Monday, 28 March 2016

८...

          टिचभर व्यासाचे वर्तुळ असलेले माझे जग त्यामानाने फार मर्यादित होते. वयाच्या पहिल्या पाच वर्षांत हाताच्या बोटावर मोजण्याएवढे प्रसंग सोडले; तर घरापासून बाहेर जाण्याचे प्रसंग फारसे आले नव्हते. त्यातूनही माझ्या काळजीपोटी निर्माण झालेल्या एक प्रकारच्या नजरकैदेतच होतो मी, असे म्हणायला हरकत नाही. या वर्तुळातील माणसांच्या पलीकडे काही असू शकते, यावर माझा विश्वास नव्हता. माई म्हणजे माझी लाडकी आजी हे आतापर्यंत माहीत झाले आहेच. माझे सर्वांत मोठे संरक्षक कवच तीच होती. जगातील सर्व भल्याबुर्‍या गोष्टींपासून माझे रक्षण करायलाच हवे. विशेषतः माझ्या बापाकडील मंडळी. अशी तिला चिंता होती. म्हणून तर क्षणभरासाठीही ती मला नजरेआड करायला तयार नव्हती.
          सगळ्यात मोठे मोहनमामा... आजोबांच्या नंतर शेतीवाडीचे आणि घरचे सगळे तेच पाहायचे. मोठी कुसूममामी म्हणजे कायम संसारात गुरफटलेली स्त्री. एखाद्याच्या आयुष्याकडून किती माफक अपेक्षा असू शकतात, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कुसूममामी.
            त्यानंतर मुकूंदमामा... खरं म्हणजे नोकरी करण्याची यांची फार इच्छा होती. विशेषतः शिक्षक म्हणून यांनी नाव काढले असते. पण काय दुर्दैव होते कोणास ठाऊक. कायम एवढ्या तेवढ्यावरून त्यांची संधी हुकत गेली. पुढे त्यांनी नोकरीचा विचार सोडून दिला आणि व्यवसायात शिरले. तिथेही अनेक उद्योग केले. इलेक्ट्रिकलची कामे केली, फोटोग्राफी केली, काहीकाळ शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी फिरता प्रतिनिधी म्हणून काम केले. पण यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे त्यांचा स्वतःचा फायदा जितका झाला; त्यापेक्षा जास्त गैरफायदाच उचलला लोकांनी. जिज्ञासा हा त्यांचा प्लसपॉईंट होता. कुठेही काही नवीन दिसले की, त्याची इत्यंभूत माहिती घेणारच. त्यातील कसब शिकून घ्यायचे आणि घरी आले की, प्रयोग सुरू व्हायचे. अंगात अनेक कलागुण असूनही त्यांना स्थैर्य मिळायला पुढे अनेक वर्षे जावी लागली. त्यामानाने सुनिता मामी बर्‍याच व्यवहारी होत्या.
          सगळ्यात धाकटा माधवमामा... तोपर्यंत तो पुण्याला राहून शिकत होता. त्या काळाच्या मानाने पुण्यात राहिल्याने तो बराच आधुनिक विचारांचा होता. तसा तो घरात कमीच असायचा. परंतु सुटीला आला म्हणजे घरातले वातावरणच बदलून गेलेले असे. असे असले तरीही घरच्या सगळ्यांचाच तो लाडका होता. दोन्ही मामा शांत होते. हा मात्र काहीसा गरम डोक्याचा. तरीही सगळ्यात जास्त माझी गट्टी याच्याशीच जमली. कारण आमच्या दोघांच्या स्वभावात अनेक गोष्टींत साम्य होते. विशेषतः हट्टीपणाला तोड नाही.
          राहता राहिली आबई. ती सगळ्यांमध्ये धाकटी. पण अलीकडील काळाता घटनाच अशा घडत गेल्या होत्या की, तिला अकाली वार्धक्य आले होते. माहेरी आल्यापासून तिने सदैव स्वतःला कामात गुंतवून घेतले होते. तरीही अधूनमधून तिला आजारपणामुळे सक्तीने विश्रांती घ्यावी लागत होती. पणजोबाच्या काळात घराच्या दोन खोल्या आणि पुढे खोपट होते. आजोबांनी त्यात भर घालून चांगले पाचसहा खोल्यांचे घर बांधले. मामांनी हे घर तसेच ठेवून पुढचा दर्शनी भाग सिमेंट कॉक्रेंटमध्ये बांधून घेतला होता. घराचा आकार वाढत गेला तशा माजघराच्या मागील दोन खोल्या आधिकच अंधारात गुडूप झाल्या. आबई एकतर शेतात गेलेली असायची किंवा कायम या अंधारात काहीतरी काम करत बसलेली असायची. जास्त करून ती बाहेर कुणामध्येही मिसळायची नाही. तिने स्वतःला केवळ घरातल्या अंधारातच नाही; तर मनातूनही कोंडून घेतले होते. मला काही हा अंधार मानवणारा नव्हता. ज्या अंधारात तिला सुरक्षित वाटायचे; त्याच अंधारात माझा जीव मात्र गुदमरून जायचा. त्यामुळे आबईपासून मी आणखी दुरावत गेलो.
          घरातील या वडीलधार्‍यांनंतर चिल्लरपार्टीत मोठेपणाचा मान होता शुभांगीचा. मोठ्या मामाची मोठी मुलगी. माझ्यापेक्षा चारपाच वर्षांनी मोठी. मामेबहीण असली तरी माझ्यासाठी मात्र ती माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा तसूभरही कमी नव्हती. शुभांगी आणि शेखरनंतर घरात बाकीची चिल्लर जमा होत गेली. म्हणजे घरातील पहिला मुलगा मीच. तसा शुभाताईच्या पाठीवर एक मुलगा झाला होता. पण... कोणा एखाद्या शापित यक्ष, गंधर्वाला मानवी योनीत जन्मण्याचा शाप मिळाला असेल खरा. पण उःशाप मिळून अवघ्या वर्षभरातच तो मुक्त झाला असावा. असो. तो थांबला असता; तर मला एक समवयस्क सवंगडी मिळाला असता. बहुधा तो योग काही दोघांच्याही नशिबात नव्हता. कुसूममामीला तर माझ्यातच तिचा मुलगा दिसू लागला. त्यामुळे एक झाले. सर्वांच्याच लाडकेपणाचा वाटा माझ्या वाट्याला जास्त आला. त्यातूनही एकुलता एक भाचा. एकंदरीत आबईपेक्षा या सर्व मंडळीसोबतच मी आधिक रमू लागलो. या घरात मला मिळालेली मायेची ऊब अपवादानेच एखाद्याला मिळाली असेल.
          आकाशात भरारी घेण्यापूर्वी पाखरालाही काही काळ घरट्यातच घालवावा लागतो. मलाही अंड्यातून बाहेर पडण्यापूर्वी या सर्वांच्या पंखातली ऊब पूरेपूर मिळत राहिली. त्यामुळेच मी जेवढे प्रेम आकाशावर केले; तेवढेच या घरट्यावरही केले. या घरट्याची ओढ मला कायम जाणवत राहिली. याच्या एकेका काडीसोबत माझे ऋणानुबंध जुळलेले होते. मी डोळे उघडले; तेंव्हापासून हे घरटे भलतेच देखणे होते. गल्लीत इतर घरे मातीची होती. मोठमोठाले चिरेबंदी वाडे होते. त्यामानाने हे घर छोटे होते. तरीही आधुनिक शहरी पद्धतीमध्ये बांधलेल्या पुढील दर्शनी भागामुळे ते उठून दिसायचे. खेड्यात अपवादानेच आढळणारी बैठकीची खोली आणि तिची सजावट पाहून आलेला पाहुणा अवाक् व्हायचा. ही खोली कोणी आले गेले; तरच उघडली जायची. इतरवेळी शेजारच्या भल्यामोठ्या ढाळजेत उठबस चालायची. घराला लागूनच परसात भरपूर मोकळी जागा होती. तिथेच जनावरांसाठी गोठा आणि खेळण्यासाठी भरपूर जागा होती.
           परसातील ते अंगण अनेक प्रकारच्या फुलझाडांनी आणि कसल्या कसल्या झाडांनी भरून गेलेले असे. पांगारा, हादगा, देवकापूस, सुबाभूळ अशी मोठी झाडे होती. तशी पपई, केळीची फळझाडेही मागच्या अंगाला होती. पारिजातकाच्या जोडीला कुपाटीवर गोकर्णीची निळी फुले हमखास असायची. इवलीशी गुलाबी फुले असलेल्या चिनीगुलाबाने एक कोपरा भरून गेलेला होता. केशरी पिवळ्या झेंडूचीही बरीच रोपटी होती. उकिरड्याच्या कडेला सांडपाणी जायचे तिथे लाल पिवळी कर्दळ आणि अळूच्या पानांची दाटी झालेली होती. ज्यांच्या जोडीने मी वाढत होतो; इवल्याशा चिंचोक्याच्या दोन पाकळ्यांमधून उगवलेले ते इवलेसे चिंचेचे रोपटे असो वा बुडाशी कोय असलेले ते आंब्याचे रोप असो. या सगळ्या वैभवावरून बागडणारी निळ्या पिवळ्या नाजूक पंखांची फुलपाखरे, सगळ्या गोठ्यात चमकणार्‍या रेघांची नक्षी मागे सोडणार्‍या गोगलगाई, ओल्या मातीत राहणारे गांडूळ आणि कधीमध्ये तोंड दाखवणारे मुंगूस माझे बालपणातले संवगडी होते. अनेक प्रकारच्या पक्ष्यांची तर जत्राच भरायची. कोपऱ्यातल्या बाभळीवर रंग बदलणारे सरडेही मान हलवताना दिसायचे. देवकापसाच्या पांढऱ्याशुभ्र बोंडामधून बालपणासोबत गुंतलेले असे अनेक धागे उलगडत जातात.
