टिचभर व्यासाचे वर्तुळ असलेले माझे जग त्यामानाने फार मर्यादित होते. वयाच्या पहिल्या पाच वर्षांत हाताच्या बोटावर मोजण्याएवढे प्रसंग सोडले; तर घरापासून बाहेर जाण्याचे प्रसंग फारसे आले नव्हते. त्यातूनही माझ्या काळजीपोटी निर्माण झालेल्या एक प्रकारच्या नजरकैदेतच होतो मी, असे म्हणायला हरकत नाही. या वर्तुळातील माणसांच्या पलीकडे काही असू शकते, यावर माझा विश्वास नव्हता. माई म्हणजे माझी लाडकी आजी हे आतापर्यंत माहीत झाले आहेच. माझे सर्वांत मोठे संरक्षक कवच तीच होती. जगातील सर्व भल्याबुर्या गोष्टींपासून माझे रक्षण करायलाच हवे. विशेषतः माझ्या बापाकडील मंडळी. अशी तिला चिंता होती. म्हणून तर क्षणभरासाठीही ती मला नजरेआड करायला तयार नव्हती.
सगळ्यात मोठे मोहनमामा... आजोबांच्या नंतर शेतीवाडीचे आणि घरचे सगळे तेच पाहायचे. मोठी कुसूममामी म्हणजे कायम संसारात गुरफटलेली स्त्री. एखाद्याच्या आयुष्याकडून किती माफक अपेक्षा असू शकतात, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कुसूममामी.
त्यानंतर मुकूंदमामा... खरं म्हणजे नोकरी करण्याची यांची फार इच्छा होती. विशेषतः शिक्षक म्हणून यांनी नाव काढले असते. पण काय दुर्दैव होते कोणास ठाऊक. कायम एवढ्या तेवढ्यावरून त्यांची संधी हुकत गेली. पुढे त्यांनी नोकरीचा विचार सोडून दिला आणि व्यवसायात शिरले. तिथेही अनेक उद्योग केले. इलेक्ट्रिकलची कामे केली, फोटोग्राफी केली, काहीकाळ शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी फिरता प्रतिनिधी म्हणून काम केले. पण यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे त्यांचा स्वतःचा फायदा जितका झाला; त्यापेक्षा जास्त गैरफायदाच उचलला लोकांनी. जिज्ञासा हा त्यांचा प्लसपॉईंट होता. कुठेही काही नवीन दिसले की, त्याची इत्यंभूत माहिती घेणारच. त्यातील कसब शिकून घ्यायचे आणि घरी आले की, प्रयोग सुरू व्हायचे. अंगात अनेक कलागुण असूनही त्यांना स्थैर्य मिळायला पुढे अनेक वर्षे जावी लागली. त्यामानाने सुनिता मामी बर्याच व्यवहारी होत्या.
सगळ्यात धाकटा माधवमामा... तोपर्यंत तो पुण्याला राहून शिकत होता. त्या काळाच्या मानाने पुण्यात राहिल्याने तो बराच आधुनिक विचारांचा होता. तसा तो घरात कमीच असायचा. परंतु सुटीला आला म्हणजे घरातले वातावरणच बदलून गेलेले असे. असे असले तरीही घरच्या सगळ्यांचाच तो लाडका होता. दोन्ही मामा शांत होते. हा मात्र काहीसा गरम डोक्याचा. तरीही सगळ्यात जास्त माझी गट्टी याच्याशीच जमली. कारण आमच्या दोघांच्या स्वभावात अनेक गोष्टींत साम्य होते. विशेषतः हट्टीपणाला तोड नाही.
