Sunday, 12 June 2016

१७...

          आपल्याला पडलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला कुठे माहीत असतात? सातवीत असताना स्कॉलरशिप परीक्षेमधील गणिते सोडवण्याची एक नवीनच पद्धत गुरुजींनी आम्हांला शिकवली होती. माहीत नसलेल्या उत्तरासाठी 'एक्स' मानायचा. जी पदे माहीत आहेत; त्यांची योग्य क्रमाने मांडणी करून तिरकस गुणाकार केला की, हवे असलेले उत्तर सापडते. या अमानवी शक्तींसाठी 'एक्स' मानून उत्तर सापडेल कि नाही, कोणास ठाऊक! तुमचा जर देवावर विश्वास असेल; तर भूताखेतांना तुम्ही कोणत्या तोंडाने नाकारणार? खरं म्हणजे मी आस्तिक आहे का नास्तिक ते मलाच माहीत नाही; पण मी सृष्टीनियंत्याला मानतो. एक अमूर्त अशी शक्ती या विश्वाच्या पाठीमागे असल्याशिवाय हे सर्व इतके व्यवस्थित चाललेय तरी कसे? तुम्ही त्याला परमेश्वर म्हणा... अल्ला म्हणा... गॉड म्हणा... याने काय फरक पडतो? तुम्ही त्याला काय म्हणताय? तुमच्यालेखी तो कसा आहे? तुम्ही त्याला कोणत्या स्वरूपात गृहीत धरलेय? याने तरी काय फरक पडतो? पण अशी एखादी शक्ती तर असायलाच हवी.
          आपल्या बापजाद्यांनी पिढीजात जतन करून ठेवलेल्या ज्ञानामध्ये पंचमहाभूते सांगितली आहेत. आमच्या आधुनिक विज्ञानालाही ते मान्य आहे. पहा ना! किती गंमत आहे! पदार्थाच्या अवस्थांपैकी स्थायू, द्रव, वायू हीच अनुक्रमे भू, जल, वायू अशी महाभूते मानली आहेत. हे विश्व या घटकांनीच तर बनलेले आहे. याशिवाय असणारे तेज म्हणजे प्रकाश मानला आहे. तरीही शेवटी सांगितलेले पाचवे तत्त्व काय आहे? आकाश ही तर अमूर्त कल्पना आहे. पण या अथांग आकाशामध्ये अनेक प्रकारच्या लहरी, तरंग आहेत. आपण ज्याची कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न ऊर्जेने संपूर्ण विश्व भरलेले आहे. या ऊर्जेमुळेच या विश्वात चैतन्य भरलेले आहे. हे चैतन्य जसे ब्रह्मांडी आहे, तसेच ते पिंडी आहे. शरीरात मन कुठे आहे, हे सांगता येत नाही... आत्मा दाखवता येत नाही. तरीही शरीरातील चैतन्य संपले की, शरीर अचेतन होते. निघून जाणारी ही ऊर्जा म्हणजेच जर आत्मा असेल; तर परमात्मा म्हणजेसुद्धा हेच ते विश्वातील चैतन्य असावे.
          तुमच्या भावभावना, विचारांच्याही काही लहरी, तरंग किंवा तत्सम रूपातील काहीएक स्वरूप असेलच ना! तुमचे मूर्त शरीर आणि अमूर्त भावना यांच्यात काही ताळमेळ असेलच ना! मूर्त शरीराला आरंभ आणि अंत आहे. पण त्या अमूर्त ऊर्जेचे काय? ती कुठे जात असेल? भूतकाळातील घटना आठवणींच्या रूपात वर्तमानात डोकावत राहतात. पण काळाचे हे अवशेष केवळ आठवणींपुरतेच असतील, असे कसे म्हणता येईल? ही ऊर्जा धनात्मक असते; तशी ऋणात्मकही असते. भूतकाळात घडून गेलेल्या आहेत म्हणूनच कदाचित त्याला भूत म्हटले असावे. आपण मात्र आपल्या कल्पनेने त्याला वेगवेगळी रूपे दिली. शेवटी हे सारे मनाचेच खेळ. मी भूताखेतांचे स्पष्टीकरण देतोय, अशातला भाग नाही. पण त्याशिवायही अशा कितीतरी गोष्टी आहेत; ज्या आपल्याला नेणीवेतून नाही, तर जाणिवेतून कळतात. आपल्या मनाच्या पटलावर कुठल्यातरी अनामिक प्रोजेक्टरमधून काही प्रकाशित होत राहते. अशाच काही प्रकाश सावल्यांमधून आपण हवा तसा चित्रपट पाहतो. अर्थात असे मला आपले वाटते. असेच असेल असेही नाही. शेवटी हाही तर्कच... अंदाज पंचे दागवदर्शे.

"माई, तुम्ही कधी भूत पाहिलेय का हो?"
        मला माहीत होते की, हा प्रश्न ऐकून माई माझ्याकडे असे काही पाहतील की, जणू त्या खरंच भूत पाहत आहेत.
"हो...!"
आता विस्मयाने पाहण्याची पाळी माझी होती. अशा काही उत्तराची मलाच अपेक्षा नव्हती. त्यामुळे भूत पाहिल्यासारखा मीच माईकडे पाहू लागलो.
"काय म्हणालात?"
"तेच, जे तुम्ही ऐकलेत."
"यू मीन... म्हणजे तुम्ही खरंच भूत पाहिलंत? माय गॉड... विश्वास नाही बसत. खरंच सांगताय ना? केंव्हा? कुठे?"
माई शांतपणे माझ्याकडे पाहत राहिल्या.
"हे काय माझ्या समोर आहे. मला तरी वाटते की, यापेक्षा वेगळे भूत या जगात असूच शकत नाही."
"ओहो! हे होय? मग ठीक आहे. मला वाटलं..."
"काय वाटलं? आणि हा काय भलताच प्रश्न?"
"तो असाच. गंमत वाटली म्हणून सहजच विचारले. जाऊ द्या. सोडून द्या तो विषय."
माई हसल्या.

          या उन्हाळा सुट्टीत शब्बूआपाचे लग्न झाले. ती तिच्या सासरी गेली. मी मोठ्या मामासोबत गेलो होतो तिच्या लग्नाला. मला आपले उगीचच काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहिले. जे वाटत राहिले; त्यासाठी 'एक्स' मानून त्याचे उत्तर सापडेल का?
         सातवीमध्ये गेलो आणि सोनारगुरुजींची बदली झाली. ते जाणार याचे दुःख असले; तरी ते आता नवीन शाळेत मुख्याध्यापक म्हणून जाणार होते. त्यांना निरोप देताना प्रत्येक विद्यार्थी भावनाविवश झाला होता. डोळ्यांतून आसवांचे महापूर वाहत होते. विद्यार्थीच काय पण जाताना गुरुजींनाही त्यांच्या भावनांना बांध घालणे जमले नाही. त्यांचेही डोळे डबडबले होते. विभागावरील स्पर्धेसाठी आम्हांला पुण्याला जायचे होते; पण सोनारगुरुजी गेल्यावर हौसेने ही जबाबदारी घ्यायला कोणतेच शिक्षक तयार नव्हते. शेवटी पुणे दौरा ढेपाळला. आमच्या नाटकाचा हा अंक संपला होता. नवीन अंक येथूनच सुरू होणार होता.
          सोनारगुरुजी गेले आणि पवारगुरुजी आले. चौथीत स्कॉलरशिप परीक्षेमुळे या अभ्यासाची गोडी लागली होतीच. यशाची झलकही दुरून का होईना पाहिली होती. सातवीत पुन्हा नव्याने स्कॉलरशिपची तयारी सुरू झाली. यावेळी अभ्यास खूप अवघड होता. पण एक चांगले झाले होते. नवीन आलेल्या पवारगुरुजींमुळे अंकगणित व भौमितिक रचनांची मला गंमत वाटू लागली. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, क्षेत्रफळ, घनफळ असले एकेक नवीनच प्रकार होते. लसावि, मसावि, काळ काम वेग, संख्यारेषा असल्या अंकगणितातल्या भन्नाट गमती आणि त्यातही गुरुजी उत्तर काढण्यासाठी 'एक्स' मानून तिरकस गुणाकार करायचे त्याची गंमत वाटू लागली. मी माझ्या अनेक प्रश्नांसाठी असा 'एक्स' मानू लागलो. माझ्या परीने उत्तरे मिळविण्यासाठी धडपडू लागलो. हा वेडेपणा असेलही. पण त्यातही मजा होती. जगण्यासाठी मला कायम वेगवेगळे खाद्य हवे असायचे... ते या वेडेपणातून मिळायचे. जुने प्रश्न सुटो अथवा न सुटो. मी नव्या प्रश्नांच्या शोधात भटकू लागलो.
          स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासात मन रमण्याचे हेही कारण असावे. पवार गुरुजींनी एक चांगले केले होते, लेखनापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर दिला होता. तुम्ही जेवढ्या जास्त शंका घेऊन विचारण्यासाठी याल, तेवढा तुमचा अभ्यास जास्त झाला, असे सूत्रच मांडले होते. लिखाणाची नाहीतरी मला नावडच होती. मी हुरूपाने अभ्यासाला लागलो. यावर्षी मी स्पर्धांमधून जास्त सहभाग घेतलाच नाही. तरीही एक संधी मिळालीच. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचा एक कार्यकर्ता शाळेत आला होता. त्यांनी आम्हांला जादूचे प्रयोग करून दाखवले. हा केवळ करमणुकीचा कार्यक्रम नव्हता. प्रत्येकवेळी त्यामागील शास्त्रीय कारण व हातचलाखी कशी केले जाते, हे समजावून सांगितले. त्या आलेल्या पाहुण्यांना हाताखाली मदतीसाठी एक विद्यार्थी हवा होता. मुख्याध्यापक गुरुजींनी थेट वर्गातून मलाच बोलावून घेतले. त्यामुळे जवळून हे सगळे पाहता व अनुभवता आले. अंगात येणे हे ढोंग आहे, असे त्यांनी सांगितले. ज्याच्या अंगात आलेय, त्याला टाचणी टोचवा. अंगातील देव पळून जाईल. अशीही गंमत करायला सांगितले होते. यामुळे तर मी आणखीन नवनवीन प्रश्नांच्या शोधात गुरफटू लागलो.
          पाहता पाहता दिवाळी आली. माधवमामा गोव्यातील काम संपवून परत आला होता. यानंतर तो आता पुण्यात राहणार होता. पण सध्यातरी चांगले पंधरा दिवस गावी राहण्याच्या तयारीनेच तो आला होता.
          या ऊरुसाच्यावेळी शब्बूआपा आणि तिचा नवराही आले होते. शब्बूआपा आवर्जून सगळ्यांना भेटायला घरी आली होती. ती चक्क काळ्या रंगाचा बुरखा नेसून आली होती. आता तिच्यात बदल झाला होता. ती आता चांगलीच गोरीगोमटी आणि गरगरीत दिसू लागली होती. मोठीमामी तिला म्हणालीही,
"लगीन चांगलंच मानवल्यावनी दिसतंय, शब्बू."
शब्बूआपा फक्त हसली. नेमका त्याचवेळी माधवमामा घरी आला होता. आपा त्याच्याशीही अगदी हसून बोलली. मामाकडे पाहून मामीला म्हणालीही,
"यांच्या शादीची काय तयारी झाली का नाही? का हमारे उधर पाहायची एखादी?"
मामा उगीचच कावराबावरा झाला. सगळे हसून बोलत होते. मला मात्र सगळ्यांचा विनाकारण राग येत होता. जाताना ती मला तिच्या घरी चल म्हणाली. मी मनातून धूसफुसतच होतो. तरीही ती मला हाताला धरून तिच्या घरी घेऊन गेलीच. खरं म्हणजे मला शब्बूआपाच्या नवर्‍याला पाहायचे होते. तोही चांगला गोरागोमटा होता. सिनेमातल्या हिरोसारखा त्याने मधून भांग पाडलेला होता. मानेवर केस वाढवलेले होते. तो माझ्याशी हसून बोलला; तरीही तो मला आवडला नाही. मी लगेचच घरी निघून आलो.
          पहिली सहामाही होईपर्यंत मी अभ्यासात चांगलीच गती घेतली होती. तरीही वर्गातील पाच-सहाजण कायम स्पर्धेत होते. यामध्ये मुलीही होत्या. काही झाले तरी मुलींना आपल्या पुढे जाऊ द्यायचे नाही, हा मुलांचा हट्ट होता. तरीही मुलांच्या पुढे जाण्यासाठी मुली जिद्दीने धडपडत होत्या. वर्गातील अभ्यासाकडे कोणाचेही लक्ष नव्हते. सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त स्कॉलरशिपचाच अभ्यास चालला होता. शाळा सुटल्यावरही पटकन घरी जाऊन यायचे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत पुन्हा शाळेतच अभ्यासाला थांबायचे. पवार गुरुजींची अचानक चक्कर असायची. अभ्यास सोडून टिवल्याबावल्या चाललेल्या दिसल्या की, 'का रे फोकणीच्या!' अशी हाक आणि जोडीला पाठीवरून शाबासकीची थाप पडायची. अभ्यासिकेला थांबलेच पाहिजे असे बंधन नसे. त्यामुळे ज्याला अभ्यासच करायचाय, अशीच मुले थांबत. काही जुने विद्यार्थीही अभ्यासाला यायचे. एकूणच मग इमानदारीत अभ्यास चालायचा.
            फेब्रुवारी महिना उजाडला. अशाच एका रविवारी परीक्षेसाठी आम्ही तालुक्याच्या गावी बार्शीला गेलो. आतापर्यंत स्पर्धांच्या निमित्ताने अनेकदा बार्शीला येणेजाणे झाले असल्यामुळे बार्शी नवीन राहिले नव्हते. परीक्षाकेंद्रावर पोहचल्यावर आम्ही अगोदर जाऊन आपापले बैठक क्रमांक कोणत्या वर्गात आले आहेत? त्यातही कोणत्या ओळीत? मागे कि पुढे? बाक व्यवस्थित आहेत का? खिडकीजवळ आहे का? आपल्या खोलीत मित्रांपैकी कोण कोण आलेय? अशी काळजीपूर्वक तपासणी केली. मग समाधानाने सामुहिक भोजनाचा कार्यक्रम पार पाडला. दिवसभरात तीन पेपर होते. पहिला मराठीचा असल्यामुळे सर्वांनाच सोपा गेला. त्यामुळे सगळेच खुशीत. मधल्या ब्रेकमध्ये बाहेरच्या गाडीवर नुसती झुंबड उडाली. परंतु दुसरा नेमका गणिताचा पेपर होता. पेपर देऊन बाहेर येताना प्रत्येकाचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. यावेळी मात्र सगळेच गुपचूप झाडाखाली बसून राहिले. प्रत्येकालाच पेपर अवघड गेला होता. मला तर वेळच पुरला नाही. तरी बरे सगळे सोपे प्रश्न अगोदरच सोडवले होते.
           तिसरा बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर होता. माझा सगळ्यात आवडता विषय. पण पेपर सुरू होण्याची वेळ झाली आणि कोणीतरी एकजण पालक किंवा शिक्षक असावेत, ते आमच्या पर्यवेक्षकांना भेटून काहीतरी कानाफूसी करून गेले. जाताना कोपऱ्यातल्या एका मुलाकडे बोट दाखवून गेले. काहीतरी पाणी मुरत होते. पेपर सुरू झाला तरी माझे सगळे लक्ष पर्यवेक्षकाकडेच. शासनाने पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांना नेमले होते आणि मी बिनपगारी फूल अधिकारी बनून त्यांच्यावरच लक्ष ठेवून बसलो होतो. ते मात्र शांतपणे आपले काम करत बसले होते. जवळजवळ वीस मिनिटांनी त्यांचे काम उरकल्यावर ते वर्गात फिरत फिरत त्या कोपऱ्यातल्या बाकाजवळ गेले. मी सावध झालो. माझा पेपर सोडवायचे राहिले बाजूला. आता काय घडतेय, इकडे माझे लक्ष लागले. माझा संशय खरा ठरला. एक कागदाचा तुकडा ज्यावर त्यांनी उत्तरे काढलेली होती, त्यांनी त्या मुलाच्या पेपरवर ठेवला आणि जसे काही घडलेच नाही, अशा अविर्भावात पुढे सरकले. मी मोठ्याने ओरडलो.
"ओ सर, तो कागद उचला अगोदर. नाहीतर आमच्या गुरुजींनाच बोलीवतो."
          मला काय झाले होते कोण जाणे! मी खूप मोठे धाडस केले होते. आजपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडायचे. पहिल्यांदाच विद्यार्थी शिक्षकावर ओरडत होता. त्या सरांनाही हे अनपेक्षित असावे. तेही गडबडले. पटकन मागे जाऊन त्यांनी कागद उचलला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिला. माझ्याकडे डोळे मोठे करून पाहत होते. मी मोठा शहाणपणा केलेला होता. आता राहिलेल्या वेळात मला माझाही पेपर पूर्ण करायचा होता. त्यामुळे त्यांच्या मोठ्या डोळ्यांकडे कशाला पाहत बसतोय. भरभर प्रश्न सोडवत राहिलो. अर्थात आवडीचा विषय असल्यामुळे पेपर पूर्ण झालाही. आता काय प्रकाश पडणार ते निकाल लागल्यावरच कळणार होते. पेपर झाल्यावर मी गुरुजींना भेटून घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनाही माझ्या या उद्योगाचे कौतुक वाटण्याऐवजी गंमतच वाटली असेल.
          स्कॉलरशिपची परीक्षा झाल्यावर आता वर्गातील अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे होते. मार्च महिन्यात सकाळची शाळा आणि दुपारी सुट्टी असे. मी माझ्यापुरते नियोजन बनवून टाकले होते. शाळेतून आले की, जेवण करायचे आणि एक छोटी सतरंजी आणि अभ्यासाचे साहित्य घेऊन बाहेर पडायचे. पिंपळेश्वराचे मंदिर संगमावर होते. तिथे जवळच नदीवर एक छोटासा बंधारा बांधलेला होता. नदीला लागूनच करंज्याची झाडे होती. एक भले मोठे चिंचेचे झाड होते. तिथल्या गर्द सावलीत आमचा तळ पडे. अभ्यासासाठी चांगली निवांत जागा होती. दुपारच्या ऊन्हाच्या वेळीही चांगली सावली पडायची. कधीकधी तिथेही झोपायला म्हातारी माणसे यायची. ऊन्हे उतरली की, मग मी बंधार्‍याच्या सावलीत खडकावर पाण्यात पाय सोडून बसायचो. खूप गंमत वाटायची अभ्यास करताना. छोट्याशा चिंगळ्या पायाला गुदगुल्या करायच्या. त्यांना काहीतरी खायला मिळेल या आशेने पायाला चिकटायच्या. कधी इथे तर कधी तिथे असा अभ्यास चाललेला होता.
          माझे वेळापत्रक चांगले चालले होते. परीक्षेपूर्वी ताजा ताजा अभ्यास होत होता. पण कधीकधी बाकीचे गडीही अभ्यासाला यायचे. मग अभ्यास सोडून बाकीचेच उद्योग चालू व्हायचे. दिवसभर नुसता हैदोस होत राहायचा. मग मला दुसरी जागा शोधणे गरजेचे बनले. नदीच्या वरच्या अंगाला बामणाचा मळा होता. तिथेच बामणाची मोसंबीची लिंबोणीची बाग होती. राखणीची कुत्री फार तिखट होती. तिकडे कोणालाही फिरकू द्यायची नाहीत. बामणही फार फाटक्या तोंडाचा होता. पोरं जाम टरकून असायची. एके दिवशी असाच बंधार्‍यावर अभ्यास करत बसलो असताना बामणाचा गणू आला. वयाने वाढूनही भोळसट राहिलेला बामणाचा हा पोरगा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. वसतीला तो मळ्यातच असायचा. लग्नाचा विषय काढला की, गणोबा भलतेच खूश होत. तशी तर बर्‍याच वेळा जातायेता आमची भेट व्हायची. मला चांगली संधी मिळाली. मी गणासोबतच बोलतबोलत मळ्यात गेलो. लिंबोणीच्या बागेत झाडाच्या पोटाशी गर्द सावलीत गपगार वाटू लागले. मी शांतपणे पडून वाचत राहिलो.
          जरा वेळाने बामण आल्यावर त्यांनी विचारले,
"कोण आहे रे तिथे?"
पण माझ्याअगोदरच गणोबाने माझी बाजू सावरून नेली.
"कोणी नाही, दादा. मीच चल म्हटले त्याला बागेत अभ्यासाला. मला वसतीवर तेवढीच सोबत."
नाहीतरी बंधार्‍यावर अभ्यास करताना अनेकदा त्यांनीही मला पाहिलेले होतेच. बसतोय ना शांतपणे अभ्यास करत, मग बसू द्या. उलट पोरालाही वसतीवर सोबतच होते. म्हणून मग तेही दुर्लक्ष करू लागले. अभ्यासाला जागाच अशी भारी सापडली होती की, बस्! पुढे अनेक वर्षे मी याच ठिकाणी अभ्यासाला येत राहिलो. गणोबा त्याचे काम करत राहायचा. मी काही झाडाच्या पोटातून बाहेर पडायचे नाव घेत नसे. सायंकाळी ऊन्हे पिवळी तांबडी होऊ लागली की, बागेतून बाहेर पडायचो. विहिरीवर पांढऱ्या चाफ्याचे झाड होते, त्याला टेकून धावेवरच्या दगडी कठड्यावर बसायचो. मावळतीचे पिवळे ऊन, विहिरीचा दगडी कठडा आणि पाने कमीच पण पांढऱ्या फुलांनी भरून गेलेले चाफ्याचे ते वेडेवाकडे झाड... असे ते चित्र आजही मी विसरू शकत नाही. परीक्षा संपल्यानंतरही मी मळ्यात जात राहिलो. गोष्टींची पुस्तके वाचली. दुपारची छान झोप काढली. पण ऊन्हाचे ते दिवस आणि बामणाचा मळा यांचे एक अतूट नाते तयार झाले होते. उन्हाळा सुरू झाला की, आजही मला बामणाचा मळाच डोळ्यासमोर दिसतो.

