पाचवीची नवीन पुस्तके हातात आली. नवीन एवढ्यासाठीच म्हणायचे, कारण ती पुढच्या वर्गातील होती. प्रत्यक्षात ती जुनीच होती. चौथीपर्यंत नवी करकरीत पुस्तके मिळाली होती. चौथीचा निकाल आणायला शाळेत गेलो; तेंव्हा पुढच्या वर्गातील एका मुलाने विचारले, "शेखर, पुस्तके घेतलीस का पाचवीची."
" आताच कशाला? शाळा सुरू झाल्यावर आणायची."
"माझी हायती बघ. पाहिजी आसतील तर चल घरी बघायला."
मी त्याच्या घरी जाऊन पुस्तके पाहिली. वर्षभर वापरूनही ही पुस्तके जुनी आहेत, असे वाटतच नव्हते. खूप चांगली ठेवली होती त्याने. नाहीतर आमच्या पुस्तकांच्या वर्ष संपेपर्यंत चिंध्या झालेल्या असायच्या. याने मात्र पहिले पान सोडले; तर कुठेही नावसुद्धा टाकलेले नव्हते. कुठे बाईला मिशा काढ. कुठे पुरुषाला कुंकू लाव. असली चित्रकारी तर लांबच. मला पुस्तके आवडली.
"पुस्तके घेऊन आमच्या घरी चल. घरचे 'घे' म्हणाले, तर घेतो."
तो माझ्यासोबतच घरी आला. नेमके मोठेमामा घरीच होते. त्यांना पुस्तके दाखवली.
"तुला चालत आसली, तर घिऊन टाक. पुस्तकं जुनी का नवी, हे महत्त्वाचं नाही. त्यानं ठेवल्यात कशी ते शिक. पैसं किती द्यायचं रं पोरा?"
सर्रास मुले अर्ध्या किमतीत पुस्तके विकायची. पण ही पुस्तके चांगली असल्यामुळे तो पाऊण किमतीत देणार होता. मी पुस्तके घेतलीही. वाचलेल्या पैशातून मला कंपासपेटी घेऊन द्यायचे मामांनी कबूल केले होते. रात्री मुकूंदमामांनी सर्व पुस्तकांना छान कव्हर घालून नावे टाकून दिली होती. नवीन पुस्तकांना येणारा वेगळाच वास असतो. या पुस्तकांना तो वास नसला; तरी उदबत्ती, साबणाचा वास येत होता. कारण त्यावेळी उदबत्तीच्या पुड्याचे कागद, सुगंधी साबणावरचे कागद पुस्तकात, कंपासपेटीत ठेवण्याची पद्धत त्यावेळी मुलांमध्ये खूप चालायची.
पुस्तके घेतली, तेंव्हाच बालभारती आणि इतिहासाचे पुस्तक वाचून काढले. वर्षभर अभ्यास करायला नको वाटत असले; तरी वर्षाच्या सुरुवातीला ही दोन पुस्तके वाचण्याचा उत्साह काही औरच असतो. यावर्षी आणखीन दोन पुस्तके नवीनच होती. एक हिंदीचे पुस्तक; जे वाचता येत होते; परंतु पचायला जड होते. दुसरे इंग्रजीचे पुस्तक म्हणजे फक्त चित्र पाहण्यापुरतेच समजत होते. नेमके तेच पुस्तक हातात घेऊन बसलो होतो. छान वास येत होता. शोभाताईने कधीकाळी सीएटी कॅट, कॅट म्हणजे मांजर व डीओजी डॉग, डॉग म्हणजे कुत्रा असे चारदोन शब्द म्हटलेले आठवत होते. पण नेमके इंग्रजीअअमधील कोणतेही अक्षर लागत नव्हते. कोणत्या अक्षराला काय म्हणायचे? हे कुठे माहीत होते! तेवढ्यात आबईने हातात पुस्तक पाहिले. आबईने पाहिले म्हणजे आम्हीच खाजवून गजकर्ण काढले. कौतुकाने आबईला इंग्रजीचे पुस्तक दाखवायाला गेलो. वेणूही नेमकी त्यावेळी तिथेच होती.