राहता राहिली आबई. ती सगळ्यांमध्ये धाकटी. पण अलीकडील काळाता घटनाच अशा घडत गेल्या होत्या की, तिला अकाली वार्धक्य आले होते. माहेरी आल्यापासून तिने सदैव स्वतःला कामात गुंतवून घेतले होते. तरीही अधूनमधून तिला आजारपणामुळे सक्तीने विश्रांती घ्यावी लागत होती. पणजोबाच्या काळात घराच्या दोन खोल्या आणि पुढे खोपट होते. आजोबांनी त्यात भर घालून चांगले पाचसहा खोल्यांचे घर बांधले. मामांनी हे घर तसेच ठेवून पुढचा दर्शनी भाग सिमेंट कॉक्रेंटमध्ये बांधून घेतला होता. घराचा आकार वाढत गेला तशा माजघराच्या मागील दोन खोल्या आधिकच अंधारात गुडूप झाल्या. आबई एकतर शेतात गेलेली असायची किंवा कायम या अंधारात काहीतरी काम करत बसलेली असायची. जास्त करून ती बाहेर कुणामध्येही मिसळायची नाही. तिने स्वतःला केवळ घरातल्या अंधारातच नाही; तर मनातूनही कोंडून घेतले होते. मला काही हा अंधार मानवणारा नव्हता. ज्या अंधारात तिला सुरक्षित वाटायचे; त्याच अंधारात माझा जीव मात्र गुदमरून जायचा. त्यामुळे आबईपासून मी आणखी दुरावत गेलो.
घरातील या वडीलधार्यांनंतर चिल्लरपार्टीत मोठेपणाचा मान होता शुभांगीचा. मोठ्या मामाची मोठी मुलगी. माझ्यापेक्षा चारपाच वर्षांनी मोठी. मामेबहीण असली तरी माझ्यासाठी मात्र ती माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा तसूभरही कमी नव्हती. शुभांगी आणि शेखरनंतर घरात बाकीची चिल्लर जमा होत गेली. म्हणजे घरातील पहिला मुलगा मीच. तसा शुभाताईच्या पाठीवर एक मुलगा झाला होता. पण... कोणा एखाद्या शापित यक्ष, गंधर्वाला मानवी योनीत जन्मण्याचा शाप मिळाला असेल खरा. पण उःशाप मिळून अवघ्या वर्षभरातच तो मुक्त झाला असावा. असो. तो थांबला असता; तर मला एक समवयस्क सवंगडी मिळाला असता. बहुधा तो योग काही दोघांच्याही नशिबात नव्हता. कुसूममामीला तर माझ्यातच तिचा मुलगा दिसू लागला. त्यामुळे एक झाले. सर्वांच्याच लाडकेपणाचा वाटा माझ्या वाट्याला जास्त आला. त्यातूनही एकुलता एक भाचा. एकंदरीत आबईपेक्षा या सर्व मंडळीसोबतच मी आधिक रमू लागलो. या घरात मला मिळालेली मायेची ऊब अपवादानेच एखाद्याला मिळाली असेल.
आकाशात भरारी घेण्यापूर्वी पाखरालाही काही काळ घरट्यातच घालवावा लागतो. मलाही अंड्यातून बाहेर पडण्यापूर्वी या सर्वांच्या पंखातली ऊब पूरेपूर मिळत राहिली. त्यामुळेच मी जेवढे प्रेम आकाशावर केले; तेवढेच या घरट्यावरही केले. या घरट्याची ओढ मला कायम जाणवत राहिली. याच्या एकेका काडीसोबत माझे ऋणानुबंध जुळलेले होते. मी डोळे उघडले; तेंव्हापासून हे घरटे भलतेच देखणे होते. गल्लीत इतर घरे मातीची होती. मोठमोठाले चिरेबंदी वाडे होते. त्यामानाने हे घर छोटे होते. तरीही आधुनिक शहरी पद्धतीमध्ये बांधलेल्या पुढील दर्शनी भागामुळे ते उठून दिसायचे. खेड्यात अपवादानेच आढळणारी बैठकीची खोली आणि तिची सजावट पाहून आलेला पाहुणा अवाक् व्हायचा. ही खोली कोणी आले गेले; तरच उघडली जायची. इतरवेळी शेजारच्या भल्यामोठ्या ढाळजेत उठबस चालायची. घराला लागूनच परसात भरपूर मोकळी जागा होती. तिथेच जनावरांसाठी गोठा आणि खेळण्यासाठी भरपूर जागा होती.
