Sunday, 20 March 2016

७...

          माझ्या नकळत्या बालपणातले काही म्हणता काही आठवत नाही मला. पण काही पुसट संवेदना आहेत. अर्थात हा सगळा तोंडी जमाखर्च आहे. त्यामुळे एखादा रुपया इकडेतिकडे होऊ शकतो.
          घराशेजारच्या भल्यामोठ्या परसातील ओल्या पावसाळी वातावरणात भिजलेल्या नव्याकोर्‍या छपराच्या काडाचा ओला वास... चिखलाचा कोवळा स्पर्श माझ्या बालपणाला चिकटलेला आहे. पोलीसांसारखी खाकी वर्दी आणि मामांनी कौतुकाने आणलेली खेळण्यातील लाकडी दस्त्याची छोटी रायफल यांचा रुबाब त्या बालपणाला आहे. चाके फिरवली की, लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या रंगाचे दिवे चमचमणारी एक गाडी आठवते. आणखी आठवायचे म्हटले; तर पेठेत बापूंच्या हॉटेलमध्ये छोट्याशा बशीतून मिळणाऱ्या घट्ट सायीच्या मलईची चव जिभेवर रेंगाळते आहे. ढुंगणावर कायम होणारी बेंडं आणि त्यांची ठसठसणारी वेदनाही कधी विसरता येणारी नाही.
           एकंदरीत या कधीच विसरता न येणार्‍या गोष्टींशिवाय आठवायचा प्रयत्न केला; तर आठवते... एका भलत्याच मोठ्या मंदिरात जिथे हत्ती, घोडे, वर्‍हाडी सगळे काही दगडात कोरलेले होते... तिथे मुकूंदमामाचे झालेले लग्न आणि नवरदेवाच्या पुढ्यात मी ऐटीत घोड्यावर बसलो होतो. आपण शिवाजी महाराजच झालोय, असे उगीचच वाटत राहिले. नवीन छान कपडे तर मीही घातलेले होते. पण मळवट भरलेली, मेंहदी लावलेली, छान नटलेली नवरी म्हणजे सुनितामामी या दिवसापासून तिचे घर कायमचे सोडून आमच्यासोबत राहण्यासाठी आली होती. पुढील अनेक दिवस मी सावलीसारखा तिच्यासोबत होतो आणि तिला मामी न म्हणता 'नवरी'च म्हणायचो. खरं तर मलाही त्यावेळी लग्न करायचे होते. पण माझ्यासाठी छोटी नवरी न मिळाल्यामुळे ते झाले नाही. सुनितामामीने मात्र माझ्यासाठी छोटी नवरी आणायचे कबूल केले होते.
          माझ्या अस्पष्ट आठवणीत एक गोष्ट अजून आहे. शेतात भूईमूग काढायचे चालले होते. मी दिवसभर इकडेतिकडे भटकत होतो. सायंकाळी नांगरलेल्या वावरातून फिरताना माझ्या पायाला काहीतरी टोचले. काटा टोचण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. पण यावेळी का कोण जाणे वेदना जास्तच होत होत्या. पायाला मुंग्या येऊन मला गुंगी आल्यासारखे वाटत होते. मला उचलून लगेचच गावात आणले. गावातले कोणीतरी एकजण मला कडूनिंबाचा पाला, मिरच्या खायला देऊन कसला तरी मंत्र म्हणून माझा पाय चोळत होते. नंतर मला अनेक वर्षांनी या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळला. मला म्हणे विंचवाने दणका दिला होता.