आबई म्हणाली, "वाच."
आता अजून शाळाही सुरु झालेली नव्हती. जे शिकलोच नाही; ते कसे वाचून दाखवणार? पण वेणूसमोर वाचता येत नाही, असे कसे सांगायचे? मग काय दे धक्का! चित्र पाहून जगात कुठल्याही भाषेत सापडणार नाहीत असे शब्द मनानेच वाचायला सुरुवात केली. दोघीही माझ्याकडे कौतुकाने पाहत असताना नेमकी शोभाताई मोठ्याने हसतच तिथे आली.
"अगं आत्या, तो काहीही वाचतोय अन् तू खुशाल मान हलवती होय."
झाले. सगळे मुसळ केरात. असा राग आला होता ना! चोरी पकडली गेली होती. तरीही तणतण करण्यापलीकडे हातात काहीच नव्हते.
प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर चाररेघी वही आणि पेन्सिलने त्यावर ए बी सी डी अशी अक्षरे लिहायला सुरुवात केली. आपण खूप काहीतरी वेगळेच शिकतोय, असे वाटू लागले. पहिले सहा महिने तर इंग्रजी हा विषय नसता; तर बरे झाले असते, असे म्हणण्याची वेळ आली. लिहिता वाचता येऊ लागले; पण प्रत्येकवेळी शब्दांनी वाट अडवायला सुरुवात केली. पहिल्या चाचणीने तर जीव खाल्ला माझा. पंचवीस मार्काची चाचणी. पास होण्यासाठी दहा मार्काची अट सोनारगुरुजींनी ठेवली होती. विशेष म्हणजे गुरुजींनी फळ्यावर लिहिलेल्या उत्तराप्रमाणे स्वतःचे पेपर स्वतःच तपासायचे होते. मीच माझा पेपर तपासूनही अवघे नऊ मार्क्स मिळाले. मग मात्र वाटले, पेपर गुरुजींनीच तपासायला हवे होते. किमान दहा तरी दिले असते त्यांनी. नापास झाल्यामुळे रडायला येत होते मला. मी एवढेसे तोंड करून गुरुजींकडे गेलो.
"का रे? तोंड का बारीक केलंय असं?"
"गुरुजी, माझा पेपर तुम्हीच तपासा."
गुरुजींनी संपूर्ण पेपर उलटसुलट पाहिला आणि पेपरवर पंचवीस पैकी पंचवीस लिहिले. मग तर मी रडायलाच सुरुवात केली. माझ्या पाठीवर हात ठेवून गुरुजी म्हणाले, "तुझे मार्क्स मी कोणालाही सांगणार नाही. पण पुढच्या चाचणीत असे मार्क्स पाडणार असशील तर...!"
मी मुकाटपणे मान हलवली आणि जागेवर येऊन बसलो. मनाशी ईर्ष्या घेऊनच. पंचवीस पैकी पंचवीस. गुरुजी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या लावत. मुले विरुद्ध मुली. मग काय? इज्जत का सवाल झाल्यावर शब्दांचे पाठांतर जोरात सुरू झाले. ईर्ष्या पूर्ण करेपर्यंत जिवाला चैन कुठली पडायला. बाकीचे विषय बाजूलाच. फक्त आणि फक्त इंग्रजी.