           दिवसामागून दिवस उलटत गेले. एक दिवस आपण मोठे झाल्याचा पहिला साक्षात्कार मला झाला. माझे नाव शाळेत घातले. तसा अधूनमधून आठवण होईल तसा मी शुभाताईसोबत शाळेत जाऊन बालवाडीत बसायचो. तिथे खायला सुकडी मिळायची. आता मात्र रीतसर नाव दाखल झाले होते. तारांमध्ये रंगीबेरंगी मणी ओवलेली पाटी अन् नुकतीच विकत घेतलेली वितभर लांबीची नवीकोरी पांढरीशुभ्र पेन्सिल, चित्रे असणारी अंकलिपी एवढ्या संपत्तीसह आमचा शाळेचा शुभारंभ झाला. गळ्यात अडकवण्यासाठी लांब पट्टीचे बंध असलेली शबनम पिशवी गळ्यात अडकवून आम्ही शाळेला जाऊ लागलो. अननस, ईडलिंबू, फणस नावाची कधी न पाहिलेली फळे अंकलिपीत पहिल्यांदा पहायला मिळत होती. आमच्या गुरुजींनी "श्री गणेशा" वगैरे असले काही नाही, तर थेट एक ते दहा अंक काढून दिले. अक्षरांच्याही अगोदर अंक ओळख करून देणारे गुरुजी माझ्या आयुष्यात आले आणि आमच्या वर्तुळाचा परीघ भलताच वाढला.
           आमची शाळा त्यावेळी सरकारवाड्यात भरायची. मध्यभागी येमाईचे छोटे मंदिर होते. दोन्ही बाजूला असलेल्या ओवर्‍यांमधून पहिली दुसरीचे वर्ग भरायचे. बाहेरच्या खोल्यांमध्ये तिसरी चौथीचे वर्ग आणि पाचवी ते सातवीचे वर्ग व अॉफिस वरच्या मजल्यावर असायचे. दोन्ही बाजूने वर जाणाऱ्या अंधार्‍या जिन्यातून वर जावे लागे. अंधाराचे आपले जुळत नसल्यामुळे चौथीपर्यंतच शाळा शिकायची. नंतर शाळेला रामराम ठोकायचा, यावर पहिलीतल्या आमच्या बर्‍याच जणांचे एकमत झाले होते. वरच्या मजल्यावर असणाऱ्या वर्गात शिकणारी मुले फारच धाडसी असतात. त्यामुळे त्यांचे खूपच कौतुक वाटायचे. त्यामध्ये आमची शुभाताई पण होती. त्यांच्या वर्गातल्या गमतीजमती ती सांगायची. तेंव्हा कधी न पाहिलेल्या अलिबाबाच्या गुहेसारखे ते अद्भुत असायचे. पण वर जाऊन पाहण्याचे धाडस किमान पहिली संपेपर्यंत तरी झाले नाही. शाळेची वेळही त्यावेळी आजच्यासारखी नव्हती. सकाळी साडेसात ते साडेअकरा पहिले सत्र आणि मग दुपारी दोन ते पाच दुसरे सत्र अशा दोन सत्रांत शाळा भरायची. सकाळच्या सत्रात अक्षर ओळख, बाराखडी, वाचन, लेखन, कविता शिकवल्या जायच्या. दुपारी अंकवाचन, लेखन, उजळणी, पाढे शिकवले जायचे. कविताच काय पण उजळणी, बाराखडी आणि पाढेही तालासुरांत म्हणावे लागत. शाळा सुटताना तर प्रत्येक वर्गांतून स्पर्धाच लागलेली असे. सगळा सरकारवाडा दुमदुमून जायचा. शाळा सुटल्यावर घरी जाताना प्रत्येकालाच फुलपात्र भरून सुकडी वाटली जायची. हुशार विद्यार्थ्यांना मात्र दोन मापे मिळायची. गुरुजी कडक होते; तसे पोरांचे लाडही करायचे. दोन मापे सुकडी मिळाली की, तो मुलगा गुरुजींच्या मर्जीतला समजला जायचा. गुरुजी त्यांच्या मर्जीतील पोरांना पानसुपारी आणायला दुकानात पाठवायचे. हुशार पोरांना हिशेब कळावा, म्हणून गुरुजी त्यांनाच कामे सांगायचे.
           मोठ्या मामांनी आधीच सांगितले होते, "आपल्याकडे जो खूप शिकतो, त्यालाच भाव असतो. माधव मामासारखे खूप शिकायचे. बाकी सगळ्या गोष्टींत लाड होतील; पण अभ्यासात काही ऐकून घेणार नाही." गुरुजी हुशार पोरांच्या पेन्सिलला अडकित्याने टोकही करून द्यायचे. जर हुशार झाले नाही; तर गुरुजींनी अडकित्याने तासून गुळगुळीत केलेली छडी दररोज दहावेळा खावी लागते. तेंव्हाच ठरवून टाकले, आपण माधवमामापेक्षा हुशार व्हायचे. वर्ष संपेपर्यंत अंकलिपीत न बघता संपूर्ण उजळणी आणि बाराखडी म्हणायला आणि लिहायला आम्ही शिकलो होतो. हळूहळू वाचायला पण जमू लागले होते.
          दररोज संध्याकाळी शुभाताईसोबत अभ्यासाला बसावे लागे. गल्लीतली आणखी मुलंही अभ्यासाला घरी ढाळजेत यायची. मुकूंदमामा सगळ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यायचा. कधी कधी शिकवायचाही. मला पट्टीने सरळ रेषा ओढून द्यायचा. मग दोन्ही बाजूने पाटी भरेल इतके लिहायचे. पाटीवरचे लिहिलेले पुसू नये; म्हणून पाटी पिशवीत न ठेवता तशीच वर ठेवून सकाळी सांभाळून शाळेत घेऊन जायची. गुरुजींना दाखवली की, मग ते शाबासकी द्यायचे. कधी ते दुसऱ्या वर्गाच्या गुरुजींना पण बोलावून घेऊन दाखवायचे. ते पण कौतुक करायचे. आम्हांला अजून स्फुरण चढायचे. पहिली संपेपर्यंत गुरुजी मला हुशार म्हणू लागले. त्याचा परिणाम एकच झाला, सगळ्या कसोट्या सफलतेने पूर्ण करत आम्ही हुशार आहोत, यावर सगळ्यांचे एकमत झाले.
          मधल्या वेळात अभ्यास कमीच असायचा. बराचसा वेळ खेळण्यातच जायचा. माई मला इतर मुलांबरोबर खेळायला जाऊ द्यायची नाही. मग परसातच शुभाताई तिच्या मैत्रिणींसोबत भातुकली खेळायची; तेंव्हा मलाही त्यांच्यासोबत खेळायला मिळायचे. बाहुलाबाहुलींची लग्न लावली जायची. एवढ्याशा टोपणांच्या भांड्यातून जेवण बनविले जायचे. कधी शेंगदाणे, पापड, कुरड्या असायच्या. कधी खर्‍या भाकरीचे छोटे तुकडे असायचे. कधी काहीच नसले; तर मात्र झाडाची पानेच ठेवली जायची. चिखलाच्या अनेक वस्तू बनविल्या जायच्या. साध्या खापराच्या तुकड्यांनाही खूप महत्त्व यायचे. छोट्याशा लाकडाच्या तुकड्याला रंगीबेरंगी कापडाच्या चिंध्या गुंडाळून केलेल्या बाहुल्या बार्बी डॉलपेक्षाही सुंदर दिसत. फुटक्या बांगडीच्या रंगीत तुकड्यांपासून माळा बनवलेल्या असायच्या. कुठून कुठून एकेक वस्तू मिळवलेली असायची. जगाच्या दृष्टीने टाकावू ठरलेल्या अनेक वस्तूंची खजिन्यात भर पडत राहायची. विकत आणलेले खेळणे अपवादानेच दिसायचे. कधी माई मूडमध्ये असली की, काय काय बनवायला शिकवायची. याच खेळात मला माझी नवरी सापडली...
वेणू..!
          ही वेणू म्हणजे एकदम भारीच होती. अपर्‍या नाकाची... कुरळ्या केसांची... गोरीगोमटी असणारी वेणू माझ्यापेक्षा एक वर्षाने लहानच होती. बाकीच्या मुलींना वेण्या असत. हिचे केस मात्र कापलेले असायचे. बाहुलीच दिसायची. शुभाताईच्या कृपेने आमचे बर्‍याच वेळा लग्न झाले. मलाही ते इतके खरे वाटायचे की, मोठेपणी आपण हिच्याशीच खरेखुरे लग्न करायचे, हे जवळजवळ ठरवूनच टाकले. माईलाही तसे सांगून टाकले. हो! उगीच पुन्हा पंचाईत नको. आणि गंमत अशी की, वेणूचे बाबाही मला जावईच म्हणायचे. अशाप्रकारे माझ्या परिघात आणखी एकाची भर पडली होती.
          वास्तवातील संसारही कल्पना ठरेल, इतका कल्पनेतील तो संसार वास्तव होता.