(क्रमशः)

Wednesday, 1 June 2016

१६...

          काचेच्या लोलकातून प्रकाशाचा एक कवडसा जातो खरा; परंतु बाहेर पडताना मात्र सप्तरंगाच्या छटा घेऊनच बाहेर पडतो. या छटा लोलक त्याला देत नाही. त्या त्याच्याच अंतरंगात सामावलेल्या असतात. लोलक फक्त त्याला त्याच्या आत लपलेले जे आहे, त्याचा साक्षात्कार घडवतो. मी तरी काय आहे? एक साधा प्रकाशाचा कवडसाच. राममंदिराच्या प्रकरणामुळे मला पहिल्यांदाच धर्माची जाणीव झाली... तर भूकंपाने निसर्गाच्या प्रलयंकारी शक्तीचे दर्शन घडवले... शब्बूआपा असो कि सुजितची मम्मी, कुठेतरी त्यांनी मला अंतर्मुख व्हायला भाग पाडून माझे अंतरंग ढवळून काढले... बालनाट्य स्पर्धेमुळे माझ्यातील असलेला कलेचा एक अंकुर तरारून वर आला... माई, वेणू, माधवमामा, गुरुजी, बल्लू, ओमी, सुजित प्रत्येकजण लोलक बनून माझ्यासारख्या एका कवडशाला त्याच्यातील सप्तरंगांची जाणीव करून देत राहिले. या काळात माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती... घडणारी प्रत्येक घटना माझ्यासाठी लोलकाचीच भूमिका वठवत होते. मी माझ्याही नकळत आधिकाधिक अंतर्मुख होत होतो. माझी भूक खादाड बनली होती. येईल तो अनुभव मी पचवत होतो. स्वतःभोवती एकेक धागा विणत होतो. कोशात शिरण्यापूर्वी जे जे घडायला हवे, ते सारे घडत होते. नियतीच ते सारे घडवून आणत होती. या बाबतीतही मी भाग्यवान होतो.
          तुमचा अमानवी गोष्टींवर विश्वास आहे का? उत्तर देण्याऐवजी उलटून हाच प्रश्न तुम्ही मला विचारू शकत नाही. कारण याचे उत्तर मलाच नीट माहीत नाही. सांगायचा प्रयत्न केला; तरी ते तर्कसंगत असेलच, असेही नाही. आपण समजतो तशा भूत, पिशाच्च, भटकते आत्मे, अघोरी शक्ती, इत्यादी वगैरे गोष्टी मला फक्त सुरस कथांमधूनच ऐकायला चांगल्या वाटतात. पण वास्तवामध्ये तार्किक बुद्धी यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. बरं विश्वास का ठेवावा? यामागे पटण्यासारखे काही लॉजिक तर हवे ना! पण एक गोष्ट आहे... भीती. तो सिग्मंड फ्रॉईड का कोण तो, त्याच्याही मते मानवाच्या सर्व भावनांच्या मुळाशी भीती असते म्हणे. लहानपणी तसे सगळेच कशाला ना कशाला भीत असतात. पण मोठ्या माणसांनाही कसली ना कसली भीती असतेच जणू. युगानुयुगे माणूस घाबरत आला आहे म्हणजे त्याला भीती वाटावी असे काही असेलच ना? भले आपण समजतो तशा गोष्टी नसतीलही. काही गोष्टींमागे वेगवेगळी नैसर्गिक, शास्त्रीय कारणे असतीलही. तरीही कुठेतरी असे वाटत राहते की, असेही काहीतरी नक्कीच असायला हवे; जे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. दृष्टी, ध्वनी, रस, गंध, स्पर्श याच्याही पुढे जाऊन जाणीव नावाचा काही प्रकार असावा. म्हणालो ना, तुम्हांला पटणार नाही कदाचित.
          माधवमामाने मला पिराच्या विहिरीत पोहायला शिकवले होते. पण मामा नसताना मी विहिरीवर कधीच गेलो नाही. त्याऐवजी मी बाकीच्या पोरांसोबत डोहावर पोहायला जाऊ लागलो. त्याच डोहावर वरच्या बाजूला खडकावर काही ठिकाणी शेंदूर थापलेला होता. या आसरा होत्या म्हणे. सगळे या डोहाला साती आसरांचा डोह म्हणत. एक म्हसोबाही त्यांच्यामध्ये होता. वर्षानुवर्षे ते सगळे तिथेच होते. म्हातारी माणसं यांच्याविषयी बरेच काहीबाही सांगत. आसरा म्हणजे पाण्यातल्या अप्सराच. पण जेवढ्या देखण्या; तितक्याच भयानक. दुपारच्या निर्मनुष्य वेळी सूर्य ऐन माथ्यावर आला की, यांची जलक्रीडा सुरू होते. अशावेळी जर कोणी त्यांच्या तावडीत सापडला; तर त्या त्याला आपल्या मेळात घेतात. त्याला पाण्याखाली आपल्या राज्यात घेऊन जातात. जोपर्यंत तो त्यांच्या अंकित राहतो; तोपर्यंत तो स्वर्गीय सुखात राहतो. पण तो त्यांच्या हाताला लागत नसेल; तर तो कामातून गेलाच म्हणून समजा. अशा काही विलक्षण दंतकथा ऐकायला मिळत. त्यामुळे एकप्रकारची भीती मनात जागी होत असली; तरीही वेगळेच कुतूहलही मनात तयार होत होते.
          सकाळी स्वच्छ नितळ दिसणारे डोहाचे पाणी ऊन्हे कलू लागली की, गोठलेल्या मधासारखे दिसायला लागे. सकाळच्या उन्हात तळाचा तांबडा खडकसुद्धा दिसायचा. याच्या उलट सायंकाळी हा डोह एखाद्या कृष्णविवरासारखा दिसायचा. असे वाटायचे की, याच्यातून आत जाणारा पलीकडे कुठेतरी दुसऱ्याच विश्वात निघत असावा. मला कधीतरी एकदा त्या डोहाच्या गर्दकाळोख्या पाण्याखालील अद्भूत जगात जायचे होते. आतापर्यंत चंपक, चांदोबासारख्या कॉमिक्स पुस्तकातून पर्‍या, राक्षस, चेटकिनी, चमत्कार वाचलेले होते. त्यामुळे वाटायचे की, आपणही सिंदबाद, हातिमताई यांच्यासारखे वेडे धाडस करायला हवे. त्याशिवाय हे अद्भूत जग पाहायला कसे मिळणार? पण अडचण एकच होती, मला तेवढे चांगले पोहता येत नव्हते आणि एकट्याने जाण्यापेक्षा एखादा सोबती मिळायला हवा होता. बल्लूला ही कल्पना सांगितल्यावर तो माझ्याकडे असा काही पाहत राहिला की, पुन्हा त्याला विचारण्याचे माझेच धाडस झाले नाही. आणि... तसेही एकट्याने जाणे मलाही शक्य नव्हते. 
          रामोशाचा एक तरणाबांड पोरगा होता. अंबादास. तो तालीम करायचा. तो असाच कुणाच्याही सांगण्याला न जुमानता भर दुपारचा पाण्यात उतरला. चांगला तासभर पोहत होता. एकटाच. खडकावर चढून मोठ्याने किलकारी मारायचा अन् पाण्यात उड्या मारायचा. अंग घुसळून पाणी ढवळून काढत होता. काही गुराखी दुरून कुरणातून त्याची मजा बघत होते. पोहायचे झाल्यावर चांगला तासभर पाण्यात बसून राहिला. त्याला काहीच झाले नाही. जसा आला; तसा निघूनही गेला. पुढे दररोज भर दुपारच्या वेळी तो पोहायला येऊ लागला. तासन् तास उघड्या अंगाने खडकावर बसून खूळ लागल्यासारखा नुसता पाण्याकडे पाहत राहायचा. तरीही काहीच झाले नाही. पण त्याने तालीम सोडली. व्यायाम सोडला. अगोदर कुस्त्याच्या निमित्ताने तो सार्‍या मुलखात फिरायचा, तेही बंद झाले. पुढील सहा महिण्यात तर तो पार खंगून गेला होता. शेवटी शेवटी तर चालताना पाऊल टाकणेही त्याच्या जिवावर येई. धाप लागू लागली... कण्हू लागला... विव्हळू लागला. चरकातून काढलेल्या चिपाडासारखा तो वाळून गेला होता. शेवटी त्याच डोहात त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याचे हे असे गायब झालेले कोणालाच कळले नाही. तो पाण्यात बुडाला आहे हे माहीत नसल्यामुळे सर्वत्र त्याचा शोध घेतला. कुठेच सापडला नाही. तिसर्‍याच दिवशी तो फुगून वर आल्यावर लोकांना कळले. मग मात्र बरेच दिवस कोणीही डोहाकडे फिरकले नाही. विशेषतः अमावस्या-पौर्णिमेला भर दुपारच्या ऊन्हात कोणीच डोहात उतरायचे नाही. अगदी जनावरे राखणारे गुराखीही पलीकडे कुरणातच थांबत. माणसं सोडा, पण म्हशीही कधी यावेळी डोहात उतरलेल्या मी पाहिल्या नाहीत. 
          अधूनमधून कधीतरी कोणी ना कोणी तिथे पूजा करताना आढळून येई. अमावस्या-पौर्णिमेला नारळ फोडले जात. पण कधी कधी कोंबडेही असायचे. सटी सहामाहीला पाण्यात परडी सोडण्याचा विधीही असायचा. नव्या टोपलीत सात पोळ्यांचे नैवेद्य, सात चोळीखण, सात चुडे, सात वेण्या, सात आरसे, फण्या, कुंकवाचे करंडे, सर्व प्रकारची सात सात खेळणी असे भरगच्च टोपली भरून पाण्यात सोडले जाई. सात सवाष्णी जेवू घातल्या जात. म्हसोबाला कोंबडा असे. गंमत म्हणजे या सर्व नैवेद्याचा मान कोणा ब्राह्मणाला नसे. महारमांग येथे मानकरी असायचे. अशाच कोणाच्या तरी कार्यक्रमाला सवाष्ण म्हणून आबईला बोलावले होते. तिथे बसल्या जागीच ती झुलू लागली. आबई आता झाड बनली होती. माणूस आणि अमानवी शक्तींमध्ये संवादासाठी माध्यमाची गरज असते. अशा माध्यमाला खेड्यातील भाषेत 'झाड' म्हणतात. होय! पुढे या आसरा तिच्या अंगात येऊन संवाद साधणार होत्या.
          आबईने अनेक दुःखे... अनेक भावना मनातच खोलवर दडपून टाकलेल्या होत्या. तिच्या या मानसिक तणावाचा परिणाम तिच्या आरोग्यावर दिसत होता. ती मोठ्यामामीसोबत शेतात जायची. घरातलीही बरीचशी कामे ओढवून घ्यायची. सतत कुठल्या ना कुठल्यातरी कामात स्वतःला गुरफटून घ्यायची. तरीही उरलेल्या वेळात ती कायम आजारी असायची. आता आपण परत कधीच सासरी जाऊ शकणार नाही, हे तिने फार मनाला लावून घेतले होते. याविषयी कोणी काही बोलतेय कि काय? याच धसक्याने ती कुणाशी काही बोलायचीही नाही. शंखात अंग चोरून घेणारी गोगलगाय बनून तिने आपल्या आणि जगाच्या मध्ये एक कवचाची न दिसणारी भिंत बनवलेली होती. पण तरीही या कवचात तिची घुसमट होत असावी. याचा परिणाम तिच्या अंगात येण्यामध्ये दिसून येऊ लागला. अशा अंगात येणाऱ्या अनेक बायका खेड्यातून आढळतील. नवरात्रात तर अशा अनेक झाडांना झुलताना आम्ही पाहायचो. आपल्या मागण्या मागून झाल्या की, ही झाडे हात पुढे करत. मग हातावर हळदीकुंकू, लिंबू, पेटलेला कापूर ठेवावा लागे. ते खाऊन झाले की, मग झाड शांत होई. अशा अनेक देवीदेवतांनी पिढ्यान् पिढ्या खेड्यापाड्यातून माणसांवर अधिराज्य गाजवलेले आहे.
          अंगात येण्याच्या प्रकारामुळे आबईचा एक फायदा मात्र झाला. बायकांमध्ये आबईला आदर मिळू लागला. गावातल्या जुन्या बायकांपैकी एक कलामावशी होती. ती या आसरांची भक्त. गावात आसरांची कुणाचीही पूजा असली; तरी तिथे कलामावशीशिवाय पानही हलत नसे. ती आता आबईची स्वयंघोषित गुरूबहीण झाली. दर अमावस्या-पौर्णिमेला आसरांची पूजा होऊन त्यांना नैवेद्य पोहचू लागला. मला या सगळ्या गोष्टींचे हसू यायचे. पण मोठी माणसं कमालीची श्रद्धाळू होती या बाबतीत. वर्षातून एकदा कुणाची ना कुणाची मोठी पूजा असायचीच. अशावेळी तिघीचौघींच्या तरी अंगात यायचेच. कुणी केस मोकळे सोडून नुसत्याच घुमायच्या. कुणी आळोखेपिळोखे देऊन नुसत्या दातओठ खायच्या. कुणीतरी बोलायच्या; पण भानावर नसायच्या. अशा झाडामध्ये येऊन देव काय हवे नको ते सांगायचे. काय कमीजास्त असेल ते मागायचे आणि प्रापंचिक अडचणी सोडवण्याचे आश्वासन देऊन शांत व्हायचे. केस मोकळे सुटलेले, कपाळावर मळवट भरलेला, ग्लानीमध्ये जाऊन घुमल्यासारखे बोलणे, दातओठ खाणे हा प्रकार फार असुरी वाटायचा. त्यामुळे अशा देवीदैवतांपासून मी चार हात लांबच राहिलो.
          मला एका गोष्टीची गंमतच वाटते, या देवीदेवतांच्या इच्छा मात्र सगळ्या मानवी होत्या. टाटाबिर्लाने शेजार्‍याला चुना मागावा, अशातला प्रकार झाला. एकदा कलामावशीच्या अंगात आल्यावर तिने सगळ्या गोष्टी ऐकणाराला पटतील अशा सांगितल्या. फक्त 'देवा काही इच्छा राहिलीय का?' असे विचारल्यावर 'डिंकलाडू खावासा वाटतो' असे उत्तर दिले. हे फारच अगम्य कोडे होते माझ्यासाठी.
          लहानपणी ऐकलेल्या सुरस कथांपैकी आणखी एक कथा म्हणजे वेताळ. विक्रमवेताळाच्या गोष्टीतील वेताळ मला फार असहाय्य वाटायचा. त्यामानाने सुताराच्या मेटापलीकडे बाभळीच्या सावलीत पारावर बसलेला वेताळ फार जबरा होता. शेजारीच मरीआईचे देऊळही होते. आषाढ महिण्यातच काय ती यांची आणि आमची गाठ पडे. मंगळवार वा शुक्रवार गाठून यांच्या पूजा होत. तांब्यात पाणी आणि कडूलिंबाची डहाळी घेऊन घरच्यांसोबत आम्ही जायचो. याही देवाला अधूनमधून अंडे, कोंबडा किंवा क्वचित बकरेही मिळायचे. इतरवेळी मात्र आम्ही या वेताळाकडे फिरकायचोही नाही. बैलगाडीच्या चाकापेक्षाही मोठ्या आकाराच्या शेंदूर फासलेल्या वेताळाचा उगीचच धाक वाटे. याने कुणाचे काही नुकसान कधीच केलेले नव्हते. तरीही याचा दरारा वाटायचा. वेताळ म्हणजे सर्व भूतांचा राजाच. गावाच्या चहूबाजूला असणाऱ्या सगळ्या भूतांवर याचा अंमल चालायचा.
          गावाच्या दक्षिणेस मेंढशिंग माळ पसरलेला आहे. या माळावर कुठेही उभे रहा. सलग असा भलामोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. माळाची सुरुवात फाटकीच्या तळ्यापासून होते आणि शेवट पंधरकीत. कमीतकमी चार मैलाचा टापू आहे हा सगळा. अमावस्येला याच माळावरून फाटकीच्या तळ्यापासून वेताळाची पालखी निघे. सगळी भूते यावेळी एकत्र जमतात म्हणे. दिवटीच्या उजेडात आपल्या या राजाची पालखी खांद्यावर घेऊन कुठेही न थांबता पंधरकीपर्यंत जातात. तिथून परत फाटकीपर्यंत आल्यापावली पळतच निघायचे. मग जेवणाच्या पंगती बसतात. माणसांना काय मिळेल, असे भारी भारी एकेक पदार्थ असतात यावेळी. गावातील काही अचाटवीर आपण या पंगतीत जेवून आल्याचे सांगतात. भूतांना कळणार नाही अशा बेताने गर्दीत मिसळून जायचे. हवे तर डोक्यावर घोंगड्याची खोळ घेतली की, चेहरा झाकून जातो. जेवायला बसल्यावर बोलायचे नाही. वाढणारालाही 'पुरे' म्हणायचे नाही. वाढणारे वाढतच राहतात. आपल्याला हवे तेवढे खायचे. ताटाला मध्यभागी भोक असते. नको असलेले ताटातून खाली टाकायचे. त्याची माती होऊन जाते. भूतांनी जर अशा आगंतुकाला ओळखले; तर मात्र घोळसून मारतात. पण जर तुम्ही धाडसी असलात आणि वेळ मारून नेलीत; तर तुम्हाला वेताळाशेजारीही रुबाबात बसता येते. अशा चविष्ट गप्पांची मैफिल शेकोटीभोवती, कट्ट्यावर बसले की, हमखास रंगायची. मला एकदातरी ही मिरवणूक पाहायची इच्छा होती. कधी रात्री अचानक जाग आली आणि त्यातही ती अमावस्येची रात्र असेल; तर माळाकडे पाहायचो. किमान माळावरून धावणारी पालखी नाही, निदान दिवट्यांचे उजेड तरी दिसतील, अशी आशा असायची. पण ती कधीही पूर्ण झाली नाही, हा भाग अलहिदा.
          सुताराचा नान्या मात्र गांज्याची तार चढली की, एखाद्या दोस्ताला बोलावे, तसा पारावर बसून वेताळाशी गप्पा मारत राही. वेताळाशी एकेरीवर बोलणारा नान्या म्हणजे काय? रामकटीसारखा उंचच उंच, छातीच्या बरगड्या तर एक ना एक मोजून घ्याव्यात. जरा काम केले की, छातीचा भाता सुरू व्हायचा. काय विशेष असेल कोणास ठाऊक. असा हा नान्या तांबारलेले डोळे वटारून हातवारे करत दातओठ खाऊनच वेताळाशी बोलायचा. त्याच तारेत बैलगाडीचे चाकसुद्धा सहज उचलायचा. पण हाच नान्या नशेत नसल्यावर मात्र चोरट्या नजरेने भिजलेल्या मांजरासारखा त्याच वेताळाकडे पाहायचा. कधीकाळी वेताळाच्या पंगतीला तो बसून आलाय, असे सगळे म्हणायचे.
          भूताखेताच्या गोष्टींना तर ऊत आलेला होता. कोणी भूताबरोबर कुस्ती केलेली होती. कोणाला भूताने तंबाखूच मागितली होती. कोणी हिरव्या साडीतली केस मोकळे सोडलेली हडळ बघितली होती. बहुतेक या असामींना माझ्यासारख्या यत्किंचित जिवामध्ये स्वारस्य वाटले नसावे. त्यामुळे माझ्या वाटेला ती कधीच आली नाहीत. मला स्वतःला मात्र याबाबतीत कसलाही वेगळा अनुभव आलेला नव्हता. भूतबाधा म्हणाल तर तशी एकदा झाली होती. एकदा शेतातून घरी येताना वाटेत एक काळे कुत्रे माझ्यामागे आले होते. आजपर्यंत त्याला मी कधीच पाहिलेले नव्हते. ते ओळखीचेही वाटत नव्हते. मी एकटाच असल्यामुळे नदीपर्यंत त्याने मला सोबत केली होती. काही ठरावीक अंतर ठेवून ते मागेपुढे चालत होते इतकेच. नदीपासून ते कुठे दिसेनासे झाले, ते मलाही कळले नाही. बस् त्या रात्री मला थंडी वाजून आली. अंगात ताप भरला. माईने चुलीतील राख अंगारा म्हणून लावली. मागच्या गल्लीत आंधळी सरूआत्या राहायची. ती सुपात धान्य घेऊन कुठली बाधा आहे, हे सांगायची. त्याप्रमाणे माईने काहीतरी 'देणे' भागवून शेताकडील वाटेवर नेऊन टाकले. सकाळी मी खडखडीत बरा. आता तो कुत्रा थोडा मोठा असल्यामुळे मी थोडासा घाबरलो होतो, हे खरे असले तरी यात भूताचा संबंध कुठे येतो? हे काही मला कळले नाही.
          यापेक्षा कधी काही विचित्र अनुभवाबद्दल म्हणाल, तर रात्री अचानक कधीतरी सगळे शांत असले की, सूर काढून कुत्री ओरडायला लागत. तेंव्हा कोणीतरी किंचाळल्याचा आवाज मी काहीवेळा ऐकलेला आहे. चालताना कधीतरी आपल्या पाठीमागून कोणीतरी येत आहे, असेही बर्‍याच वेळा वाटलेले आहे. काहीवेळा खूप दुरून आल्यासारखे येणारे भजनाचे आवाजही मी ऐकलेले आहेत. गंमत म्हणजे माईला विचारले की, तिला मात्र यातले काहीच माहीत नसायचे. एकदा तर दुपार टळून गेल्यावर तीनचार वाजता मी आणि बल्लू दोघेच डोहाच्या खालच्या बाजूला पोहत होतो. अगदी निवांत वातावरण होते. पोहून झाल्यावर डोहाच्या वरच्या बाजूने दगडी चौपाळीकडून घरी येण्यासाठी मार्ग पकडला. तिथे तेल्याचे म्हातारे सावलीत बसलेले होते. आम्हांला बघून त्याने आम्हांला विचारले,
"लईच गोंधूळ चालला व्हता रं..! दोघंच आलाय. बाकीची संमदी कुटं हायती."
"कोण बाकीचे? आम्ही दोघंच होतो."
"लईच लबाड हाय रं तुम्ही. चांगला सातआठदहा जणांचा कालवा हितवर ऐकू येत व्हता की."
काय बोलावे हे न कळल्यामुळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत आम्ही तिथून निघून आलो होतो.


