Monday, 4 April 2016

९...

          पाटी-पेन्सिल हीच एकमेव संपत्ती असण्याच्या त्याकाळात पहिली किंवा दुसरीच्या वर्गामध्ये वही-पेन वापरणारे कोणीही नसायचे. परंतु माधवमामाने त्याच्याकडील एक वही मला देऊन आमचा सन्मान आणि वर्गातील मुलांमध्ये आमचे वजन भलतेच वाढवले होते. सकाळी प्रार्थनेसाठी मात्र वरच्या वर्गातील सर्व मुलांकडे एखादी छोटीशी डायरी असायची. त्यात राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदे मातरम्, प्रार्थना, पसायदान, इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे असे बरेच काही भारी भारी लिहिलेले असायचे. माझ्यासाठीही एका संक्रांतीच्या भेटकार्डामध्ये काही कोरे कागद घालून मुकूंदमामाने एक छानसी डायरी शिवून दिली होती. एवढेच नाही; तर त्यांनी स्वतःच्या वळणदार हस्ताक्षरात सर्वकाही लिहून दिले होते. अधूनमधून जुन्या कॅलेंडरमधील काही चित्रेही चिकटवलेली होती. रेडीमेड डायर्‍यांपेक्षा ही हाताने बनवलेली सुंदर डायरी शाळेत फारच लोकप्रिय झाली होती. मलाही मुकूंदमामामुळे अभ्यासाच्या जोडीला सतत काहीतरी नवीन करण्याचा नाद लागला होता. चित्रे काढायची... माईच्या गोष्टी ऐकायच्या आणि त्यात मनाची भर घालून त्या वर्गात सांगायची कला मला जमू लागली होती. सरकारवाड्यात लपायला भरपूर जागा होती. कमीजास्तीला शेजारचे मारुतीचे मंदिर होतेच. मंदिरापुढे खेळायला बरेच मोकळे पटांगण असल्यामुळे घरी जे फारसे खेळायला मिळत नव्हते; त्याची कसर आता शाळेतील वेळात निघू लागली. अनेक संवगडी गोळा होऊ लागले. परिघाचा व्यास वाढतच चालला होता.
          पहिलीची परीक्षा ती काय असणार? गुरुजी पाटीवरच काहीबाही लिहायला सांगायचे आणि झाली परीक्षा. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत परीक्षा संपूनही गेली.
          अशातच घरातल्या वातावरणात आनंद पसरला होता. सुनितामामीमध्ये बदल दिसू लागला होता. एकदा तर चुलीजवळ बसून लहान पोरांसारखं चुलीची माती खातानाही मी तिला पाहिले होते. पण एक झाले, तिच्यामुळे मलाही कैर्‍या, चिंचा खायला मिळू लागल्या होत्या. आताशी मामी दुपारी एकटी बसली की, मनाशीच हसायची. मला जवळ घ्यायची आणि माझे लाड करायची. मला जवळ घेऊन हळूच विचारायची,
"काय हो! नवरी पाहिजे ना तुम्हाला? का खेळायला दोस्त पाहिजे?"
          खरं म्हणजे मला माझी नवरी मिळाली होती. आता काही त्याची गरज नव्हती. मात्र खेळायला दोस्त मिळाला, तर बरेच होते. पण मी आपला काही न बोलता वेड्यासारखा नुसताच पाहतच राहायचो. मग मामी हसून हळूच माझी पापी घ्यायची. मलाही तिच्याकडून असे लाड करून घ्यायला आवडायचे. असे असले तरी तिच्या नजरेत तरंगणार्‍या स्वप्नांचा अर्थ त्यावेळी मला काही लागत नव्हता. माईनेही मला दम भरला होता.
"आता जास्त आगावपणा करायचा न्हाई. मामीसंगट जास्त धिंगाणा घालायचा न्हाई. आन तू आता मोठा झालाईस. शहाण्यासारखं वागावं."