यावर्षी आमच्या शाळेत एक नवीनच मुलगा आला होता. वर्गातील इतर मुलांमध्ये त्याचे वेगळेपण दिसून यायला कारण म्हणजे तो शहरातील शाळेत शिकून आलेला होता. अगदी गोरागोमटा, केस वाढवलेला आणि शर्ट पँटमध्ये खोचून दररोज इन करणारा. आम्ही कधी नवीन कपडे घातले किंवा बाहेरगावी जायचे असेल; तरच इनशर्ट करायचो. बाकी पंधरा अॉगस्ट व सव्वीस जानेवारी सोडले; तर इन नावाचा प्रकार आमच्याकडे नसायचाच. अगदी चोरपोलीस खेळतानाही पोलीस झालेल्या मुलांचा इन म्हणजे इंटरनॅशनल प्रकार असे. पुढून शर्ट खोचायचा; पण पाठीमागे मात्र तसाच मोकळा सोडलेला असे. वर्गातील अर्ध्याहून आधिक मुलांच्या चड्यांना ठिगळ लावलेले असायचे. गावातील टेलरही त्याहून इंटरनॅशनल असे. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट एवढेच रंग कायम अंगावर मिरवणार्या मुलांच्या जीवनात रंग भरण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर दिली आहे, याची जाणीव ठेवून खाकी रंगाच्या चड्डीला ठिगळ लावताना सहजासहजी उठून दिसेल, अशा कापडाचे ठिगळ लावी. मग स्वतःच्याच गरिबीचे प्रदर्शन करायला कोण कशाला इनशर्ट करेल? खेळताना केलाच... तर पुढून इन आणि मागे आऊट, असा काहीसा प्रकार असे. हे जसे कपड्यांचे झाले, तसेच केसांचेही होते. सगळी खेड्यातील मुले. केस ठेवून त्यांची निगा राखणे, तेल लावणे हे खर्चिक प्रकार सगळ्यांनाच परवडणारे नव्हते. बहुतांशी मुलांच्या कटींगचा प्रकार एकसारखा असे. हातात येणार नाहीत, इतपत केस बारीक ठेवलेले असत. त्याचे सगळ्यांपेक्षा वेगळेपण दिसण्याची ही काही कारणे तर होतीच. याशिवाय तो मूळ अकोला, जळगावकडचा असल्यामुळे त्याच्या बोलण्यातही वेगळेपण जाणवायचे.
सुजित राठोड त्याचे नाव. त्याचे वडील शेतकी अधिकारी होते. आमची ओळख झाली आणि तो बसायला माझ्याजवळच आला. पुढे आम्ही चांगले दोस्त बनलो. अगदी सातवी होईपर्यंत आम्ही एकत्र राहिलो. मला कायम नवनव्या गोष्टींचे आकर्षण वाटत राहिले आहे. नवी ठिकाणे, नवीन माणसं, नवीन नाती. त्यामुळे असेल कदाचित. मी कायम नवे मित्र बनवत गेलो. जुने होतेच; पण त्यामध्ये नव्यांची कायम भर पडत राहिली. एखादी गोष्ट आपली मानली की, फार लवकर मी त्याच्यात गुंतत राहिलो. गुंते सोडवतानाही हलक्या हाताने स्वतःला मुक्त करत राहिलो. पण त्या आठवणी काळजापर्यंत रुजलेल्या आहेत. त्या अशा इतक्या सहज पुसणार्या नाहीत. ओमीच्या भोवती काही मुलांचा ग्रुप गोळा होत होता. तोही त्याच्या ग्रुपमध्ये गुंतत गेला. मग माझ्या आयुष्यात त्याची जागा सुजितने घेतली. आमच्या बर्याच आवडीनिवडी जुळत राहिल्या. सुजितचे अक्षर आणि इंग्रजी दोन्ही चांगले होते. त्यामुळे माझाही फायदा झाला. इंग्रजीतील अभ्यासात प्रगती करणे सोईचे झाले.
सुजितच्या घरीही माझे जाणेयेणे असे. त्याची आई फार प्रेमळ होती. सुजितप्रमाणेच त्यांचेही वेगळेपण जाणवत राही. खेड्यातील बायका कायम साडीत दिसतील. पण सुजितची आई घरी असली की, सलवार कमीज वापरत असे. त्यांना पाहिले की, शब्बूआपाची हमखास आठवण येत राही. सुजितला एक छोटी बहीणही होती. सुप्रिया तिचे नाव. पाहिले की, हुबेहूब बाहुलीच वाटायची. त्याचे बाबाही फार चांगले होते. पण लवकरच एक गोष्ट लक्षात आली. सुजितचे बाबाही दारूच्या आहारी गेलेले होते. सुरूवातीला त्यांचे पिणे कमी होते. तोपर्यंत ठीक होते. मग मात्र माझे येणेजाणे थोडे मर्यादितच राहिले. शक्यतो ते नसतील अशावेळी मी जात असे. ते आले की, आमच्या मिटींग बरखास्त होत. नशेत असताना ते कोणाला नीट ओळखायचेही नाहीत. ते प्यायलेले नसले की, मग मात्र आवर्जून आमच्याशी बोलायचे. अभ्यासाची चौकशी करायचे. मला कायम सुजितपेक्षा जास्त मार्क्स मिळत; म्हणून कौतुकही करायचे. 'घरी येत जा', म्हणून सांगायचे. नशेत असताना आम्ही भेटल्याचे त्यांना साधे आठवायचेही नाही.
