं आणि कोणी बसायचं हे इथेच ठरू लागलं. गावात देशमुख, जाधव, पवार, मोरे अशी तालेवार भावकीची घरं होती तशी कुणबावा करून पोट भरणार्‍या मराठा समाजातील मंडळीही होती. महार, मांग, बारा बलुतेदार आणि अठरा पगडजातीची जशी घरे होती. तशीच मुसलमानांचीही बरीच घरे होती. हा गाव पावसाच्या आणि विहिरीतल्या पाण्यावर जगत होता. अस्सल शंभर नंबरी टपोरी ज्वारी, काबुली चणाही ज्याच्यापुढे झक मारेल असा हरभरा, तेवढ्याच कॉलिटीची तूर, जोडीला हळद, कांदा, मका पिकवणार्‍या मातीला पाण्यावाचून ऊसाची बाधा झाली नव्हती. पुढे दोन बाजूला दोन पाझरतलाव झाले आणि शिवार हिरवागार दिसू लागला. शिकून सवरून नोकरदार झालेल्यांचे पिक इथे भलतेच आले असल्यामुळे महिन्याच्या महिन्याला येणारा ताजा पैसा खुळखुळत होता. इरसालपणात तर हात धरावा असे तालुक्यात कोणी नव्हते.
           हे गाव कोणी वसवलं कोणास ठाऊक! पण हा गाव नद्यांच्या संगमावर आखीवरेखीव वसवलेला आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले पिंपळेश्वराचे मंदिर आणि शिवकाळातील बांधकामाची आठवण करून देणारा सरकारवाडा, गावाच्या उत्तर आणि दक्षिणेस आपला आब राखून असलेल्या भल्या दांडग्या चिरेबंदी दोन वेशी... आणि चार कोपऱ्यावर असणारे चार भरभक्कम बुरूज गावाच्या जुनेपणाची साक्ष देतात. विजापूराहून तुळजापूरमार्गे निघालेला अफजुल्या या गावातूनच गेला असणार. इंग्रजी राजवटीत शिक्षणाचा फायदा या गावाने उचलला. मराठवाड्याच्या सरहद्दीवर असल्याने मुक्तिसंग्रामाच्यावेळी रझाकारांना ठेचायला आलेल्या सेनेला जशी इथूनच कुमक पुरवली गेली. तसे मराठवाड्यातील अनेक मुसलमानांना आश्रयही इथेच मिळाला. त्यावेळी निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन बराचसा माल आपल्या मांडीखाली दाबलेले चारदोघेजण गावात चांगलेच गब्बर झाले होते. शेवटपर्यंत अगदी मिशीला तूप लावून जगले.
           कोणालाही हेवा वाटावा असा हा गाव माझ्या कॅमेर्‍यातून दिसू लागतो. तेंव्हा माझ्याही अगोदर माझे मन त्या आठवणीत केंव्हाच पोहचलेले असते. तसा तर हा माझा गाव नाही. हे माझे आजोळ. परंतु माझा जन्मच या गावात झाला. माझे बालपण इथेच गेले आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरही इथेच पोहचलो. बाहेरून आलेले हे बीज इथल्या मातीत पडले. रूजले आणि वाढलेही. या मातीनेही त्याला जवळ केले. परकेपणाची जाणीव कधीच होऊ दिली नाही. शेवटी मीही या मातीचाच झालो. त्यामुळेच असेल कदाचित पण या मातीशी जडलेले बंध सोडू म्हणता सुटत नाहीत... तोडू म्हणता तुटत नाहीत...!

(क्रमशः)

Friday, 19 February 2016

३...


मी...
मी ?
मी कोण ?
कोण आहे मी??
खरंच कोण आहे मी???
          कधीतरी असा भारी प्रश्न पडतो ना!
प्रश्न साधेच असतात. म्हणजे वरवर तरी वाटतात साधेच; परंतु डोक्यात मधमाश्यांचे पोळे उठवून टाकतात. आता हा काय प्रश्न आहे का? मी कोण?
          गेल्या काही वर्षांमध्ये नाव सांगण्याची वेळ कधी आलीच नाही. सर्वकाही मागे सोडून आलो होतो. अगदी नावसुद्धा. मुळात माझे काय होते? मला माझे आयुष्य जगताना ते फक्त माझ्यासाठी जगायचे होते. ते जगताना नावाची अथवा कसल्या लेबलची आवश्यकता नव्हती. कोणालाच मी माझे साधे नावही सांगितले नाही. मी कोण आहे? काय आहे? याच्याशी कोणाला काही देणेघेणे नसावे. ज्यांना उगीचच जिथेतिथे नाक खुपसायची सवय असते; अशा अतिउत्साही प्राण्यांना मी दूरच ठेवतो. मला कोणी शोधत यावे, अशी काही गरज राहिली नाही. कोणी आलेच नाही. मीही कोणाला बोलावले नाही. मुळात यायला आहेच कोण? कोणीच आले नाही. आला होता ना! गेल्या पंधरा दिवसापूर्वी तो आला होता. काल त्याचे पार्सलही आले.
          पार्सलची आठवण होताच मी उठून घरात आलो. टेबलावर पार्सल तसेच पडलेले होते. मी ते उचलून उलटेसुलटे करून पाहिले. पत्ता... हो पत्ता काय लिहिलाय याची मला उत्सुकता होती. पत्ता लिहिणे अवघड नव्हते. तो सोपा होता. पण नावाचे काय? ते काय लिहिलेय, हे महत्त्वाचे होते. बरं! पार्सल अचूक माझ्यापर्यंत आलेय म्हणजे काय? घेऊन येणाराला काय स्वप्न पडले काय माझेच म्हणून. नाव तर असायलाच हवे. त्याशिवाय का ते अचूक पोहचले. पण मी तर त्याला नाव सांगितल्याचे मला काही आठवत नाही. पत्ता पाहिला आणि हसू आले. झटक्यात माझ्या सर्व शंका दूर झाल्या. पत्ता बरोबर होता. फक्त पत्त्यामध्ये माझ्या नावाच्या जागेवर लिहिले होते...
"टेकडीवरचा म्हातारा...!"
हां. हां.. हां...!
काय खोटे होते त्यात. या छोट्याशा खेड्यातील टेकडीवरील एकमेव घरात राहणारा मी...