(क्रमशः)

Tuesday, 24 May 2016

१५...

          मनाला कुरतडणारे अनेक प्रश्न ठेवून सुजित गेला होता. प्रश्न केवळ एकट्या सुजितचा नव्हता. अशाप्रकारचे अनेक प्रश्न कधी प्रत्यक्ष... तर कधी अप्रत्यक्षपणे आयुष्याने माझ्यासमोर वारंवार उभे केले. काहींची उत्तरे मिळाली... काहींची उत्तरे मिळण्यासाठी मात्र काही काळ जावा लागला. कधी काळाबरोबर प्रश्न बदलत राहिले... तर कधी प्रश्न उभे करणारेही बदलत राहिले... काहीवेळा तर प्रश्नांची उत्तरेही बदलत राहिली. यामुळेच आयुष्याच्या दिशाही बदलत राहिल्या.
          माझ्या जीवनातील या पर्वात खूप काही घडून गेलेले आहे. आतापर्यंतचे पहिले दशक मी फार बाळबोध जीवन जगत आलो होतो. मी आणि माझा परिवार यापलीकडे असणाऱ्या भल्याबुर्‍या जगाची जाणीव मला आता कुठे होऊ लागली होती. दुनियादारीचे एकेक नवीन कंगोरे मला आता दिसू लागले होते. पाचवीत असतानाचीच गोष्ट आहे. या काही दिवसांत तोंड रंगवून राम, लक्ष्मण, सिता आणि मारुती बनून गाणी म्हणणारे चारदोन वेळा गावात येऊन गेले होते. सर्कसची मोठा पोंगा लावलेली, सजवलेली गाडी असते; तशी गाडीही येऊन गेली होती. रामाचे भलेमोठे चित्र त्या गाडीवर लावलेले होते. तिकडे दूर कोठेतरी दिल्लीकडे रामाचे अयोध्या नावाचे गाव आहे, हे मी ऐकलेले होते. असेच पूर्वी कधीतरी बाबर नावाच्या कुठल्यातरी माणसाने म्हणे, तेथील रामाचे मंदिर पाडून तिथे एक मशिद बांधलेली होती. कोण तो बाबर काळा कि गोरा पाहिलाही नव्हता. त्यावेळी तर माझा आपला असा समज झाला होता की, हा बाबर म्हणजे कोणीतरी रावणाचा वंशजच असावा. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच त्याने रामाच्या अयोध्येवर आक्रमण करून रामाचे मंदिर पाडले असावे.
          आता तर म्हणे, काही लोक ती मशिद पाडून पुन्हा त्या जागेवर मंदिर बांधणार होते. त्यासाठी गावोगाव फिरून हे लोक इतर सर्व लोकांना 'चलो अयोध्या!' म्हणून आवाहन करत होते. आम्हांला काही एवढ्या दूर जाणे शक्य नव्हते. म्हणून मग आम्ही त्या गाडीच्याच मागे गावभर पळत 'मंदिर वहीं बनायेंगे' असे ओरडत फिरत आपली हौस भागवून घेतली होती. पण तसे तर मला आपले मनातून कुठेतरी असे वाटायचे की, एवढ्या लांब ते मंदिर बांधायला जाण्यापेक्षा येथेच गावात कुठेही मंदिर बांधले; तर बरे होईल की. निदान आम्हांला सगळ्यांना पाहायला तरी मिळेल. पण आमचे लहान पोरांचे कोण ऐकणार? मग शेवटी मीच आपला माझ्यापुरता निर्णय घेऊन टाकला.
          दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून माझ्या सुपीक डोक्यातून एकेक कल्पना उगवू लागल्या होत्या. परसात मोकळी जागा बरीच होती. बल्लू मदतीला होताच. सुट्टीही भरपूर होती. दरवर्षी दिवाळीत आम्ही जिथे किल्ला बनवायचो; तिथेच आमचा हा नवीन उद्योग सुरू झाला. काडीपेटीएवढ्या आकाराच्या चिखलाच्या विटा बनवून लहान लहान चपटे दगड फोडून मंदिर बांधणीचे काम सुरू झाले. वेणूही मदतीला आली होती. पुरे दोन दिवस खपून मंदिर उभे राहिले. शेजारी छोटा तलाव व बगिचाही बनवून झाला. पोत्याचे तुकडे चिखलाने माखून त्यावर आळीव टाकून बाग बनवली होती. दररोज पूजा, चुरमुरे-फुटाण्याचा प्रसाद असा कार्यक्रम ठरलेला होता. गल्लीतील व वर्गातील बरेचजण यानिमित्ताने खेळायला येत होते. दिवाळीचा सण संपला आणि ऊरुस सुरू झाला. आजही मला आश्चर्य वाटते, तिकडे बाबरी मशिद व राममंदिरावरून वातावरण तापायला सुरुवात झाली असली, तरी गावात मात्र काहीही फरक पडलेला नव्हता. कोणीतरी एकाने दर्ग्यापुढच्या कडूनिंबाच्या झाडावर एक हिरव्या रंगाचा झेंडा लावलेला होता. त्यावर चंद्राची कोर व चांदणी होती. तर वेशीच्या भिंतीवर हातात धनुष्य घेतलेला राम आणि त्याखाली 'मंदिर वही बनायेंगे!' या लिहिलेल्या ओळी असलेला कटआऊट असूनही यावर्षीचा ऊरुस सालाबादप्रमाणेच व्यवस्थित पार पडला.
          आम्ही बर्‍याचजणांनी लवचिक काठ्यांचा वापर करून धनुष्ये व चिपाडाच्या सरकाळ्यांचे बाण बनवले होते. रंगीबेरंगी बेगडाचे कागद चिकटवून त्यांची सजावट केलेली. ऊरुसातूनही एकदोघांनी धनुष्यबाण विकत घेतलेले होतेच. खेळता खेळता रामलीलेची तयारी सुरू झाली. वह्यांच्या पुठ्याचे टोप बनवून चमकी कागद चिकटवून सजावट करण्यात आली. प्लास्टिकच्या मोठ्या चेंडूत काठी खुपसून मारुतीची गदा बनवण्यात आली होती. त्यालाही चमकी कागद चिकटवून सजवण्यात आले. ऊरसातूनही खेळणी घेताना आमच्या डोक्यात रामलीलाच होती. कोणी तांबड्या रंगाचे मारुतीचे मुखवटे घेतले होते. काहींनी फुग्याच्या गदा घेतल्या होत्या. तयारी जंगी झाली होती. आता एकच अडचण उरली होती... रावण. रावणाच्या दहा तोंडाचे काय करायचे? सुध्या याबाबतीत फार तयारीचा. त्याने कुठूनतरी लग्नात नवरदेवाला बांधतात ते बाशिंगच आणले. रंगीत कागदाचे दहा गोल कापून एका पट्टीवर चिकटवले आणि पट्टी बाशिंगाला. झाला रावण तयार.
          पोरांचा काहीतरी खेळ चाललाय, म्हणूनच सगळी मोठी माणसं आमच्याकडे सुरुवातीला पाहत होती. पण एकेक दिवस जाईल; तसतशी आमची तयारी बघून मग मात्र मोठ्यांचाही हुरूप वाढला होता. सगळे कौतुकाने पाहत होते. काही मदत हवी का? म्हणून आडून आडून विचारतही होते. पण मला हा खेळ आमचाच व्हायला हवा होता. म्हणून तयारीही आमची आम्हीच केली. सुट्टीच्या शेवटच्या दिवशी तर जंगी कार्यक्रमच आखलेला होता. गल्लीतच मिरवणूक काढायचे ठरलेले असतानाही शेजारच्या दोन तीन गल्ल्या फिरून आलो. शब्बूआपाच्या दारातून जाताना तर तिने दोन बोटांचा गोल करून 'छान जमलंय!' असे म्हणून कौतुकाने हसलीही होती. अर्थातच राम मी झालो होतो, बल्लू हनुमान बनला होता, वेणूशिवाय सिता दुसरे कोण बनणार? सुजित लक्ष्मण झाला होता आणि रावण सुध्या. मला भेटलेला हा 'रावण' पुढे माझा जिवाभावाचा दोस्त बनला. 
          या राममंदिराइतकाच आणखी एक कळीचा मुद्दा माझ्यासमोर उभा राहिला होता. साधारण दिवाळी सुट्टीनंतर माधवमामाला मी पत्र लिहिले होते. पहिल्यांदाच मी असे कोणाला तरी पत्र लिहित होतो. गुरुजींनी पत्रलेखन शिकवले; तेंव्हा गुरुजी म्हणाले होते, तुमच्या परगावी असणाऱ्या एखाद्या नातेवाईकाला आता असे पत्र तुम्ही लिहू शकता. परंतु हे पत्र लिहिण्यामागे केवळ एवढे एकच कारण नव्हते. खरं तर माधवमामाला मला काहीतरी वेगळेच सांगायचे होते. पण पत्रात ते सारे लिहिण्याचे माझे धाडस झाले नाही. तरीही तो दिवाळीत घरी आला होता तेंव्हा मी त्याला ते सांगण्याचा प्रयत्न केला होता.
"मामा, मी शब्बूआपाच्या घरी गेलो होतो."
"बरं मग?"
"ती सांगत होती."
"काय?"
"तिला पाहायला पाहुणे आले होते ऊरुसाच्यावेळी."
"हं...!"
"तिच्या घरचे आता तिचे लग्न करणार आहेत. आपल्या घरचे पण तुझे लग्न करायचे म्हणाले, तर तू नाही म्हणू नकोस."
तो फक्त हसला. मला म्हणाला, "गब्बरसिंग, वेडा आहेस काय तू? मला बोललास ते ठीक आहे. घरात कोणाला असे काही बोलू नकोस."
"मी कशाला कोणाला काय बोलतोय?" 
          माधवमामा आला होता; तेंव्हाच घरात त्याच्या लग्नाची तयारी चालली होती. परंतु माधवमामा मात्र 'आताच लग्न करायला नको' म्हणत होता. अजून काही महिने तरी त्याला गोव्यात राहावे लागणार होते. तिकडून आल्यावर पाहू, असे म्हणून तो लग्नाचे पुढे ढकलत होता. मला आपले उगीचच वाटत होते, माधवमामाने पटकन लग्न करावे... आणि शब्बूआपाच मामी बनून घरी यावी. मामाची सुट्टी संपल्यानंतर मामा निघून गेला. माझीही शाळा सुरू झाली. ध्यानीमनी नसतानाही अचानक एके दिवशी मोठेमामा माईला सांगत असताना मी ऐकले. शब्बूआपाचे लग्न ठरले होते. माझे स्वप्न संपले होते. म्हणूनच मी मोठ्या निराश मनाने माधवमामाला पत्र लिहिले. पत्रात बरंच काही लिहायचे होते. ते धाडस झाले नसले; तरी शब्बूआपाचे लग्न ठरले. एवढे एक वाक्य लिहिलेच. माझे पत्र पाहून मामा खूप खूष झाला होता. एवढ्या लहान वयात मी चांगले लिहिलेय, याचेच त्याला कौतुक होते. अॉफिसमध्येही त्याने त्याच्या साहेबांना पत्र दाखवले होते. मी फक्त पाचवीत शिकतोय, हे कळल्यावर साहेबांनाही कौतुक वाटले म्हणे.
           आम्ही राममंदिर बांधले, मिरवणूक काढली. खूप धमाल केली. पण राममंदिराचा प्रश्न एवढा भयाण असेल, असे कधीच वाटले नव्हते. महिनाभरातच रेडिओवरून, वर्तमानपत्रातून एका मागोमाग एक बातम्या येऊन धडकू लागल्या. अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली होती. सगळीकडे गोंधळ उडाला होता. कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे लोक एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. राम आणि रावणाच्या युद्धानेसुद्धा वातावरण ताणले नसेल; इतका हिंदू आणि मुस्लीम यांच्यात तणाव दिसू लागला. कायम कुठे ना कुठे दंगे झाल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. अशातच मुंबईला बॉम्बस्फोट झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात दंगली सुरू झाल्या. रोजच काही ना काही ऐकायला येऊ लागले. त्यातले काही कळत नसले; तरी कानावर पडणाऱ्या चर्चेला उधाण आले होते. कुठेही चार लोक बसलेले असले की, हमखास एवढा एकच विषय कानावर येत होता. आजपर्यंत गावात कधीच तणाव निर्माण झालेला नव्हता. तरीही गावातील मुसलमानांची माणसं धास्तावलेली दिसत होती. असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांच्यात कमालीची एकी दिसू लागली. मुसलमानांची पोरं फक्त ईद, ऊरुसाच्या वेळी टोप्या घालायची, ती आता सर्रास टोप्या घालून फिरू लागली. दररोज मशिदीत जाऊ लागली. हिरवे साफे डोक्याला गुंडाळलेले व कोरीव दाढ्या ठेवलेली काही बाहेरची माणसंही बर्‍याचवेळा दर्ग्यात येऊन गेली. त्यांचे पाहून गावातील पोरांनीही दाढ्या ठेवायला सुरुवात केली. हे पाहून बिथरलेल्या काही हिंदू पोरांनी घराघरांवर, चौकाचौकांतल्या झाडांवर भगवे झेंडे लावले. या बदललेल्या वातावरणात माझे शब्बूआपाच्या घराकडे चक्कर मारण्याचेही धाडस झाले नाही. सगळे एकदम अनोळखी वाटू लागले.
          राममंदिरावरून झालेल्या गदारोळापेक्षा रामायण परवडले. रावण दुष्ट असेल, क्रूर असेल, अहंकारी असेल; पण त्याच्याकडे नीतिमत्ता होती. रावण बनने तरी कुठे सोपे आहे? रावणासारखा धार्मिक विद्वान पंडीत त्यावेळी दुसरा कुठे होता? पित्याच्या वचनासाठी वनवासाला जाणारा राम पुरुषोत्तम होता. बंधुप्रेमापोटी हसत हसत वनवास स्वीकारणारा लक्ष्मण आणि पतीच्या मागे सावलीसारखी जाणारी पतीपरायण सीता आपापल्या कर्तव्याचे पालन करण्यात पुरुषोत्तमच ठरले. पण रावण? आज स्वतःच्या घरातही सुरक्षित राहील याचीही खात्री देता येणार नाही, अशी स्त्री रावणासारख्या असुराच्या नगरात सुरक्षित होती. रावणाला मारून सीतेची सुटका हा रामाचा पराक्रम असेलही. पण ती सीता सुखरुप मिळाली, यातच रावणाचे मोठेपण होते. रावणामध्ये अहंकार होता; तसा पश्चात्तापही होता. सीतेला पळवून आणूनही तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने आपलेसे न करण्यात त्याचा संयम होता. रामा, तुझ्या काळातील रावण फार चांगला होता. आज दुर्योधन, दुःशासनालाही लाजवतील असे लोक पावलोपावली आढळतील. कित्येक द्रौपदींचे खुलेआम वस्त्रहरण होतेय. धर्म या शब्दाचा अर्थही न कळणारे धर्माच्या नावावर एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले आहेत. मनाला सात्त्विक बनवणारी प्रार्थनास्थळे आज बाजार बनली आहेत. भक्तीचा बाजार मांडून स्वतःच्या पोटापाण्याचा व्यवसाय बनवणारे दलाल धर्मवेत्ते बनले आहेत. आज राम-रावणाच्या नावाने भांडणारे त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत.
          हे सगळे वातावरण थंड होईपर्यंत गणपती आले. गणपतीच्या सोबत यावेळी पाऊसही होता. दहा दिवस गुलालाच्या जोडीने पावसाचीही उधळण चालली होती. गणरायाला निरोप देऊन मिरवणूकीत नाचून थकलेली माणसं घरी जाऊन पडली होतीच. झोपेने जरा कुठे स्वप्नांचे मोरपीस डोळ्यांवरून फिरवले होतेच. तेवढ्यात जमीन शहारली. घरावरील छत थरथरू लागले. फळीवरची भांडी गडबली. कोणीतरी हलवून जागे करावे तसे माणसं जागी झाली. काहीतरी घडतेय, हे कळेपर्यंत काहीजण बाहेर धावली, तर बाकीचे काय गोंधळ आहे, हे पाहायला बाहेर आले. मी माईजवळ झोपलो होतो. हा प्रकार सुरू झाल्यावर माई मला आपल्या कुशीत घट्ट धरून राहिली. लाईट गेल्यामुळे सगळीकडे अंधार पसरलेला होता. आबई चाचपडत जवळ आली. घरात भांडी पडल्याचा आवाज येत होता. मोठ्यामामाने हाका मारून सर्वांना बाहेर बोलावले. बाहेर येऊन पाहतो, तर सगळी गल्लीच बाहेर रस्त्यावर आलेली होती. घोळक्याने उभे राहून लोक आपापसात बोलत होते. मला एवढेच कळले, हा भूकंप होता. आतापर्यंत हा शब्दही कधी ऐकलेला नव्हता. दंगल असो कि भूकंप... सगळ्या भयानक गोष्टी कशा जुळून आल्यासारख्या घडत होत्या.
           सकाळपर्यंत पुन्हा कोणी झोपलेच नाही. त्यानंतरही दोनतीनवेळा जमीन थरथरत राहिली. सकाळच्या रेडिओवरील बातम्यातून कळले की, लातूरजवळील किल्लारी येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. संपूर्ण गावच मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले होते. जवळपासच्या गावांचीही दुरावस्था यापेक्षा वेगळी नव्हती. यापूर्वी कोयनेलाही भूकंप झाला होता म्हणे; परंतु त्यावेळी एवढे नुकसान झालेले नव्हते. काळाने आपले खरे विकट रूप दाखवले होते. 
पहिल्यांदाच ऐकलेल्या 'भूकंप' या शब्दावर पुढील पंधरा दिवसांत पूर्ण ग्रंथ भरेल एवढे लोकांच्या चर्चेतून ऐकायला मिळत होते. लोकांना चर्चेला आता नवीन विषय मिळाला होता. लोकांची स्मरणशक्ती फार अल्पकालीन असते. भूकंपाचा विषय मिळाल्यावर मंदिर, मशिद, दंगल हे शब्द असे गायब झाले की, जसे कधी ते ऐकलेच नाहीत. दिवसभर गावगप्पांना ऊत आला होता; तर रात्री घरात झोपायला कोणीच तयार नसल्यामुळे अंगणातील चर्चांना उधाण आले होते.
          माई सांगत होती, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर टेकलेली आहे. पापाचे ओझे वाढलेय. मधल्या झालेल्या दंगलीमुळे तर तो शेषनाग शहारला नसेल? किल्लारीसारखा सधन गाव एका क्षणात स्मशानभूमी बनला. कित्येकांना संजीवन समाधी मिळाली. लहानथोर असा भेदभाव मरणानेही केलाच नाही. बाळाच्या तोंडात पान्हा ठेवून आई गेलेली होती. आयुष्याच्या मावळतीला म्हातारीबी मेली होती. फार मोठा घाला नशिबाने घातलेला होता. पापणी लवेपर्यंत होत्याचे नव्हते करण्याचे सामर्थ्य फक्त निसर्गाकडेच. माणूस त्यापुढे फार क्षुद्र आहे. तरीही आपल्या क्षुद्रपणाचा कळस माणसातील हैवानांनी गाठला. मदतकार्याच्या निमित्ताने गेलेल्या काहीजणांनी मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना वाचवण्याऐवजी कुठे पैसा दागिने सापडतोय का? याचा शोध सुरू केला. प्रेताच्या मांसासाठी उतरलेली गिधाडे आणि प्रेताच्या अंगावरच्या ऐवजासाठी टपलेली माणसं एकाच पातळीवर आले होते. पाषाणालाही पिळवटून टाकेल अशा हृदयद्रावक प्रसंगी पत्थरदिल माणसं पाहायला मिळत होती. परदेशातूनही मदतीचा ओघ चालूच होता. पण चाळणीच्या नियमाप्रमाणे सगळी मदत तिथपर्यंत पोहचलीच नाही. पुढील महिनाभर निर्वासित झालेली माणसं गावोगाव फिरून आसरा शोधत होती. त्यांच्या तोंडून आपबिती ऐकताना अंगावर काटा फुलत होता.
          दिवाळी आली; तरी माणसं अजून सावरलेली नव्हती. लावायचे म्हणून चार दिवे दारात जळत होते नि पोरासोरांसाठी म्हणून चारदोन गोडधोडाचे पदार्थ केलेले होते. ही दिवाळी काही गोड झाली नाही. गेल्यावेळी रामलीला होती. यावर्षी काही करावेसे वाटलेच नाही.