          मुकूंदमामाला विचारले की, तो फक्त हसायचा. सांगायचा काहीच नाही. शेवटी उन्हाळ्याच्या सुट्टीत माधवमामा आल्यावर मी त्याचा पिच्छाच पुरवला. तेंव्हा त्याने मला हळूच गमाडीजंमत सांगितली. आमच्या घरात लवकरच एक बाळ येणार होते. लवकर म्हणजे अगदी लगेचच नाही काही. ही सुट्टी संपून मी दुसरीत गेल्यावर जेंव्हा गणपती येऊन जातील... मग दसरा येऊन तो संपेपर्यंत मात्र मला वाट पहावी लागणार होती. ही जमाडीगंमत कळल्यावर तर मी एकेका दिवसाने वाटच पाहू लागलो.
          या सुट्टीत माधवमामा आलेला असल्यामुळे खूप धमाल करायला मिळाली. माधवमामाच्या सायकलवर बसून तो मला कुठेकुठे फिरायला घेऊन जायचा. संध्याकाळी तो मला व्यायामालाही घेऊन जायचा. अट एवढीच होती की, सगळ्याच गोष्टी घरी सांगायच्या नाहीत. मीही त्या कोणालाच अगदी माईलाही सांगणार नव्हतो. आम्ही शेतात निघालो की, नेहमीच्या वाटेने न जाता तळ्याच्या वाटेने जायचो. तिथे पाणकोंबड्या भरपूर असायच्या. माधवमामा जवळच्या गुलेरने गोटीएवढ्या खड्याने त्यांना टिपायचा. प्रत्येकवेळी शिकार मिळायचीच असे नाही. पण पाणकोंबडी नाही मिळाली; तर तित्तर वगैरे सापडायचे. एकदा तर मामाने भरावाच्या दगडांमध्ये एक मोठी काळी पालच पकडली. मला तिची खूपच भिती वाटली होती. पण त्यानेच सांगितले की, ही घोरपड आहे म्हणून. शेतातील झोपडीत काही सामान ठेवलेले असायचे. तिथेच आमची पार्टी व्हायची. भाजलेले पदार्थ एवढे रुचकर असतात, हे तेंव्हाच मला कळले होते. आता माधवमामाची शेवटची परीक्षा झाल्यामुळे तो जास्त दिवस राहणार होता. तो आल्यापासून आमचा मुक्काम पोस्ट बैठकीच्या खोलीत होता. त्याने एक मोठा रेडिओ आणला होता पुण्याहून. खूप छान छान गाणी ऐकायला मिळायची. एकंदरीत काय सुट्टी एकदम धमाल गेली.
          माझी दुसरीची शाळा सुरू झाली. शुभाताईपण सातवीत गेली होती आणि विशेष म्हणजे वेणू आता पहिलीच्या वर्गात बसू लागली होती. तिला काहीच येत नव्हते आणि मी हुशार होतो. त्यामुळे वेणूला मी बर्‍याच गोष्टी शिकवायचो. ओठांचा चंबू करून ती नवलाईने माझ्याकडे पाहत राहायची. माधवमामाकडूनही मला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या होत्याच.
          मामीचे पोट आता चांगलेच मोठे दिसू लागले होते. एकदा मी माईला विचारलेही होते. "मीपण असाच आबईच्या पोटात होतो?"
यावर आबईच म्हणाली, "नाही बाबा! तुला तर भिकारणीकडनं भाकरी देऊन इकत घेतलंय. काय लेकरू हाय...! आसलं कडकडं लेकरू पोटात कसं ठरलं आसल देव जाणं!!!"
          कधीकधी मी सुनितामामीच्या पोटाला कान लावायचो. बाळ माझ्याशी काहीतरी बोलेल, असे मला वाटायचे. मग सगळेजण मलाच विचारायचे,
"सांग बरं! पोरगं हुईल का पोरगी?"