(क्रमशः)

Sunday, 20 March 2016

७...

          माझ्या नकळत्या बालपणातले काही म्हणता काही आठवत नाही मला. पण काही पुसट संवेदना आहेत. अर्थात हा सगळा तोंडी जमाखर्च आहे. त्यामुळे एखादा रुपया इकडेतिकडे होऊ शकतो.
          घराशेजारच्या भल्यामोठ्या परसातील ओल्या पावसाळी वातावरणात भिजलेल्या नव्याकोर्‍या छपराच्या काडाचा ओला वास... चिखलाचा कोवळा स्पर्श माझ्या बालपणाला चिकटलेला आहे. पोलीसांसारखी खाकी वर्दी आणि मामांनी कौतुकाने आणलेली खेळण्यातील लाकडी दस्त्याची छोटी रायफल यांचा रुबाब त्या बालपणाला आहे. चाके फिरवली की, लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या रंगाचे दिवे चमचमणारी एक गाडी आठवते. आणखी आठवायचे म्हटले; तर पेठेत बापूंच्या हॉटेलमध्ये छोट्याशा बशीतून मिळणाऱ्या घट्ट सायीच्या मलईची चव जिभेवर रेंगाळते आहे. ढुंगणावर कायम होणारी बेंडं आणि त्यांची ठसठसणारी वेदनाही कधी विसरता येणारी नाही.
           एकंदरीत या कधीच विसरता न येणार्‍या गोष्टींशिवाय आठवायचा प्रयत्न केला; तर आठवते... एका भलत्याच मोठ्या मंदिरात जिथे हत्ती, घोडे, वर्‍हाडी सगळे काही दगडात कोरलेले होते... तिथे मुकूंदमामाचे झालेले लग्न आणि नवरदेवाच्या पुढ्यात मी ऐटीत घोड्यावर बसलो होतो. आपण शिवाजी महाराजच झालोय, असे उगीचच वाटत राहिले. नवीन छान कपडे तर मीही घातलेले होते. पण मळवट भरलेली, मेंहदी लावलेली, छान नटलेली नवरी म्हणजे सुनितामामी या दिवसापासून तिचे घर कायमचे सोडून आमच्यासोबत राहण्यासाठी आली होती. पुढील अनेक दिवस मी सावलीसारखा तिच्यासोबत होतो आणि तिला मामी न म्हणता 'नवरी'च म्हणायचो. खरं तर मलाही त्यावेळी लग्न करायचे होते. पण माझ्यासाठी छोटी नवरी न मिळाल्यामुळे ते झाले नाही. सुनितामामीने मात्र माझ्यासाठी छोटी नवरी आणायचे कबूल केले होते.
          माझ्या अस्पष्ट आठवणीत एक गोष्ट अजून आहे. शेतात भूईमूग काढायचे चालले होते. मी दिवसभर इकडेतिकडे भटकत होतो. सायंकाळी नांगरलेल्या वावरातून फिरताना माझ्या पायाला काहीतरी टोचले. काटा टोचण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. पण यावेळी का कोण जाणे वेदना जास्तच होत होत्या. पायाला मुंग्या येऊन मला गुंगी आल्यासारखे वाटत होते. मला उचलून लगेचच गावात आणले. गावातले कोणीतरी एकजण मला कडूनिंबाचा पाला, मिरच्या खायला देऊन कसला तरी मंत्र म्हणून माझा पाय चोळत होते. नंतर मला अनेक वर्षांनी या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळला. मला म्हणे विंचवाने दणका दिला होता.
          अजूनही सांगायचं; तर एक आठवण आहे. मुकूंद मामाच्या सायकलवर बसून फिरायला गेल्यानंतर अंधार असलेल्या मोठ्या खोलीत तेवढ्याच मोठ्या पडद्यावर पाहिलेला सिनेमा. सिनेमा कळण्याएवढे वय नव्हतेही त्यावेळी. परंतु मनात एक विचार राहून राहून येत होता. ही सगळी सिनेमात दिसणारी माणसे आत कुठून गेली असतील. कारण तोपर्यंत नाटक माहीत होते. सिनेमाचेही तसेच काहीसे असावे, असा माझा आपला समज होता. तिथून परत येताना खूप मोठ्या मुसळधार वादळी पावसाने आम्हांला झोडपले. नदीला पूर आल्यामुळे आम्ही पैलतीरालाच अडकून पडलो होतो. त्यात सायकल घसरल्यामुळे आम्ही दोघेही पडलो. नाकाच्या वरच्या बाजूला कपाळावर सायकलचे हँडल लागल्यामुळे खोक पडली. रक्ताची ती खारट चव अजून आठवतेय. एवढे होऊनही थंडीने गारठल्यामुळे संवेदना बधीर झालेल्या होत्या. आपल्याला काहीच लागले नाही. मामा मात्र धपकन चिखलात पडले; म्हणून मी बावळटासारखा हसत होतो. घरी आल्यावर माई मामालाच रागावली. मी मात्र हसतच होतो.
         या आणि अशाच काही आंबट चिंबट... खारटगोड आठवणी जमाखर्चात मांडत मी मोठा झालो. जन्मानंतरची पहिली काही वर्षे तरी आपल्याला काही आठवत नाही. जे काही आठवतेय, ते असे तुकड्या-तुकड्याने. त्या गोष्टी लक्षात राहण्यामुळे कोणताही मोठा फायदा होणार नसतो. तरीही त्या पूर्ण विस्मृतीतही जात नाहीत... पूर्ण स्मृतीतही राहत नाहीत. भूतकाळाच्या धुक्यात लपेटलेल्या या आठवणी म्हणजे कोणत्याही दंतकथांपेक्षा कमी विलोभनीय नसतात. या सगळ्या अर्ध्याकच्च्या आठवणी आणि माझा जन्म यांदरम्यान बरेच काही असे घडले होते की, त्यातील मला काहीही आठवत नाही... आठवणे शक्यही नाही. ते सगळे फक्त माईच्या गोष्टींमधून मला ऐकायला मिळाले.
            माझ्या जन्मानंतर बाळंतपणासाठी आलेली आबई पुन्हा सासरी आली. मी माझ्या हक्काच्या घरी आलो. ऋतू बदलला की, वातावरणही बदलते. माझ्या येण्याने घरातले वातावरणच बदलून गेले. सगळेजण जाम खूश होते. क्षणभरही मला खाली ठेवायला कोणी तयार नव्हते. सगळ्यांच्या विरंगुळ्याचे ठिकाण मी होतो. त्यावेळी सगळ्यांच्याच आनंदाचा केंद्रबिंदू मी बनलो होतो. सर्वांचे रस्ते जगभर फिरून माझ्याजवळच येत होते. दूध पिण्यापुरतेच काय ते मी आबईजवळ असायचो. माझा पायगुण फार जबरदस्त होता म्हणे. घराला लागलेली साडेसाती माझ्या जन्मापासून कमी झाली. कर्त्या पुरुषांच्या राशीत ठाण मांडून बसलेला जुगार, नशा कमी झाली. घरात पैसा व्यवस्थित येऊ लागला. रात्री घरी आणलेली कमाई कपाटात ठेवण्यापूर्वी 'मालक' म्हणून त्यास माझ्या हाताचा स्पर्श घडवला जात होता. तुम्हांला हसू येईल कदाचित; पण घरातून बाहेर पडताना माझी पापी घेऊन बाहेर पडले की, दिवसभरात फार लाभ होतो, असा निराळाच शोध लागल्यामुळे तर मला फारच मार्केट आले होते. अंगावर एकेक दागिना वाढू लागला होता. कपडे, खेळणी यांचे ढिगारे लागले होते. कौतुकच असे चालले होते की, रडायला वेळच मिळत नव्हता. खाणे, पिणे, झोपणे आणि उरलेल्या वेळात खेळणे. मी सहा महिन्याचा होईपर्यंत सगळा गाव फिरून झाला होता. आजीबाईंनी कामातून निवृत्ती घेतलेली होती. वडील आणि चुलते यांची कामेच काय होती? प्रत्येकालाच मी हवा असे. त्यासाठी त्यांच्यामध्ये लुटूपुटूची भांडणेही होत.
          भलतेच वाढलेले जावळ आणि गुटगुटीत बाळसं कोणालाही वेडं करील असंच होतं. रांगायला तर अंगणही पुरेना झाले. कोणाची नजर लागू नये; म्हणून आजीबाई कपाळ... गाल... तळहात... तळपायावर काजळाचे भलेमोठे ठिपके द्यायच्या. कमीजास्तीला मनगटात दृष्टमणीही बांधले होते. मग नजर लावायची काय बिषाद आहे! आणि उलट आम्ही काजळ घातलेल्या टपोर्‍या डोळ्यांनी समोरच्याकडे असे काही पाहायचो की, पाहणाराच्याच काळजाचे पाणीपाणी होऊन जाई. मग दृष्ट लागेल कशी?
          पण दृष्ट लागली होती. एकप्रकारची काजळी घरात पसरत होती. ती या काजळाच्या ठिपक्यांना जुमानत नव्हती आणि कठोर काळजाच्या लोकांना त्याचे सोयरसुतक राहिलेले नव्हते. बाळंतपणापासूनच आबईची तब्येत बिघडलेली. ती मरायला टेकली होती. बंद झालेला सासूरवास पुन्हा सुरू झाला होता. नुसता सुरू नाही, वाढलेला होता. त्यांना आबईची आता आवश्यकता राहिलेली नव्हती. उलट अशी आजारी खंगलेली आबई मेली; तर ते सर्व सुटणारच होते. माझ्या पहिल्याच वाढदिवसाचा कार्यक्रम जंगी झाला आणि मानपानावरून संगीत मानापमान नाटकही चांगलेच रंगले. वाढदिवसाच्या निमित्ताने आबईची माहेरची मंडळी आली खरी; पण त्यांच्या अपमानच झाला. आमच्या आजीबाईने सरळसरळ नातवाचे नाव पुढे करून लग्नापासून राहिलेल्या अपेक्षा बोलून दाखवल्या. त्या पूर्ण करायला जमत नसतील; तर पुन्हा आमच्या घराची पायरी चढू नये; म्हणून दमच भरला. आजपर्यंत काही दिलेले नव्हते, असेही नाही. पण या लोकांच्या अपेक्षांचे ओझे फार जड होते. रडकुंडीला येऊन ती मंडळी पिंपळेश्वरला परतली. झाला प्रकार आजोबांनी फारच मनाला लावून घेतला होता. आजपर्यंत अनेकांची लग्ने जमवली होती; परंतु स्वतःच्याच मुलीच्या बाबतीत मात्र माणसं ओळखण्यात आपण पुरते फसलो. जाळाला फुले समजून हात जाळून बसलो. या पश्चात्तापाच्या आगीत त्यांचे मन होरपळू लागले. कोणाशी मनातले फारसे न बोलणारे आजोबा त्या क्षणापासून आणखीनच अबोल होऊन गेले. काळजातील व्यथा कोणालाही सांगता येईना. दिवसेंदिवस चिंता त्यांना चितेकडे ढकलू लागली. खाल्लेला घास गोड लागेना... झोपेने पाठ फिरवली. तब्येत ढासळू लागली. शरीराचे आजार औषधाने बरे होतील; पण मनाचे काय?
          एके रात्री असेच झोप येईना; म्हणून अंथरुणावर ते तळमळत पडले होते. माईपुढे बसून त्यांनी थडाथड स्वतःच्याच तोंडात थपडाही मारून घेतल्या.
"ह्या ह्या हातानी मी शेण खाल्ले. बास्! आता डोळ्यांनी बघवत नाही आन् डोळेही मिटत नाहीत."
असे म्हणत ते रडू लागले. माईने समजूत काढली.
"आता झोपा. पाह्यजे तर उद्या जाऊन पोरीला घेवून या. आठपंधरा दिवस राहू द्या. मग बघू काय वाट घावती ते."
आजोबांनाही ते पटले असावे. डोळ्यांतून टीपे गाळतच त्यांनी डोळे मिटले.
देव म्हणाला, "तथास्तु!"
सकाळी आजोबा उठलेच नाहीत. देवाने त्यांचे ऐकले. आजोबांना काळझोप लागली. ते गेलेले कळल्यावर आबई मला घेऊन माहेरी आली.
            आजोबांच्या तिसऱ्याला आबईच्या सासरची मंडळी आली होती. मोठ्या मनाने तेराव्यापर्यंत आबईला माहेरी राहायची परवानगी दिली; पण अडचण एकच होती. लाडक्या नातवाला सोडून एवढे दिवस राहणे, त्यांच्या जिवावर आले होते. मला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा त्यांचा हट्ट होता. एवढे लहान बाळ आईशिवाय कसे राहील? हा व्यावहारिक युक्तिवादही त्यांना पटण्यासारखा नव्हता. आतापर्यंत दूध पाजण्यापुरतेच आबईच्या जवळ मला दिलेले होते. त्यांच्या दृष्टीने तर आबईची आता तेवढीही गरज उरलेली नव्हती. एकूणच समजावून सांगण्याच्या पलीकडे हे प्रकरण पोहचले, सगळे एकेरीवर आले; तेंव्हा मात्र पै-पाहुणे, शेजारी मध्ये पडले. त्यांची कसीबशी समजूत काढली खरी; पण तो त्यांना त्यांचा अपमान वाटला. एवढ्या तेवढ्यावरून चिडून ते निघून गेले.
          तेराव्याला आले; तेंव्हा मात्र वेगळाच गोंधळ सुरू झाला.
"हिला ठेवून घ्या. आम्ही काही तिला घेऊन जाणार नाही. आमचे पोर फक्त आम्हाला द्या."
हा त्यांचा शेवटचा निर्णय होता. वातावरण तापत गेले. हमरीतुमरीला सुरुवात झाली. आपण नेमके कोणत्या प्रसंगाला आलोय, याचेही भान त्यांना राहिले नव्हते. माई, मामा सगळे त्यांची समजूत काढत होते. हातापाया पडत होते. ती मंडळी मात्र ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. प्रकरण हातघाईवर आल्यावर शेवटी तालमीतली पोरं मध्ये पडली. ती या पाहुण्यांना सन्मानाने पार माळापर्यंत सोडवून आली.