(क्रमशः)

Saturday, 14 May 2016

१४...

          पाचवीची नवीन पुस्तके हातात आली. नवीन एवढ्यासाठीच म्हणायचे, कारण ती पुढच्या वर्गातील होती. प्रत्यक्षात ती जुनीच होती. चौथीपर्यंत नवी करकरीत पुस्तके मिळाली होती. चौथीचा निकाल आणायला शाळेत गेलो; तेंव्हा पुढच्या वर्गातील एका मुलाने विचारले, "शेखर, पुस्तके घेतलीस का पाचवीची."
" आताच कशाला? शाळा सुरू झाल्यावर आणायची."
"माझी हायती बघ. पाहिजी आसतील तर चल घरी बघायला."
मी त्याच्या घरी जाऊन पुस्तके पाहिली. वर्षभर वापरूनही ही पुस्तके जुनी आहेत, असे वाटतच नव्हते. खूप चांगली ठेवली होती त्याने. नाहीतर आमच्या पुस्तकांच्या वर्ष संपेपर्यंत चिंध्या झालेल्या असायच्या. याने मात्र पहिले पान सोडले; तर कुठेही नावसुद्धा टाकलेले नव्हते. कुठे बाईला मिशा काढ. कुठे पुरुषाला कुंकू लाव. असली चित्रकारी तर लांबच. मला पुस्तके आवडली.
"पुस्तके घेऊन आमच्या घरी चल. घरचे 'घे' म्हणाले, तर घेतो."
तो माझ्यासोबतच घरी आला. नेमके मोठेमामा घरीच होते. त्यांना पुस्तके दाखवली.
"तुला चालत आसली, तर घिऊन टाक. पुस्तकं जुनी का नवी, हे महत्त्वाचं नाही. त्यानं ठेवल्यात कशी ते शिक. पैसं किती द्यायचं रं पोरा?"
सर्रास मुले अर्ध्या किमतीत पुस्तके विकायची. पण ही पुस्तके चांगली असल्यामुळे तो पाऊण किमतीत देणार होता. मी पुस्तके घेतलीही. वाचलेल्या पैशातून मला कंपासपेटी घेऊन द्यायचे मामांनी कबूल केले होते. रात्री मुकूंदमामांनी सर्व पुस्तकांना छान कव्हर घालून नावे टाकून दिली होती. नवीन पुस्तकांना येणारा वेगळाच वास असतो. या पुस्तकांना तो वास नसला; तरी उदबत्ती, साबणाचा वास येत होता. कारण त्यावेळी उदबत्तीच्या पुड्याचे कागद, सुगंधी साबणावरचे कागद पुस्तकात, कंपासपेटीत ठेवण्याची पद्धत त्यावेळी मुलांमध्ये खूप चालायची.
          पुस्तके घेतली, तेंव्हाच बालभारती आणि इतिहासाचे पुस्तक वाचून काढले. वर्षभर अभ्यास करायला नको वाटत असले; तरी वर्षाच्या सुरुवातीला ही दोन पुस्तके वाचण्याचा उत्साह काही औरच असतो. यावर्षी आणखीन दोन पुस्तके नवीनच होती. एक हिंदीचे पुस्तक; जे वाचता येत होते; परंतु पचायला जड होते. दुसरे इंग्रजीचे पुस्तक म्हणजे फक्त चित्र पाहण्यापुरतेच समजत होते. नेमके तेच पुस्तक हातात घेऊन बसलो होतो. छान वास येत होता. शोभाताईने कधीकाळी सीएटी कॅट, कॅट म्हणजे मांजर व डीओजी डॉग, डॉग म्हणजे कुत्रा असे चारदोन शब्द म्हटलेले आठवत होते. पण नेमके इंग्रजीअअमधील कोणतेही अक्षर लागत नव्हते. कोणत्या अक्षराला काय म्हणायचे? हे कुठे माहीत होते! तेवढ्यात आबईने हातात पुस्तक पाहिले. आबईने पाहिले म्हणजे आम्हीच खाजवून गजकर्ण काढले. कौतुकाने आबईला इंग्रजीचे पुस्तक दाखवायाला गेलो. वेणूही नेमकी त्यावेळी तिथेच होती.
आबई म्हणाली, "वाच."
आता अजून शाळाही सुरु झालेली नव्हती. जे शिकलोच नाही; ते कसे वाचून दाखवणार? पण वेणूसमोर वाचता येत नाही, असे कसे सांगायचे? मग काय दे धक्का! चित्र पाहून जगात कुठल्याही भाषेत सापडणार नाहीत असे शब्द मनानेच वाचायला सुरुवात केली. दोघीही माझ्याकडे कौतुकाने पाहत असताना नेमकी शोभाताई मोठ्याने हसतच तिथे आली.
"अगं आत्या, तो काहीही वाचतोय अन् तू खुशाल मान हलवती होय."
झाले. सगळे मुसळ केरात. असा राग आला होता ना! चोरी पकडली गेली होती. तरीही तणतण करण्यापलीकडे हातात काहीच नव्हते.
          प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर चाररेघी वही आणि पेन्सिलने त्यावर ए बी सी डी अशी अक्षरे लिहायला सुरुवात केली. आपण खूप काहीतरी वेगळेच शिकतोय, असे वाटू लागले. पहिले सहा महिने तर इंग्रजी हा विषय नसता; तर बरे झाले असते, असे म्हणण्याची वेळ आली. लिहिता वाचता येऊ लागले; पण प्रत्येकवेळी शब्दांनी वाट अडवायला सुरुवात केली. पहिल्या चाचणीने तर जीव खाल्ला माझा. पंचवीस मार्काची चाचणी. पास होण्यासाठी दहा मार्काची अट सोनारगुरुजींनी ठेवली होती. विशेष म्हणजे गुरुजींनी फळ्यावर लिहिलेल्या उत्तराप्रमाणे स्वतःचे पेपर स्वतःच तपासायचे होते. मीच माझा पेपर तपासूनही अवघे नऊ मार्क्स मिळाले. मग मात्र वाटले, पेपर गुरुजींनीच तपासायला हवे होते. किमान दहा तरी दिले असते त्यांनी. नापास झाल्यामुळे रडायला येत होते मला. मी एवढेसे तोंड करून गुरुजींकडे गेलो.
"का रे? तोंड का बारीक केलंय असं?"
"गुरुजी, माझा पेपर तुम्हीच तपासा."
          गुरुजींनी संपूर्ण पेपर उलटसुलट पाहिला आणि पेपरवर पंचवीस पैकी पंचवीस लिहिले. मग तर मी रडायलाच सुरुवात केली. माझ्या पाठीवर हात ठेवून गुरुजी म्हणाले, "तुझे मार्क्स मी कोणालाही सांगणार नाही. पण पुढच्या चाचणीत असे मार्क्स पाडणार असशील तर...!"
मी मुकाटपणे मान हलवली आणि जागेवर येऊन बसलो. मनाशी ईर्ष्या घेऊनच. पंचवीस पैकी पंचवीस. गुरुजी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या लावत. मुले विरुद्ध मुली. मग काय? इज्जत का सवाल झाल्यावर शब्दांचे पाठांतर जोरात सुरू झाले. ईर्ष्या पूर्ण करेपर्यंत जिवाला चैन कुठली पडायला. बाकीचे विषय बाजूलाच. फक्त आणि फक्त इंग्रजी.
          यावर्षी आमच्या शाळेत एक नवीनच मुलगा आला होता. वर्गातील इतर मुलांमध्ये त्याचे वेगळेपण दिसून यायला कारण म्हणजे तो शहरातील शाळेत शिकून आलेला होता. अगदी गोरागोमटा, केस वाढवलेला आणि शर्ट पँटमध्ये खोचून दररोज इन करणारा. आम्ही कधी नवीन कपडे घातले किंवा बाहेरगावी जायचे असेल; तरच इनशर्ट करायचो. बाकी पंधरा अॉगस्ट व सव्वीस जानेवारी सोडले; तर इन नावाचा प्रकार आमच्याकडे नसायचाच. अगदी चोरपोलीस खेळतानाही पोलीस झालेल्या मुलांचा इन म्हणजे इंटरनॅशनल प्रकार असे. पुढून शर्ट खोचायचा; पण पाठीमागे मात्र तसाच मोकळा सोडलेला असे. वर्गातील अर्ध्याहून आधिक मुलांच्या चड्यांना ठिगळ लावलेले असायचे. गावातील टेलरही त्याहून इंटरनॅशनल असे. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट एवढेच रंग कायम अंगावर मिरवणार्‍या मुलांच्या जीवनात रंग भरण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर दिली आहे, याची जाणीव ठेवून खाकी रंगाच्या चड्डीला ठिगळ लावताना सहजासहजी उठून दिसेल, अशा कापडाचे ठिगळ लावी. मग स्वतःच्याच गरिबीचे प्रदर्शन करायला कोण कशाला इनशर्ट करेल? खेळताना केलाच... तर पुढून इन आणि मागे आऊट, असा काहीसा प्रकार असे. हे जसे कपड्यांचे झाले, तसेच केसांचेही होते. सगळी खेड्यातील मुले. केस ठेवून त्यांची निगा राखणे, तेल लावणे हे खर्चिक प्रकार सगळ्यांनाच परवडणारे नव्हते. बहुतांशी मुलांच्या कटींगचा प्रकार एकसारखा असे. हातात येणार नाहीत, इतपत केस बारीक ठेवलेले असत. त्याचे सगळ्यांपेक्षा वेगळेपण दिसण्याची ही काही कारणे तर होतीच. याशिवाय तो मूळ अकोला, जळगावकडचा असल्यामुळे त्याच्या बोलण्यातही वेगळेपण जाणवायचे.
          सुजित राठोड त्याचे नाव. त्याचे वडील शेतकी अधिकारी होते. आमची ओळख झाली आणि तो बसायला माझ्याजवळच आला. पुढे आम्ही चांगले दोस्त बनलो. अगदी सातवी होईपर्यंत आम्ही एकत्र राहिलो. मला कायम नवनव्या गोष्टींचे आकर्षण वाटत राहिले आहे. नवी ठिकाणे, नवीन माणसं, नवीन नाती. त्यामुळे असेल कदाचित. मी कायम नवे मित्र बनवत गेलो. जुने होतेच; पण त्यामध्ये नव्यांची कायम भर पडत राहिली. एखादी गोष्ट आपली मानली की, फार लवकर मी त्याच्यात गुंतत राहिलो. गुंते सोडवतानाही हलक्या हाताने स्वतःला मुक्त करत राहिलो. पण त्या आठवणी काळजापर्यंत रुजलेल्या आहेत. त्या अशा इतक्या सहज पुसणार्‍या नाहीत. ओमीच्या भोवती काही मुलांचा ग्रुप गोळा होत होता. तोही त्याच्या ग्रुपमध्ये गुंतत गेला. मग माझ्या आयुष्यात त्याची जागा सुजितने घेतली. आमच्या बर्‍याच आवडीनिवडी जुळत राहिल्या. सुजितचे अक्षर आणि इंग्रजी दोन्ही चांगले होते. त्यामुळे माझाही फायदा झाला. इंग्रजीतील अभ्यासात प्रगती करणे सोईचे झाले.
            सुजितच्या घरीही माझे जाणेयेणे असे. त्याची आई फार प्रेमळ होती. सुजितप्रमाणेच त्यांचेही वेगळेपण जाणवत राही. खेड्यातील बायका कायम साडीत दिसतील. पण सुजितची आई घरी असली की, सलवार कमीज वापरत असे. त्यांना पाहिले की, शब्बूआपाची हमखास आठवण येत राही. सुजितला एक छोटी बहीणही होती. सुप्रिया तिचे नाव. पाहिले की, हुबेहूब बाहुलीच वाटायची. त्याचे बाबाही फार चांगले होते. पण लवकरच एक गोष्ट लक्षात आली. सुजितचे बाबाही दारूच्या आहारी गेलेले होते. सुरूवातीला त्यांचे पिणे कमी होते. तोपर्यंत ठीक होते. मग मात्र माझे येणेजाणे थोडे मर्यादितच राहिले. शक्यतो ते नसतील अशावेळी मी जात असे. ते आले की, आमच्या मिटींग बरखास्त होत. नशेत असताना ते कोणाला नीट ओळखायचेही नाहीत. ते प्यायलेले नसले की, मग मात्र आवर्जून आमच्याशी बोलायचे. अभ्यासाची चौकशी करायचे. मला कायम सुजितपेक्षा जास्त मार्क्स मिळत; म्हणून कौतुकही करायचे. 'घरी येत जा', म्हणून सांगायचे. नशेत असताना आम्ही भेटल्याचे त्यांना साधे आठवायचेही नाही.
           आम्हाला इतिहासातील महाराणा प्रताप यांचे प्रकरण गुरुजींनी शिकवले. तेंव्हा सुजितने मला सांगितले की, तेही मूळचे राजस्थानचे राजपूतच आहेत. महाराणा प्रताप यांनी अरवलीच्या जंगलात राहून मुघलांशी लढा दिला. तेंव्हा जे बंजारा लोक राणाजीसोबत होते; ते परत नगरात गेलेच नाहीत. पुढे भटकंती करत त्यातील काही महाराष्ट्रात आले. व्यापारी तांड्यासोबत जंगलातून मालाची वाहतूक करण्याचा व्यवसाय ते करू लागले. शेवटी बरीचशी मंडळी महाराष्ट्रातच स्थायिक झाली. एकदा सुजितच्या घरी फोटोंचा अल्बम पाहताना त्याच्या मम्मीचा एक फोटो मी पाहिला होता. त्यामध्ये राजस्थानी बायकांप्रमाणे कोपरापर्यंत पांढऱ्या बांगड्या, आरसे बसवलेली ओढणी डोक्यावरून घेतलेला फोटो होता. कधीकधी सुजित घरात बोलताना तो वेगळ्याच भाषेत बोलायचा. भाकरीला बाटी म्हणायचा. तो राजस्थानला कधीच गेला नव्हता. पण त्यांच्या गावाकडे म्हणे त्यांचे भरपूर नातेवाईक होते. तेथील बहुतांशी बायका आजही पारंपरिक पोशाखच करतात. जे शिकले; ते बाहेर पडले, सुधारले. बाकी परिस्थिती 'जैसे थे'च. त्याचे मम्मी-पप्पा शिकलेले होते. नोकरीच्या निमित्ताने कायम बाहेरच राहिले. कधीतरी गावी जायला मिळे. वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे तो अनेक ठिकाणी फिरून आलेला होता. त्यामुळे सांगण्यासाठी त्याच्याकडे खूप काही असे. कधीही न पाहिलेल्या... ऐकलेल्या... कल्पनाही केली नसती; अशा अद्भूत गोष्टींचा त्याच्याकडे खजिनाच होता. मला माझ्या मर्यादित जगाच्या बाहेर असलेल्या या अज्ञात जगाची ओढ वाटू लागली. परिघाबाहेरचे जग पाहण्यासाठी मी उत्सुक झालो होतो.
