या दुनियेत एवढी सारी माणसं आहेत. पण प्रत्येकाची तर्हा वेगळी. सगळ्यांचेच आयुष्य सारखे कुठे आहे? प्रत्येकजण आपल्या आयुष्याची एक 'ब्ल्यू प्रिंट' घेऊन येत असतो. पोपट घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेल्या जोश्यापासून ते प्रस्थापित प्राच्यविद्याविशारद ज्योतिर्भास्करापर्यंत कित्येकजण त्याची उकल करण्याची खटपट करतात. कोणाला त्यातले कितपत कळते कोणास ठाऊक! जो तो आपापल्या परीने त्याचा अर्थ लावत असतो. पण जरा बारकाईने विचार केला की, एक गोष्ट हमखास लक्षात येते. कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नाही. विनाकारण तर नाहीच नाही.
असंख्य ठिपके असलेल्या एखाद्या रांगोळीप्रमाणे एकेक ठिपका आपण जोडत चाललेले असतो. एखादे डिझाईन डोक्यात ठेवून तुम्ही काढलेल्या रांगोळीत फारसे नावीन्य नसते. फक्त कार्यसफलतेचा आनंद असतो. रूळलेल्या वाटांनी जगण्यामध्ये तरी यापेक्षा काय वेगळे असते. या मळलेल्या वाटा तुम्हांला उद्दिष्टांपर्यंत पोहचवतात. यामध्ये सफळ संपूर्णपणे जीवन कडेला लागले, याचाच आनंद. पण नवनवीन वाटा शोधून नवी शिखरे पादाक्रांत केल्याचा आनंद तुम्हाला कसा मिळावा? खरं म्हणजे तुम्ही ज्या बिंदूवर असता; त्याच्या आठही बाजूंपैकी कोणत्याही एका दिशेने जाण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला असते. परंतु तुम्ही निवडलेली प्रत्येक दिशा तुमच्या संपूर्ण रांगोळीचा आकारच बदलून टाकते. तुमच्याही नकळत तुम्ही ठिपके जोडत जाता. जास्तीत जास्त सुंदर रचना करण्याकडे तुमचा कल असतो. पण जसजसा आकार येत राहतो; तेंव्हा तुम्हीही अचंबित झालेले असता. तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे तुम्ही जगलेला असता. प्रवास पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल ना मिळेल. पण नवनिर्मितीचा... सृजनाचा आनंद तुम्हाला मिळालेला असतोच असतो. सगळ्याच गोष्टींचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. पाहिलेले सगळे काही कळतेच, असे थोडीच आहे. कळण्याएवढी जागृत बुद्धी आणि पाहण्यासाठी 'ती' नजरही असावी लागते. सगळीच देवस्थाने स्वयंभू थोडीच असतात. काही काही दगडावर कोणाच्यातरी नकळत शेंदराची बोटे पुसली जाऊन देवस्थानं झालेली असतात. पण म्हणून सगळ्याच दगडाची देवस्थानंही होत नाहीत. प्रत्येकाचे प्राक्तन वेगळे. त्यात्यावेळी आयुष्याचा अर्थ लागेलच असे नाही. चालताना घेतलेली सगळीच वळणे कळतीलच असेही नाही. पण विशिष्ट उंची गाठल्यानंतर सगळा प्रवास स्पष्ट होतो. साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचेही अर्थ लागतात. म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की, कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नाही... आणि विनाकारण? तर नाहीच नाही.
चौथीच्या वर्षात केवळ स्कॉलरशिप परीक्षा एवढाच भाग नव्हता. ही तर सुरुवात होती. या काळात अशा अनेक साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी घडत गेल्या. पण पुढे घडणाऱ्या पर्वाची ती नांदी होती. एकदा का तुम्हांला एखाद्या गोष्टीचा चस्का लागला की, जगातील कोणतीही नशा त्याच्यापुढे झक मारते. व.पु. म्हणतात तसे माणसाला काही न काही छंद हवा, स्वप्न हवीत; पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला
जिंकायला व जगायला शिकतो...!