मी परत आलो होतो...
होय! मी या पांढरीत परत आलो होतो.
यातील मला काहीच कळत नव्हते. तरीही मला कुठे कल्पना होती, आता पुन्हा आपण कधीच परत जाणार नाही म्हणून. मलाच काय कोणालाही असे वाटले नव्हते. आज ना उद्या वातावरणातला तणाव कमी होईल. सर्वकाही सुरळीत होईल, याच वेड्या आशेवर पुढचे दिवस उलटत राहिले. काही केल्या मनातली अढी निघत नव्हती. अनेकांनी समजूत घालण्याचे प्रयत्न केले. पण नात्यांमध्ये पडलेले अंतर काळासोबत वाढतच गेले. आणि मी मात्र याच गावात... आजोळात वाढत राहिलो. पुढे काही वर्षांनी वडिलांनी दुसरे लग्न केल्याचे कानावर आले. आबई त्यावेळी खूप रडली होती. काही दिवस तिने अंथरुणच धरले होते. कळता झाल्यावरही मला या गोष्टींचे नवल वाटत राहिले की, ज्या लोकांनी आबईचे जगणे अवघड करून सोडले होते... जो संसार तिच्या जिवावर उठला होता; तोच संसार तुटल्याचे तिने एवढे मनाला लावून का घ्यावे? वाह रे! संस्कृती ! धन्य त्या परंपराच्या जोखडात अडकलेल्या मानसिकतेची...!
          काहीतरी भलतेच घडून बसले होते. पण आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते की, आबईचा आणि तिच्या माहेरच्या लोकांचा तिरस्कार करणारी ही माणसं आपल्या वारसासाठी तडफडत होती. त्यांच्या घरात यापुढे मुलच जन्माला आले नाही अथवा येणार नव्हते, अशातला भाग नव्हता. तरीही त्यांना 'मी' हवा होतो. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते.
ही मंडळी शांत बसणार्‍यांपैकी नव्हती. काहीही झाले तरी त्यांना त्यांचा वारस हवा होता. म्हणून मग मला पळवून नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. त्याला उत्तर म्हणून माझ्याभोवती संरक्षक कडे तयार झाले. कडेकोट पहारे बसले. घरातील मंडळी डोळ्यांत तेल घालून जपू लागली. जसजसा मी मोठा होत होतो, तसतसे सदैव माझ्या अवखळ पावलांबरोबर आपली थकलेली पावलं जुळवत माई सावलीसारखी माझ्यामागे फिरत राहिली. कळतनकळतपणे मीही त्यामुळे आबईपेक्षा माईच्याच जास्तीत जास्त जवळ येत गेलो. इतका की, माईशिवाय माझी कुठलीच गोष्ट... कुठलीच आठवण पूर्ण होऊ शकत नाही.
            आपल्या जन्माबरोबर आपण अनेक नाती सोबत घेऊन येत असतो. मी जसजसा मोठा होत गेलो; तसतसे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, याची समज येत गेली. कोणी आंधळे... लंगडे... मुके... बहिरे असते. कुठलीतरी कमतरता घेऊन ते जगत असतात. तसे आपल्याही आयुष्यात काही नातीच नाहीत, हे कळून चुकले. बाकीची मुले अंधाराला, चोराला, बागुलबुवाला घाबरत होती. आपल्या वडिलांना ते बाबा, पप्पा, दादा, बप्पा, नाना, अण्णा, आबा, बापू, तात्या असे काही ना काही म्हणत होती. मला मात्र आपण वडिलांना काय म्हणावे? हा प्रश्न कधी पडलाच नाही. माझ्यासाठी एकच शब्द होता... 'बाप!'
'बाप' नावाच्या या माणसाला पुढे खूप नंतर पाहिलेले आठवतेय; तेंव्हापासून एक चित्र कायम मनावर कोरले गेले... मळकट कपडे, वाढलेली दाढी, नशेत तांबारलेले डोळे असलेला हा अस्ताव्यस्त अवतारातील 'बाप' नावाचा माणूस म्हणजे फक्त भीती...!
           त्यामुळे झाले एवढेच की, आयुष्यात मी स्वतःचा बाप सोडून इतर कोणाच्याही बापाला कधीही घाबरलो नाही...! असो.

(क्रमशः)

Monday, 14 March 2016

६...