घरात शुभाताई मुलगी होतीच ना! त्यामुळे आता मुलगा व्हावा, असेच सगळ्यांना वाटत होते. मलाही खेळायला जोडीदार हवा होता. म्हणून मग मी लबाडपणाने बारकाईने ऐकायचो आणि "मुलगा!" म्हणून सांगायचो. पण तरीही सगळे मला चिडवायचे.
"हा हा! पोरगीच होणार. आमाला माहितीय तुला बायकू पाहिजेल ते. म्हणून तर लाडीगोडी चाललीय. कळतंय की आमाला बी साखरपेरणी कशासाठी चाललीय ते."
मग सगळेजण माझी गंमत करून मोठमोठ्याने हसायचे. मी मात्र चिडायचो... फुगायचो. पण तेवढ्यापुरतेच.
           तसा तर मुलगा अथवा मुलगी असा काही आग्रह नव्हता कुणाचाच. त्यात मोठ्या मामीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाने सर्वांनाच काळजी लागून राहिलेली होती. माई तर म्हणायची, "दगड, धोंडा काय बी हूदे. पण सगळं यवस्थित हूदे."
           शाळेत गुरुजींनी आता बेरीज वजाबाकीची गणिते, जोडाक्षरांचे शब्द असे काहीबाही शिकवायला सुरुवात केली होती. मंदिरातील घंटा वाजवण्यासाठी पळतपळत येऊन उडी मारायची. हात पोहचायचा नाही. मग दुसऱ्याच्या खांद्यावर तिसर्‍याचा आधार घेऊन चढायचे. चिरघोडी खेळायची. अशा उपक्रमात मी तयार होत होतो. दुपारी अचानक देवदर्शनाच्या निमित्ताने माईची चक्कर व्हायचीच. पण त्यामागील शुद्ध हेतू माझ्यावर लक्ष ठेवण्याचाच असायचा. श्रावण महिण्यापासून पुढे अनेक कारणांनी मंदिरापुढे भंडारा व्हायचा. गावातून फिरून गहू तांदूळ गोळा करायचे... पेठेतून फिरून गूळ जमा व्हायचा. कोणी ना कोणी नारळ द्यायचे. मंदिरापुढे खड्डा खोदून चुलवण केलेले असायचे. हळद शिजवायच्या भल्या मोठ्या काहिलीतून खीर शिजवली जायची. शाळा सुटल्यावर पटकन घर गाठायचे आणि ताट घेऊन भंडार्‍याचा प्रसाद खाण्यासाठी पळायचे. काहिलीपासून जवळ जागा सापडली की, ताटातली खीर संपल्यावर लगेच डबल खीर मिळायची. ती घेऊन घरी यायचे. नवरात्र संपेपर्यंत कोणाचा ना कोणाचा भंडारा असे. खिरीत नारळाचा तुकडा सापडला की, जो आनंद होई, त्याला तोड नाही. गरमागरम खीर बोटाने चाटूनपुसून संपवली जाई.