आम्हाला इतिहासातील महाराणा प्रताप यांचे प्रकरण गुरुजींनी शिकवले. तेंव्हा सुजितने मला सांगितले की, तेही मूळचे राजस्थानचे राजपूतच आहेत. महाराणा प्रताप यांनी अरवलीच्या जंगलात राहून मुघलांशी लढा दिला. तेंव्हा जे बंजारा लोक राणाजीसोबत होते; ते परत नगरात गेलेच नाहीत. पुढे भटकंती करत त्यातील काही महाराष्ट्रात आले. व्यापारी तांड्यासोबत जंगलातून मालाची वाहतूक करण्याचा व्यवसाय ते करू लागले. शेवटी बरीचशी मंडळी महाराष्ट्रातच स्थायिक झाली. एकदा सुजितच्या घरी फोटोंचा अल्बम पाहताना त्याच्या मम्मीचा एक फोटो मी पाहिला होता. त्यामध्ये राजस्थानी बायकांप्रमाणे कोपरापर्यंत पांढऱ्या बांगड्या, आरसे बसवलेली ओढणी डोक्यावरून घेतलेला फोटो होता. कधीकधी सुजित घरात बोलताना तो वेगळ्याच भाषेत बोलायचा. भाकरीला बाटी म्हणायचा. तो राजस्थानला कधीच गेला नव्हता. पण त्यांच्या गावाकडे म्हणे त्यांचे भरपूर नातेवाईक होते. तेथील बहुतांशी बायका आजही पारंपरिक पोशाखच करतात. जे शिकले; ते बाहेर पडले, सुधारले. बाकी परिस्थिती 'जैसे थे'च. त्याचे मम्मी-पप्पा शिकलेले होते. नोकरीच्या निमित्ताने कायम बाहेरच राहिले. कधीतरी गावी जायला मिळे. वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे तो अनेक ठिकाणी फिरून आलेला होता. त्यामुळे सांगण्यासाठी त्याच्याकडे खूप काही असे. कधीही न पाहिलेल्या... ऐकलेल्या... कल्पनाही केली नसती; अशा अद्भूत गोष्टींचा त्याच्याकडे खजिनाच होता. मला माझ्या मर्यादित जगाच्या बाहेर असलेल्या या अज्ञात जगाची ओढ वाटू लागली. परिघाबाहेरचे जग पाहण्यासाठी मी उत्सुक झालो होतो.