          एक बैल, एक घोंगडी आणि गाठोड्यात मोजून चार भांडी घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. सोबत होती खांद्यावर घेतलेली चार वर्षाची मुक्ता... आणि तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला गोविंद हाताला धरून चालत होता. आज इथे तर उद्या तिथे... पोटाला चार घास मिळावे; म्हणून मिळेल तो कामधंदा करायचा. मन रमेना झाले की, पुढच्या वाटेला लागायचे. असे करत करत पैठणकडच्या कुठल्यातरी गावातून निघालेला एकनाथा दोन वर्षांनी पिंपळेश्वरमध्ये येऊन पोहचला. रात्र झाली म्हणून वेशीच्या आत चावडीत मुक्काम केला. गाव तर बरा वाटला. काही दिवस पोटाला कमी पडणार नाही. अजून किती दिवस असे बेवारशागत फिरायचे. एक तर पंढरपूर करून परत फिरायचे. नाहीतर कुठेतरी आता एका जागी स्थिर व्हायला पाहिजे.
            तीन दगडांच्या चुलीवर त्याने काहीबाही शिजवून लेकरांना खाऊ घातले. चार घास कसेबसे आपल्याही पोटात ढकलून तिथेच ऊबीला आडवा झाला. चावडीत तो एकटाच नव्हता. अजून एकदोघे बसलेले होते.
          "कोण गाव म्हनायचं पावनं?"
कोतवालाने चौकशी केली. थोडीफार जुजबी माहिती सांगून एकनाथा पुन्हा शांत झाला.
          एकनाथा म्हणजे पैलवान गडी. सकाळी उठावं, तालमीत मेहनत करावी. दिवसभर शेतीवाडीतली जमतील तेवढीच कामे करून आराम करावा. रात्री घाम निघेपर्यंत पुन्हा मेहनत करावी. कुस्त्या कराव्यात. खावे... प्यावे... निवांत मजेत राहावे. यात्रा... जत्रा... उरुसामधून कुस्त्यांचे आखाडे गाजवायचे... असे दिवस चालले होते. पुढे घरच्यांनी लग्न करून दिले. एक बापासारखाच गबरू मुलगा आणि एक नक्षत्रासारखी मुलगीही झाली. सगळे व्यवस्थित चाललेले असताना असे काय घडले कोणास ठाऊक? दुधात मिठाचा खडा पडावा, तसा एकनाथाचा संसार विस्कटला. बायको मरण पावली... घरदार, गाव सोडावे लागले. बायकोच्या मृत्यूने उघड्यावर पडलेला संसार सावरण्यासाठी धडपडणाऱ्या एकनाथाची संसाराच्या आखाड्यात मात्र पुरती दमछाक झाली होती.
           "आन! हे हाताला काय झालं म्हनं?" कोतवालाची चौकशी सुरूच होती.
          आपल्या मनगटापासून भुंड्या डाव्या हाताकडे पाहत एकनाथाने उसासा सोडला.
          "ऊसाच्या चरकात गेला. थोड्यावर भागलं... बरं तुमच्या या गावात कामाधंद्याची काय सोय हुईल का? काही दिवस राहावं म्हनतूय इथंच."
           दुसऱ्या दिवशी सकाळी तेल्याच्या घरी कामाची सोय झाली. तेल्याच्या घाण्याला बैल मिळाला आणि एकनाथाला बूड टेकवायला जागा. दिवसभर काम करून सकाळ संध्याकाळ तो तालमीत जाऊन बसू लागला. पुढील काही दिवसांत ओळखी पाळखी वाढत गेल्या. एकनाथाचे कसब लोकांपर्यंत पोहचू लागले. गावातील पांडूरंग देशमुख आणि शामराव पवार कारभारी या दोन मातब्बर असामी. त्यांच्या नजरेत एकनाथा आला. वर्षा दोन वर्षांतच तो त्या दोघांच्या गळ्यातील ताईत झाला. विशेषतः शामराव कारभार्‍याचा आणि एकनाथाचा तर चांगलाच दोस्ताना झाला. एकनाथा आता तालमीत बसून पोरांना डावपेच शिकवू लागला. मेहनत करून घेऊ लागला. पुढच्या पाच वर्षांत पोरांचा दबदबा वाढत गेला आणि एकनाथ आता पोरांचा वस्ताद झाला होता.
           गोविंद आणि मुक्ता मोठी होत होती. एकनाथही आता गावासाठी 'नाथाभाऊ' झाला होता. कारभार्‍यांनी दोस्तीला जागून आपल्या परड्याच्या पलीकडे असलेली जागा नाथाभाऊला देऊन तेल्याच्या अंगणातील त्याचा संन्याशाचा प्रपंच हक्काच्या जागेत वसवला. हाताशी आलेल्या गोविंदच्या जोडीने नाथाभाऊंनी हिश्याने दुसऱ्याची शेती कसायला सुरुवात केली होती. परिस्थिती पालटू लागली. देशमुखांच्या ओळखीने त्यांच्याच व्याह्याच्या गावात मुक्ताचे लग्न करून दिले. घरात उरले बापलेक. पण बापाप्रमाणेच गोविंदलाही तालमीचे वेड होते. त्यामुळे खाण्यापिण्याची सोय तालमीतच होऊन जाई. घरात चूल पेटली काय किंवा न पेटली काय? काय फरक पडणार...
          पूर्वी वाहतुकीच्या सोईसुविधा फारशा नव्हत्याच. एकतर पायी अथवा लांबचा पल्ला असेल; तर बैलगाडी. रात्री गावाजवळ तळ पडायचा. सकाळी उठून पुढे मार्गस्थ व्हायचे. असाच गावाबाहेरील कैकाड्याच्या लिंबाखाली तुळजापूरला निघालेल्या बैलगाड्यांचा तळ पडला होता. त्यात होती एक नऊ दहा वर्षाची चिमुरडी. गोरीगोरी पान... नाकीडोळी छान! इकडच्या तिकडच्या ओळखी निघाल्या. विषय निघाले. कोणीतरी नाथाभाऊला सुचवले. शामराव कारभार्‍यांनी पुढाकार घेतला. देशमुखांनी मुक्ताचे लग्न करून दिले होते; आता गोविंदच्या लग्नाचा बार कारभार्‍यांनी उडवून दिला. पुढच्या लग्नसराईत छोटीशी सून नाथाभाऊंच्या घरात नांदायला आली. नाथाभाऊ आपल्या या छोट्याशा सुनबाईला माई म्हणू लागले. गंमत म्हणजे गोविंदलाही आई नव्हती आणि माईलाही. लहान वयातच माईवर सगळी जबाबदारी पडली ती तिच्या शेवटापर्यंत. घर उभे राहत गेले... घराला घरपण येत गेले. चार जनावरे... शेळ्या... थोडीफार शेती होत होत ही मंडळी आता या गावचाच एक अविभाज्य भाग बनली होती.
          तो काळ हा माणूसकीचा होता. माणसांच्या अंगी नेकी होती, सच्चेपणा होता. माणसाला माणसाची कदर होती. दाराशी आलेल्या माणसाला तांब्याभर पाणी, बसायला पाट आणि जेवायला ताट देऊन मग कोण... कुठला... हे सवडीने विचारता येईल, असे साधे सोपे गाणित असायचे. नीतीमत्तेची चाड आणि पाप-पुण्याची भीडभाड पाळली जाई. एखाद्याचा सोयरा साऱ्या गावाचा सोयरा मानला जाई. त्यामुळेच आपला आब राखून जगणाराची गावात पत असे. नाथाभाऊची परिस्थिती तशी बेताचीच होती. तुमच्या दारातून येणारा जाणारा तुम्हांला नमस्कार घालत असेल; तर तुम्ही एक तर सत्तेवर पाहिजे किंवा तुमच्याकडे संपत्ती असायला हवी. हे नसूनही लोक तुमचा आदर करत असतील; तर तुम्ही विद्वान तरी आहात किंवा सच्चरित्र. नाथाभाऊकडे यांपैकी चौथी गोष्ट होती. नाथाभाऊंच्या नंतर गोविंदने हा वसा कसोशीने पाळला.
         काळाची चाकं फिरत राहिली. देश स्वतंत्र झाला. पुढे राज्यघटना आली. आणखी काही वर्षांमध्ये पंचायत राजही आले. गोविंदची चार माणसांत ऊठबस वाढली होती. गोविंदचा गोविंदराव झाला. चार एकराचे दहाबारा एकर झाले. साध्या घराला दिमाख आला. घरातले गोकुळ फुलत गेले. तीन मुलांच्या पाठीवर चौथी मुलगी झाली. खरं म्हणजे गावातील भावभावकी नसलेले एकटे घर असूनही सगळ्यांनाच धरून राहिल्याने गावानेही यांना परके मानले नाही. स्वभाव लाघवी असल्याने सोयरिकी जुळवायला असो वा सुख-दुःखाला असो. गोविंदराव पुढे असत. गोविंदराव आबांच्या शब्दाला गावात... सोयर्‍याधायर्‍यांत... मान मिळू लागला.