पोस्टमनला फार विचार करावा लागला नसेल. उलट तोही हसला असेल. असा गमतीदार पत्ता पाहून. सगळ्यांच्या माहितीप्रमाणे मी म्हणजे टेकडीवरील घरात राहणारा विक्षिप्त म्हातारा. माई त्यांच्या दृष्टीने त्यांच्यातलीच. मी कोणी परग्रहावरून आलेला. माझे नाव त्या बिचाऱ्याला तरी कसे माहीत असणार...
चंद्रशेखर.
अरेच्या! खरंच की... मी तर चंद्रशेखर! आज पुन्हा नाव आठवले.
त्यानेही मला हा प्रश्न विचारला होता. तुम्ही कोण?
मी म्हणालो होतो, तुझ्यासारखाच हाडामासाचा माणूस.
आता नावाचा विषय आला.
मी चंद्रशेखर.
परंतु हे तर माझे नाव झाले. ही काही माझी ओळख होऊ शकत नाही. फार फार तर हेसुद्धा माझ्यातील 'मी'ला चिकटलेले एक भारीपैकी लेबल आहे. ब्रँडनेम म्हणायला काही हरकत नाही.
          कोणीतरी एखादा शापित यक्ष... गंधर्व... किन्नर या अनंत अंतरिक्षातून धूमकेतू बनून भटकत होता. चौर्‍याऐंशी लक्ष योनीतून पुन्हा पुन्हा जन्म घेऊनही त्याची सुटका होत नव्हती. त्याला उःशाप हवा होता. कधीकाळी केलेल्या काही चुकांचे परिमार्जन झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी हवा मानवजन्म. आकाशगंगेतील पृथ्वी नामक एका ग्रहाजवळून हा धूमकेतू जात असताना तो वारंवार त्या सृष्टीनियंत्याला साकडे घालत होता. फक्त एकदा मानवजन्म मिळू दे... मला मोक्ष नको... मुक्ती नको... मानवजन्म दे. त्याची प्रार्थना फळाला आली. परमेश्वराने आपला हात उचलला...
"तथास्तु!!!"
अशाच कोण्या अनामिक क्षणी माझ्या आस्तित्वाचे एक बीज... मेघाने भूमीला दान द्यावे... तसे आईच्या गर्भामध्ये पोहचले... तिथेच ते रूजले... भिजले... अंकुरले...! दोन दोन इवलीशी हातापायाची पाने फुटून आली. आणि एक दिवस बियावरचे कवच फोडून या नव्या जगात प्रवेश झाला... पूर्वेला उषेची लाली पसरायला सुरुवात झाली. कोंबड्याने बांग देताच पाखरांची किलबिल सुरू झाली. अशाच शिशिरातील एका पहाटे धुक्याची ऊबदार दुलई पांघरून उषेच्या रक्तिमेत माखलेला एक जीव रूदनभूपाळी आळवत या जगात अाला. थोडावेळ कसलाच आवाज आला नाही; म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरले होते. एवढ्या मोठ्या प्रवासाने थकल्यानंतर आईच्या उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवसांची भलीमोठी विश्रांती मिळाली होतीच. आता हा कोश फोडून बाहेर यायला हवे. असा विचार करून पहिला श्वास घेतला... आणि माझ्या रडण्याने सर्वांचेच चेहरे पुन्हा उजळले. नव्या जगातील नवा प्रवास पुन्हा सुरू झाला... जगण्याचे एक वेड... एक ओढ घेऊन...! असेच सुरू झाले... वाहायला लागले एक जीवन!!! त्याला भीती एकच... साचून राहिले की, डबके होते. कित्येक श्वासांचा हा प्रवास... युगानुयुगे चालू आहे... दिगंताच्या दिशेने!!!
           भटजीबुवांनी पंचांग धुंडाळले. पत्रिका बनवली. पुढे अनेक वर्षांनी अशाच एका प्रवासात सुब्रमण्यम स्वामींकडे भृगूसंहिता मिळाली. पहिल्या वहिल्या भेटीतच हात हातात घेऊन मला म्हणाले, "इतके दिवस कुठे लपून बसला होता? कुछ पुराना है... हमें तो कब का मिलना था|"
          आर्यमातेच्या पोटी असूरकुळातील क्षत्रिय वर्णाचा मंगळाची तामसीवृत्ती... शुक्राचे तेज... रविची प्रतिभा... घेऊन; सद्गुण-दुर्गुण... नीति-अनीति... पाप-पुण्य... जे काही गाठीला बांधून आणता येईल, ते सर्व घेऊन महारुद्राप्रमाणे हलाहल पचवण्यासाठी सिद्ध झाल्यानंतर... मी जन्माला आलो आणि बाराव्या दिवशी... अगदी बारावाच असेल असेही नाही. तेरावा, चौदावा; कदाचित पंधरावाही दिवस असेल, काय फरक पडतो... पण घरच्यांनी भारीपैकी बारसे घातले. आत्याबाईंनी आपल्या नाकातील नथ झोकात हलवून मुरका मारत माझ्या कानाजवळ आपले तोंड आणले आणि माझ्या कानात माझेच नाव सांगितले... चंद्रशेखर.
            त्यानंतर एवढ्या मोठ्याने कुर्र$$$ केले की, मी दचकून रडायलाच लागलो. एकामागून एक आणखी इतरही नावे सांगून पुन्हा पुन्हा कुर्र कुर्र केली. पण उडालेल्या त्या सगळ्या गोंधळात त्यांनी सांगितलेली ना नावे कळली ना त्यातील गंमत. तरी एक बरे झाले... आमच्या या आत्याबाईंच्या पाठीवर बाकीच्या बायकांनी चांगलेच धोपटले. असेच पाहिजे. आम्हाला रडवणाराची अशीच खोड मोडायला हवी. तेंव्हापासून ती आत्याही आवडली नाही आणि तिने ठेवलेले नावही. अगदी हायस्कूलमध्ये जाईपर्यंत हे नाव काही आवडले नाही.
चंद्रशेखर!
छ्या! हे काय नाव झाले? माझ्या बिकीच्या मित्रांची नावे कशी छोटीछोटी छान छान होती... शाम, रवी, राजू, अजय, सुहास... माझे नाव मात्र रेल्वेच्या डब्यासारखे लांबलचक. मी आजीला नेहमी म्हणायचो, "माई, आपण ना माझं पुन्हा बारसं घालूया. दुसरं कायतरी चांगलं नाव ठेवू."
आजी हसायची अन् म्हणायची, "आता तू एवढा मोठा झालास. पाळणा तुला पुरणार नाही. नवा मोठा पाळणा बनिवला की, तुझं नाव ठेवू."