          अजूनही सांगायचं; तर एक आठवण आहे. मुकूंद मामाच्या सायकलवर बसून फिरायला गेल्यानंतर अंधार असलेल्या मोठ्या खोलीत तेवढ्याच मोठ्या पडद्यावर पाहिलेला सिनेमा. सिनेमा कळण्याएवढे वय नव्हतेही त्यावेळी. परंतु मनात एक विचार राहून राहून येत होता. ही सगळी सिनेमात दिसणारी माणसे आत कुठून गेली असतील. कारण तोपर्यंत नाटक माहीत होते. सिनेमाचेही तसेच काहीसे असावे, असा माझा आपला समज होता. तिथून परत येताना खूप मोठ्या मुसळधार वादळी पावसाने आम्हांला झोडपले. नदीला पूर आल्यामुळे आम्ही पैलतीरालाच अडकून पडलो होतो. त्यात सायकल घसरल्यामुळे आम्ही दोघेही पडलो. नाकाच्या वरच्या बाजूला कपाळावर सायकलचे हँडल लागल्यामुळे खोक पडली. रक्ताची ती खारट चव अजून आठवतेय. एवढे होऊनही थंडीने गारठल्यामुळे संवेदना बधीर झालेल्या होत्या. आपल्याला काहीच लागले नाही. मामा मात्र धपकन चिखलात पडले; म्हणून मी बावळटासारखा हसत होतो. घरी आल्यावर माई मामालाच रागावली. मी मात्र हसतच होतो.
         या आणि अशाच काही आंबट चिंबट... खारटगोड आठवणी जमाखर्चात मांडत मी मोठा झालो. जन्मानंतरची पहिली काही वर्षे तरी आपल्याला काही आठवत नाही. जे काही आठवतेय, ते असे तुकड्या-तुकड्याने. त्या गोष्टी लक्षात राहण्यामुळे कोणताही मोठा फायदा होणार नसतो. तरीही त्या पूर्ण विस्मृतीतही जात नाहीत... पूर्ण स्मृतीतही राहत नाहीत. भूतकाळाच्या धुक्यात लपेटलेल्या या आठवणी म्हणजे कोणत्याही दंतकथांपेक्षा कमी विलोभनीय नसतात. या सगळ्या अर्ध्याकच्च्या आठवणी आणि माझा जन्म यांदरम्यान बरेच काही असे घडले होते की, त्यातील मला काहीही आठवत नाही... आठवणे शक्यही नाही. ते सगळे फक्त माईच्या गोष्टींमधून मला ऐकायला मिळाले.
            माझ्या जन्मानंतर बाळंतपणासाठी आलेली आबई पुन्हा सासरी आली. मी माझ्या हक्काच्या घरी आलो. ऋतू बदलला की, वातावरणही बदलते. माझ्या येण्याने घरातले वातावरणच बदलून गेले. सगळेजण जाम खूश होते. क्षणभरही मला खाली ठेवायला कोणी तयार नव्हते. सगळ्यांच्या विरंगुळ्याचे ठिकाण मी होतो. त्यावेळी सगळ्यांच्याच आनंदाचा केंद्रबिंदू मी बनलो होतो. सर्वांचे रस्ते जगभर फिरून माझ्याजवळच येत होते. दूध पिण्यापुरतेच काय ते मी आबईजवळ असायचो. माझा पायगुण फार जबरदस्त होता म्हणे. घराला लागलेली साडेसाती माझ्या जन्मापासून कमी झाली. कर्त्या पुरुषांच्या राशीत ठाण मांडून बसलेला जुगार, नशा कमी झाली. घरात पैसा व्यवस्थित येऊ लागला. रात्री घरी आणलेली कमाई कपाटात ठेवण्यापूर्वी 'मालक' म्हणून