          गावाचा कारभार बघता बघता घरचा कारभार सांभाळायला मुले हाताखाली येत गेली. थोरला मोहन घरची शेतीवाडी सांभाळू लागला. मधला मुकुंद उद्योग-व्यवसायात शिरला. तर धाकटा माधव अजून शहरात शिकत होता. थोरल्या मोहनचे लवकरच लग्नही उरकले. एवढ्यात मुलीसाठी म्हणजे मालतीसाठी स्थळ आले. पाहुणे पाहायला आले; ते पाहणाराला गार करतच. अंगठा सोडून बाकीच्या बोटात अंगठ्या... बगळ्यालाही लाजवतील असे स्टार्चचे कपडे... डोक्यावर पुढारी छाप झोकदार टोपी... कुठेतरी दूर तिकडच्या अकलूजकडंच्या साखर कारखान्यात मुकादम का काय होते. लोकांच्या पगारी करणं त्यांच्याच हातात होतं म्हणे. दोन मुले. एक लग्न होऊन गेलेली मुलगी. थोरला लवकरच बापाच्या जागेवर कारखान्यात चिकटणार होता आणि धाकटा कसलातरी कंत्राटदार. भिमा नदीच्या काठावर सलग पन्नास एकर बागायती शेती होती. दिली होती दुसऱ्याला हिश्याने करायला. खेड्यातील पानसुपारी, तंबाखू खाणार्‍या लोकांत बसून पांढऱ्या कागदाची सिगारेट फुकणारा हा माणूस म्हणजे भलताच गोष्टीवेल्हाळ होता. त्याच्या एकेक गोष्टी ऐकून गावातील एकेक माणूस चाट पडला. आजपर्यंत अख्ख्या गावात नसलेली अपूर्वाईची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे भल्यामोठ्या धुराची रेषा सोडणारी मोटारसायकल होती. शहरातील पाहुणा होता. अशी सोयरीक गोविंदरावांच्या घरी चालून आली होती. लोकांचे एकच मत झाले,
          "पार्टी एकदम जंक्शन हाय. सोडून चालणार नाही."
मग काय? लग्न ठरलेही आणि महिनाभरात उरकलेही.
          काशिनाथ अर्थात तात्यासाहेब... एक जबरदस्त वल्ली होती. आठ हात लाकूड असेल; तर बारा हाताची ढलपी निघणारच. बोलणे असे अघळपघळ असे की, खरं म्हणजे या माणसाला इंदिराजींनी परराष्ट्र खात्याचे मंत्रीपद दिले असते; तर नुसत्या चर्चेनेच या महाशयांनी भारत पाकिस्तान प्रश्न सोडवला असता. काश्मीर सोडाच, पाकिस्तानने लाहोर कराचीही भारताला देऊन टाकले असते. एकूणच तात्यासाहेब बोलबच्चन होते. कारखान्यात नोकरी होती ती मुनीमाची. पन्नास एकर वगैरे कधी काळी असलीच तरी त्यातील आता केवळ पाच एकर उरली होती. गावाकडं चौसोपी वाडा होता; पण तोही गहाणवट पडलेला. जहागिरी केंव्हाच गेली होती; फुगिरी मात्र कायम होती. कमाईच्या मानाने खर्च भन्नाट होते. जुगार, नशा हे शौक खानदानी लोकांनीच करावे, असा त्यांचा रुबाब होता. उधळपट्टीला माप नव्हते. बडेमियाँचे गुण दोन्ही चिरंजीवामध्येही उतरलेले होते. वरून शहरातील गुंडपुंड मित्रांची कमी नव्हती. या सगळ्यांच्या नाड्या मात्र तात्यासाहेबांच्या सौभाग्यवतीच्या हातात होत्या. एकछत्री अंमल. बाई अशी जहांबाज की, एखाद्या गड्याची गचांडी धरायला कमी करणार नाही. बाहेर डरकाळ्या फोडणारे वाघ घरात मात्र कान कापलेल्या कुत्र्यांसारखे शेपूट आत घेऊन असत. अशा घरात मालती आली. लांडग्यांच्या दावणीला शेळी आणून बांधली गेली.
          नव्याची नवलाई लवकरच संपली आणि वास्तवाचे चटके सुरू झाले. मालतीला सासूरवास सुरू झाला. बडेजावासाठी हे लोक एकेक खड्डा काढत होते. हे खड्डे एवढे वाढले होते की, आपण विनाशाच्या खोल गर्तेत चाललोय, याचेही भान राहिले नव्हते. डोक्यावर कर्ज वाढतच चालले होते. शेतीवाडी, वाडा हातात राहिला नव्हता. पण नाहीतरी कोण तिकडे खेड्यात मरायला जाणार? त्यापेक्षा गेला तर जाऊ द्या. अशीच बापलेकाची भावना झाली होती. तर मालतीच्या सासूचा एकच आक्षेप होता.
          "एवढ्या अडचणीत आम्ही सापडलोय अन् तुझ्या दरिद्री माहेरच्यांना त्याचं काय सोयरसुतक आहे का? आम्हीच फसलो ही सोयरीक करून. त्यापेक्षा दुसरी एखादी सून घरात आणली असती; तर ती वजनाएवढे सोनेनाणे घेऊन आली असती. तेवढ्यात सगळे कर्ज तरी फिटले असते."
          सगळ्या अडचणीच्या मुळाशी मालती आहे, यातून बाहेर पडण्यासाठी तिचा काहीच उपयोग नाही. असा समज करून घेऊन मग उपाशी ठेवणे... मारझोड करणे हे नित्याचेच होऊन मालतीची जागा फक्त घरातल्या एका मोलकरणीची राहिली होती. पण वर्ष उलटले आणि मालतीचा त्रास काहीअंशी संपला. संपला म्हणजे तेवढ्या पुरता तरी थांबला. कारण तसे होतेच. मालतीला दिवस गेले होते. यांना यांच्या बुडत्या साम्राज्यासाठी वारस हवा होता आणि तो येणार म्हणून सगळेच खूष होते. फक्त मालतीला आता वेगळीच धास्ती लागली होती... समजा मुलगी झाली तर...?
          माझ्या लहानपणी माईकडून मी जेवढ्या गोष्टी ऐकल्या; त्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट होती. या गोष्टीत तसे तर विशेष असे काहीच नाही. या सर्व घटना म्हणजे विश्वातील अफाट पसार्‍यात कशातच काही नाहीत. कितीतरी अशा घटना नित्यनेमाने घडत असतील. या घडल्यामुळे काही मोठा फरक पडलेला नाही. समजा या गोष्टी घडल्याच नसत्या; तरी काही फार मोठी उलथापालथ झाली नसती. अगणित असंख्य क्षणांपैकी हे काही सामान्य क्षण होते. पण या घटनेत पुढील अनेक गोष्टींची नांदी होती. दोन वेगवेगळ्या ध्रुवांच्या एकत्र येण्यामुळे... दोन भिन्न धर्मी प्रकृतीच्या एकत्र येण्यामुळे... लाखो पेशींमधील कुठल्यातरी एका पेशीतील गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या एका जीवात्म्याचे भवितव्य ठरवणार होत्या. त्याच्या या अमूर्त जगातून मूर्त जगातील प्रवेशाचा मार्ग सुकर करणार होत्या. निराकार स्वरुपातून सगुण साकार देहाला एक खूप सुंदर मानवी जीवन जगण्याची संधी मिळणार होती. इतर कोणाला त्याचे काय कौतुक असणार! एवढेच सांगतो... माझ्यासाठी त्याला महत्त्व असायलाच हवे होते; कारण तो जन्माला येणारा जीव म्हणजे 'मी' होतो.
           आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच. मी कोणताही फार मोठा ऐतिहासिक... सामाजिक... आध्यात्मिक... वगैरे वगैरे वारसा घेऊन आलो नव्हतो. या अथांग अफाट विश्वातील मी तर एक नगण्य जीव. माझ्या असण्याने किंवा नसण्याने काहीही फरक पडणार नाही. तसेही जिथपर्यंतची पाळेमुळे मला माहिती आहेत; त्याची सुरुवातच मुळात 'एका' प्रवासाने झालेली होती. जन्माला येताना आपल्या हातापायांवरती काही खुणाही आपण घेऊन येत असतो. ज्योतिष् हस्तरेषांमधले मला काही कळत नाही. परंतु उजव्या तळपायावर ना एक भोवरा आहे माझ्या. त्यामुळेही असेल कदाचित. पण मग एका जागेवर कधी स्थिर बसणे मला जमलेच नाही. कायम ओढ राहिली ती पुढच्या प्रवासाची...! रोज सूर्योदयासोबत एक नवीन प्रवास...! आयुष्याचा!
          चिरंतन नावीन्य म्हणजे जीवन. जीवनाच्या या आकर्षणाला अंत नाही... मला जीवनाचा लोभ आहे... मला जीवनाची ओढ आहे... त्याहून जास्त मला जीवनाचे वेड आहे... एक विलक्षण जिज्ञासा अाहे. जीवनाची विविध रूपे पाहण्याची तडफड आहे. म्हणूनच एका ठिकाणी फार वेळ थांबत नाही... जिथे रंगतो... तिथे थोडावेळ रेंगाळतो... कंटाळा अाला की, पुढचा रस्ता पकडतो...!
         कुठून अाला??? माहीत नाही... कुठे चालला??? माहीत नाही. तरीही मी 'कोणी' आहे, हा अहं गप्प बसू देत नाही.
         अगोदरच तुम्हांला काय हसायचे, ते हसून घ्या. "हे तुझे नेहमीचेच!" असेही म्हणून घ्या. हवं तर 'वेडा' वगैरे वगैरे म्हणून घ्या. पण तरीही हे मी तुम्हांला सांगतोय... अर्थात मी तुम्हांला सांगतोय हे निमित्त!!! तसा तर माणसाचा स्वतःचाच स्वतःशी संवाद चाललेला असतो. परंतु हे सर्व उघड सांगायची सोय कुठेय??? नाहीतर मग लोक हे असे 'वेडा' वगैरे म्हणतात. आणि गंमत म्हणजे हे वेड थोड्याफार प्रमाणात सगळ्यांमध्येच असते. हा! हा!! हा!!! आता नेमके कोणते वेगळे संचित सोबत घेऊन मी येणार होतो कोणास ठाऊक...!