पाचवीतून आम्ही सहावीत गेलो, तेंव्हाची गोष्ट आहे. एके दिवशी गुरुजींनी नाटकाची आवड असणारे विद्यार्थी निवडून त्यांना अॉफिसमध्ये बोलावले. बालनाट्य स्पर्धेसाठी यावर्षी शाळेतून नाटक बसवण्याचे ठरले होते. यावेळी सुजित आणि मी दोघेही उत्साहाने पुढे झालो. 'बनवाबनवी' नावाच्या या नाटकात तीन ठग असतात. तिघांची भेट झाल्यावर ते तिघे साधूचा वेश पालटून तीर्थयात्रेला जायला निघतात. एका धर्मशाळेत उतरल्यावर त्यांना एक व्यापारी भेटतो. ते तिघे मिळून त्या व्यापाऱ्याला फसवून जिलेबीने भरलेले चांदीचे ताट मिळवतात. त्यातही एकमेकांवर कुरघोडी करून ते ताट स्वतःलाच मिळवण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. या तीन ठगांपैकी दोन भूमिकांसाठी गुरुजींनी आम्हा दोघांना निवडले होते. नाटकाचे संवाद लिहून घेण्यापासून पाठांतर, ड्रेपरीची तयारी आम्ही मिळूनच केली. बाकीचे चारजण होते आमच्याबरोबर. ओमीला अशा गोष्टींची फारशी आवड नव्हतीच. आपोआपच सुजित आणि माझ्यात जवळीकता वाढायला हे नाटक पुरेसे होते. पाठांतर करण्यात मला काही अडचण नव्हती. पण सुज्याचे संवाद पाठ करून घेताघेता माझेच संवाद पाठ कधी झाले, कळलेच नाही. त्याची मम्मी तशी शिकलेली होती. त्यांनीही आमचे संवाद आवाजातील चढउतारासह व्यवस्थित म्हणवून घ्यायला मदत केली. सुरुवातीच्या प्रवेशात तिघेही ग्रामीण पोशाखात असतात. म्हणून फेटा, धोतर, नेहरू शर्ट असा पेहराव होता. मुकूंदमामानी इंटरेस्ट घेऊन वेशभूषेसाठी आम्हाला खूप मदत केली. साधूच्या वेशांतरासाठी आमच्या मुख्याध्यापक गुरुजींनी त्यांच्या जुन्या धोतराचे लुंगीसारख्या आकाराचे तीन तुकडे दिले. त्यांना काऊच्या पाण्यात बुडवून आम्ही भगवी वस्त्रे तयार केली. रुद्राक्षाच्या माळांसाठी आम्ही लहान कच्ची उंबरे गोळा करून त्याच्या माळा केल्या. उंबरे सुकल्यावर त्यांना रंग दिला. अशाच काही काही शक्कल लढवून खर्च न करता वेशभूषा तयार झाली.
पंधरा दिवसाच्या पाठांतरानंतर प्रॅक्टिस सुरू झाली. याकाळात अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. पण नाटकाचा नादच वेगळा. आपण वेगवेगळ्या भूमिका करतो; तेंव्हा आपले स्वतःचे अस्तित्व विसरून वेगळेच आयुष्य जगायला लागतो. तोंडाला रंग लागण्याची ही आयुष्यातील दुसरी वेळ होती. महिनाभरातच आम्ही स्पर्धेला गेलो आणि तालुक्याचे पहिले बक्षिस मारूनही आलो. थोड्याच दिवसांत जिल्ह्याची स्पर्धाही गाजवली. तिथेही पहिले बक्षिस आमचीच वाट पाहत होते कि काय, कोण जाणे! आता विभागावरील स्पर्धेसाठी पुण्याला जायचे होते. पुढे दूरदर्शनवरील बालचित्रवाणीमध्येही आपण दिसणार; म्हणून आम्ही उत्साहात होतो. सहावीच्या वर्षात अभ्यास कमी आणि नाटकंच जास्त झाली होती. त्यात सुजित जोडीला असल्यामुळे आयुष्यात एकेक नवीन रंग भरले जात होते.