त्यास माझ्या हाताचा स्पर्श घडवला जात होता. तुम्हांला हसू येईल कदाचित; पण घरातून बाहेर पडताना माझी पापी घेऊन बाहेर पडले की, दिवसभरात फार लाभ होतो, असा निराळाच शोध लागल्यामुळे तर मला फारच मार्केट आले होते. अंगावर एकेक दागिना वाढू लागला होता. कपडे, खेळणी यांचे ढिगारे लागले होते. कौतुकच असे चालले होते की, रडायला वेळच मिळत नव्हता. खाणे, पिणे, झोपणे आणि उरलेल्या वेळात खेळणे. मी सहा महिन्याचा होईपर्यंत सगळा गाव फिरून झाला होता. आजीबाईंनी कामातून निवृत्ती घेतलेली होती. वडील आणि चुलते यांची कामेच काय होती? प्रत्येकालाच मी हवा असे. त्यासाठी त्यांच्यामध्ये लुटूपुटूची भांडणेही होत.
          भलतेच वाढलेले जावळ आणि गुटगुटीत बाळसं कोणालाही वेडं करील असंच होतं. रांगायला तर अंगणही पुरेना झाले. कोणाची नजर लागू नये; म्हणून आजीबाई कपाळ... गाल... तळहात... तळपायावर काजळाचे भलेमोठे ठिपके द्यायच्या. कमीजास्तीला मनगटात दृष्टमणीही बांधले होते. मग नजर लावायची काय बिषाद आहे! आणि उलट आम्ही काजळ घातलेल्या टपोर्‍या डोळ्यांनी समोरच्याकडे असे काही पाहायचो की, पाहणाराच्याच काळजाचे पाणीपाणी होऊन जाई. मग दृष्ट लागेल कशी?
          पण दृष्ट लागली होती. एकप्रकारची काजळी घरात पसरत होती. ती या काजळाच्या ठिपक्यांना जुमानत नव्हती आणि कठोर काळजाच्या लोकांना त्याचे सोयरसुतक राहिलेले नव्हते. बाळंतपणापासूनच आबईची तब्येत बिघडलेली. ती मरायला टेकली होती. बंद झालेला सासूरवास पुन्हा सुरू झाला होता. नुसता सुरू नाही, वाढलेला होता. त्यांना आबईची आता आवश्यकता राहिलेली नव्हती. उलट अशी आजारी खंगलेली आबई मेली; तर ते सर्व सुटणारच होते. माझ्या पहिल्याच वाढदिवसाचा कार्यक्रम जंगी झाला आणि मानपानावरून संगीत मानापमान नाटकही चांगलेच रंगले. वाढदिवसाच्या निमित्ताने आबईची माहेरची मंडळी आली खरी; पण त्यांच्या अपमानच झाला. आमच्या आजीबाईने सरळसरळ नातवाचे नाव पुढे करून लग्नापासून राहिलेल्या अपेक्षा बोलून दाखवल्या. त्या पूर्ण करायला जमत नसतील; तर पुन्हा आमच्या घराची पायरी चढू नये; म्हणून दमच भरला. आजपर्यंत काही दिलेले नव्हते, असेही नाही. पण या लोकांच्या अपेक्षांचे ओझे फार जड होते. रडकुंडीला येऊन ती मंडळी पिंपळेश्वरला परतली. झाला प्रकार आजोबांनी फारच मनाला लावून घेतला होता. आजपर्यंत अनेकांची लग्ने जमवली होती; परंतु स्वतःच्याच मुलीच्या बाबतीत मात्र माणसं ओळखण्यात आपण पुरते फसलो. जाळाला फुले समजून हात जाळून बसलो. या पश्चात्तापाच्या आगीत त्यांचे मन होरपळू लागले. कोणाशी मनातले फारसे न बोलणारे आजोबा त्या क्षणापासून आणखीनच अबोल होऊन गेले. काळजातील व्यथा कोणालाही सांगता येईना. दिवसेंदिवस चिंता त्यांना चितेकडे ढकलू लागली. खाल्लेला घास गोड लागेना... झोपेने पाठ फिरवली. तब्येत ढासळू लागली. शरीराचे आजार औषधाने बरे होतील; पण मनाचे काय?