(क्रमशः)


Tuesday, 8 March 2016

५...

भव्यतेने कायम मानवी मनावर भुरळ घातलेली दिसते. मग ती वस्तू असो वा वास्तू... मानवी असो वा प्राकृतिक. खरं म्हणजे मनातला अहंकार एकदा का गळून पडला की, अशा भव्यतेपुढे आपण किती क्षुद्र आहोत; याची प्रकर्षाने जाणीव होते.
          बाहेरून येणारा कोणीही माणूस गावात शिरण्यापूर्वी वेशीत थबकतोच थबकतो. हत्तीवर उभा राहूनही पुरुषभर शिल्लकच राहील, एवढ्या उंचीची चिरेबंदी वेस स्वागताला उभी असते. आज ही अवस्था आहे; तर कधीकाळी काय वैभवाचे दिवस पाहिले असतील या वेशीने! असा विचार त्याच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आज दरवाजे कुठे दिसत नसले तरी; कधीकाळी ते असल्याच्या खुणा आजही दिसतात. वेशीच्या भिंतीला बाहेरच्या बाजूने छोट्या चित्रलिपीत कोरलेले काही दगड आहेत. काय अर्थ असेल त्यांचा? काहीतरी असेलच की. मला तरी कायम गूढ अर्थ जाणवतो त्यामध्ये.टृचा वेशीत येताच आठवते... पोळ्याच्या दिवशी बैलांची मिरवणूक येथूनच सुरू व्हायची. वेशीतून जनावरे आत जाताना शेतकरी बैलांवरून नारळ ओवाळायचा आणि जोराने वेशीच्या दगडी भिंतीवर मारायचा. नारळाचे तुकडे इतरत्र उडायचे; रिमझिमत्या पावसात ते तुकडे पकडण्यासाठी आम्हा चिल्लरपार्टीची झुंबड उडायची. आताही वेशीतून आत जाताना एखादा नारळ जोराने या चिरेबंदी भिंतीवर आपटावा असे वाटते.
          माझ्या लहानपणी वेशीच्या आतल्या बाजूला आता जिथे नव्याने बांधलेली ग्रामपंचायतीची इमारत उभी आहे; तिथे चावडी होती. पूर्वी चावडीत अर्जुना येसकर बसलेला असायचा. कानावरच्या पांढऱ्या कल्ल्यात मिसळून गेलेल्या मुठभर मिशावरून कायम उजव्या हाताची पालथी मूठ फिरवायची सवय. बाभळीच्या गाठीगत शिसवी शरीराचा अर्जुना कानापर्यंत उंचीची घुंगरे लावलेली काठी घेऊन उभा राहिला म्हणजे बघणाराच्या छातीत धडकीच भरायची. पुराणातील दैत्याप्रमाणे आडदांड असणारा अर्जुना बघितला की, मला उगीचच चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील मावळे आठवायचे. सोनार गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टीतला संभाजी कावजी असाच असेल का? अफजुल्याचे मुंडके एका हातात धरून "खान संपला!" म्हणून ओरडत गडाकडे पळत सुटलेला संभाजी... घोड्याच्या पोटाखाली मान घालून धनगराने मेंढरू उचलावे तसे उचलून गनिमाच्या अंगावर धावत जाणारा संभाजी... असाच असणार. गोष्ट ऐकताना मला संभाजीच्या जागी अर्जुना दिसत राही. असा हा अर्जुना गावातून फिरून दवंडी देत असला की, ओरडताना त्याच्या घशातील घाटी वरखाली हलत राहायची. आम्ही आपले त्याकडेच गंमत बघावी, तसे पाहत राहायचो.
           अर्जुना कधीमधी दारात आला की, माईला म्हणजे आजीला "वैनी!" म्हणून हाक मारायचा. हातातली काठी खाली टाकून डोक्यावरचे मुंडासे काखेत दाबून धरत सप्पय बैठक मारायचा. खरं म्हणजे देश स्वतंत्र होऊन आमचे आमच्याच बापाने लिहिलेल्या अधिकारांचे राज्य येऊनही अर्जुना बदलला नाही. माणसाला माणसापासून तोडणार्‍या अमानुष रूढींचा विटाळ अजूनही संपलेला नव्हता. आजीने पाणी दिलेल्या तांब्याला त्याने कधीच तोंड लावले नाही. डाव्या हाताने तांब्या धरून उजव्या ओंजळीने पाणी पिणारा अर्जुना चहा मात्र फुरक्या मारत प्यायचा. त्याचा अगदी साधा हिशेब होता. चहा जेवढा गोड; तेवढा फक्कड. मग भले तो वेगळ्या ठेवलेल्या कानफुटक्या कपातून असले म्हणून काय झाले! चहाला गोडी साखरेमुळे येते, कपबशी फक्त पिण्यासाठी. चहा पिऊन झाल्यावर लहान पोरांसारखी खुशीत मिटकी मारायचा; तेंव्हा तो पुन्हा वय विसरून लहान झालेला असायचा. घरातल्या लहानथोर सर्वांनाच आदराने तो 'अहो जाहो!' करून बोलायचा. आम्ही चिल्लरपार्टी जवळ गेलो की, पोटाला चिमटा घेऊन वाहणाऱ्या झर्‍यासारखा खळखळून हसायचा. एवढे निर्व्याज हसू मला पुन्हा कधीच पाहायला मिळाले नाही. मी मात्र या अर्जुनाकडूनच हसायला शिकलो. पण तेवढे तर अजूनही जमत नाही. एक गोष्ट तो न चुकता करायचा. तांब्यातल्या उरलेल्या पाण्याने कपबशी विसळून पालथी घालून ठेवायचा. दुर्दैवाने या प्रथेतील हीनता कळण्याचे ते वय नसल्यामुळे ती समज यायला पुढे काही वर्षे जावी लागली.
            भल्या जंगी वेशीमध्ये आणि तेवढयाच आडदांड अर्जुनामध्ये कमालीची एकरूपता होती. असं वाटावं की, त्या परमेश्वराने या दोन गोष्टी एकमेकांसाठीच बनविल्या असाव्यात. आज अर्जुना नाही आणि ती चावडीही; परंतु आठवणी कशालाही बांधील नसतात.
          वेशीतून सरळ आत आले की, बाजाराच्या पटांगणात एक तेवढाच मोठा दगडी पार बांधलेला आहे. त्यावर तेवढाच मोठा पिंपळ. पिंपळाखाली बुंध्याशी एक छोटी नरसोबाची घुमटी आहे. यामुळेच या पाराला नाव पडले 'नरसोबाचा पार.' हा नरसोबाचा पार कधीच रिकामा नसतो. अगदी भर दुपारी गावात शुकशुकाट असतो; पण या पारावर कोणी ना कोणी सापडणारच. पोरंठोरं खेळत असतील... म्हातारी कोतारी झोपलेली असतील... रिकामे टोळभैरव चकाट्या पिटताना दिसतील... अगदी कोणीच नसले; तर एखादा तळीराम कोणाच्या तरी नावाने शिमगा करताना आढळून येईल... यात्रा उरसाच्यावेळी पंचकमेटी घोंगड्या अंथरून येथेच बसणार. नोकरीधंद्याच्या निमित्ताने बाहेर असणारा कोणी गाडीतून उतरून गावात पोहचला की, आपलेपणाने स्वागताची सलामी येथेच मिळे. "आरं वा! आलं का गाव!" असे कोणी ना कोणी हमखास विचारणार. त्यात औपचारिकता नव्हती, आपुलकीची भावना असायची.
            याच पाराजवळ गोट्यांचे डाव रंगायचे. किरकोळ डावांना येथे संधी नव्हती. अटीतटीच्या लढती व्हायच्या. चांगल्या सातआठ गली आणि पिंपळाच्या सावलीत तेवढीच रिंगणे ओढलेली असायची. गोट्यावरून भांडणंही होत. पण पुन्हा डाव सुरू. गावात एखाद्याचे लेकरू सापडत नसेल; तर आईबाप फारसी काळजी करत नसायचे. चुकला फकीर मशिदीतच सापडणार. तसा मग जाणारा येणाराकडे निरोप जाई. तोही पाराजवळ येऊन नेमकं कार्टं शोधून काढायचा. आणि पालकाच्या भूमिकेतून चार शिव्या देऊन पोराची सन्मानाने घराकडे पाठवणी व्हायची. कधीकधी मोठी माणसं या पोरांवर रागवायची. पण कधीतरी कौतुकानं प्रेक्षक बनून खेळ पाहणारेही तुम्हांला येथे हमखास सापडले असते. गावभर फिरूनही गारेगारवाल्याचा जेवढा धंदा व्हायचा नाही; तेवढा तर नुसता पाराजवळच होई.
          चावडीच्या मागच्या अंगाला तालिम होती. पानटपरीवर गुटखा मावा खाऊन रूबाबात थुंकत बसणारी... आणि रात्री 'चियर्स!' करणारी परमीट बार-ढाबा संस्कृती गावात येईपर्यंत तालिम गजबजलेली होती. पाचपन्नास पोरं सकाळ संध्याकाळ तालमीतल्या तांबड्या मातीत घुमत होती. या पोरांना भल्या पहाटे छडीचे फटके मारून उठवायचे आणि हौदातील लाल माती घामाने ओली होईपर्यंत सकाळ संध्याकाळ त्यांच्याकडून मेहनत करून घ्यायचे काम वस्ताद म्हणून माझे आजोबा करत होते. त्यांना मात्र पोरं दबून असायची ती अर्थातच आदरापोटी... प्रेमापोटी...! पण कधीकधी तांबड्या अंगाने चावडीपुढे यायची, तेंव्हा ही पोरं आहेत कि भूतं असा प्रश्न पडायचा. या पोरांचा एकेकाळी काय दबदबा होता. सहजासहजी कोणी या पोरांच्या नादाला लागत नव्हते. कोणी नाद केलाच; तर बाद झालाच म्हणून समजा. तालुक्यात काय पार जिल्ह्यातले फड गाजवले. फड गप्पाचे असो वा कुस्त्याचे... रंगले नाहीत, असे झाले नाही. इब्लिसपणाही तेवढाच केला. यांचे एकेक किस्से असे इरसाल होते की, ऐकायला रात्र पुरणार नाही.