पुन्हा पाळण्यात बसल्यावर मित्र मला चिडवणार. म्हणून मग माझा बेत बारगळत राही. तरीसुद्धा आपण मोठे झालो की, नाव बदलून टाकू. हा निर्णय कायम होता. तरी बरं. लहान होतो तोपर्यंत कोणी कोणत्याही नावाने हाक मारायचे. पण शाळेत जायला लागलो आणि हजेरीपत्रकावर नाव चिकटले ते चिकटलेच. शाळेतल्या मित्रांनी मात्र माझा प्रश्न थोडक्यात सोडवला. त्यांनाही एवढ्या लांबलचक नावाने हाक मारताना अवघड जाई. मग ते शेखर म्हणू लागले आणि मग पुढे सर्वांसाठी मी 'शेखर' झालो. हेही नसे थोडके.
            मराठी शाळेतून आठवीला हायस्कूलमध्ये गेलो. पहिलाच दिवस. मराठी शाळेत खाली फरशीवर अंथरलेल्या पट्टीवर मांडी घालून बसावे लागे. हायस्कूलमध्ये बसायला बाके होती. मोठ्या उत्साहाने आम्ही बसलो होतो. तेवढयात मॅडम आल्या. आम्हांला वर्गशिक्षिका म्हणून जोशी मॅडम होत्या. आल्यावर त्यांनीच त्यांचे नाव सांगितले. उंचीने तशा बेताच्याच. अगदी मी शेजारी उभारलो असतो ना! तर माझ्या एवढ्या होत्या. म्हणजे त्या छोट्या होत्या कि मी मोठा झालो होतो? बहुधा मीच मोठा झालो होतो. बरोबर आहे ना! मराठी शाळेत आम्ही हाफ चड्डी वापरायचो. आता एकदम इन वगैरे करून फुलपँट होती. तर काय! मॅडम अशा छान होत्या. गोर्‍या होत्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकदम गोल गरगरीत चेहरा होता. मला तर एकदम असे वाटले की, घरी गौरी उभ्या करतात ना! त्यातलीच एक गौराई अशी जिवंत होऊन मॅडम बनून आमच्या वर्गात आलीय. आवाज तर एकदम देवघरातील पूजेची घंटी वाजवल्यासारखाच वाटत होता. थोडंसं नाकात बोलल्यासारखं वाटायचं. पण भारीच. मी आपला वेड्यासारखा बघतच बसलो होतो. डोक्यात हे असे काहीतरी विचार चाललेले.  मॅडमनी असेच छान छान बोलत राहावे असे वाटत होते. कानाला गोड वाटत होतं.
            पहिलाच दिवस असल्याने हजेरीपत्रक वगैरे काही नव्हते. मॅडमच म्हणाल्या, आपापली नावे सांगा म्हणून. बस् आमची गाडी तिथेच पंक्चर. मला खात्रीच होती, आपले हे नाव काही त्यांना आवडणार नाही. माझ्यासाठी ही चांगली संधी होती नाव बदलण्यासाठी. हजेरीपत्रक अजून तयार नव्हतेच. आपण सांगणार ते नाव इथून पुढे सुरू होणार. म्हणून मग कुठले नाव सांगावे, याचा विचार सुरू झाला. काय सांगावे हे पक्के होईपर्यंत माझा नंबर आला. मी गोंधळून उभा राहिलो. काहीच सुचेना. आम्ही शांतच. मॅडमनी आपल्या भुवया उंचवून गळ्यातल्या गळ्यात "अं?" असे काहीसे केले. मी वेड्यासारखा आपला तोंडाकडे पाहतोय.
"नाव..."
आता "अं?" असे करण्याची पाळी माझी होती. तेवढ्यात शेजारच्या केशवने मला डिवचले. मी आपला कसाबसा "शेखर" एवढेच पुटपुटलो.
"काय? ऐकायला नाही आले. पूर्ण नाव सांग पाहू."
मी कसबसे जड अंतःकरणाने पूर्ण नाव सांगितले. अरे या नावाचा वर्गातच काय पण अख्ख्या गावात कोणी सापडणार नाही. हे काय नाव झाले? मी पटकन खाली बसलो.
           तोंडात लेमनगोळी ठेवून बोलावे तसे मॅडमनी नाव उच्चारले, "चंद्रशेखर. भारीच!"
माझा माझ्याच कानावर विश्वास बसला नाही. मॅडम आपल्या नावाला 'भारीच!' म्हणाल्या. चेहऱ्यावर अगदी मोरपंख फिरवल्यासारखे वाटत राहिले. पुढे सुट्टी झाल्यावर पुन्हा पुन्हा केशवला विचारले. मॅडम खरेच 'भारीच!' म्हणाल्या कि माझा समज झाला तसा. पण केशवकडून पुन्हा पुन्हा खात्री करून घेतल्यानंतर माझीही खात्री झाली. आपल्या मॅडम भारीच आहेत. 'भारीच!' हा शब्दही तेवढाच भारीच आहे. आणि राहिले माझे नाव... मॅडम म्हणताहेत म्हटल्यावर तेही भारीच असणार...! आत्याबाईंच्या कुर्रने नावावर साठलेली धूळ मॅडमच्या एका शब्दाने झटकली गेली. पूर्ण दिवस मी असा रूबाबात फिरत होतो. इतर पोरांकडे अशा काही नजरेने पाहत होतो की, "हाय कंबख्तो! तुम्हारे पास भारीच नावपण नाय." खोटं सांगत नाही. तेंव्हापासून माझे नाव मला भलतेच आवडायला लागले. भारीच...!
          आठवणींची गणितं काही वेगळीच असतात नाही! कितीही दूर पळालं; तरी त्या सावलीसारखी पाठराखण करतात. याच जनसेवा हायस्कूलने मला माझ्या नावाची तर नव्याने ओळख करून दिलीच. वर माझ्यातील "मी" मला नव्याने समजू लागला. काय काय भेटले मला या दिवसांत. भारीच...!!!

(क्रमशः)

Monday, 8 February 2016

२...