          पाचवीतून आम्ही सहावीत गेलो, तेंव्हाची गोष्ट आहे. एके दिवशी गुरुजींनी नाटकाची आवड असणारे विद्यार्थी निवडून त्यांना अॉफिसमध्ये बोलावले. बालनाट्य स्पर्धेसाठी यावर्षी शाळेतून नाटक बसवण्याचे ठरले होते. यावेळी सुजित आणि मी दोघेही उत्साहाने पुढे झालो. 'बनवाबनवी' नावाच्या या नाटकात तीन ठग असतात. तिघांची भेट झाल्यावर ते तिघे साधूचा वेश पालटून तीर्थयात्रेला जायला निघतात. एका धर्मशाळेत उतरल्यावर त्यांना एक व्यापारी भेटतो. ते तिघे मिळून त्या व्यापाऱ्याला फसवून जिलेबीने भरलेले चांदीचे ताट मिळवतात. त्यातही एकमेकांवर कुरघोडी करून ते ताट स्वतःलाच मिळवण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. या तीन ठगांपैकी दोन भूमिकांसाठी गुरुजींनी आम्हा दोघांना निवडले होते. नाटकाचे संवाद लिहून घेण्यापासून पाठांतर, ड्रेपरीची तयारी आम्ही मिळूनच केली. बाकीचे चारजण होते आमच्याबरोबर. ओमीला अशा गोष्टींची फारशी आवड नव्हतीच. आपोआपच सुजित आणि माझ्यात जवळीकता वाढायला हे नाटक पुरेसे होते. पाठांतर करण्यात मला काही अडचण नव्हती. पण सुज्याचे संवाद पाठ करून घेताघेता माझेच संवाद पाठ कधी झाले, कळलेच नाही. त्याची मम्मी तशी शिकलेली होती. त्यांनीही आमचे संवाद आवाजातील चढउतारासह व्यवस्थित म्हणवून घ्यायला मदत केली. सुरुवातीच्या प्रवेशात तिघेही ग्रामीण पोशाखात असतात. म्हणून फेटा, धोतर, नेहरू शर्ट असा पेहराव होता. मुकूंदमामानी इंटरेस्ट घेऊन वेशभूषेसाठी आम्हाला खूप मदत केली. साधूच्या वेशांतरासाठी आमच्या मुख्याध्यापक गुरुजींनी त्यांच्या जुन्या धोतराचे लुंगीसारख्या आकाराचे तीन तुकडे दिले. त्यांना काऊच्या पाण्यात बुडवून आम्ही भगवी वस्त्रे तयार केली. रुद्राक्षाच्या माळांसाठी आम्ही लहान कच्ची उंबरे गोळा करून त्याच्या माळा केल्या. उंबरे सुकल्यावर त्यांना रंग दिला. अशाच काही काही शक्कल लढवून खर्च न करता वेशभूषा तयार झाली.
          पंधरा दिवसाच्या पाठांतरानंतर प्रॅक्टिस सुरू झाली. याकाळात अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. पण नाटकाचा नादच वेगळा. आपण वेगवेगळ्या भूमिका करतो; तेंव्हा आपले स्वतःचे अस्तित्व विसरून वेगळेच आयुष्य जगायला लागतो. तोंडाला रंग लागण्याची ही आयुष्यातील दुसरी वेळ होती. महिनाभरातच आम्ही स्पर्धेला गेलो आणि तालुक्याचे पहिले बक्षिस मारूनही आलो. थोड्याच दिवसांत जिल्ह्याची स्पर्धाही गाजवली. तिथेही पहिले बक्षिस आमचीच वाट पाहत होते कि काय, कोण जाणे! आता विभागावरील स्पर्धेसाठी पुण्याला जायचे होते. पुढे दूरदर्शनवरील बालचित्रवाणीमध्येही आपण दिसणार; म्हणून आम्ही उत्साहात होतो. सहावीच्या वर्षात अभ्यास कमी आणि नाटकंच जास्त झाली होती. त्यात सुजित जोडीला असल्यामुळे आयुष्यात एकेक नवीन रंग भरले जात होते.
          आम्ही सातवीत जाईपर्यंत इकडे सुजितच्या घरची परिस्थिती ढासळत चालली होती. त्याच्या बाबांचे पिणे वाढतच गेले होते. दिवसरात्रीचेही त्यांना भान उरले नाही. चोवीस तास ते नशेत राहू लागले. त्यातच त्यांच्या हातून काहीतरी आगळीक घडली होती. त्यांनी म्हणे पैशाच्या व्यवहारात काही गडबड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यातच त्यांच्या साहेबांशी त्यांचे कशावरून तरी बिनसले. नशेतच त्यांनी साहेबांच्या अंगावर फाईल फेकल्या. त्यामुळे त्यांच्या साहेबांना अनायासे निमित्तच मिळाले व कामावरून त्यांना निलंबित करण्यात आले. कामावरच नाही गेले; तर पगार तरी कसा मिळेल? दुकानदारांची उधारी वाढतच चालली होती. याच्या... त्याच्याकडून केलेली उसनवारी कमी नव्हतीच. अशोक पवार, बप्पा जाधव यांच्यासारखी मंडळी सावकारी करायचे. त्यांच्याकडूनही अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे घेतलेले होते. ती माणसं आता घरापर्यंत येऊ लागली होती. दाराशी कोणी आला की, त्याची मनधरणी करण्यात घरातील एकेक वस्तू कमी होऊ लागली. कितीतरी किमती वस्तू कवडीच्या मोलाने विकून टाकाव्या लागत होत्या. परिस्थिती चिघळतच चालली होती. एकेकाळी सगळ्यांपेक्षा रंगीबेरंगी दिसणारे हे फुलपाखरू आता सगळ्यांसारखेच कळाहिन झाले होते. सुजितला उघड्या डोळ्यांनी जे दिसायचे; ते पाहून त्याला खूप वाईट वाटत होते. त्या वयातही त्याला न कळणारी तरीही सहज जाणवणारी वेदना तो मला सांगण्याचा प्रयत्न करे. मात्र या परिस्थितीत तो काय किंवा मी काय? काय करणार होतो? नव्हे नव्हे; तर काही करण्याएवढे आमच्या हातात तरी कुठे काय होते?
          उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या व दिसल्या तरी त्या समजण्याएवढे वय नसल्यामुळे न कळणार्‍याही काही गोष्टी घडू लागल्या होत्या. त्यावेळी न कळलेल्या काही गोष्टींचे अर्थ आज जेंव्हा लागताहेत; तेंव्हा माणसाच्या माणूसपणाविषयीही शंका येऊ लागते. एखाद्याच्या अगतिकतेचा फायदाच नाही; तर गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती पाहिली की, चीड येऊ लागते. या घटनाही अशा होत्या की, चीड हा शब्दही फार फिका वाटावा. अगदी या पाशवी मानसिकतेची शिसारी येते... किळस वाटते. सुज्याचा बाप असा दारूत बुडालेला... घरात दोनवेळच्या अन्नाची भ्रांत पडलेली... बाहेरून आलेल्या, आधारासाठी जवळचे म्हणावे असे कोणी नसलेल्या निराधार कुटुंबाची परवड चाललेली असताना हळहळ वाटण्याऐवजी एखाद्याच्या जळत्या चितेवर स्वतःची पोळी भाजणारे कमी नसतात या जगात. राठोडसाहेबांच्या संसाराची राखरांगोळी ज्या दारूमुळे होत होती; त्या व्यसनापासून त्यांना परावृत्त करण्याऐवजी पदरच्या पैशाने त्यांना थोडी जास्तच पाजून घरापर्यंत सोडायला येणारांची संख्या लक्षणीय होती. एखाद्या तरूण त्यातही सुंदर स्त्रीचा संसार उघडा पडला असेल; तर 'सहानुभूती'चे अनेक विकृत हात पाठीवर फिरण्यासाठी शिवशिवत असतात.
          आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडत असेल; तर सुरुवातीला आपल्याला त्याची चीड येते. पुढेही तसेच घडले; तर त्याचा तिरस्कार वाटतो. हे असेच वारंवार चालू राहिले; तर त्याविषयी घृणा वाटते. पुढे अगदी त्याची शिसारी येते. आणि तरीही तीच तीच गोष्ट मनाविरुद्ध पुन्हा पुन्हा घडत राहिली तर...? तर त्याची सवय होते. सुजितच्या आईच्या बाबतीत असेच काहीसे घडले असावे. जेंव्हा सगळे मार्ग बंद झाले... काही देण्याच्या मोबदल्याशिवाय कुठूनच काही मिळण्याची सुतरामही शक्यता उरली नाही... वखवखलेल्या नजरा आशाळभूतपणे कायम लाळ गाळत राहिल्या. सहानुभूतीच्या आडून असहाय्यतेचा फायदा उठवत राहिल्या... देण्यासारखे काहीच उरले नाही... देणेकर्‍यांना चुकवण्यासाठी गाव सोडून तोंड लपवून निघून जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. तेंव्हा वरिष्ठांच्या पुढे जाऊन काहीतरी तडजोड करावी लागणार होती. वरिष्ठ आपला हेका सोडायला तयार नव्हते. त्यातूनही काही तोडपाणी होणार असेल, हात ओले करण्याची तयारी असेल; तर झालेला अपमान विसरण्याएवढे मन मोठे करायला मोठे साहेब तयार होते.
         'ज्याला भ्यावं, तेच आडवं यावं', असे म्हणायची वेळ आली. देण्याघेण्याची परिस्थिती राहिली नव्हती. दातावर हाणायला पदरात दमडी नव्हती. सुजितच्या मम्मीने नाइलाजाने आपला पदर पसरला. पसरलेल्या पदराकडे पाहून साहेबांना आपल्या चुकीची जाणीव झाली. सगळे व्यवहार पैशात थोडीच होतात! आपण उगीचच पैशाला महत्त्व देतोय. पैशापेक्षाही मौल्यवान काही गोष्टी असतात. पदराच्या पलीकडेही देण्याघेण्यासाठी काही असतेच ना! आणि केवळ एका परत'फेडी'च्या बदल्यात चुटकीसरशी हा माणूस सगळ्या अपमानावर पाणी सोडून मार्ग काढायला तयार झाला... तेंव्हा त्या कुठल्यातरी गाफिल क्षणी ती आपला निर्धार हरवून बसली. यावर फार काय बोलू? जनावरं मारून मांस खाणार्‍या माणसातही एक जनावर लपलेले असते. त्यालाही कधीकधी गरम रक्ताची ओढ असते. मृत शरीरापेक्षाही जिवंत शरीराला या वासनेने बरबटलेल्या बाजारात फार चांगली किंमत मिळते. तीच किंमत अदा करून तिने नवर्‍याची नोकरी वाचवली व बदलीचीही तजवीज केली. गुपचूप झालेल्या या व्यवहाराची गावात कुणकूण लागलीच.
'आजपर्यंत तर फार सतीसावित्रीचा आव आणत होती. एकदा वहिवाट पडल्यावर आता काय कोणीही यावे जावे. कोण आडकाठी करणार?' अशी भाषा बोलली जाऊ लागली.
          एकदा कलंकित होऊन उजळ माथ्याने फिरणे अवघड झाले; रक्ताला चटावलेल्या गिधाडांकडून शरीराचे लचके तोडून घेऊन पुढील काही महिने तिने आपला प्रपंच कसाबसा चालवला. अखेरीस नोकरीवर परत घेतल्याचा व सोलापूरच्या पलीकडे अक्कलकोटकडे बदली झाल्याचा आदेश हातात आला. आपल्या अब्रूची किंमत देऊन सुजितच्या मम्मीने अनेकांची देणी चुकती केली आणि गाव सोडला. एक दिवस जसा अचानक सुजित आला; तसाच अचानक गाव सोडून निघूनही गेला. पुन्हा तो मला कधीच भेटला नाही. पण अनेक प्रश्नांची उत्तरे कायम अनुत्तरीत राहिली. सुजितच्या मम्मीने आपल्या प्रपंचासाठी एवढी जबर किंमत मोजूनही सुजितच्या पप्पांचे म्हणजे राठोडसाहेबांचे व्यसन संपले का? का त्या माऊलीलाच बदफैली ठरवून ते व्यसनाच्या आणखी आहारी गेले आणि त्यासोबत तेही संपले का? गाव बदलल्याने माणसं बदलली, पण प्रवृत्ती बदलली का? आणि त्याच्या आईची निर्भत्सना एवढ्यावरच थांबली का? का प्रपंचाची लक्तरे सावरण्यासाठी तिच्या स्वतःच्या वस्त्राची ठिगळे पुन्हा पुन्हा जोडावी लागली?

(क्रमशः)

Saturday, 7 May 2016

१३...