आपल्यामध्ये काही प्रवृत्ती उपजतच असतात. त्या कुठेतरी आतमध्ये अगदी खोलवर गाडल्या गेलेल्या असतात. टिकून राहण्यासाठी त्यांना थोडीसीही ओल पुरते. पेरलेले दाणे उगवून येण्यासाठी वाफसा व्हावाच लागतो. त्यामुळे योग्य परिस्थितीची वाट पाहत त्या तग धरून राहिलेल्या असतात. आपल्या आसपासच्या वातावरणाचीही त्यात भर पडत राहते. तुमच्याही नकळतपणे तुमच्या आयुष्याची जडणघडण चाललेली असते. अंकुर फुटतो आणि समजा वेळकाळाप्रमाणे त्याला खतपाणी मिळालेच; तर मग विचारायलाच नको. जीवनरूपी वृक्ष फोफावत राहतो. तुम्ही गुण म्हणा अगर अवगुण; पण या काळातच माझ्यामधील ईर्ष्या जागी होऊ लागली होती. यश, कौतुक वाट्याला आले पाहिजे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तशीच ती माझीही होती. पण ते दुसऱ्या कोणाच्या वाट्याला आले की, माझ्यातील ईर्ष्या मला आतून जाळून काढू लागली. मला त्या समोरच्याविषयी काहीच देणेघेणे नसे. मला स्वतःचाच राग येई. त्याच्याकडे असे काय आहे; जे माझ्याकडे नाही. तो करू शकतो; मग मी का नाही?
"मी का नाही?" या प्रश्नाने मी बेचैन राहू लागलो. त्यासाठी माझे डोके वेगाने काम करू लागले. नवनवीन कल्पना सुचू लागल्या. फक्त समाधानाची गोष्ट एवढीच होती की, ही ईर्ष्या निर्मळ होती. कोणताही उपद्रव अथवा विनाशकारी नव्हती. ती स्वतःपुरतीच होती. एखाद्याकडे कोणती चीजवस्तू असल्याचे दुःख मला नव्हते. पण तशीच वस्तू मलाही मिळायला हवी आणि मग ती मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होत. कोणी एखाद्याने काही केले आणि त्याचे कौतुक झाले की, माझा ईर्ष्याळू स्वभाव जागा होई. त्याच्याहूनही सरस असे काही करून कौतुक मिळवेपर्यंत मला स्वस्थता कसली ती मिळायची नाही. कायम उंची गाठण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी धडपड सुरू व्हायची. हे तारुण्याच्या आणि कर्तृत्वाच्या काळातही असेच चालू राहिले. त्यामुळेच तर मी एकेक पायरी चढतच राहिलो.
मागे जाऊन मूळ शोधायचा प्रयत्न केला; तर इथपर्यंत नक्कीच मागे येता येईल. त्यावेळी आमच्या शाळेत एक खूप चांगली प्रथा होती. वर्षभरातून वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी व्हायची. पण संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनी करायचे. अगदी कार्यक्रमात अध्यक्षस्थानीही विद्यार्थीच. मुख्याध्यापक गुरुजींच्या शेजारी खूर्चीत बसायला मिळणे, हा किती मोठा सन्मान! चौथीत असताना हा ईर्षेचा किडा मला चावला आणि गांधीजयंतीला भाषणाची तयारी करूनच गेलो. गुरुजी कसे बोलतात... हातवारे कसे करतात... याचे निरीक्षण केलेले होतेच. पाठ केलेले भाषण नुसती पोपटपंची करून धडाधड बोलायचे नव्हतेच. त्या वयाला शोभेल असा अॅटिट्यूड दाखवत फार पोक्तपणाचा आव आणून मी तेंव्हा बोललो. त्याचा फायदा एकच झाला. दिवाळीनंतर होणाऱ्या स्पर्धेसाठी सोनारगुरुजींच्या डोक्यात मी अगदी फिट्ट बसलो.
त्याकाळात निबंध, कथाकथन, भाषणाच्या तालुकावार स्पर्धा होत. आजपर्यंत या स्पर्धांमध्ये आमच्या शाळेचा लौकिक होता. हमखास बक्षिसे मिळायचीच. यावर्षीही साधारणपणे दिवाळीनंतर डिसेंबर कि जानेवारी महिन्यात आम्हा दहाबारा मुलांना गुरुजी तालुक्याच्या गावी नेणार होते. आतापर्यंत घरच्यांसोबत बाहेर जाण्याचा योग आला होता; पण हे असे एकट्याने जाण्याची ही पहिलीच वेळ होती. मनात धाकधूक तर होतीच. माई गुरुजींना भेटायला आली होती. तिने बरेच काहीबाही सांगितले त्यांना. "आबईच्या सासरची कोणी मंडळी आली; तर पोराला सोडायचं न्हाई. त्याचा बाप जरी आला; तरी पोराला सोडू नका. आमच्यापासून घेऊन जाताय. संध्याकाळी त्याला आमच्या ताब्यात पोचवायला जमत आसंल; तर पोराला घेवून जा." आजी हे सगळं सांगताना माझी अवस्था मात्र फारच विचित्र झाली होती. आजीने असे काही गुरुजींना बोलू नये, असे वाटत होते. तशी गुरुजींना आमच्या कुटूंबाची बर्यापैकी माहिती होतीच. मोठ्यामामाचे व गुरुजींचे संबंधही चांगले होते. गुरुजींनी पुन्हा पुन्हा माईला शब्द दिला. पोराची जबाबदारी माझी. पोराचे बोट सोडून कुठेच जाणार नाही म्हणून. अर्थातच तरीही माईचे समाधान होण्यासारखी परिस्थिती नव्हती; म्हणून तिने पाठीमागून मुकूंदमामाला पाठवून दिले.