          रात्री चांदणं असं टिपूर फुलायला लागायचं. शेतातून परतलेली गुरंवासरं केंव्हाचीच आपल्या दावणीला गेलेली असायची. गोठ्यातून धारा काढल्याचा आवाज सुरू व्हायचा. एका लयीत चरवीमधील दुधाचा फेस सूर धरायचा. घराघरांतून चुली पेटलेल्या असत. लालबुंद निखार्‍यावर खरपूस भाजलेल्या भाकरीचा खमंग वास आणि तव्यावर दिलेल्या फोडणीचा चर्रचरित आवाज अंगणात पोहचला की, पोटातील भूक चुलीतल्या जाळासारखी जागी व्हायची. अंगणातच 'मूनलाईट' डिनर उरकायचे. आणि मग दिवसभरातला शेवटचा कार्यक्रम राहिलेला असे. आजीने अंगणात गोधडी पसरली की, आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपायचे. आजी बोलता बोलता दिवसभरात काय काय झाले याची बित्तमबात सगळी चौकशी करायची. बाल वयाला शोभेल एवढा आगाऊ होतो मी, नाही असे नाही. पण आजीला माझी भलतीच काळजी लागलेली असायची. दिवसातील तिचा बराचसा वेळ माझ्यावर लक्ष ठेवण्यातच जायचा. तरीही सगळा अहवाल तिच्या मनासारखा पोहचला की, मग गोष्ट. गोष्टी तरी कसल्या... रोज रोज कुठून आणायच्या नवीन नवीन गोष्टी? आजीही मग अशाच कुठल्यातरी गोष्टी सांगे. तिच्या जुन्या आठवणी सांगायची. आयुष्याच्या मावळतीला भविष्य फारसे उरलेले नसते. त्यामुळे मनही मग भूतकाळात रमू लागते. तिच्या गोष्टीसोबत चांदणं गडद होत जाई... आजीचा हात केसातून फिरत राही... अगदी मोरपिसारखी झोप अलगद कधी आली, तेही कळायचे नाही.
         डोळे उघडावेसे वाटत नव्हते. तरीही झोप झाल्यानंतर ते उघडतातच. आताही उघडले. रात्री मी घरी केंव्हा आणि कसा आलो, हेही फारसे आठवत नव्हते. आपण घरात आहे, हे समजायलाही काही सेकंद जावे लागले. पण हे काय? मी आजीच्या मांडीवर झोपलोय, असेच समजत होतो मी. अर्थात तिथे आजी नव्हे; तर माई होती. प्रत्यक्षात नेमका काय प्रकार झाला आहे, तो लक्षात आला. रात्री काहीशा धुंदीतच मी घरी आलो होतो. मला कुणाच्यातरी कुशीची गरज होती. माझा तोल जात होता म्हणून माईने आधार दिला. त्या काळजीयुक्त स्पर्शानेही मी हळवा झालो. त्या क्षणाला मला फक्त आजी आठवली. खूप दिवसांनी माईच्या रूपात आजीची मांडी मिळाली. माझ्यातील पोरकेपणा कुठेतरी सुखावला... आणि माझी झोपमोड होऊ नये; म्हणून रात्रभर माईही तशीच अवघडून बसून राहिली होती. पहाटे पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला असावा. पण मला थोपटणारा तिचा हात अद्याप माझ्या डोक्यावर तसाच होता. माझ्या एवढ्याशा हालचालीनेही तिचे डोळे टक्ककन उघडले असते. म्हणून हलक्या हातांनी तिचा हात बाजूला केला. एक शाल तिच्या अंगावर पांघरून चोरपावलांनी उठून बाहेर आलो.
          आपल्या आयुष्यातील अनंत क्षणांपैकी फार थोड्या क्षणांना स्वप्नांचा सुगंध असतो. रात्र सरली तरी दिवसभर तो दरवळत राहतो. एवढेच काय ते आपले आयुष्य. उर्वरित आयुष्य म्हणजे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळण्यात तळमळत घालवलेली अस्वस्थ रात्र असते.
रात्र सरते...
झोपही सरते...
येणाऱ्या जागेपणाबरोबर स्वप्नही विरून जातात. परंतु काही स्वप्नं रात्र सरली; तरी संपत नाहीत. दिवसभराच्या जागेपणातही एक अनामिक हूरहूर लावून जातात. त्यांचा गंध दरवळत राहतो. आयुष्य सरत राहते; तरी त्यातील आठवणींचा दरवळ कायम राहतो...
मुठीत पकडून ठेवलेल्या सोनचाफ्यासारखा! काही आठवणींचा दरवळ आपल्याही नकळत ओठांवरती स्मित उमटवून जातो. तर काही आठवणी शीळ बनून घुमत राहतात...
मंदिरातील वळचणीला बसलेल्या पारव्याप्रमाणे.
आजीचा हात असाच डोक्यावरून फिरायचा. तो स्पर्श अनेक वर्षांनी पुन्हा वाट्याला आला. माझ्या अस्थिर मनाला आधार देण्यासाठी तो समर्थ होता. वेदनेचेही सोने करण्याची ताकद त्या स्पर्शात होती.
          एकटेपणा घालवण्यासाठी इथे एकांतात राहायला आलो. दुनियेच्या सर्व धकाधकीपासून अलिप्त असे टेकडीवर घर बांधले. घरापासून धावत गेलो; तरी दहा मिनिटे लागतील वस्तीत पोहचायला. बराचवेळ मी झोपाळ्यावर बसून समोरच्या फुलणार्‍या गुलमोहराकडे पाहत होतो. माझ्यासारखेच आठवणींच्या धुक्यात कुठेतरी हरवून गेले होते सर्व. इथून उंचावरून दिसते की. पाठीमागे पाणी आहे. धरणातील पाणी दिवसभर ऊन्हात चमचमत राहते. रात्री चांदणे पांघरून झोपी जाते. कधीतरी त्यालाही झोप नाही आले की, माझ्यासारखेच जागे राहते. कोणीतरी मासे पकडणारा आपल्या नावेतून जाळे पसरत राहतो. त्याच्या नावेतील दिवा लुकलुकताना दिसतो. टेकडीच्या पायथ्यापासून एक सडक गेलीय. तासाभराने एखादे वाहन येते जाते. तिथून वळणे घेत वर घरापर्यंत आलेला रस्ता. दोन्हीही बाजूने रानगवत वाढलेले होते, ते पिवळे पडलेय. मधूनमधून आवर्जून लावलेली झुडपे उठून दिसताहेत. अध्ये मध्ये बसवलेले दगडी खुंट मैलाच्या दगडाचा आभास निर्माण करताहेत.