         वाह! काय भारी दिवस होते तेंव्हाचे...! भारीच! रेडिओचे अप्रूप असण्याच्या त्या काळात टि.व्ही. नावाचा पेटारा आला होता. अलिबाबाच्या गुहेतील पेटार्‍यात नसेल असा खजिना या पेटार्‍यात होता. रविवारी सकाळी रंगोलीच्या हिंदी जुन्या गाण्यांसोबत आमची सकाळ सुरू व्हायची. साडेआठ वाजता 'चड्डी पहनके फूल खिला है'... म्हणत धावणारा मोगली म्हणजे आमचा एक संवगडीच बनला होता. तो, भालू, बघिरा जाम जावडायचे. शेरखानचा मात्र दरारा वाटायचा. आजही नाना पाटेकरचा आवाज ऐकला की, शेरखानच आठवतो. एकात एक वर्तुळे फिरता फिरता दूरदर्शनचा लोगो तयार व्हायचा. त्यानंतर सुरू व्हायचे महाभारत. श्रीकृष्ण शंख वाजवू लागला की, आम्ही संजयची दिव्यदृष्टी घेऊन कुरुक्षेत्रावर पोहचायचो. संस्कृत कशाशी खातात? हेसुद्धा माहीत नव्हते, त्या काळात 'यदा यदा ही धर्मस्य...' हा श्लोक तर ऐकूनच पाठ झाला होता. काय ते भीष्म पितामह... तो बलदंड भीम... आणि तसाच दणकेबाज दुर्योधन... शकुनीचा तर असा राग यायचा ना! बस्! कृष्णाचे गालातल्या गालात हसणे असो कि कर्णाची तडफड... खरे महाभारत यापेक्षा वेगळे असूच शकत नाही, यावर आमची गाढ श्रद्धा होती. 'मिले सूर मेरा तुम्हारा...' या गाण्यातील वेगवेगळ्या भाषा कळत नसल्या; तरी भारताच्या विविधतेतील एकतेची ओळख तेंव्हाच झाली होती. 'निन्ने स्वरगूम, होमार शूर तोमार शूर...' असले भारी काहीतरी आम्ही म्हणत राहायचो. सायंकाळी मराठी सिनेमा पाहिला की, रविवारचा दिवस सत्कारणी लागला असे वाटे. पुन्हा सुरू व्हायचे आठवडाभर पुढच्या रविवारची वाट पाहणे.
          टि.व्ही.वर मुंग्या येऊ लागला किंवा चित्र वरवर पळू लागले की, नऊ काड्यांच्या भल्या उंच अँटेनावर कावळा बसलाय, असले अंदाज परफेक्ट जुळायचे. रेडिओवर लागणारी आपली आवड आणि बिनाका गीतमाला ऐकता ऐकता बालपण उमलत होते. मोठ्या भसाड्या आवाजात आम्हीही गाण्याच्या भेंड्या खेळायचो, तेंव्हा हीच तर गाणी तोंडात असायची. शब्दांची पार वाट लावून टाकलेली असायची. 'कुण्या गावाचं आलं पाखरू' म्हणताना ते पाखरू डौलात बसण्याऐवजी देवळात बसे. सून साहिबा सून म्हणताना कोणत्या साहेबाची सून आहे, हे कधीच कळायचे नाही. परदेसियाँचे आम्ही 'पडदे शिवा' करून टाकले होते. दिवाळीत ऊरसाच्या वेळी गावातील तरुण मंडळाची पोरं नाटक बसवायची. मोठ्या पडद्यावर एखादा सिनेमा दाखवला जायचा. ग्रामपंचायतीच्या, तलाठी अॉफिसच्या, पोलीस स्टेशनच्या फळ्यावर लिहिलेल्या नाटक सिनेमाच्या जाहिराती पाठ होऊन जायच्या. गावभर गाडी गाडी खेळत मोठमोठ्याने ओरडत आम्ही फिरून यायचो. याल तर हसाल, न याल तर फसाल. दुसऱ्या दिवशी शेजार्‍यांना पुसाल... अशी जाहिरात करून टाकायचो. आमच्या लेखी सगळेच नाटक सिनेमे हे तीन अंकी तुफान विनोदी, कौटुंबिक आणि सामाजिक असत.
           तालुक्याच्या गावी म्हणजे बार्शीत आलेल्या सर्कसची जाहिरात करण्यासाठी सर्कसवाल्यांची मोठा स्पीकर लावलेली गाडी यायची. गाडीच्या मागे पळून पाच-पंचवीस रंगीत जाहिराती गोळा करेपर्यंत जिवाला चैन नसे. एकदा शाळेत अशीच काहीतरी चूक घडली होती माझ्याकडून. पोरं गुरुजींना नाव सांगतो म्हणू लागली. मग पोरांना याच रंगीबेरंगी जाहिराती देऊन त्यांची तोंडे बंद केली होती. सगळ्या जाहिराती वाटून संपल्यानंतर एकजण उरलाच. त्याला दुसरे काही देण्याची तयारी दाखवली. त्याला मात्र जाहिरातीच हव्या होत्या. शेवटी काही पर्याय उरलाच नाही. तो तक्रार घेऊन गेला. पण इतरांनी मात्र माझ्याच बाजूने साक्ष दिली. तो खरे सांगत असूनही खोटा पडला आणि मी दोषी असूनही निर्दोष ठरलो. नकळत्या वयातील या साध्या घटनेने खूप काही शिकवले. प्रत्येकाला भूक असते आणि पोटही असते. काहीतरी खाऊ घालायला लागते. कोणी खात नसेल; तर वेगवेगळ्या पद्धतींनी त्याचे तोंडही बंद करता येते.
          काही अडचणी मात्र भलत्याच खोड्यात अडकवतात. एका मित्राकडे शेतात हुरडापार्टीचे नियोजन होते. वर्गातले दोघेतिघे जाणार होते. त्याने मलाही बोलावले होते. अर्थातच माझीही जायची खूप इच्छा होती. परंतु एक अडचण होती. नेमकी त्या दिवशी शाळा होती. घरच्या मंडळीनी शाळा बुडवून मला पाठवणे शक्यच नव्हते. घरून परवानगी मिळणे दुरापास्त आहे, याची खात्री होती. जावे तरी कसे? हा प्रश्न सुटणारा नव्हता. एक मन मागे ओढत होते, तरीही दुसऱ्या मनाची जायची  इच्छा सुटत नव्हती. मित्र मधल्या सुट्टीत जायला निघाल्यावर तर फारच उलाघाल होऊ लागली. 'भित्री भागूबाई' म्हणून मित्र हुलीवर घालत होते. एकाने शक्कल चालवली. शाळा सुटेपर्यंत परत येऊ. कोणाला कळणारही नाही. हा पर्याय त्यातल्या त्यात बरा होता. शाळा सुटेपर्यंत परत यायच्या बोलीवर मी चक्क दांडी मारली. आम्ही चारपाचजण ओढ्यातून बोरे खात हुरडापार्टी जिथे होणार होती, तिथे पोहचलो. आमच्या दुप्पट उंचीच्या वाढलेल्या ज्वारीतून बांधावरून जाताना फारच टेरिफिक वाटत होते. कोणीतरी विचारलेही.
"काय रे पोरांनो! मास्तरांना अन् घरच्यानला सांगून आलाय ना रं?"
तिथे कोणीतरी मोहळ झाडलेले होते. तो मध खायच्या आशेने त्याच्यावरची नजरही न हटवता आम्ही खोटीच मान हलवली. खूप धम्माल आली. हुरड्यासोबत खायला काय एकएक पदार्थ होते. शेंगदाण्याची, लसणाची चटणी, गूळ, शेवचिवडा, खोबर्‍याच्या वड्या. वेळेचे भानही राहिले नाही. ऊन संपून सूर्य कलू लागला; तेंव्हा आपण घरी जायला हवे, याची आठवण झाली. एवढी रंगलेली मैफिल सोडून उठायला एकही जोडीदार तयार नव्हता. आलेल्या वाटेने उभ्या ज्वारीतून तेही एकट्याने जाणे माझ्या ताकदी बाहेरचे काम होते. शाळा सुटल्यावर सगळी मुले घरी जातील; तेंव्हा काहीतरी रामायण उभे राहील, याची जाणीव होऊ लागली होती. पण तरीही नाइलाज झाला होता.
          इकडे मी शाळेतून घरी आलो नाही म्हटल्यावर माई मला पाहायला शाळेत गेली. आता तिथे कोण असणार होते? वाटेने दिसेल त्या पोराकडे चौकशी सुरू झाली. कोणालाच काही माहीत नव्हते. शाळेला दांडी मारायची म्हणून एकतर गुपचूप आम्ही सटकलो होतो. त्यात वर्गातील एकाने मी मधल्या सुटीपासून शाळेतच नव्हतो; म्हटल्यावर घरच्या सगळ्यांचे धाबे दणाणले. सरकारवाडा, पिंपळाचा पार, मंदिर जिथे मी सापडू शकेल; अशा सर्व जागा शोधून झाल्या. घरातील सगळेच जण कामाला लागले. शेजारचीही काही उत्साही मंडळी शोध मोहिमेवर बाहेर पडली. एकटी सुनितामामी शिरीषला घेऊन घरी होती. बाकीचे सारेच वेगवेगळ्या ठिकाणी माझा शोध घेत होते. जसजसा वेळ जाऊ लागला; तशा नाना शंकाही बळावू लागल्या. त्यात भेटणारा माणूस काही वेगळेच सुचवायचा. मग तर घरचे आणखीनच हवालदिल झाले. नदी, डोह, आसपासच्या विहिरीसुद्धा पाहून झाल्या. काही दिवसांपूर्वी माझ्या वर्गातलाच एकजण पोहायला म्हणून गेला; तो बुडून फुगूनच वर आला होता. हा प्रसंग ताजा असल्यामुळे तर घरच्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. थोड्या थोड्यावेळाने प्रत्येकजण घरी येऊन मी आलोय का याची खात्री करत होता. 'नाही' म्हटल्यावर तोंड बारीक करून पुन्हा शोधायला बाहेर पडत होता. मोठेमामा वेगळीच शंका आल्यामुळे बार्शीच्या एस. टी. स्टँडपर्यंत पाहायला गेले. माईला तर खात्रीच झाली होती, मला माझ्या बापाने पळवले म्हणून. घरात रडारड सुरू झाली. मुकूंदमामाला कोणीतरी सांगितले की, माझ्या वर्गातील दोघेचौघे हुरडा खायला जाणार होते. कदाचित मी तिथेच सापडेल, या आशेने मुकूंदमामा तिकडे यायला निघाले. तोपर्यंत अंधार पडू लागला होता.
          आज खूप मज्जा केली, यावर मित्रांच्या हसून गप्पा चालल्या असल्या; तरी फक्त शरीराने मी त्यांच्यासोबत होतो. मनाने तर मी केंव्हाच घरी पोहचलो होतो. आता घरी गेल्यावर कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, याची आतून कुठेतरी जाणीव होत होतीच. फक्त आता सांगायचे काय आणि कसे? याचीच मनाशी जुळवाजुळव चालली होती. यापुढे असला नसता उद्योग पुन्हा कधी करायचा नाही, हेही मनाला वारंवार बजावून झाले होते. अर्ध्या वाटेतच नेमके मुकूंदमामाला समोरून येताना बघून थोडेसे हायसे वाटले. मोठेमामा असते; तर काही बोलायची गरजच पडली नसती. अगोदर एक कानाखाली बसली असती. मग चौकशी.
          जवळ आल्यावर माझे दप्तर आपल्या हातात घेऊन मामाने मला पुढे ओढले. मी आपले उगीचच काहीतरी स्पष्टीकरण द्यायचे म्हणून तोंड उघडले खरे! पण तोंडातून काही आवाज निघायच्या आतच खाडकन् गालावर फटाका फुटला. कानातून 'गुङ्गsss!' एवढाच आवाज येत राहिला. मला उचलून खांद्यावर घेऊन काही न बोलता मामा घरी आले. घरातले वातावरण पाहून खूप मोठे वादळ येऊन गेल्याच्या खुणा दिसत होत्या. कधी न रागावणार्‍या मुकूंदमामाने ते मारले; आता मोठेमामा कच्चा खाऊन टाकणार, हे उघड होते. पण नशिबाने मोठेमामा घरी नव्हते. माझ्या थोडासा जिवात जीव आला खरा. आबईने मला पाहायचा काय तो अवकाश होता. मुकूंदमामा कोणालातरी सांगत होते. 'हुरडा खायला चावरात गेला होता.' आबईने तेवढेच ऐकले. तरातरा बाहेर जाऊन परसातील सिताफळाची फांदी तोडली. 'ओल्या फोकाचे पडणे' म्हणजे काय? हे तेंव्हाच समजले. कोणी मला सोडवायला लवकर मध्ये पडले नाही. कुसूममामी येईपर्यंत अंगावर कुठे कुठे फटके बसत होते, हेही समजले नाही. मामीने मला सोडवून पाठीशी घातले. तरीही मामीच्या हातून ओढून घेऊन आबईने मला पकडले आणि जवळ पडलेल्या दाव्याने हातपाय बांधून भिंतीवरच्या खुंटीला अडकवले. आबईचा अवतार बघून मला सोडवण्यासाठी सगळे लांबूनच तिला समजावत होते. मोठेमामा येईपर्यंत अधूनमधून मला फटके पडतच होते. खुंटीला टांगल्यामुळे हातपाय सांध्यातून उपसून निघतील कि काय? असे वाटत होते.
"माई, पुन्हा नाही असं करणार. आता एवढ्या वेळ सोड."
अशी विनवणी केल्यावर मोठ्यामामाने मला सोडले. नशीब त्यांनीही मारले नाही. सुटका तर झाली; परंतु कोणाकडेही पाहायचे धाडस होईना. खूपच लाजिरवाणे वाटत होते. असे वाटायचे सगळे माझ्याकडेच पाहत आहेत. त्यानंतर कितीतरी वेळ माईच्या कुशीत तोंड लपवून मी रडत राहिलो.
          मी शाळा बुडवायला नको होती. घरच्यांना न सांगता परस्पर असे कुठे जायला नको होते. हे सगळे पटतेय मला. पण घरचे इतके चिडतील, असे वाटले नव्हते मला. यापुढे अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून धसकाच घेतला मी. नदीचे दोन तीर पाण्याच्या प्रवाहाचे नियंत्रण करत असतात. एकीकडे जागी होणारी ईर्ष्या आणि दुसऱ्या बाजूने घरातील शिस्त माझ्या प्रवाहाला वळण देत राहिले.
          आबई मला मारत असताना अनेकांनी पाहिले होते. त्यामध्ये वेणूही होती. वेणूने मी मार खाताना मला पाहायला नको होते. तिच्यासमोर माझ्या इज्जतीचा फार कचरा झाला होता. पुढचे दोनतीन दिवस मी तिला टाळतच होतो. नाहीतरी तसेही मोठे होईल तसे आमचे एकत्र खेळणे कमी होत चालले होते. मुलींसोबत खेळताना दिसले; तर बाकीची मुलं चिडवायची हा भाग होताच. मलाही बल्लू, ओमीसारखे माझे नवीन संवगडी मिळत चालले होते. त्यामुळे वेणूच्या सोबतीची तेवढी गरज उरलेली नव्हती. पण वेणूला मात्र मी कायम हवा असायचो. एक तर मी खूप हुशार असल्याचा तिलाच फार अभिमान होता. अभ्यासात तिला कायम माझी मदत हवी असायची. माझ्यामुळेच तर तिचा अभ्यास पूर्ण होई. त्यासाठी मी सांगेल ते काम करायला ती तयार असे. घरातून काही खाऊ मिळाला की, मला पोहचवण्यासाठी तिची धडपड असे. खरं सांगू का? अलीकडे वेणूची सलगी मला नको झाली होती. हुरडा खायला जाताना आम्ही किती धमाल केली, हे तिला सांगायचे होते. ओढ्याला बोरे किती खाल्ली, वाढलेल्या ज्वारीतून कसे न घाबरता गेलो, मोहळाचा मध खाल्ला... हे सगळे तिला सांगावेसे वाटत होते. पण आबईने मारलेले आठवायचे आणि ती आठवण पुन्हा नको म्हणून बोलणेच नको. तेवढ्यासाठी तर आणलेली बोरेही तिला दिली नाहीत. दुसऱ्या दिवशी शुभाताईलाच बोराचा वास आल्यावर तिने काढून घेतली. वेणूला टाळण्यासाठी आणखी एक कारण सापडले. माधवमामाने मागे एकदा आमच्या दोघांचा एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला होता. तो फोटो पाहून तर अनेक दोस्तांनी मला चिडवले होते. म्हणूनच मीही फक्त घरी असतानाच तिच्याशी बोलायचो. आता तर तिच्यासमोरच मला मार खावा लागला होता.
          नेमके थोड्याच दिवसांत मी भाषणाची स्पर्धा गाजवली. सगळेच मागचा झाला प्रकार विसरून गेले होते. यावेळी झालेल्या कौतुकाने माझी गेलेली इज्जत पुन्हा मिळाली होती. ज्या ज्या मुलांचे नंबर आले होते; त्या सर्वांची प्रमाणपत्रे व बक्षिसाची पाकिटे देऊन प्रार्थनेच्यावेळी गुरुजींनी अभिनंदन केले होते. स्पर्धेनंतर मी आजारी पडल्यामुळे दोन दिवस शाळेत गेलो नव्हतो. शुभाताईही आता हायस्कूलला जात होती. त्यामुळे मी नसताना माझे बक्षीस वेणूनेच जाऊन स्वीकारले. एवढेच नाही तर घरी आल्यावर सगळा कौतुकसोहळा अथःपासून इतिःपर्यंत रंगवून सांगितला होता. बक्षीस तर माझेच होते; पण स्वीकारण्याची संधी वेणूला मिळाली होती. याचाही तिला स्वतःलाच बक्षीस मिळाल्याइतका आनंद झाला होता.
           माझा स्कॉलरशिपचा निकाल आला, तेंव्हा कौतुकात भरच पडली. भले गुणवत्ता यादीत नंबर नसेल आला; पण तिथपर्यंत पोहचून पास तर झालो होतो. एकूणच काय चुका करून शिक्षा भोगायची आणि स्वतःचा अपमान करून घ्यायचा. यापेक्षा चांगले काही करून कौतुक करून घेण्यातच मजा असते, याची जाणीव झाली होती. यापुढे चुका होणारच नव्हत्या, अशातला भाग नव्हता. पण काही घडलेच; तरी त्या सावरून कशा न्यायच्या, याचेही तारतम्य येऊ लागले.
          बरोबर वर्षभरानंतर अक्षयतृतीयेच्या वेळी पंधरा दिवसाची सुटी घेऊन माधवमामा आला होता. भाषण स्पर्धेचा व स्कॉलरशिपचा निकाल ऐकून त्यानेही कौतुक केले. पण मी मार खाल्ला होता, हे शुभाताईकडून त्याला कळले असावे. तो आबईला रागावला. मलाही रागावला.
"लेका, जायचं तर सांगून जायचं. हुरडा खाऊन वरून मारबी खाल्लास!"
         परसात एक भोपळ्याचा वेल होता. एक बियासाठी राखलेला भोपळा वाळून कोळ झाला होता. माधवमामाने काथ्याने भोपळा विणून त्याचा बिंडा वनवला. मला म्हणाला, "गब्बरसिंग, बिंडा तर बनिवला, पण विहिरीला पाणी आहे का? उद्या मळ्यात जाऊ. तुला पोहायला शिकवतो."
          गल्लीतली आम्ही चारपाच पोरं माधवमामासोबत पोहायला जाऊ लागलो. आमच्या विहिरीपेक्षा पिराच्या विहिरीत पाणी बरे होते. मग आम्ही रोजच पिराच्या विहिरीवर जात राहिलो. पोहायला शिकायला सुरुवात केली त्याच्या दुसऱ्या का तिसर्‍याच दिवशी संध्याकाळी त्याने मला शब्बूआपाच्या घरी काहीतरी निमित्त काढून पाठवले. शब्बूआपाच्या शेताजवळच पिराची विहीर असल्यामुळे मीही आम्ही पोहायला तिथे जात असतो, हे बोलताना सांगून टाकले. त्यानंतर माधवमामाची सुट्टी संपेपर्यंत आम्ही पोहण्यात तरबेज झालो. शब्बूआपा पण त्यानंतर रोजच विहिरीवर येत होती. माझ्या पोहण्याचे तिला कौतुक वाटायचे. म्हणून मीही तिला दाखवण्यासाठी पहिल्या दुसऱ्या करत करत पाचव्या पायरीवरून उड्या मारू लागलो. माधवमामा थोडावेळ पोहून तिथेच विहिरीत पायर्‍यावर शब्बूआपाबरोबर गप्पा मारत बसायचा. आम्हांलाही पोहायला तेवढाच जास्त वेळ मिळायचा. माधवमामा, शब्बूआपा व आम्ही सगळेच काहीतरी जोक करून खूप हसायचो. आपा आधीच गोरी होती. उन्हातून आल्यावर लालबूंद झालेली असायची. हसताना तिच्या नाकाचा शेंडा अजून लालबूंद व्हायचा. माधवमामा आम्हाला हळूच खुणवायचा. मग आम्ही "लाल मिरची...!" म्हणून मोठ्याने ओरडून पाण्यात उड्या मारायचो.
          पाहता पाहता मामाची सुट्टी संपली. फक्त मला हे कळले नव्हते की, माधवमामा जायच्या आदल्या दिवशी आम्ही कितीही जोक करून आपा हसली नव्हती. त्यादिवशी तिचे नाक तर लाल झाले होतेच, पण डोळेही लालबूंद झाले होते. तिला कोण हसवतेय? म्हणून मामाने पैज लावली; तर ती उठून वर निघून गेली. मला उगीचच असे वाटले की, आम्ही चिडवल्याचा तिला राग आला असावा. जाताना तिच्या गालावर थेंब चमकल्यासारखे वाटले. माधवमामालाही बहुतेक तसेच वाटले असावे. तोही मग तिची समजूत काढण्यासाठी तिच्या मागोमाग गेला.
          बर्‍याच वेळाने तो परत आल्यावर आपा घरी गेली म्हणून सांगितले. आमचे सगळ्यांचे पोहायचे झाले होते. आम्हीही आता घरी जायला निघणारच होतो. नाहीतरी आज पोहताना काही मजा आली नव्हती. तरीही माधवमामा मात्र एकटाच थोडावेळ पोहत राहिला. पोहून त्याचेही डोळे लाल झाले होते.

(क्रमशः)

Tuesday, 3 May 2016

१२...