शहरातील हा अनुभव माझ्यासाठी नवाच होता. घरच्यासोबत गावाला जाण्यापेक्षा सर्व मुले मिळून एकत्र प्रवासाची मजा काही औरच होती. एकट्याने प्रवास करण्याएवढे आपण आता मोठे झालो आहोत, असे वाटू लागले. अगोदर गुरुजी आम्हा सर्वांनाच घेऊन त्यांच्या घरी गेले. ते माडीवर राहायचे. गॅलरीतच स्वागताला पोपटाचा पिंजरा लटकवलेला होता. एका खोलीत तर कपाटभरून पुस्तकेच पुस्तके होती. टेबलखूर्ची होती. गुरुजींची ती अभ्यासाची खोली होती म्हणे. टेबलावर एक वाकड्या पाईपचा दिवा होता. भारीच दिसत होता तो. फक्त टेबलावरच उजेड पडायचा. मी तर तेंव्हाच ठरवून टाकले. आपल्याला पण अभ्यासाची अशीच जागा असायला पाहिजे. गुरुजींच्या बाईपण चांगल्या होत्या. त्यापण गुरुजीसारखाच चष्मा लावायच्या. आम्ही डबे नेले होते, तरी पण त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी गरमागरम पोहे बनवले. वरून सगळ्यांना चहापण दिला. ओमीने गडबड केलीच. त्याच्या हातातून पाण्याचा मगच निसटला. सार्या घरभर पाणी झाले. तरीही बाई रागावल्या नाहीत. तिथून मग आम्हांला घेऊन गुरुजी स्पर्धा होणार होत्या; त्या शाळेत आले. तिथे पोहचल्यावर आम्हांला भाषणाचे विषय मिळाले. तसे त्यांनी अगोदरच ते शाळेला पाठवले होते म्हणे; पण मिळाले नाहीत, यात त्यांचा काय दोष? आमच्याकडे मात्र आता तयारीसाठी तासा दोन तासाचीच काय ती सवड होती. तोपर्यंत मुकूंदमामाही येऊन पोहचले होते. मला आणखीन बरे वाटले.
गुरुजींनी फळ्यावर लिहिलेले पाचही विषय वाचून यायला सांगितले. बाकीचे असेच काहीएक विषय होते; पण मला 'माझे स्वप्न' या विषयावर बोलायचे होते. त्या विषयावर काय बोलायचे याचा त्यांनी अंदाज घेतला. मग थोडक्यात एक गोष्ट सांगितली. स्वप्न म्हटले की, रात्री झोपल्यावर पाहतो ते स्वप्न एवढेच मला माहीत होते. गुरुजी म्हणाले, आपल्याला मोठे झाल्यावर काय बनायचे आहे, हेही स्वप्नच असते. समज तू मोठेपणी वैमानिक झाला आहेस. तुला तसेच स्वप्न पडले. तुला जी मजा येईल, ते सांग. मग तुला कळते की, विमानात बाँब आहे. तू सगळ्यांना सुखरूप बाहेर काढतो आणि विमानाचा स्फोट होतो. तुझ्या धाडसासाठी तुला पंतप्रधानाच्या हस्ते बक्षीस मिळते. तू आनंदाने ओरडतच झोपेतून जागा होतो. ही गोष्ट त्यांनी सांगितली तशी मला भाषणात सांगावी लागणार होती. माझ्यापेक्षा मुकूंदमामाच बारकाईने ते ऐकत होते. नेमके भाषण काय करायचे आहे, हे त्यांच्या लक्षात आले. तिथून मग तासभर पुन्हा पुन्हा त्यांनी ते माझ्याकडून घोटवून घेतले. मधूनमधून मला ते दुरुस्ती सांगायचे. रंगवून गोष्टी सांगण्यात तसा मी पटाईत होतोच. प्रत्यक्ष भाषण करायला उठेपर्यंत मी निवांत होतो. मात्र माईकपुढे उभे राहिल्यावर पाय थोडे लटपटले. घसा कोरडा पडला. समोर बसलेले विद्यार्थी आणि शिक्षक नवीन होते. त्यामुळे मग मी गुरुजींकडे आणि मुकूंदमामाकडे पाहिले. ते हळूच हसले. मलाही हसू आले. मी आलटून पालटून त्यांच्याकडे बघून बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू भीती पळून गेली. सगळे शांतपणे ऐकताहेत. त्यात मोठे साहेबपण होते. हे पाहून मला जोर चढला. आयुष्यातील पहिली लढाई सुरू झाली आणि संपलीही. पहिले बक्षीस... तेही घसघशीत एकावन्न रुपयांचे. कौतुक झाले ते वेगळेच. रात्री घरी आल्यावर माईने मीठमिरच्या ओवाळून टाकल्या. गंमत म्हणजे तरीही मला कोणाची तरी नजर लागली असावी. मी चक्क पुढील दोन दिवस अंथरुणातच काढले.