          खरं म्हणजे प्रत्येकाच्याच खांद्यावर आठवणींच्या शिदोरीचे गाठोडे असते... परंतु शिदोरी ही पुरेल इतपतच असावी, असे माझे प्रामाणिक मत आहे. शिदोरी चालण्यासाठी ऊर्जा पुरवते...
जर तिचेच ओझे होऊ लागले तर...
आपण मुसाफिर आहोत, हमाल नाही. भूतकाळातील आठवणी या मैलाच्या दगडाप्रमाणे मागे सोडायच्या असतात. तेंव्हाच त्यांची स्मारके होतात. मागच्यांसाठी पथदर्शक ठरतात.
म्हणूनच भल्याबुर्‍या सगळ्या आठवणींना मी खोल गाडून टाकले होते. मागचे सर्व दरवाजे बंद करतच मी कायम पुढे जात राहिलो होतो. आज माईच्या रूपाने मनाला पुन्हा संधी मिळाली होती भूतकाळात डोकावण्याची. वर्षानुवर्षे आत कुठेतरी दाबून ठेवलेल्या आठवणी अशा उफाळून वर येऊ लागल्या. मन असे अस्थिर झाले की, घट्ट लावून घेतलेली दारे किलकिली होतात. आणि मग वारूळातून असंख्य मुंग्या बाहेर पडाव्यात; त्याप्रमाणे आठवणींचेही मोहोळ उठू लागले होते.
         घरी असलो म्हणजे दिवसभर वेळ मोकळाच असायचा. कधी वाचण्यात... कधी गाणी ऐकण्यात... तो जाई. उरलेला वेळ भटकण्यातच जात असे. कुठलेही पाश उरलेले नव्हते. अशाच एका प्रवासात योगायोगानेच माई भेटली. चेहरा ओळखीचा वाटत होता. आजारी होती. तिकिटालाही पैसे नव्हते. उपाशीही असावी कधीची. पुढील स्टेशनवर उतरून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पुढे कुठे जाणार म्हणून चौकशी केली. पण उत्तराऐवजी डोळ्यांत पाणी आणि त्याहीपेक्षा अगतिकता दिसली. मग माझ्यासोबत घेऊन आलो. जोपर्यंत तिची इच्छा असेल; तोपर्यंत ती माझ्यासोबत राहू शकणार होती. तिने माझ्याविषयी काही विचारले नाही आणि तिच्याकडे कसलीही चौकशी करण्याची मला आवश्यकता वाटली नाही. तिचा निर्णय घेण्यासाठी ती स्वतंत्र आणि समर्थ होती. गेली काही वर्षे माझ्या एकटे राहण्यामुळे कोणाला काही फरक पडलेला नव्हता आणि आमच्या एकत्र राहण्यामुळे कोणाला काही वाटण्याचे कारण नव्हते. मुळात आम्ही दोघेही वयाच्या अशा टप्प्यावर होतो की, सर्व "किंतु-परंतु" तिथे गळून पडतात. लोकांना फुकटच्या चर्चा करण्यासाठी वयही तितकेच महत्त्वाचे असते.
          दुपारच्या वेळी एखादा गुराखी अथवा वाटसरू घराजवळ पाणी पिण्यासाठी... जेवण्यासाठी सावलीत थांबला की, त्याच्या शिदोरीवर माईच्या हातचे काही ना काही पडायचे. मी एकटा होतो; तोपर्यंत हा एका संन्याश्याचा आश्रम होता. माई आल्यापासून पुन्हा चैतन्य आले होते. कुत्री, मांजरं, कोंबड्या आणि अलिकडे एक मुंगूसही दिसतेय इकडेतिकडे जाता येता. दाराशी आलेला रिकाम्या हाती गेला नाही. ते सर्वजण तिला 'माई' म्हणू लागले. तेच तिचे नाव झाले. ती सर्वांचीच माई झाली.
          भानावर आलो; ते माईच्या आवाजाने. माई माझ्यासाठी चहा घेऊन आली होती. कप झोपाळ्यावर ठेवून ती जायला वळली; तेंव्हा मात्र मला राहवले नाही.
"माई, माफ करा मला. रात्री फारसा शुद्धीत नव्हतो मी. म्हणजे माझ्या विचित्र वागण्याचा तुम्हांला त्रास झाला. पण यापुढे असं काही होणार नाही. मी नक्कीच दक्षता घेईन. एक्स्ट्रिमली स्वारी...!!!"
"तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. रात्री तुम्ही नाही, तुमच्यातले लहान मूल जागे झाले होते. आणि आई कधी मुलांवर नाराज होत नाही."
           माई आली तशी निघूनही गेली. मी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत राहिलो. गमतीची गोष्ट अशी की, आजीलाही मी 'माईच' म्हणायचो. त्यामुळेही असेल कदाचित... आज माझ्यासाठीसुद्धा... ती माईच झाली होती.

(क्रमशः)

Monday, 1 February 2016

१...

आज खूप रडावंसं वाटतंय...!
मला माहितीय पुढचा प्रश्न काय असणार ते...!
काय झालं???
आणि मी सांगूनही कोणाचा विश्वास बसेल, असंही वाटंत नाही.
का बसावा?
बरं कोणाचा विश्वास बसावा; म्हणून मीही इत्यादी वगैरे स्पष्टीकरण देत का बसावं?
काहीच तर झालेलं नाही.
तरीही रडावंसं वाटतंय.
हे जरासं विचित्र आहे खरं.
ढग दाटून आले आणि पाऊस पडला... हे स्वाभाविकच आहे. परंतु आज आभाळ अगदी कोरडेफट्ट आहे. तरीही मन भरून आलंय.
फारसं काही घडलेलं नाही... विशेष काही घडण्याची शक्यताही नाही...
कदाचित आयुष्याचा लेखाजोखा करण्याएवढा निवांतपणा यापूर्वी कधीच मिळाला नसावा... मिळाला तरी त्याची तेवढी गरजही भासली नसावी. आज मिळाला.
मग मन भरून यायला एवढंसं कारण पुरेसं असेल. तेही अशाच निवांतपणाची वाट पाहत असेल... आज मिळाला. झालं!!!
          पण तरीही मी रडणार नाहीच.
का रडावं???
आजपर्यंत फार नाही, थोडेसेच असतील; पण काही आघात पचवले.
काही सोडून गेले... काहीना मी सोडून आलो...
काहीतरी गमावलं... काही मिळालंच नाही...
काही निसटून गेलं... काही सोडून दिलं...
काही हरवून गेलं... काही हिरावून नेलं...
पण...