          या दुनियेत एवढी सारी माणसं आहेत. पण प्रत्येकाची तर्‍हा वेगळी. सगळ्यांचेच आयुष्य सारखे कुठे आहे? प्रत्येकजण आपल्या आयुष्याची एक 'ब्ल्यू प्रिंट' घेऊन येत असतो. पोपट घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेल्या जोश्यापासून ते प्रस्थापित प्राच्यविद्याविशारद ज्योतिर्भास्करापर्यंत कित्येकजण त्याची उकल करण्याची खटपट करतात. कोणाला त्यातले कितपत कळते कोणास ठाऊक! जो तो आपापल्या परीने त्याचा अर्थ लावत असतो. पण जरा बारकाईने विचार केला की, एक गोष्ट हमखास लक्षात येते. कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नाही. विनाकारण तर नाहीच नाही.
          असंख्य ठिपके असलेल्या एखाद्या रांगोळीप्रमाणे एकेक ठिपका आपण जोडत चाललेले असतो. एखादे डिझाईन डोक्यात ठेवून तुम्ही काढलेल्या रांगोळीत फारसे नावीन्य नसते. फक्त कार्यसफलतेचा आनंद असतो. रूळलेल्या वाटांनी जगण्यामध्ये तरी यापेक्षा काय वेगळे असते. या मळलेल्या वाटा तुम्हांला उद्दिष्टांपर्यंत पोहचवतात. यामध्ये सफळ संपूर्णपणे जीवन कडेला लागले, याचाच आनंद. पण नवनवीन वाटा शोधून नवी शिखरे पादाक्रांत केल्याचा आनंद तुम्हाला कसा मिळावा? खरं म्हणजे तुम्ही ज्या बिंदूवर असता; त्याच्या आठही बाजूंपैकी कोणत्याही एका दिशेने जाण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला असते. परंतु तुम्ही निवडलेली प्रत्येक दिशा तुमच्या संपूर्ण रांगोळीचा आकारच बदलून टाकते. तुमच्याही नकळत तुम्ही ठिपके जोडत जाता. जास्तीत जास्त सुंदर रचना करण्याकडे तुमचा कल असतो. पण जसजसा आकार येत राहतो; तेंव्हा तुम्हीही अचंबित झालेले असता. तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे तुम्ही जगलेला असता. प्रवास पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल ना मिळेल. पण नवनिर्मितीचा... सृजनाचा आनंद तुम्हाला मिळालेला असतोच असतो. सगळ्याच गोष्टींचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. पाहिलेले सगळे काही कळतेच, असे थोडीच आहे. कळण्याएवढी जागृत बुद्धी आणि पाहण्यासाठी 'ती' नजरही असावी लागते. सगळीच देवस्थाने स्वयंभू थोडीच असतात. काही काही दगडावर कोणाच्यातरी नकळत शेंदराची बोटे पुसली जाऊन देवस्थानं झालेली असतात. पण म्हणून सगळ्याच दगडाची देवस्थानंही होत नाहीत. प्रत्येकाचे प्राक्तन वेगळे. त्यात्यावेळी आयुष्याचा अर्थ लागेलच असे नाही. चालताना घेतलेली सगळीच वळणे कळतीलच असेही नाही. पण विशिष्ट उंची गाठल्यानंतर सगळा प्रवास स्पष्ट होतो. साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचेही अर्थ लागतात. म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की, कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नाही... आणि विनाकारण? तर नाहीच नाही.
          चौथीच्या वर्षात केवळ स्कॉलरशिप परीक्षा एवढाच भाग नव्हता. ही तर सुरुवात होती. या काळात अशा अनेक साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी घडत गेल्या. पण पुढे घडणाऱ्या पर्वाची ती नांदी होती. एकदा का तुम्हांला एखाद्या गोष्टीचा चस्का लागला की, जगातील कोणतीही नशा त्याच्यापुढे झक मारते. व.पु. म्हणतात तसे माणसाला काही न काही छंद हवा, स्वप्न हवीत; पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला
जिंकायला व जगायला शिकतो...!
          आपल्यामध्ये काही प्रवृत्ती उपजतच असतात. त्या कुठेतरी आतमध्ये अगदी खोलवर गाडल्या गेलेल्या असतात. टिकून राहण्यासाठी त्यांना थोडीसीही ओल पुरते. पेरलेले दाणे उगवून येण्यासाठी वाफसा व्हावाच लागतो. त्यामुळे योग्य परिस्थितीची वाट पाहत त्या तग धरून राहिलेल्या असतात. आपल्या आसपासच्या वातावरणाचीही त्यात भर पडत राहते. तुमच्याही नकळतपणे तुमच्या आयुष्याची जडणघडण चाललेली असते. अंकुर फुटतो आणि समजा वेळकाळाप्रमाणे त्याला खतपाणी मिळालेच; तर मग विचारायलाच नको. जीवनरूपी वृक्ष फोफावत राहतो. तुम्ही गुण म्हणा अगर अवगुण; पण या काळातच माझ्यामधील ईर्ष्या जागी होऊ लागली होती. यश, कौतुक वाट्याला आले पाहिजे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तशीच ती माझीही होती. पण ते दुसऱ्या कोणाच्या वाट्याला आले की, माझ्यातील ईर्ष्या मला आतून जाळून काढू लागली. मला त्या समोरच्याविषयी काहीच देणेघेणे नसे. मला स्वतःचाच राग येई. त्याच्याकडे असे काय आहे; जे माझ्याकडे नाही. तो करू शकतो; मग मी का नाही?
          "मी का नाही?" या प्रश्नाने मी बेचैन राहू लागलो. त्यासाठी माझे डोके वेगाने काम करू लागले. नवनवीन कल्पना सुचू लागल्या. फक्त समाधानाची गोष्ट एवढीच होती की, ही ईर्ष्या निर्मळ होती. कोणताही उपद्रव अथवा विनाशकारी नव्हती. ती स्वतःपुरतीच होती. एखाद्याकडे कोणती चीजवस्तू असल्याचे दुःख मला नव्हते. पण तशीच वस्तू मलाही मिळायला हवी आणि मग ती मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होत. कोणी एखाद्याने काही केले आणि त्याचे कौतुक झाले की, माझा ईर्ष्याळू स्वभाव जागा होई. त्याच्याहूनही सरस असे काही करून कौतुक मिळवेपर्यंत मला स्वस्थता कसली ती मिळायची नाही. कायम उंची गाठण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी धडपड सुरू व्हायची. हे तारुण्याच्या आणि कर्तृत्वाच्या काळातही असेच चालू राहिले. त्यामुळेच तर मी एकेक पायरी चढतच राहिलो.
          मागे जाऊन मूळ शोधायचा प्रयत्न केला; तर इथपर्यंत नक्कीच मागे येता येईल. त्यावेळी आमच्या शाळेत एक खूप चांगली प्रथा होती. वर्षभरातून वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी व्हायची. पण संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनी करायचे. अगदी कार्यक्रमात अध्यक्षस्थानीही विद्यार्थीच. मुख्याध्यापक गुरुजींच्या शेजारी खूर्चीत बसायला मिळणे, हा किती मोठा सन्मान! चौथीत असताना हा ईर्षेचा किडा मला चावला आणि गांधीजयंतीला भाषणाची तयारी करूनच गेलो. गुरुजी कसे बोलतात... हातवारे कसे करतात... याचे निरीक्षण केलेले होतेच. पाठ केलेले भाषण नुसती पोपटपंची करून धडाधड बोलायचे नव्हतेच. त्या वयाला शोभेल असा अॅटिट्यूड दाखवत फार पोक्तपणाचा आव आणून मी तेंव्हा बोललो. त्याचा फायदा एकच झाला. दिवाळीनंतर होणाऱ्या स्पर्धेसाठी सोनारगुरुजींच्या डोक्यात मी अगदी फिट्ट बसलो.
           त्याकाळात निबंध, कथाकथन, भाषणाच्या तालुकावार स्पर्धा होत. आजपर्यंत या स्पर्धांमध्ये आमच्या शाळेचा लौकिक होता. हमखास बक्षिसे मिळायचीच. यावर्षीही साधारणपणे दिवाळीनंतर डिसेंबर कि जानेवारी महिन्यात आम्हा दहाबारा मुलांना गुरुजी तालुक्याच्या गावी नेणार होते. आतापर्यंत घरच्यांसोबत बाहेर जाण्याचा योग आला होता; पण हे असे एकट्याने जाण्याची ही पहिलीच वेळ होती. मनात धाकधूक तर होतीच. माई गुरुजींना भेटायला आली होती. तिने बरेच काहीबाही सांगितले त्यांना. "आबईच्या सासरची कोणी मंडळी आली; तर पोराला सोडायचं न्हाई. त्याचा बाप जरी आला; तरी पोराला सोडू नका. आमच्यापासून घेऊन जाताय. संध्याकाळी त्याला आमच्या ताब्यात पोचवायला जमत आसंल; तर पोराला घेवून जा." आजी हे सगळं सांगताना माझी अवस्था मात्र फारच विचित्र झाली होती. आजीने असे काही गुरुजींना बोलू नये, असे वाटत होते. तशी गुरुजींना आमच्या कुटूंबाची बर्‍यापैकी माहिती होतीच. मोठ्यामामाचे व गुरुजींचे संबंधही चांगले होते. गुरुजींनी पुन्हा पुन्हा माईला शब्द दिला. पोराची जबाबदारी माझी. पोराचे बोट सोडून कुठेच जाणार नाही म्हणून. अर्थातच तरीही माईचे समाधान होण्यासारखी परिस्थिती नव्हती; म्हणून तिने पाठीमागून मुकूंदमामाला पाठवून दिले.
          शहरातील हा अनुभव माझ्यासाठी नवाच होता. घरच्यासोबत गावाला जाण्यापेक्षा सर्व मुले मिळून एकत्र प्रवासाची मजा काही औरच होती. एकट्याने प्रवास करण्याएवढे आपण आता मोठे झालो आहोत, असे वाटू लागले. अगोदर गुरुजी आम्हा सर्वांनाच घेऊन त्यांच्या घरी गेले. ते माडीवर राहायचे. गॅलरीतच स्वागताला पोपटाचा पिंजरा लटकवलेला होता. एका खोलीत तर कपाटभरून पुस्तकेच पुस्तके होती. टेबलखूर्ची होती. गुरुजींची ती अभ्यासाची खोली होती म्हणे. टेबलावर एक वाकड्या पाईपचा दिवा होता. भारीच दिसत होता तो. फक्त टेबलावरच उजेड पडायचा. मी तर तेंव्हाच ठरवून टाकले. आपल्याला पण अभ्यासाची अशीच जागा असायला पाहिजे. गुरुजींच्या बाईपण चांगल्या होत्या. त्यापण गुरुजीसारखाच चष्मा लावायच्या. आम्ही डबे नेले होते, तरी पण त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी गरमागरम पोहे बनवले. वरून सगळ्यांना चहापण दिला. ओमीने गडबड केलीच. त्याच्या हातातून पाण्याचा मगच निसटला. सार्‍या घरभर पाणी झाले. तरीही बाई रागावल्या नाहीत. तिथून मग आम्हांला घेऊन गुरुजी स्पर्धा होणार होत्या; त्या शाळेत आले. तिथे पोहचल्यावर आम्हांला भाषणाचे विषय मिळाले. तसे त्यांनी अगोदरच ते शाळेला पाठवले होते म्हणे; पण मिळाले नाहीत, यात त्यांचा काय दोष? आमच्याकडे मात्र आता तयारीसाठी तासा दोन तासाचीच काय ती सवड होती. तोपर्यंत मुकूंदमामाही येऊन पोहचले होते. मला आणखीन बरे वाटले.
          गुरुजींनी फळ्यावर लिहिलेले पाचही विषय वाचून यायला सांगितले. बाकीचे असेच काहीएक विषय होते; पण मला 'माझे स्वप्न' या विषयावर बोलायचे होते. त्या विषयावर काय बोलायचे याचा त्यांनी अंदाज घेतला. मग थोडक्यात एक गोष्ट सांगितली. स्वप्न म्हटले की, रात्री झोपल्यावर पाहतो ते स्वप्न एवढेच मला माहीत होते. गुरुजी म्हणाले, आपल्याला मोठे झाल्यावर काय बनायचे आहे, हेही स्वप्नच असते. समज तू मोठेपणी वैमानिक झाला आहेस. तुला तसेच स्वप्न पडले. तुला जी मजा येईल, ते सांग. मग तुला कळते की, विमानात बाँब आहे. तू सगळ्यांना सुखरूप बाहेर काढतो आणि विमानाचा स्फोट होतो. तुझ्या धाडसासाठी तुला पंतप्रधानाच्या हस्ते बक्षीस मिळते. तू आनंदाने ओरडतच झोपेतून जागा होतो. ही गोष्ट त्यांनी सांगितली तशी मला भाषणात सांगावी लागणार होती. माझ्यापेक्षा मुकूंदमामाच बारकाईने ते ऐकत होते. नेमके भाषण काय करायचे आहे, हे त्यांच्या लक्षात आले. तिथून मग तासभर पुन्हा पुन्हा त्यांनी ते माझ्याकडून घोटवून घेतले. मधूनमधून मला ते दुरुस्ती सांगायचे. रंगवून गोष्टी सांगण्यात तसा मी पटाईत होतोच. प्रत्यक्ष भाषण करायला उठेपर्यंत मी निवांत होतो. मात्र माईकपुढे उभे राहिल्यावर पाय थोडे लटपटले. घसा कोरडा पडला. समोर बसलेले विद्यार्थी आणि शिक्षक नवीन होते. त्यामुळे मग मी गुरुजींकडे आणि मुकूंदमामाकडे पाहिले. ते हळूच हसले. मलाही हसू आले. मी आलटून पालटून त्यांच्याकडे बघून बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू भीती पळून गेली. सगळे शांतपणे ऐकताहेत. त्यात मोठे साहेबपण होते. हे पाहून मला जोर चढला. आयुष्यातील पहिली लढाई सुरू झाली आणि संपलीही. पहिले बक्षीस... तेही घसघशीत एकावन्न रुपयांचे. कौतुक झाले ते वेगळेच. रात्री घरी आल्यावर माईने मीठमिरच्या ओवाळून टाकल्या. गंमत म्हणजे तरीही मला कोणाची तरी नजर लागली असावी. मी चक्क पुढील दोन दिवस अंथरुणातच काढले.
          आपण कायम फोकसमध्ये असायला हवे. हिरोलाच सगळे विचारतात; तेंव्हा आपण हिरोच व्हायला हवे. पण एखादा असिस्टंट हिरो असेल; तर हिरोचा भाव आणखीनच वाढतो. सपोर्टला कोणी असेल; तर कॉन्फिडन्स वाढतो. हे लक्षात आले होते. कुठेतरी ऐकलेला एक डायलॉग आहे. अपनी किमत उतनीही रखिए, जो अदा हो सके| अगर अनमोल हो गए, तो तनहा हो जाओगे| ते खरेच तर होते. वर्गातील बर्‍याचजणांचे ग्रुप झाले होते. पण हिरोगीरीच्या नादात मी एकटा पडलो होतो. ही कसर काढण्यासाठी कि काय? माझ्या या सिनेमात बल्लूची एन्ट्री झाली.
         बल्लू हा काय माझ्या वर्गात नव्हता किंवा तो माझ्या वयाचाही नव्हता. उलट माझ्यापेक्षा तीनएक वर्षांनी लहानच होता. आमच्या घराच्या खालच्या बाजूला काही मळे होते. त्यात एक त्यांचाही होता. तिथेच जनावरांसाठी गोठा होता. कोंबड्यांचे खुराडे होते. दररोज सायंकाळी कोंबड्या खुरड्यात डालण्यासाठी तो मळ्यात यायचा. सुट्टीदिवशी तर दिवसभर त्याला मळ्यांतच थांबावे लागे. त्याच्या येण्याजाण्याची वाट आमच्या घरापुढूनच असल्यामुळे कधीकधी माझ्याकडे तो थांबायचा. त्याला आकर्षण वाटण्यासाठी आणखी एक निमित्त मिळाले होते. मुकूंदमामाने बाहेरच्या परसात दोन मजबूत मेढी उभ्या करून मोठ्या लाकडी पाटाचा झोपाळा टांगलेला होता. मी तिथे खेळताना दिसलो की, तो आवर्जून यायचा. हळूहळू दोघांनाही एकमेकांची एवढी सवय झाली की, शिक्षण संपून मी नोकरीच्या निमित्ताने घर सोडेपर्यंत तो सावलीसारखा सोबत राहिला. पुढेही भेटीगाठी कमी झाल्या; तरी ऋणानुबंध कसे संपतील?
            बल्लूप्रमाणेच ओमी आणि मी याच दिवसात काहीसे एकत्र आलो. ओमी म्हणजे ओंकार. एकाच वर्गात होतो आणि स्कॉलरशिप पास होणारांमध्ये तोही होता. पेठेत त्यांचे घर होते. त्यावेळी गावात अवघ्या चारजणांकडे टि.व्ही. आलेले होते. भला मोठा ब्लॅक अँड व्हाईट टि.व्ही. सरकती लाकडी दारे असलेला. त्याकाळात बी.आर. चोप्राच्या महाभारत मालिकेने लोकांना वेडे केले होते. विशेषतः आम्ही चिल्लरपार्टी तर डोळ्याची पापणीही न हलवता एकटकपणे त्यात हरवून गेलेलो असायचो. 'वर्गमित्र' एवढ्याशा वशिल्यावर दर रविवारी मी टि.व्ही. पाहण्यासाठी त्याच्या घरी जात असे. आता दोघांच्या समान आवडीचा एक दुवा जुळला होता. गोष्टींची पुस्तके. ओमीच्या घरी भलेमोठे किराणा मालाचे दुकान होते. दुकानाच्या मागील खोलीत माल ठेवलेला असे. तिथेच रद्दीचे गठ्ठेही ठेवलेले होते. कोळशाच्या खाणीतच हिरा सापडतो. तसे या रद्दीतून काही चांगली पुस्तके मिळत. मासिके असत. रविवारच्या रंगीत पुरवण्या असत. महाभारत संपले तरी रविवारी दुपारपर्यंत तहानभूक हरपून त्या ढिगार्‍यात बसून राहायचो. लहानपणीची ही दोस्ती खर्‍या अर्थाने पक्की अगदी घट्ट होईपर्यंत आमचे पाखिफुटे वय आले होते. वेडे होऊन बेभान जगण्याच्या काळात आम्ही पुन्हा एकत्र आलो. वेडेपणा काय असतो तो शब्दशः आणि अर्थशः आम्ही जगलो.

(क्रमशः)

Saturday, 23 April 2016

११...