          एके रात्री असेच झोप येईना; म्हणून अंथरुणावर ते तळमळत पडले होते. माईपुढे बसून त्यांनी थडाथड स्वतःच्याच तोंडात थपडाही मारून घेतल्या.
"ह्या ह्या हातानी मी शेण खाल्ले. बास्! आता डोळ्यांनी बघवत नाही आन् डोळेही मिटत नाहीत."
असे म्हणत ते रडू लागले. माईने समजूत काढली.
"आता झोपा. पाह्यजे तर उद्या जाऊन पोरीला घेवून या. आठपंधरा दिवस राहू द्या. मग बघू काय वाट घावती ते."
आजोबांनाही ते पटले असावे. डोळ्यांतून टीपे गाळतच त्यांनी डोळे मिटले.
देव म्हणाला, "तथास्तु!"
सकाळी आजोबा उठलेच नाहीत. देवाने त्यांचे ऐकले. आजोबांना काळझोप लागली. ते गेलेले कळल्यावर आबई मला घेऊन माहेरी आली.
            आजोबांच्या तिसऱ्याला आबईच्या सासरची मंडळी आली होती. मोठ्या मनाने तेराव्यापर्यंत आबईला माहेरी राहायची परवानगी दिली; पण अडचण एकच होती. लाडक्या नातवाला सोडून एवढे दिवस राहणे, त्यांच्या जिवावर आले होते. मला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा त्यांचा हट्ट होता. एवढे लहान बाळ आईशिवाय कसे राहील? हा व्यावहारिक युक्तिवादही त्यांना पटण्यासारखा नव्हता. आतापर्यंत दूध पाजण्यापुरतेच आबईच्या जवळ मला दिलेले होते. त्यांच्या दृष्टीने तर आबईची आता तेवढीही गरज उरलेली नव्हती. एकूणच समजावून सांगण्याच्या पलीकडे हे प्रकरण पोहचले, सगळे एकेरीवर आले; तेंव्हा मात्र पै-पाहुणे, शेजारी मध्ये पडले. त्यांची कसीबशी समजूत काढली खरी; पण तो त्यांना त्यांचा अपमान वाटला. एवढ्या तेवढ्यावरून चिडून ते निघून गेले.
          तेराव्याला आले; तेंव्हा मात्र वेगळाच गोंधळ सुरू झाला.
"हिला ठेवून घ्या. आम्ही काही तिला घेऊन जाणार नाही. आमचे पोर फक्त आम्हाला द्या."
हा त्यांचा शेवटचा निर्णय होता. वातावरण तापत गेले. हमरीतुमरीला सुरुवात झाली. आपण नेमके कोणत्या प्रसंगाला आलोय, याचेही भान त्यांना राहिले नव्हते. माई, मामा सगळे त्यांची समजूत काढत होते. हातापाया पडत होते. ती मंडळी मात्र ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. प्रकरण हातघाईवर आल्यावर शेवटी तालमीतली पोरं मध्ये पडली. ती या पाहुण्यांना सन्मानाने पार माळापर्यंत सोडवून आली.