तरीही मी रडलो नाही.
कोणासमोर रडावंसं वाटलं नाही... आणि एकांतात रडण्याचं धाडसच झालं नाही.
आजही रडणार नाहीच...
कारण...
रडण्यासाठी उशीची नाही; कुशीची गरज असते.
आणि आज...
या बाबतीतही मी करंटा आहे.
          या एकटेपणाची तर मला कायम भीती वाटत राहिली. त्याची जातकुळीच वेगळी! तो भर गर्दीतही तुम्हाला गाठू शकतो. सगळ्या जगाशी विसंवाद निर्माण झाला की, एकटेपणा वाटायला लागतो. सर्वांपासून आपण तुटत चाललोय, ही भावनाच कुठंतरी मनाला टोचत राहते. त्यातही जेंव्हा आपण आपला आपल्या स्वतःशीच संवाद हरवून बसतो; तेंव्हा तर एकटेपणाची दाहकता अनुभवण्यासाठी तो एक क्षणही पुरेसा आहे. एकटेपणा खायला उठणे इत्यादी वगैरे म्हणजे काय, हे तेंव्हाच कळते. म्हणूनच मीही मग कायम माणसं जोडत गेलो. काही ठिकाणी जुळले; तसे काही ठिकाणी जळलेही. या सर्वाचा विषाद न मानता आयुष्याची वाट चालत राहिलो... एकेक पाऊल टाकत राहिलो... एकेक शिखर चढत गेलो. खूप पुढे गेलो आणि लक्षात आले की, तोपर्यंत एक एक करत बाकीचे हात सुटत गेले होते. अत्युच्च शिखरावर पोहचलो; तेंव्हा तर एकटाच उरलो होतो. कोणताही इत्यादी नाही कि वगैरे नाही. एकटाच...!
          शेवटी जमून आलेला सगळा डाव सोडला. जे जे मी मिळवले होते; ते सर्व सोडले. अर्थात मी कधी ना कधी ते सोडणारच होतो. ते माझे नव्हतेच. तसे पूर्वीपासूनच मला कुठेतरी आत 'ते' नेहमी जाणवत राही. हे जे आपण करतोय, तो आपला खरा मार्ग नाही. 'माझं माझं' म्हणून जे आपण गोळा करत चाललोय; ते सर्व तकलादू आहे. या नश्वर गोष्टींचे ओझे वाहायला आपण जन्माला आलेलो नाही. आपण तर फक्त 'मुसाफिर' आहोत. इथला मुक्काम आज ना उद्या संपला की, आपण निघालोच. आपल्या प्राक्तनात काही वेगळेच लिहिलेले असावे. मला कुठलेही पाश नको होते. मला फक्त जगायचे होते. स्वतःला हवे तसे. मी कबूल करतो की, होय! या जगात मी सर्वांत जास्त प्रेम स्वतःवरच केले. म्हणूनही असेल कदाचित. पण मला स्वतःपुरता स्पेस हवा असायचा. आयुष्यभर तो मी मिळवत राहिलो. शेवटीही तो हवाच हवा, म्हणून तर मला दूर कुठेतरी निवांतपणा असणारं एक घर हवं होतं... छोटंसंच.
          आपली काही स्वप्नं असतात... लहान... मोठी... तशीच थोडीशी वेडीही. माझ्या एका छोटया मैत्रिणीचे असेच एक स्वप्न होते. समुद्रकिनारी एक छोटीशी झोपडी असावी. त्या झोपडीला दार नको. त्याऐवजी तिच्या आवडत्या लाल ओढणीचा पडदा असावा... मी माझ्या इवल्याशा नावेतून मासे पकडून आणावेत. आणि तिने ते आपल्या इवल्याशा स्टोव्हवर माझ्यासाठी बनवावेत. नारळाच्या झाडांना बांधलेल्या जाळीच्या झोक्यामध्ये बसून एकमेकांच्या डोळ्यांतील आभाळ शोधत... समुद्राच्या फेसाळ लाटांची गाज ऐकत... आभाळाच्या निळाईखाली... स्वप्नातले जीवन जगावे...!
          मीही असेच एक स्वप्न पाहिलेय. फरक इतकाच की, माझे स्वप्न जगण्याचे नाही; तर मरणाचे आहे. गावाबाहेरील टेकडीवर माझेही एक छोटेसे कौलारू घर असावे. घराभोवती सुरेख झाडी असावी. दारात मात्र प्राजक्त हवाच... फुलांचा सडा टाकणारा... आणि समोरच्या गुलमोहराला टांगलेला झोपाळा असावा. मंदिरापुढे असते तशीच एक दीपमाळ. मग एखाद्या रम्य सायंकाळी घरापुढील दीपमाळेवर दिवे पेटवून हातातील जॉनी वॉकरचा घोट घेत झोपाळ्यावर पडून राहावे. अगदी कायमचे...!
          वार्‍याने छान झोका द्यावा... शेवटच्या श्वासात मंद रातराणीचा सुगंध भरून जावा... गुलमोहराने फुलांची शाल पांघरूण घालावी... अन् निघावे...
          शांतपणे शेवटच्या प्रवासाला...!!!
          माझ्यामागे ते दिसतंय ना? ते घरटं माझंच. अगदी स्वप्न पाहिले होते तसेच. घराच्या पुढच्या बाजूला दिसतोय तो गुलमोहर जो मीच लावलाय. तुम्ही म्हणाल आता गुलमोहरच का? आणखी काही दिवसांनी येऊन पहा तो लालबुंद गेंदानी भरून गेल्यावर. दुपारच्या भर उन्हात तो तुमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून पेटून उठेल अन् तुम्हांला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. पलिकडे दूर एक पिंपळ जो पूर्वीपासूनच आहे. सायंकाळच्या संधीप्रकाशात याच्या पानांची थरथर पाहिली की, मनाचं पानही असंच कातर होऊन जातं. या दोघांच्याशिवाय दुसरी सोबत नाही. एकुलतं एक घर आहे या टेकडीवर.
          एकटेपणा घालवण्यासाठी इथे एकांतात राहायला आलो. दुनियेच्या सर्व धकाधकीपासून अलिप्त. इथून दिसतात जगाचे सर्व व्यवहार. पण आपण त्यात कुठेच नसतो. आपल्या सभोवतालच्या परिसरांत निःस्तब्धता असणे म्हणजे एकांत...!!! निःशब्द असूनही आपल्याला कधीतरी तो हवा असतो. व.पुं.च्या भाषेत सांगायचे तर एकांताचे नाते मौनाशी...!!! एकटेपणा तर माझ्या वाट्याला आला होता. पण तो नको होता. जेंव्हा या दोहोंपैकी एकाची निवड करण्याची वेळ माझ्यावर आली; तेंव्हा मी एकांत निवडला.