          भल्या पहाटेच आबईने कि माईने... पण कोणीतरी मला उठवले असावे. काहीसा वैतागून डोळे चोळीतच बाहेर आलो. एका हातात कंदील व दुसऱ्या हातात असलेले डमरूसारखाच आवाज करणारे कुडमुडे वाजवत कोणीतरी दारात आला होता.
माई म्हणाली, "पांगूळ आलाय."
मी पाहिले, तर चांगला धडधाकट होता. दोन्हीही पाय व्यवस्थित असूनही हा पांगळा कसा? डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा आणि अंगावर कोट घातलेला... कपाळाला भस्माचे पट्टे होते. गळ्यात अनेक प्रकारच्या माळा होत्या. त्या माणसाने आपल्या कमरेला अडकवलेल्या पिशवीतील चिमुटभर भस्म माझ्या कपाळाला लावले.
         दारावर मागायला येणारे अनेकजण पाहिले होते आतापर्यंत. त्यामध्ये मोरपिसांचा टोप घातलेले वासुदेव असायचे. माईने सूपभरून धान्य झोळीत टाकले की, माईच्या आई-वडिलाचे, सासू-सासर्‍याचे नाव विचारून "दान पावलं...!" म्हणून टाळ वाजवून नाचणारे वासुदेव पाहिले होते. त्यांच्या टोपातील एखादा मोरपीस पुस्तकात ठेवायला मिळाला, तर 'किती भारीच मज्जा!' असे वाटायचे. पुस्तकात मोरपंख ठेवला की, त्याचा मोर होतो. त्यावेळी आमची आपली तशी भोळी समजूत होती.
पोलिसांसारखे कपडे घालून येणारे रायरंद तर असे छान भारी काहीतरी बोलायचे. "लग्नाला चला... तुम्ही लग्नाला चला. सखूबाई ठकूबाई लग्नाला चला. लेकरं बांधा खुटीला अन् कोकरं घ्या काखेला...!" असले काहीएक गमतीदार बोलायला लागले की, हसून हसून बेजार व्हायचो. गळ्यात अडकवलेल्या बाजाच्या पेटीवर "चलो मच्छिंदर गोरख आया..." अशी नवनाथाची गाणी म्हणणारे नाथ यायचे. धुपाटणी घेऊन फिरणारे हिरव्या कपड्यातील फकीर यायचे. हलगीच्या ठेक्यावर गाणी म्हणणारे पोतराज यायचे. गुबूगुबू वाजवत नंदीवाले यायचे. आसुडाचे फटकारे अंगावर ओढत मरीआईवालेसुद्धा यायचे. पण सगळे यायचे ते दिवसाचे. असे पहाटे येणारा पांगूळ पहिल्यांदाच पाहिला होता. कुडमुडेवाला होता जणू तो. नंतर मुकूंदमामाने सांगितले की, याला 'पिंगळा' म्हणतात म्हणून. पिंगळा...! कुणाशीही बोलायचे नाही. दारात उभे राहून दान मागायचे नाही. सूर्य उगवण्यापूर्वीच फिरायचे, असा यांचा नियम. यांच्यापैकी कोणीतरी एक जण पहाटेच 'पिंगळा आला' हे गावात कळण्यासाठी गावाबाहेरील झाडावर चढून ओरडायचा. कुणाशीही न बोलणारे हे पिंगळे जे बोलतील; ते मात्र खरे होते, अशी लोकांची भावना होती.
          अलिकडे बदलत्या काळाबरोबर अनेक लोककला व अनेक लोककलावंत नामशेष होऊन गेले आहेत. बहुरूपी व वासुदेव तेवढे तुरळक आढळतात. इथल्या संस्कृतीच्या नावाने कायम खडे फोडणारांना हे तरी माहीत आहे का? की कधीकाळी लोककलेचा एक समृद्ध वारसा आपण उशाशी घेऊन झोपत होतो. आणि आज पिढ्यान् पिढ्या जपलेली ही श्रीमंती काळाच्या प्रवाहात हरवून गेलीय. आज फक्त दंतकथा बनून राहिली आहे. केवळ आपल्या टिचभर पोटाची भूक भागवण्याच्या गरजेपलीकडे जाऊन सृजनवृत्तीचा... प्रतिभेचा अविष्कार होता या कलेत. समोरच्या माणसाच्या मनात शिरून आरसा दाखवण्याचे कौशल्य होते. पिढीजात अभ्यासाचे संचित होते. 
         पुढे अनेक वर्षांनी भिमाशंकरच्या वाटेवर भटकंतीमध्ये अगदी अनपेक्षितपणे असे दोघेजण मला भेटले. आवर्जून गाडी थांबवून त्यांना मीच भेटलो. त्यांनी मग नेहमीच्या ठोकताळ्याप्रमाणे माझे भविष्यही सांगितले. काही पटणारे भूत-वर्तमान आणि आशा लावणारे भविष्य ऐकायला तेही त्यांच्या स्टाईलमध्ये बरे वाटत होते. स्वतः होऊन शंभर रुपये काढून दिले. आणखी मिळतील, या आशेने तेही रंगवून सांगत होते. माझा खरा इंटरेस्ट त्यांच्या भविष्यकथनात नसून त्यांच्या कलेत आहे, हे कळल्यावर पोटभर आशीर्वाद देऊन त्यांनी काढता पाय घेतला.
          "जर भविष्य खरं झालं आन तू शिखर शिंगणापूरच्या म्हाधेवाला कधी आलाच; तर आवरजून भेट!" असे म्हणून थोडा भस्म आमच्या कपाळी लावला. सातारला असताना गावाकडे जाण्याचा तो तर माझा नेहमीचा रस्ता होता. भेटला वेळ कधी, तर नक्कीच भेटू; म्हणून मीही निरोप घेतला होता.
          आता लहानपणी माझ्याकडे फारसा भूतकाळ होताच कुठे? भविष्यकाळाचे मात्र ढिगारे पडले होते. का कोण जाणे! पण या कुडमुडेवाल्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माईला म्हणाला, "आई, पोराला जपा. म्हाधेव हाये त्यो. साधाभोळा हाये, तेवढाच गरम डोक्याचा हाये. बाईच्या जातीपासनं अडचणी हायत्या त्याला. एक दिस लई मोठा कामदार हुईल. पन शेवटी संन्याशीच. जवळचं सगळं उधळून एक दिस मसणात जावून बसंल. देवाची नजर राहील त्याज्यावर. पन त्याज्या नावानं पाच सोमवार धरा."
          असेच बरेच काहीबाही तो बोलत राहिला. माईने सुपभरून दाणे आणि दोन रुपयाची नोट दिल्यावर स्वारी निघून गेली. त्यावेळी त्याच्या बोलण्याचा अर्थ उमगेल असे वय माझे नसले; तरी माईच्या काळजीत भरच पडली असावी. पुढे बरेच दिवस ते जाणवत राहिले. आज त्यातील किती खरे ठरले आणि किती खोटे, हे सांगायचे अवघड आहे. पण ते चुकीचे होते, असे म्हणायला जीभ रेटत नाही. माधवमामा मात्र गालातल्या गालात हसत होता.
          अरे हो! सांगायचे राहिलेच. गुढी पाडवा यावेळी रविवारला जोडून आला होता. त्याचवेळी आणखी दोन दिवसांची सुटी घेऊन माधवमामा घरी आला होता. तो खूप खुशीत होता. कंपनीमधील त्याचे काम पाहून त्याच्या मोठ्या साहेबांनी त्याला आपल्यासोबत गोव्याला न्यायचे ठरवले होते. त्यांच्या कंपनीचे एक फार मोठे काम तिथे चालणार होते. साहेबांना आपला असिस्टंट म्हणून माधवमामा हवा होता. पुढील एक वर्ष ते दोन वर्षे त्याला तिथे राहायला मिळणार होते. साहेब बराच अनुभवी आणि हुशार असल्यामुळे शिकण्यासारख्या बर्‍याच गोष्टी होत्या. सरकारी नोकरीपेक्षा खाजगी नोकरी करून पुढेमागे स्वतःचा व्यवसाय करण्याचा त्याचाही विचार असावा. एकदा गोव्याला गेल्यावर पुन्हा लवकर येता येणार नाही; म्हणूनच जाण्यापूर्वी तो घरी आला होता. तसेही तो शिकायला पुण्यालाच असल्यामुळे घरी खूप कमी असायचा. आता फरक एवढाच होता की, पुण्याऐवजी तो गोव्याला जाणार होता. गोवा म्हणे खूप लांब... तिकडे कोल्हापूरच्याही पुढे होते. इथे अजून कोल्हापूर कुठे आहे, हेच मला माहिती नव्हते. फक्त ऐकले होते. तिकडे म्हणे समुद्र आहे. खूप सारी नारळाची आणि आंब्याची झाडे आहेत. सुपारी, काजू, फणस अशी कधी न पाहिलेली फळे असतात. भेटकार्डावर पाहिलेला समुद्राचा देखावा म्हणजे गोवा. पाण्यावर  आपल्या भल्यामोठ्या पांढऱ्या शिडात हवा भरून तरंगणारी नाव... माडांची किनार लाभलेल्या पदरावरती मावळतीच्या कि उगवतीच्या सूर्याची पसरलेली लाली... यालाच गोवा म्हणतात, अशी माझी धारणा होती. मामासोबत कधी जायला मिळाले; तर किती धमाल होईल ना!
          या चारदोन दिवसांत मागच्या सुट्टीतल्यासारखा मामा माझ्या वाट्याला आलाच नव्हता. एकतर दिवस कमीच होते. त्यात त्याच्यामागे धावपळ जास्त होती. मोठ्यामामांचे आणि त्याचे बरेच काही चालले होते. खरं तर मला त्याला खूप काही सांगायचे होते. पण जमत नव्हते. आमच्या शाळेत शिबिर येऊन गेले होते... माझा हात मोडला होता... मी शिरीषसोबत खूप धमाल करायचो... शिबिर संपल्यावर मला करमत नव्हते. म्हणून शब्बूआपाच्या घराकडून मी चकराही मारल्या होत्या... एकदा तिने मला घरात बोलावून घेऊन खाऊही दिला होता... आणिक सांगायचे तर बर्‍याच गप्पागोष्टी केल्या होत्या... माधवमामा कधी येणार? त्याचे पत्र आले का एवढ्यात एखादे? म्हणून चौकशी केली होती. पण हे सगळे माधवमामाला कसे सांगायचे, हेच कळत नव्हते. माधवमामा आला तसा निघून गेला. काहीच बोलला नाही. मीही काही सांगितले नाही. आता तो लवकर येणार नव्हता; म्हणून मलाच वाईट वाटले. शाळेला सुट्या लागल्यावर तर मला गेल्या उन्हाळासुट्टीची जास्तच आठवण येऊ लागली होती.
          अक्षयतृतीया झाली. एकदोन दिवसांची छोटी यात्राही झाली. मुकूंदमामासोबत यात्रेतून फिरूनही आलो. पण ऊरुसासारखी मजा काही यावेळी आली नाही. या सुट्टीला मी आणि शुभाताई तिच्या मामाच्या गावाला गेलो होतो आठ दिवस. सोबत मोठीमामी होतीच. तिथे बरेचजण मला त्यांचा मुलगाच समजत होते. एकदोघे म्हणालेही.
"कुसूम, पोरगं चांगलंच मोठं झालं की तुझं."
मामीही हसून मला जवळ घ्यायची. माझ्या गालावरून हात फिरवून स्वतःच्या गालावर बोटं मोडायची.
"खाली बघा बया! नजर लागंल लेकराला माझ्या."
मला आबईच्या जोडीने अजून एक आई मिळाल्यासारखे वाटत होते. काय खोटे होते? कृष्णालाही अशीच एक यशोदामैया होतीच की. तशीच मलाही कुसुममामी भेटली होती. मामीच्या घरी शेतात आमराई होती. आठवडाभर दिवसच्या दिवस मी नुसता चरत होतो. किती आंबे खाल्ले, याचे मोजमापच नाही. मामीच्या भावांची चिल्लरपार्टी भरपूर होती. त्यात आमच्या दोघांची भर पडली. दुपारी आमचा बराचसा वेळ आमराईतच जायचा. घरी मला काही गोष्टींची पुस्तके सापडली होती. आमराईत पाडाचे आंबे खात खात बुंध्याशी बसून ती सगळी पुस्तके मी वाचून काढली. एका अद्भूत दुनियेत जाण्याची गुरुकिल्ली मला सापडली होती. यावेळी मला जी त्यांची बाधा झाली ती आयुष्यभर पुरली. मी अक्षरशः पुस्तकांच्या प्रेमात पडलो. झपाटूनच गेलो म्हणा ना! त्या पुस्तकांतून मला अनेक न पाहिलेली माणसं, स्थळं भेटली. मी त्यांच्यात इतका हरवून गेलो की, स्वतःलाही त्यांच्यापैकीच एक समजू लागलो. माझ्याही जीवनात असेच काही अद्भूत घडावे, मला ते जवळून अनुभवता यावे, अशी स्वप्ने मी उघड्या डोळ्यांनीही पाहू लागलो. या वाचलेल्या गोष्टींमुळे माझ्याही कल्पनेला पंख फुटू लागले.
        चौथीचे वर्ष सुरू झाले. परंतु आता आम्हांला सरकारवाड्यातील शाळेत जायची गरज उरली नव्हती. वेशीच्या बाहेर शाळेसाठी एक छान सिमेंटकाँक्रेटची इमारत उभी राहिली होती. शाळेचे स्थलांतर हक्काच्या जागेत झाले. नवी इमारत मिळाली. नव्या वर्गासोबतच नवीन शिक्षकही मिळाले. धोतरवाले, विजारवाले गुरुजी इकडे आलेच नाहीत. नव्या वर्गाला पँट शर्ट घालणारे, केसांचा चांगला भांग पाडणारे व महत्त्वाचे म्हणजे इतिहासातील गोष्टी सांगणारे नवीन गुरुजी मिळाले. आतापर्यंतच्या गुरुजींपेक्षा हे प्रकरण वेगळेच होते. पण भारी होते. त्यांचे नाव सोनारगुरुजी. सतत काहीतरी नवीन चाललेले असे त्यांचे. पहाटे उठून ते आम्हांला व्यायाम करायला सांगत. अगदी ते स्वतः उठून दोन मैलापर्यंत धावायला जात. त्यांना भूतांची अजिबात भीती वाटत नव्हती. अमावस्येच्या रात्री बारा वाजताही ते पैज लावून स्मशानभूमीत जाऊन येत. मोठ्या वर्गातील मुलांना ते इंग्रजी नावाचा भयानक अवघड विषय शिकवायचे. हा अवघड विषय फक्त तेच शिकवू शकतात, यावर मुलांचीच नव्हे; तर इतर गुरुजींही श्रद्धा होती. आमच्या वर्गाला इंग्लिश नव्हते. ते आमचे वर्गशिक्षकही नव्हते. तरीही ते आमच्या वर्गाला शिकवणार होते. नेहमीच्या अभ्यासाशिवाय स्कॉलरशिप नावाचा असाच काहीतरी भयंकर प्रकार असतो, हे शुभाताईमुळे कळलेले होते. अर्थात या स्कॉलरशिपचा शोधही या गुरुजींनीच लावलेला होता. दररोज सकाळी व संध्याकाळी ते शाळेत स्कॉलरशिपचा जादा तास घेणार होते. यावर्षीपासून शाळेची वेळ बदलली होती. अकरा ते पाच. आम्ही मात्र नऊ ते साडेसात असे शाळेत अडकणार होतो. जोडीला सातवीची मुलेही असणार होती.
          या नवीन अभ्यासात खूप गमतीजमती होत्या. उतारा, कविता, संवाद सर्वकाही तिथेच असे. फक्त उत्तरे शोधायचे काम असल्यामुळे पाठांतर करण्याची गरज नव्हती. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, आलंकारिक, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे एक एक तोळामासा मोजून घ्यावेत, अशा शब्दांचा खजिनाच हाती लागला होता. एवढ्या सगळ्या प्रकारची गणिते असू शकतात, हा आम्हांला लागलेला ताजाच शोध होता. पण आमचे गुरुजी भलतेच हुशार होते. अगदी आभाळातील चांदण्यांही मोजता येतील, अशा गणिताच्या क्लृप्त्या त्यांच्याकडे असत. खूप सारी कोडी असलेला बुद्धिमापन चाचणी एवढा एकच विषय अभ्यासात असावा, असे म्हणण्याइतपत त्याची गोडी लागली होती. वर्गातील अभ्यासापेक्षा स्कॉलरशिपच्या अभ्यासाची गोडी वाटू लागली होती. पण एक अडचण निर्माण झाली होती. हात मोडल्यापासून लेखन खूप कमी आले होते. लिहायचा खूपच कंटाळा यायचा आणि गुरुजी मात्र डझनवारी कागदांची भलीमोठी वही तयार करून सगळे प्रश्न लिहायला लावायचे. कितीही प्रश्न सोडवले; तरी त्यांचे समाधान काही व्हायचे नाही. त्यामुळे नाइलाजाने या परीक्षेचा नाद सोडायचा, या निर्णयापर्यंत मी येऊन पोहचलो होतो. माझ्यासारखीच बर्‍याच जणांची हीच अवस्था होती. माझी जरा जास्तच गोची झाली होती. एकतर हा नवीन अभ्यास मला खूप आवडला होता. पण लेखनाला वैतागून टाटा बायबाय करायची वेळ आली होती. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली होती. काय करावे तेच समजत नव्हते.
          निर्णय घेण्याची वेळ मात्र आलीच नाही. गुरुजींनी अगोदरच मोठ्यामामांना भेटून "पोरगं हुशार आहे. स्कॉलरशिपला बसवा. पास झालं तर दरवर्षी स्कॉलरशिप मिळेल." म्हणून सांगितले होते. आता माघार घेण्याचा प्रश्न उरलाच नव्हता. बरं लेखनाचे कारण सांगू शकत नव्हतो. हे कारण ऐकून गुरुजीच काय पण मामांनीही मला धुतले असते. शेवटी जमेल तसे लिहीत गेलो. वहीच आणली नाही... घरीच विसरली... गैरहजर मित्राने वही नेलीय... अशा बहाण्यावर दिवाळीपर्यंत वेळ मारून नेत होतो. वर्गातील अभ्यासातली गती पाहून गुरुजींनाही ते खरेच वाटत राहिले. निळीच्या भांड्यात पडलेला कोल्हा किती दिवस निळा दिसणार? पाऊस कधीतरी पडणारच. काहीजण यामुळे दुःखी होते. त्यांना लिहावे लागते, या त्रासापेक्षा मी यातून सुटलोय, याचेच दुःख जास्त होते. त्यांनी गुरुजींकडे कागाळी केली. तेंव्हा दोन दिवस बसून एकसारखे लिहूनही वही काही पूर्ण होण्याचे नाव घेईना. मग मोडलेला हात कसा दुखतोय, याचे नाटक रंगवले. त्यापेक्षा आपल्याला ते स्कॉलरशिपच नको, हे माईच्या गळी चांगलेच उतरवले.
"गुरुजी, पोरगं आजून बारकं हाय वं. एवढा अभ्यास एकदम कसा झेपंल त्याला. त्यात त्याजा हात मोडल्याला हाय. जरा कलानं घ्या. नाहीतर ती परीक्षा कसली हाय ती नकू त्याला. हाय तीच अभ्यास बास झाला."
          एवढी मात्रा लागू पडली. मी परीक्षा द्यायलाच हवी, हा गुरुजींचा आग्रह होता. त्यामुळे मग लेखनात सवलत मिळाली. पण रोजच्या रोज नियमित उदाहरणे सोडवायची व पाठांतर करायचे या अटीवर. वर्षाच्या शेवटी परीक्षा झाली. पेपरही चांगले गेले आणि यथावकाश निकालही लागला. दोघेचौघेच पास झाले होते. त्यात मीही चांगल्या मार्कांनी पास झालो. पण गुणवत्ता यादीपर्यंत पोहचण्यासाठी थोड्या टाचा वर करायला पाहिजे होत्या. ते विसरलो. त्यामुळे ती गुणवत्ता यादी का काय ते काही दिसली नाही. तरीही आपल्यामध्ये थोडीफार गुणवत्ता असल्याचा साक्षात्कार मला झाला होता. वर्गातील पोरांना ते नाही पटले; तरी शाळेतल्या गुरुजींचाही त्यावर विश्वास बसला होता.

(क्रमशः)