मी परत आलो होतो...
होय! मी या पांढरीत परत आलो होतो.
यातील मला काहीच कळत नव्हते. तरीही मला कुठे कल्पना होती, आता पुन्हा आपण कधीच परत जाणार नाही म्हणून. मलाच काय कोणालाही असे वाटले नव्हते. आज ना उद्या वातावरणातला तणाव कमी होईल. सर्वकाही सुरळीत होईल, याच वेड्या आशेवर पुढचे दिवस उलटत राहिले. काही केल्या मनातली अढी निघत नव्हती. अनेकांनी समजूत घालण्याचे प्रयत्न केले. पण नात्यांमध्ये पडलेले अंतर काळासोबत वाढतच गेले. आणि मी मात्र याच गावात... आजोळात वाढत राहिलो. पुढे काही वर्षांनी वडिलांनी दुसरे लग्न केल्याचे कानावर आले. आबई त्यावेळी खूप रडली होती. काही दिवस तिने अंथरुणच धरले होते. कळता झाल्यावरही मला या गोष्टींचे नवल वाटत राहिले की, ज्या लोकांनी आबईचे जगणे अवघड करून सोडले होते... जो संसार तिच्या जिवावर उठला होता; तोच संसार तुटल्याचे तिने एवढे मनाला लावून का घ्यावे? वाह रे! संस्कृती ! धन्य त्या परंपराच्या जोखडात अडकलेल्या मानसिकतेची...!
          काहीतरी भलतेच घडून बसले होते. पण आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते की, आबईचा आणि तिच्या माहेरच्या लोकांचा तिरस्कार करणारी ही माणसं आपल्या वारसासाठी तडफडत होती. त्यांच्या घरात यापुढे मुलच जन्माला आले नाही अथवा येणार नव्हते, अशातला भाग नव्हता. तरीही त्यांना 'मी' हवा होतो. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते.
ही मंडळी शांत बसणार्‍यांपैकी नव्हती. काहीही झाले तरी त्यांना त्यांचा वारस हवा होता. म्हणून मग मला पळवून नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. त्याला उत्तर म्हणून माझ्याभोवती संरक्षक कडे तयार झाले. कडेकोट पहारे बसले. घरातील मंडळी डोळ्यांत तेल घालून जपू लागली. जसजसा मी मोठा होत होतो, तसतसे सदैव माझ्या अवखळ पावलांबरोबर आपली थकलेली पावलं जुळवत माई सावलीसारखी माझ्यामागे फिरत राहिली. कळतनकळतपणे मीही त्यामुळे आबईपेक्षा माईच्याच जास्तीत जास्त जवळ येत गेलो. इतका की, माईशिवाय माझी कुठलीच गोष्ट... कुठलीच आठवण पूर्ण होऊ शकत नाही.
            आपल्या जन्माबरोबर आपण अनेक नाती सोबत घेऊन येत असतो. मी जसजसा मोठा होत गेलो; तसतसे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, याची समज येत गेली. कोणी आंधळे... लंगडे... मुके... बहिरे असते. कुठलीतरी कमतरता घेऊन ते जगत असतात. तसे आपल्याही आयुष्यात काही नातीच नाहीत, हे कळून चुकले. बाकीची मुले अंधाराला, चोराला, बागुलबुवाला घाबरत होती. आपल्या वडिलांना ते बाबा, पप्पा, दादा, बप्पा, नाना, अण्णा, आबा, बापू, तात्या असे काही ना काही म्हणत होती. मला मात्र आपण वडिलांना काय म्हणावे? हा प्रश्न कधी पडलाच नाही. माझ्यासाठी एकच शब्द होता... 'बाप!'
'बाप' नावाच्या या माणसाला पुढे खूप नंतर पाहिलेले आठवतेय; तेंव्हापासून एक चित्र कायम मनावर कोरले गेले... मळकट कपडे, वाढलेली दाढी, नशेत तांबारलेले डोळे असलेला हा अस्ताव्यस्त अवतारातील 'बाप' नावाचा माणूस म्हणजे फक्त भीती...!
           त्यामुळे झाले एवढेच की, आयुष्यात मी स्वतःचा बाप सोडून इतर कोणाच्याही बापाला कधीही घाबरलो नाही...! असो.

(क्रमशः)

3 comments:

  1. खूप छान भाग अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  2. बाप' नावाच्या या माणसाला पुढे खूप नंतर पाहिलेले आठवतेय; तेंव्हापासून एक चित्र कायम मनावर कोरले गेले... मळकट कपडे, वाढलेली दाढी, नशेत तांबारलेले डोळे असलेला हा अस्ताव्यस्त अवतारातील 'बाप' नावाचा माणूस म्हणजे फक्त भीती...!

               त्यामुळे झाले एवढेच की, आयुष्यात मी स्वतःचा बाप सोडून इतर कोणाच्याही बापाला कधीही घाबरलो नाही...! असो.

    Khupch manala bhidtat ya lines.

    ReplyDelete