परसातील ते अंगण अनेक प्रकारच्या फुलझाडांनी आणि कसल्या कसल्या झाडांनी भरून गेलेले असे. पांगारा, हादगा, देवकापूस, सुबाभूळ अशी मोठी झाडे होती. तशी पपई, केळीची फळझाडेही मागच्या अंगाला होती. पारिजातकाच्या जोडीला कुपाटीवर गोकर्णीची निळी फुले हमखास असायची. इवलीशी गुलाबी फुले असलेल्या चिनीगुलाबाने एक कोपरा भरून गेलेला होता. केशरी पिवळ्या झेंडूचीही बरीच रोपटी होती. उकिरड्याच्या कडेला सांडपाणी जायचे तिथे लाल पिवळी कर्दळ आणि अळूच्या पानांची दाटी झालेली होती. ज्यांच्या जोडीने मी वाढत होतो; इवल्याशा चिंचोक्याच्या दोन पाकळ्यांमधून उगवलेले ते इवलेसे चिंचेचे रोपटे असो वा बुडाशी कोय असलेले ते आंब्याचे रोप असो. या सगळ्या वैभवावरून बागडणारी निळ्या पिवळ्या नाजूक पंखांची फुलपाखरे, सगळ्या गोठ्यात चमकणार्या रेघांची नक्षी मागे सोडणार्या गोगलगाई, ओल्या मातीत राहणारे गांडूळ आणि कधीमध्ये तोंड दाखवणारे मुंगूस माझे बालपणातले संवगडी होते. अनेक प्रकारच्या पक्ष्यांची तर जत्राच भरायची. कोपऱ्यातल्या बाभळीवर रंग बदलणारे सरडेही मान हलवताना दिसायचे. देवकापसाच्या पांढऱ्याशुभ्र बोंडामधून बालपणासोबत गुंतलेले असे अनेक धागे उलगडत जातात.
दिवसामागून दिवस उलटत गेले. एक दिवस आपण मोठे झाल्याचा पहिला साक्षात्कार मला झाला. माझे नाव शाळेत घातले. तसा अधूनमधून आठवण होईल तसा मी शुभाताईसोबत शाळेत जाऊन बालवाडीत बसायचो. तिथे खायला सुकडी मिळायची. आता मात्र रीतसर नाव दाखल झाले होते. तारांमध्ये रंगीबेरंगी मणी ओवलेली पाटी अन् नुकतीच विकत घेतलेली वितभर लांबीची नवीकोरी पांढरीशुभ्र पेन्सिल, चित्रे असणारी अंकलिपी एवढ्या संपत्तीसह आमचा शाळेचा शुभारंभ झाला. गळ्यात अडकवण्यासाठी लांब पट्टीचे बंध असलेली शबनम पिशवी गळ्यात अडकवून आम्ही शाळेला जाऊ लागलो. अननस, ईडलिंबू, फणस नावाची कधी न पाहिलेली फळे अंकलिपीत पहिल्यांदा पहायला मिळत होती. आमच्या गुरुजींनी "श्री गणेशा" वगैरे असले काही नाही, तर थेट एक ते दहा अंक काढून दिले. अक्षरांच्याही अगोदर अंक ओळख करून देणारे गुरुजी माझ्या आयुष्यात आले आणि आमच्या वर्तुळाचा परीघ भलताच वाढला.