          वेशीतून आत पाराजवळ आल्यानंतर समोर गेलेला रस्ता म्हणजे बाजारपेठ. रस्त्याच्या दुतर्फा दुकांनाची गर्दी झालेली होती. किरणा मालापासून ते औषधे, कपडे, सोने सर्वकाही. अगरबत्तीपासून हत्तीपर्यंत उलाढाल चाले. रात्री नऊदहा वाजेपर्यंत पेठेत गजबज असायची. पुढे दुकाने आणि मागे चिकटूनच घर असलेल्या लिंगायत समाजाचे याठिकाणी चांगलेच बस्तान बसलेले होते. एखाद्या दुपारी जेवून खाऊन आळसावलेला वाणी बसलेला दिसला की, तालमीतली चारपाचजण उगीचच निमित्त काढून जाऊन बसायची. गप्पा मारण्याच्या कलेत चांगलेच मुरलेले असल्यामुळे विषयातून विषय निघत जायचे. हळूहळू एकेक गडी वाढत जायचा. बोलता बोलता यातला एक... त्यातला एक घास करत करत पाटीभर शेंगदाणे किलोभर गूळ आणि असंच काहीबाही संपलेले असे. पोरं गेल्यावर वाण्याला पत्ताही नसायचा, खोबरे किती कमी झाले आणि अजून काय पळवलेय. रात्री अपरात्री एखाद्याची बोरीची... द्राक्षांची... मोसंबीची बाग उतरून आणायची. तालमीत बसून संपवायचे आणि कचरा सगळा असाच कोणा तिसऱ्याच दारात नेऊन टाकायचा. अशीच ओढ्याला एकाने हातभट्टीची दारू काढण्याचा उद्योग सुरू केला होता. पोरांनी रात्रीच जाऊन सगळे कॅन भरून आणले आणि सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या टाकीत नेऊन टाकले. सकाळी नळाला पाणी सुटले खरे. पण पाण्याला दारूचा वास येत होता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली... 'नळाला पाणीपुरवठ्याऐवजी दारूपुरवठा!' वाचणारे हसले असतील; पण पोलीस खाते खडबडून जागे झाले.
           गावात एक पीराच्या नावाने सोडलेला वळू होता. तोही या तालमीतल्या पोरांसारखाच मस्तावलेला होता. त्याचा उपद्रव वाढतच चालला होता. कुणालाही जवळ येऊ देत नव्हता. जाणारा येणारालाही भिती वाटू लागली. एकदा त्याने सरपंचाच्याच बैलाला भोकसले. मग मात्र पोरांनी त्याला काढण्या लावूनच बांधून घातला. बरं देवाचा असल्याने मारताही येईना आणि विकताही येईना. दोन दिवस पाराजवळच बांधलेला होता. अन्न नाही आणि पाणी नाही. सरपंचाने तर कसायालाच बोलवायचे बाकी ठेवले होते. पोरांनाच मग त्याची दया आली. रात्रीत पोरांनी त्याला दूर फॉरेस्टात नेऊन सोडले. बरं एवढ्यावर थांबतील ती पोरं कसली! येताना तिथे कुंभाराचे गाढव आणून बांधले. सकाळी गावभर चर्चेला ऊत आला होता... 'कटाळ्याचं गाढाव झालं!'
           पोरांच्या असल्या उद्योगामुळे गावाला होणाऱ्या त्रासापेक्षा करमणूकच जास्त व्हायची. पोरं तशी दिलदार होती. एखाद्या सरळमार्गी माणसाला त्यांच्याकडून कधीच त्रास झाला नाही. पोरांच्या एकीमुळे तसा गावाला आधारही होता. तरी काहीजण पोरांवर नाराज होते. यांपैकी एक होता महालिंग सोनार. पोरं तालमीपुढे उघड्या अंगाने फिरतात याचा त्याला भलताच राग येई. अर्थात कारणही तसेच होते. या म्हाताऱ्याच्या घरात त्याची तरुण विधवा सून होती. दोष तर त्या बिचारीचाही नव्हता... आणि पोरांनीही कधी काही आगळीक केलेली नव्हती. तरीही काही निमित्त सापडले की, म्हाताऱ्या महालिंगाच्या तोंडाचा पट्टा सुरू होई. पोरांना तर शिव्या द्यायचाच वरून सुनेचाही उद्धार करून मोकळा होई. महालिंगाच्या शिव्याला पोरं वैतागली होती. त्याची खोड मोडण्यासाठी काय करावे, याचा विचार सुरूच होता. थोड्याच दिवसांत पोरांना संधी सापडली. थंडी असूनही म्हातारा दारात बाजले टाकून झोपला होता. कोणीतरी जाऊन हळूच अंगावर घोंगडी टाकून आला. ऊब लागेल तशी घरासमोर झोपलेल्या महालिंगाला गाढ झोप लागलेली पाहून पोरांनी एवढ्या अलगद त्याला उचलला की, त्यालाच काय बाजल्यालाही पत्ता लागला नाही. सकाळी म्हातारा जागा झाला ते स्मशानभूमीतच. बाजल्यासह पोरांनी त्याला पोहचवले होते. उशाशी एक मडके... कपाळावर अबीरबुक्यासह पोरांनी तयारी केली होती. पुढे काही दिवस गावाला हा टिंगलीचा विषय झाला होता. अशा एकेक गोष्टी मीठ मसाल्यासह ऐकवल्या जात. त्यातल्याच काही वार्‍यावर उडणार्‍या वावड्या चहूमुलखात पसरत गेल्या आणि गावाच्या वाट्याला प्रसिद्धीसोबत काही कुप्रसिद्धीही येऊ लागली. पण जेंव्हा फासेपारध्यांनी आसपासच्या गावाला चोऱ्यामाऱ्या करून घाईला आणले होते; तेंव्हा आमच्या गावातली माणसं मात्र या पोरांच्या जिवावर निर्धास्त झोपत होती. असो.
          बाजारपेठेतून पुढे गेले की, बाजारपेठेकडेच पाठ फिरवून बसलेल्या मारुतीचे मंदिर आहे. गाव जळाला; तरी हनुमान बाहेर, अशी एक म्हण आहे. पण आमचे हे बजरंगबली गावाच्या ऐन मध्यावर बसलेले आहेत. गावाची रचना पाहिली की, असे वाटते; ज्याने कुणी गाव वसवला असेल; त्याने या मंदिरावरच कंपासचे टोक ठेवून गावाचे वर्तुळ काढले असावे. मावळतीला तोंड असलेल्या या देवळापुढून एक सरळ रस्ता अगदी कडेपर्यंत गेला आहे. ही एक त्रिज्या आणि त्याला काटकोनात वेशीपासून अखंड गेलेला बाजारपेठेतील रस्ता म्हणजे व्यासच. पण तरीही केंद्रबिंदूवर बसलेल्या मारुतीरायानी पेठेकडे पाठ का बरे फिरवली असेल...? मारुतीचे हे मंदिर म्हणजे गावातील लोकांचे बसण्या उठण्याचे आणखी एक आवडीचे ठिकाण. रात्री जेवण उरकले की, तरुण मंडळाचे तरुण कार्यकर्ते गोळा होत. मध्यरात्रीपर्यंत सूरफाट्या म्हणजे आट्यापाट्याचा खेळ रंगे... लेझिम, झांजपथकाचे डाव चालत. मी मराठी शाळेत असतानाची गोष्ट आहे. दोन वर्षे पावसाने जरा ओढ दिली होती. गावकरी एकत्र आले. मारुतीचा आणि पिंपळेश्वराचा गाभारा पाण्याने भरायचा आणि सलग अकरा दिवस रात्री मारुतीवर अखंड धार धरायची ठरले. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचा खूप मोठा अपव्यय होणार होता; परंतु श्रद्धेपुढे बुद्धीचे काही चालत नाही, हेच खरे. गावाजवळ पुरेसे पाणी असणारी विहीर बामणाच्या मळ्यात होती. मानवी साखळी करून अकरा दिवस हा उद्योग चालला होता. आलटून पालटून मधली माणसं बदलत होती. आमच्यासारखी चिल्लरपार्टी देवघरातील तांब्या घेऊन हेलपाटे मारून मज्जाच मज्जा करत होती. गारठून गेलेल्या मारुतीरायांनी पाऊस पाडला शेवटी. हे एक बरे झाले. नाहीतर तेलही गेले आणि तूपही, अशातली गत झाली असती.
          गावाच्या पश्चिमेस नद्यांच्या संगमावर पिंपळेश्वर वसलेला आहे. जुने हेमाडपंती बांधणीचे मंदिर. त्याला जोडूनच आधुनिकीकरण झाले आहे, पण मुळचे सौंदर्य काही औरच आहे. आत गाभाऱ्यात अगदी गारगार अंधार जाणवायचा. डोक्यावर सदैव ठिबकणारी तांब्याची हंडी. महादेवाच्या पिंडीमागे असणारी नागाची पंचफड्याची दगडी प्रतिमा नंदादीपाच्या उजेडात अशी गूढ दिसायची की, वाटायचे क्षणात जिवंत होऊन डोलेल की काय! या पिंपळेश्वरावरूनच तर गावाचे नाव पडले पिंपळेश्वर. अशा एक ना एक आठवणी मनात दाटून येत होत्या. कॅमेर्‍याची फ्रेम लागली होती. कथा... पटकथा आधीच घडून गेलेली असल्यामुळे त्याचाही प्रश्न उरलेला नव्हता. जुन्या आठवणींनी हृदयाची वाढलेली धडधड कुठल्याही पार्श्वसंगितापेक्षा कुठेही तसूभरही कमी नव्हती. पात्रे ठरलेली होती. लोकेशन्स रेडी होती. आता फक्त फ्लॅशबॅकमध्ये कहाणी उलगडत जाणार होती. शेवट तर त्या विधात्याने केंव्हाचा ठरवून ठेवला आहे. फक्त तो कसा व्हावा, याची इच्छा बाळगण्याचा अधिकार माझा होता.
शेवट...
हं...!
या कहाणीचा शेवट तर माझ्यासोबतच होणार आहे. काही काळाचा मुक्काम संपवून आता पुढच्या प्रवासाला निघावे लागणार आहे...!

(क्रमशः)