मी निवडला?
          जेंव्हा जेंव्हा मी माझा स्वतःशीच संवाद हरवून बसायचो; तेंव्हा तेंव्हा हा एकांतच मला निवडायचा. पुन्हा मग मी मलाच नव्याने सापडायचो. या एकांताने तर मला माझ्याशी बांधून ठेवले होते. भल्या मोठ्या बंगल्यात का कोण जाणे; पण माझा जीव गुदमरून जायचा. एकएक खोल्या अशा मोकळ्या पडलेल्या असायच्या. त्यांच्याकडे पाहिले की, आपला जबडा पसरून त्या मला गिळायला बसल्या आहेत, असंच वाटत राहायचं. म्हणून आवर्जून या एकांतवासात मी हे छोटं घरटं बांधून ठेवलं होतं. अगदी आवर्जून. कामातून थकून गेलो की, एकटाच इथे यायचो. एखादी रात्र, एखादा दिवस इथे काढून जगण्यासाठी एक ऊर्जा घेऊन पुन्हा जगाच्या गर्दीत हरवून जायचो. जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इत्यादी वगैरे इथे मी गोळा करून ठेवल्या आहेत. खूप सारी पुस्तके भिंतीवरच्या कपाटातून मांडून ठेवलेली आहेत. संगीत ऐकण्यासाठी सोय आहेच, पण बेसूर व्हावसं वाटलं तरी एक बासरी... एक व्हायोलीन आणि कमीजास्तीला एक हार्मोनियमही आहे. यातले एकही वाद्य मला कधी धडपणे वाजवता आले नाही. पण हौस दांडगी. रेकॉर्डरवर म्युजिक ट्रॅक लावून मन मानेल तशा ताना घेत कुठल्याही शास्त्रात न बसणारे माझे गायन चाललेले असते. फायदा एकच. ऐकायला कोणी नसल्यामुळे कोणालाही त्रास होण्याची सुतरामही शक्यता नाही.
          टेकडीच्या पायथ्यापासून एक सडक गेलीय. मी मुद्दामच सडक म्हणालो. गेल्या काही वर्षांत डांबराचा साधा वासही तिला मिळालेला नाही. दिवसा तासाभराच्या फरकाने एखादे वाहन येते जाते. रात्री तर तो रस्ताही शांत झोपलेला असतो. तिथून वळणे घेत वर घरापर्यंत आलेला रस्ता. दोन्हीही बाजूने रानगवत वाढलेले होते, ते पिवळे पडलेय. मधूनमधून आवर्जून लावलेली झुडपे उठून दिसताहेत. अध्ये मध्ये बसवलेले दगडी खुंट मैलाच्या दगडाचा आभास निर्माण करताहेत. खालच्या सडकेने असे सरळ पुढे गेले की, टेकडीच्या या बाजूला वस्ती आहे. घरापासून धावत गेलो; तरी दहा मिनिटे लागतील वस्तीत पोहचायला. गरीब बिचारे... टीचभर पोटासाठी हातभर शेतात दिवसभर खपणारे... गाईगुरं पाळणारे आणि त्यांना चारण्यासाठी जंगलात वणवण फिरणारे लोक राहतात इथे. इथून उंचावरून समोर भलामोठा समुद्र पसरावा तसे धरणातील पाणी पसरलेले दिसते आहे. इकडं यायचं म्हणजे या पाण्याला प्रदक्षिणा घालूनच यावे लागते. शहर इथून फार दूर आहे. त्यामुळे धावपळ या लोकांच्या स्वभावातच नाही. अलीकडे थोड्याफार सुधारणा इत्यादी वगैरे झाल्यापासून हे लोकही काहीसे बेचैन बनलेत. नाही असे नाही. पूर्वी मात्र खूप सुखी होते. कारण त्यांच्या गरजाही फार थोड्या होत्या. सुखी होण्यासाठी ते गरजा वाढवत गेले आणि गरजा वाढल्यापासून सुख मात्र हरवून बसले.
          धरणातील पाणी दिवसभर उन्हात चमचमत राहते. सूर्य कलू लागला की, काठावरल्या झाडांच्या सावल्या त्यात उतरून माशासारख्या पोहत राहतात. सायंकाळी आभाळाची लाली त्यात पसरते. एखादा लाजेने आरक्त झालेला सुंदर चेहरा मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये हरवून जावा; तसा काळोख पसरत राहतो. रात्री चांदणे पांघरून मग हे पाणीही झोपी जाते. कधीतरी त्यालाही झोप नाही आली की, मग मात्र तेही माझ्यासारखेच जागे राहते. आजही बहुधा त्याची माझ्यासारखीच गत झालेली दिसतेय. त्यालाही झोप येत नसावी. पाण्यावर एक दिवा तरंगताना दिसतोय. कोणीतरी मासे पकडणारा कोळी असावा आपल्या नावेतून जाळे पसरत चाललेला. त्याच्याच छोट्याशा नावेतील दिवा लुकलुकत असेल.
          या दिव्यावरून आठवले. घरापुढे एक दीपमाळ आहे. मंदिरापुढे असते ना! अगदी तशी. तुम्हांला गंमत वाटेल कदाचित! पण तीही मी आवर्जून बांधून घेतलीय. अंधार्‍या रात्री मी त्यावर दिवे पेटवतो. आता सगळा हिशोब मांडलाच आहे; तर हे तरी कशाला लपवू? अंधार आणि एकटेपणा सोबत असले की, मला त्यांची नेहमीच भीती वाटत राहिली. अंधार कसा उगीचच अंगावर यायला नको. त्याचाही एक उत्सव व्हायला हवा. अंधारातही मनाला आधार वाटावा; म्हणून तर हा खटाटोप. दुसरे काय? हा माझा विक्षिप्तपणा वाटतो लोकांना. काहीजणांना कौतुकही वाटतं; पण बोलून दाखवायला कोण येणार इथे? तरीही कधीतरी येतं असंच उडत उडत कानावर. ऐकून मात्र बरं वाटतं.