आपण कायम फोकसमध्ये असायला हवे. हिरोलाच सगळे विचारतात; तेंव्हा आपण हिरोच व्हायला हवे. पण एखादा असिस्टंट हिरो असेल; तर हिरोचा भाव आणखीनच वाढतो. सपोर्टला कोणी असेल; तर कॉन्फिडन्स वाढतो. हे लक्षात आले होते. कुठेतरी ऐकलेला एक डायलॉग आहे. अपनी किमत उतनीही रखिए, जो अदा हो सके| अगर अनमोल हो गए, तो तनहा हो जाओगे| ते खरेच तर होते. वर्गातील बर्याचजणांचे ग्रुप झाले होते. पण हिरोगीरीच्या नादात मी एकटा पडलो होतो. ही कसर काढण्यासाठी कि काय? माझ्या या सिनेमात बल्लूची एन्ट्री झाली.
बल्लू हा काय माझ्या वर्गात नव्हता किंवा तो माझ्या वयाचाही नव्हता. उलट माझ्यापेक्षा तीनएक वर्षांनी लहानच होता. आमच्या घराच्या खालच्या बाजूला काही मळे होते. त्यात एक त्यांचाही होता. तिथेच जनावरांसाठी गोठा होता. कोंबड्यांचे खुराडे होते. दररोज सायंकाळी कोंबड्या खुरड्यात डालण्यासाठी तो मळ्यात यायचा. सुट्टीदिवशी तर दिवसभर त्याला मळ्यांतच थांबावे लागे. त्याच्या येण्याजाण्याची वाट आमच्या घरापुढूनच असल्यामुळे कधीकधी माझ्याकडे तो थांबायचा. त्याला आकर्षण वाटण्यासाठी आणखी एक निमित्त मिळाले होते. मुकूंदमामाने बाहेरच्या परसात दोन मजबूत मेढी उभ्या करून मोठ्या लाकडी पाटाचा झोपाळा टांगलेला होता. मी तिथे खेळताना दिसलो की, तो आवर्जून यायचा. हळूहळू दोघांनाही एकमेकांची एवढी सवय झाली की, शिक्षण संपून मी नोकरीच्या निमित्ताने घर सोडेपर्यंत तो सावलीसारखा सोबत राहिला. पुढेही भेटीगाठी कमी झाल्या; तरी ऋणानुबंध कसे संपतील?
बल्लूप्रमाणेच ओमी आणि मी याच दिवसात काहीसे एकत्र आलो. ओमी म्हणजे ओंकार. एकाच वर्गात होतो आणि स्कॉलरशिप पास होणारांमध्ये तोही होता. पेठेत त्यांचे घर होते. त्यावेळी गावात अवघ्या चारजणांकडे टि.व्ही. आलेले होते. भला मोठा ब्लॅक अँड व्हाईट टि.व्ही. सरकती लाकडी दारे असलेला. त्याकाळात बी.आर. चोप्राच्या महाभारत मालिकेने लोकांना वेडे केले होते. विशेषतः आम्ही चिल्लरपार्टी तर डोळ्याची पापणीही न हलवता एकटकपणे त्यात हरवून गेलेलो असायचो. 'वर्गमित्र' एवढ्याशा वशिल्यावर दर रविवारी मी टि.व्ही. पाहण्यासाठी त्याच्या घरी जात असे. आता दोघांच्या समान आवडीचा एक दुवा जुळला होता. गोष्टींची पुस्तके. ओमीच्या घरी भलेमोठे किराणा मालाचे दुकान होते. दुकानाच्या मागील खोलीत माल ठेवलेला असे. तिथेच रद्दीचे गठ्ठेही ठेवलेले होते. कोळशाच्या खाणीतच हिरा सापडतो. तसे या रद्दीतून काही चांगली पुस्तके मिळत. मासिके असत. रविवारच्या रंगीत पुरवण्या असत. महाभारत संपले तरी रविवारी दुपारपर्यंत तहानभूक हरपून त्या ढिगार्यात बसून राहायचो. लहानपणीची ही दोस्ती खर्या अर्थाने पक्की अगदी घट्ट होईपर्यंत आमचे पाखिफुटे वय आले होते. वेडे होऊन बेभान जगण्याच्या काळात आम्ही पुन्हा एकत्र आलो. वेडेपणा काय असतो तो शब्दशः आणि अर्थशः आम्ही जगलो.
(क्रमशः)

No comments:
Post a Comment