आम्ही सातवीत जाईपर्यंत इकडे सुजितच्या घरची परिस्थिती ढासळत चालली होती. त्याच्या बाबांचे पिणे वाढतच गेले होते. दिवसरात्रीचेही त्यांना भान उरले नाही. चोवीस तास ते नशेत राहू लागले. त्यातच त्यांच्या हातून काहीतरी आगळीक घडली होती. त्यांनी म्हणे पैशाच्या व्यवहारात काही गडबड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यातच त्यांच्या साहेबांशी त्यांचे कशावरून तरी बिनसले. नशेतच त्यांनी साहेबांच्या अंगावर फाईल फेकल्या. त्यामुळे त्यांच्या साहेबांना अनायासे निमित्तच मिळाले व कामावरून त्यांना निलंबित करण्यात आले. कामावरच नाही गेले; तर पगार तरी कसा मिळेल? दुकानदारांची उधारी वाढतच चालली होती. याच्या... त्याच्याकडून केलेली उसनवारी कमी नव्हतीच. अशोक पवार, बप्पा जाधव यांच्यासारखी मंडळी सावकारी करायचे. त्यांच्याकडूनही अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे घेतलेले होते. ती माणसं आता घरापर्यंत येऊ लागली होती. दाराशी कोणी आला की, त्याची मनधरणी करण्यात घरातील एकेक वस्तू कमी होऊ लागली. कितीतरी किमती वस्तू कवडीच्या मोलाने विकून टाकाव्या लागत होत्या. परिस्थिती चिघळतच चालली होती. एकेकाळी सगळ्यांपेक्षा रंगीबेरंगी दिसणारे हे फुलपाखरू आता सगळ्यांसारखेच कळाहिन झाले होते. सुजितला उघड्या डोळ्यांनी जे दिसायचे; ते पाहून त्याला खूप वाईट वाटत होते. त्या वयातही त्याला न कळणारी तरीही सहज जाणवणारी वेदना तो मला सांगण्याचा प्रयत्न करे. मात्र या परिस्थितीत तो काय किंवा मी काय? काय करणार होतो? नव्हे नव्हे; तर काही करण्याएवढे आमच्या हातात तरी कुठे काय होते?
उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या व दिसल्या तरी त्या समजण्याएवढे वय नसल्यामुळे न कळणार्याही काही गोष्टी घडू लागल्या होत्या. त्यावेळी न कळलेल्या काही गोष्टींचे अर्थ आज जेंव्हा लागताहेत; तेंव्हा माणसाच्या माणूसपणाविषयीही शंका येऊ लागते. एखाद्याच्या अगतिकतेचा फायदाच नाही; तर गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती पाहिली की, चीड येऊ लागते. या घटनाही अशा होत्या की, चीड हा शब्दही फार फिका वाटावा. अगदी या पाशवी मानसिकतेची शिसारी येते... किळस वाटते. सुज्याचा बाप असा दारूत बुडालेला... घरात दोनवेळच्या अन्नाची भ्रांत पडलेली... बाहेरून आलेल्या, आधारासाठी जवळचे म्हणावे असे कोणी नसलेल्या निराधार कुटुंबाची परवड चाललेली असताना हळहळ वाटण्याऐवजी एखाद्याच्या जळत्या चितेवर स्वतःची पोळी भाजणारे कमी नसतात या जगात. राठोडसाहेबांच्या संसाराची राखरांगोळी ज्या दारूमुळे होत होती; त्या व्यसनापासून त्यांना परावृत्त करण्याऐवजी पदरच्या पैशाने त्यांना थोडी जास्तच पाजून घरापर्यंत सोडायला येणारांची संख्या लक्षणीय होती. एखाद्या तरूण त्यातही सुंदर स्त्रीचा संसार उघडा पडला असेल; तर 'सहानुभूती'चे अनेक विकृत हात पाठीवर फिरण्यासाठी शिवशिवत असतात.
आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडत असेल; तर सुरुवातीला आपल्याला त्याची चीड येते. पुढेही तसेच घडले; तर त्याचा तिरस्कार वाटतो. हे असेच वारंवार चालू राहिले; तर त्याविषयी घृणा वाटते. पुढे अगदी त्याची शिसारी येते. आणि तरीही तीच तीच गोष्ट मनाविरुद्ध पुन्हा पुन्हा घडत राहिली तर...? तर त्याची सवय होते. सुजितच्या आईच्या बाबतीत असेच काहीसे घडले असावे. जेंव्हा सगळे मार्ग बंद झाले... काही देण्याच्या मोबदल्याशिवाय कुठूनच काही मिळण्याची सुतरामही शक्यता उरली नाही... वखवखलेल्या नजरा आशाळभूतपणे कायम लाळ गाळत राहिल्या. सहानुभूतीच्या आडून असहाय्यतेचा फायदा उठवत राहिल्या... देण्यासारखे काहीच उरले नाही... देणेकर्यांना चुकवण्यासाठी गाव सोडून तोंड लपवून निघून जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. तेंव्हा वरिष्ठांच्या पुढे जाऊन काहीतरी तडजोड करावी लागणार होती. वरिष्ठ आपला हेका सोडायला तयार नव्हते. त्यातूनही काही तोडपाणी होणार असेल, हात ओले करण्याची तयारी असेल; तर झालेला अपमान विसरण्याएवढे मन मोठे करायला मोठे साहेब तयार होते.