आमची शाळा त्यावेळी सरकारवाड्यात भरायची. मध्यभागी येमाईचे छोटे मंदिर होते. दोन्ही बाजूला असलेल्या ओवर्यांमधून पहिली दुसरीचे वर्ग भरायचे. बाहेरच्या खोल्यांमध्ये तिसरी चौथीचे वर्ग आणि पाचवी ते सातवीचे वर्ग व अॉफिस वरच्या मजल्यावर असायचे. दोन्ही बाजूने वर जाणाऱ्या अंधार्या जिन्यातून वर जावे लागे. अंधाराचे आपले जुळत नसल्यामुळे चौथीपर्यंतच शाळा शिकायची. नंतर शाळेला रामराम ठोकायचा, यावर पहिलीतल्या आमच्या बर्याच जणांचे एकमत झाले होते. वरच्या मजल्यावर असणाऱ्या वर्गात शिकणारी मुले फारच धाडसी असतात. त्यामुळे त्यांचे खूपच कौतुक वाटायचे. त्यामध्ये आमची शुभाताई पण होती. त्यांच्या वर्गातल्या गमतीजमती ती सांगायची. तेंव्हा कधी न पाहिलेल्या अलिबाबाच्या गुहेसारखे ते अद्भुत असायचे. पण वर जाऊन पाहण्याचे धाडस किमान पहिली संपेपर्यंत तरी झाले नाही. शाळेची वेळही त्यावेळी आजच्यासारखी नव्हती. सकाळी साडेसात ते साडेअकरा पहिले सत्र आणि मग दुपारी दोन ते पाच दुसरे सत्र अशा दोन सत्रांत शाळा भरायची. सकाळच्या सत्रात अक्षर ओळख, बाराखडी, वाचन, लेखन, कविता शिकवल्या जायच्या. दुपारी अंकवाचन, लेखन, उजळणी, पाढे शिकवले जायचे. कविताच काय पण उजळणी, बाराखडी आणि पाढेही तालासुरांत म्हणावे लागत. शाळा सुटताना तर प्रत्येक वर्गांतून स्पर्धाच लागलेली असे. सगळा सरकारवाडा दुमदुमून जायचा. शाळा सुटल्यावर घरी जाताना प्रत्येकालाच फुलपात्र भरून सुकडी वाटली जायची. हुशार विद्यार्थ्यांना मात्र दोन मापे मिळायची. गुरुजी कडक होते; तसे पोरांचे लाडही करायचे. दोन मापे सुकडी मिळाली की, तो मुलगा गुरुजींच्या मर्जीतला समजला जायचा. गुरुजी त्यांच्या मर्जीतील पोरांना पानसुपारी आणायला दुकानात पाठवायचे. हुशार पोरांना हिशेब कळावा, म्हणून गुरुजी त्यांनाच कामे सांगायचे.
मोठ्या मामांनी आधीच सांगितले होते, "आपल्याकडे जो खूप शिकतो, त्यालाच भाव असतो. माधव मामासारखे खूप शिकायचे. बाकी सगळ्या गोष्टींत लाड होतील; पण अभ्यासात काही ऐकून घेणार नाही." गुरुजी हुशार पोरांच्या पेन्सिलला अडकित्याने टोकही करून द्यायचे. जर हुशार झाले नाही; तर गुरुजींनी अडकित्याने तासून गुळगुळीत केलेली छडी दररोज दहावेळा खावी लागते. तेंव्हाच ठरवून टाकले, आपण माधवमामापेक्षा हुशार व्हायचे. वर्ष संपेपर्यंत अंकलिपीत न बघता संपूर्ण उजळणी आणि बाराखडी म्हणायला आणि लिहायला आम्ही शिकलो होतो. हळूहळू वाचायला पण जमू लागले होते.