          आज सायंकाळपासूनच मन थार्‍यावर नाही. मग त्याला थोडे शांत करण्यासाठी या दीपमाळेवर दिवे पेटवायचे ठरवले. हट्टाने वर चढलो. दिवे लावून झाल्यावर जरा थकल्यासारखं झालं. हात थोडे कापत होते. पायही लटपटू लागले. नेहमीच असे होते, असं नाही. पण अशी अस्वस्थता असली की, होते. दिव्यांच्या उजेडात अंगण मात्र सारे उजळून गेले होते. मनाची अस्वस्थता थोडी कमी झाली. तिथेच पायऱ्यांवर बैठक मारली. कितीतरी वेळ नुसताच बसून राहिलो. एकएक दिवा त्याचे हितगूज सांगत राहिला. मी शांतपणे ऐकत राहिलो. शब्दांच्या पलीकडे जाऊन आमचा संवाद चालला होता. मौनाचीही आपली अशी एक भाषा असते. कितीवेळ गेला कोणास ठाऊक. पण बसूनबसून पाय अवघडल्यासारखे वाटले; तेंव्हाच उठलो.
          भूक अशी फारशी नव्हतीच. घरात जाऊन 'टिचर्स'चा एक कडक पेग भरला. एक पेग मारल्यावर थोडी तरतरी आली. मग आणखी एक पेग. शेवटी लागणारा सर्व सरंजाम उचलला आणि इथे निवांत एका बाजूला येऊन बसलो. खुल्या चांदण्याची ओढ जुनीच आहे. होळी होऊन आठवडा होत आलाय. त्यामुळे थंडी बरीच कमी झालीय. तरीही एक सिगारेट तर हवीच. अजून पेटवलेली नाही. पेटवायला हवी. डोळे थोडे जड झालेत का? पण असे सगळे आभाळच पांघरून घेऊन पडून राहायला बरे वाटते. झोप नाही आली म्हणून काय झाले. सगळ्या रात्री झोपण्यासाठी थोडीच असतात. असा मस्त पसरत जाणारा धूर. सिगारेटच्या या धुरासारखेच आपणही कसे अलगद तरंगत असल्यासारखे वाटतेय. आकाश टिपूर चांदण्यांनी भरून गेलेय. आपणही त्या चांदण्यांचाच एक भाग होऊन मस्त पंख पसरून त्या चांदण्याचाच एक भाग होऊन जावं.
           आपल्याकडे जे नाही; ते मिळविण्यासाठी सामर्थ्य लागते. लहानांत लहान सुखापासून ते मोठमोठाली साम्राज्ये उभी राहिली; ती याच कर्तृत्वाच्या बळावर. परंतु सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना सत्ता, संपत्ती, स्त्री, संतती ही सर्व सुखाची परिसीमा असतानाही सर्वसंगपरित्याग करून संन्यस्त जीवनाचा स्वीकार करून समस्त दुःखाचे मूळ शोधायला तो बाहेर पडला. याला जे धाडस लागते; त्याबाबत तो अतुलनीय आहे. आपल्या अर्धोन्मलित पापण्यांमधून ममतेने पाहणारी त्याची ती तृप्त नजर कायम माझ्या मनाचा ठाव घेत राहिली. मी पहिल्यांदाच अजिंठ्याच्या लेण्यातून फिरत होतो; तेंव्हा त्या थंडगार अंधाऱ्या लेण्यांमधून ही नजर सतत आपला पाठलाग करतेय, असेच वाटत राहिले. या नजरेचे असे काय गारुड आपल्या मनावर झाले होते कोणास ठाऊक! पण नित्यनेमाने वारीला जावे तसे अजिंठ्याला जात राहिलो. प्रत्येकवेळी आपल्या आतमध्ये कुठेतरी तो भिनत राहिला. विपश्यना करताना तर शरीराच्याही पलीकडे जाऊन त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत राहिली.
         आताही मिटलेल्या पापण्यांना छेदत नजरेसमोरच्या एवढ्याशा कणातून मोठा मोठा होत होत तो आकाशाएवढा झाला... नव्हे तर संपूर्ण आकाशच झाला. समोरच्या नक्षत्रांनी भरून गेलेल्या आकाशातून तो आपल्याकडेच पाहतोय, अशी जाणीव मनाला होतेय. डोळ्यांना दिसतेय तेवढेच सत्य कसे असेल? शरीराच्या पलीकडे जाऊन असे काहीतरी अस्तित्वात आहे, जे पाहण्यासाठी मनःचक्षूच उघडायला हवेत. ते उघडण्यासाठी हा एकांत आहे. आईच्या गर्भात असलेली ऊब या एकांताला आहे. तेवढ्यात त्याच्या डोळ्यातून एक थेंब ओघळावा; तसा आकाशात एक तारा निखळला. अशाच काही नक्षत्रांनी माझ्या पाठीमागे एक झाड भरून गेलेय. डोळ्यांना दिसत नसले; तरी नाकाला त्याची संवेदना जाणवतेय. कॉलेजमध्ये असताना कुसुमाग्रज यांच्या 'समिधा' या पुस्तकातली एक कविता वाचली होती... 'पारिजातक.' आपल्या कुरुप ओबडधोबड व पुष्पहिन जीवनाला वैतागून तो वृक्ष तपश्चर्येला बसला. सर्वांनाच हेवा वाटेल, असे खूप सुगंधीत सौंदर्य मिळवायचे, हाच एक ध्यास घेऊन. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अखंड साधना सुरूच राहिली. दिवसामागून दिवस आणि रात्रीमागून रात्री उलटून गेल्या. त्याच्या या अथक साधनेनंतर परमेश्वर प्रसन्न झाला. मनातील इच्छा फलद्रूप झाली. प्राजक्त पवित्र अशा पुष्पवैभवाने भरून गेला. पण जेंव्हा ग्लानीतून तो शुद्धीवर आला; तेंव्हा त्या सर्व वैभवाचा त्याने त्याग केला.
"अरे! मी तर तपस्वी... साधक... संन्यासी... हे सर्व वैभव माझ्या काय कामाचे...?"
त्या भल्या पहाटेपासून आजतागायत त्या स्वर्गीय फुलांचा सडा मातीमोल होऊन जातो.
            या दोघांमध्येही किती कमालीचे साम्य आहे. दोघेही व्रतस्थ. आणि आपले काय?
        आपणही यांच्यासारखाच तर वसा घेतला. उतलो नाही... मातलो नाही... घेतला वसा टाकला नाही. जीवनाचे व्रत कायम पाळले. अजूनही पाळतोय.

(क्रमशः)