'ज्याला भ्यावं, तेच आडवं यावं', असे म्हणायची वेळ आली. देण्याघेण्याची परिस्थिती राहिली नव्हती. दातावर हाणायला पदरात दमडी नव्हती. सुजितच्या मम्मीने नाइलाजाने आपला पदर पसरला. पसरलेल्या पदराकडे पाहून साहेबांना आपल्या चुकीची जाणीव झाली. सगळे व्यवहार पैशात थोडीच होतात! आपण उगीचच पैशाला महत्त्व देतोय. पैशापेक्षाही मौल्यवान काही गोष्टी असतात. पदराच्या पलीकडेही देण्याघेण्यासाठी काही असतेच ना! आणि केवळ एका परत'फेडी'च्या बदल्यात चुटकीसरशी हा माणूस सगळ्या अपमानावर पाणी सोडून मार्ग काढायला तयार झाला... तेंव्हा त्या कुठल्यातरी गाफिल क्षणी ती आपला निर्धार हरवून बसली. यावर फार काय बोलू? जनावरं मारून मांस खाणार्या माणसातही एक जनावर लपलेले असते. त्यालाही कधीकधी गरम रक्ताची ओढ असते. मृत शरीरापेक्षाही जिवंत शरीराला या वासनेने बरबटलेल्या बाजारात फार चांगली किंमत मिळते. तीच किंमत अदा करून तिने नवर्याची नोकरी वाचवली व बदलीचीही तजवीज केली. गुपचूप झालेल्या या व्यवहाराची गावात कुणकूण लागलीच.
'आजपर्यंत तर फार सतीसावित्रीचा आव आणत होती. एकदा वहिवाट पडल्यावर आता काय कोणीही यावे जावे. कोण आडकाठी करणार?' अशी भाषा बोलली जाऊ लागली.
एकदा कलंकित होऊन उजळ माथ्याने फिरणे अवघड झाले; रक्ताला चटावलेल्या गिधाडांकडून शरीराचे लचके तोडून घेऊन पुढील काही महिने तिने आपला प्रपंच कसाबसा चालवला. अखेरीस नोकरीवर परत घेतल्याचा व सोलापूरच्या पलीकडे अक्कलकोटकडे बदली झाल्याचा आदेश हातात आला. आपल्या अब्रूची किंमत देऊन सुजितच्या मम्मीने अनेकांची देणी चुकती केली आणि गाव सोडला. एक दिवस जसा अचानक सुजित आला; तसाच अचानक गाव सोडून निघूनही गेला. पुन्हा तो मला कधीच भेटला नाही. पण अनेक प्रश्नांची उत्तरे कायम अनुत्तरीत राहिली. सुजितच्या मम्मीने आपल्या प्रपंचासाठी एवढी जबर किंमत मोजूनही सुजितच्या पप्पांचे म्हणजे राठोडसाहेबांचे व्यसन संपले का? का त्या माऊलीलाच बदफैली ठरवून ते व्यसनाच्या आणखी आहारी गेले आणि त्यासोबत तेही संपले का? गाव बदलल्याने माणसं बदलली, पण प्रवृत्ती बदलली का? आणि त्याच्या आईची निर्भत्सना एवढ्यावरच थांबली का? का प्रपंचाची लक्तरे सावरण्यासाठी तिच्या स्वतःच्या वस्त्राची ठिगळे पुन्हा पुन्हा जोडावी लागली?
(क्रमशः)

छान लिहित रहा.
ReplyDeleteछान लिहित रहा.
ReplyDeleteधन्यवाद. महाराज, आपल्या शुभेच्छांसाठी.
ReplyDelete