दररोज संध्याकाळी शुभाताईसोबत अभ्यासाला बसावे लागे. गल्लीतली आणखी मुलंही अभ्यासाला घरी ढाळजेत यायची. मुकूंदमामा सगळ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यायचा. कधी कधी शिकवायचाही. मला पट्टीने सरळ रेषा ओढून द्यायचा. मग दोन्ही बाजूने पाटी भरेल इतके लिहायचे. पाटीवरचे लिहिलेले पुसू नये; म्हणून पाटी पिशवीत न ठेवता तशीच वर ठेवून सकाळी सांभाळून शाळेत घेऊन जायची. गुरुजींना दाखवली की, मग ते शाबासकी द्यायचे. कधी ते दुसऱ्या वर्गाच्या गुरुजींना पण बोलावून घेऊन दाखवायचे. ते पण कौतुक करायचे. आम्हांला अजून स्फुरण चढायचे. पहिली संपेपर्यंत गुरुजी मला हुशार म्हणू लागले. त्याचा परिणाम एकच झाला, सगळ्या कसोट्या सफलतेने पूर्ण करत आम्ही हुशार आहोत, यावर सगळ्यांचे एकमत झाले.
मधल्या वेळात अभ्यास कमीच असायचा. बराचसा वेळ खेळण्यातच जायचा. माई मला इतर मुलांबरोबर खेळायला जाऊ द्यायची नाही. मग परसातच शुभाताई तिच्या मैत्रिणींसोबत भातुकली खेळायची; तेंव्हा मलाही त्यांच्यासोबत खेळायला मिळायचे. बाहुलाबाहुलींची लग्न लावली जायची. एवढ्याशा टोपणांच्या भांड्यातून जेवण बनविले जायचे. कधी शेंगदाणे, पापड, कुरड्या असायच्या. कधी खर्या भाकरीचे छोटे तुकडे असायचे. कधी काहीच नसले; तर मात्र झाडाची पानेच ठेवली जायची. चिखलाच्या अनेक वस्तू बनविल्या जायच्या. साध्या खापराच्या तुकड्यांनाही खूप महत्त्व यायचे. छोट्याशा लाकडाच्या तुकड्याला रंगीबेरंगी कापडाच्या चिंध्या गुंडाळून केलेल्या बाहुल्या बार्बी डॉलपेक्षाही सुंदर दिसत. फुटक्या बांगडीच्या रंगीत तुकड्यांपासून माळा बनवलेल्या असायच्या. कुठून कुठून एकेक वस्तू मिळवलेली असायची. जगाच्या दृष्टीने टाकावू ठरलेल्या अनेक वस्तूंची खजिन्यात भर पडत राहायची. विकत आणलेले खेळणे अपवादानेच दिसायचे. कधी माई मूडमध्ये असली की, काय काय बनवायला शिकवायची. याच खेळात मला माझी नवरी सापडली...
वेणू..!
ही वेणू म्हणजे एकदम भारीच होती. अपर्या नाकाची... कुरळ्या केसांची... गोरीगोमटी असणारी वेणू माझ्यापेक्षा एक वर्षाने लहानच होती. बाकीच्या मुलींना वेण्या असत. हिचे केस मात्र कापलेले असायचे. बाहुलीच दिसायची. शुभाताईच्या कृपेने आमचे बर्याच वेळा लग्न झाले. मलाही ते इतके खरे वाटायचे की, मोठेपणी आपण हिच्याशीच खरेखुरे लग्न करायचे, हे जवळजवळ ठरवूनच टाकले. माईलाही तसे सांगून टाकले. हो! उगीच पुन्हा पंचाईत नको. आणि गंमत अशी की, वेणूचे बाबाही मला जावईच म्हणायचे. अशाप्रकारे माझ्या परिघात आणखी एकाची भर पडली होती.
वास्तवातील संसारही कल्पना ठरेल, इतका कल्पनेतील तो संसार वास्तव होता.
(क्रमशः)

Nice
ReplyDeleteनंदू सर मनात आठवणींचा समुद्र साठवून ठेवलाय तुम्ही.
ReplyDeleteहसरी दु:ख घेऊन आनंदान कसा जगावं याचे मूर्तिमंत आहात तुम्ही
ही गोष्ट सामान्य नाही.