           नवरात्र सुरू झाले की, आमचा पोराठोरांचा उत्साह ओसंडून वाहत असे. गावाच्या चारही बाजूला देवीचे एकेक ठाणे होते. सरकारवाड्यातील येमाईपुढे आरास केलेली असे. मोर्‍याचा साहेबानाना जोगत्याचे कपडे घालायचा. गळ्यात कवड्याच्या माळा अन् हातात पोत पेटवलेला असे. आम्ही त्याच्या पाया पडलो की, कमरेला अडकवलेल्या पिशवीतले कुंकू कपाळाला लावायचा. पाचपन्नास आराधी आणि तेवढयाच परड्या घेऊन पाचव्या माळेपासून एकेका ठाण्याला भेट दिली जाई. पाचव्या माळेला गावाच्या पूर्वेला असलेल्या राणूबाईला जायचे. सहाव्या माळेला दक्षिणेकडे असलेल्या तुकाई बरडावर... आठव्या माळेला पश्चिमेस असलेल्या पिंपळेश्वराशेजारची सटवाई; तर नवव्या माळेदिवशी उत्तर वाटेच्या लखाईला जाऊन यायचे. दिवस मावळून अंधार पडेपर्यंत आराध्यांचा मेळा चालायचा. अंधारात तर पेटलेले पोत फारच भारी दिसायचे. झांजा वाजवणारे जोशमध्ये यायचे. ढोलकीवरचे पेटून उठायचे. पोत खेळणारे तर असे रिंगण धरायचे की, बघतच राहावे. एक म्हणता दहाबारा बायांच्या अंगात आल्यामुळे त्या झुलत असायच्या. कुंकवाचा मळवट भरल्याने कपाळ भरून गेलेले... केस मोकळे सुटलेले... पेटण्यासाठी टलेला कापूर, लिंबू असे काहीबाही त्यांच्या हातावर दिले म्हणजे त्या खाऊन टाकायच्या; तेंव्हा कुठे शांत व्हायच्या.
          नवरात्रात दुपारची शाळा नावालाच असे. आम्ही जुन्या टायरामध्ये काठ्या घालून किंवा लोखंडी रिंगेची चकारी करून त्या दिवसांत भरगच्च असणाऱ्या तर्वटाच्या पिवळ्या झुपकेदार फुलांनी, सूर्यफुलांनी त्या सजवायचो. मोठी मुले सायकल घेऊन यायची. नदीवर सायकल धुवून तिलाही सजवले जायचे. अशा शंभरेक 'गाड्या' रस्त्याने दिसायच्या. लहानमोठ्या मुली आपल्या डोक्यावर लहानमोठी मडकी घेऊन यायच्या. तांबड्या काऊने आणि पांढऱ्या चुन्याची बोटे ओढून मडकी सजवली जायची. चुंबळ करून ही मडकी डोक्यावर ठेवलेली असायची. शुभाताई डोक्यावर मडके घेऊन आणि माई हातात परडी घेऊन आलेली असायची. या मडक्यातील आंबील हा जिव्हाळ्याचा विषय असायचा. ताक, कुरड्या आणि भाजलेल्या मिसळीच्या पिठापासून आंबिल केलेली असायची. आपल्या ओळखीच्या मुलींजवळ जाऊन मडक्यावरच्या बशीसारख्या खापराच्या येळणीतून आंबील प्यायला मिळायची. थोडीथोडी म्हणता पोट गच्च भरायचे.
           दरवर्षी नवव्या माळेला रात्री गावातील तरुण पोरांपासून ते पोक्त माणसांपर्यंत शे-पाचशे लोक सिमोल्लंघनासाठी तुळजापूरला जातात. तिथले सिमोल्लंघन उरकून विजयादशमीचे 'शिलंगण' खेळण्यासाठी सगळेजण सकाळी गावात पोहचत; तेंव्हा कुंकवाने लालबुंद झालेले असायचे. यावेळी माधवमामा गावीच असल्यामुळे मोहनमामासोबत तोही गेला होता. खूप गर्दी असते; म्हणून त्यांनी मला काही नेले नाही. मी हट्ट केल्यावर पुढच्या वर्षी तुझा अन् मुकूंदमामाचा नंबर म्हणून माझी समजूत घातली माईने. पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी. तुळजापूरमध्ये दसर्‍याची भवानीमातेची पालखी निघते. वर्षभर सेवा करूनही पालखीला खांदा द्यायचा मान भोप्यांना नाही. हा मान नगरच्या तेल्याच्या घराण्याकडे वंशपरंपरेने आलेला आहे. देवीसाठी पलंग बनवून तो तिला पोहचवण्याचे काम त्यांच्याकडे आहे. नवरात्रात महिषासुराबरोबर चाललेले युद्ध विजयादशमीला संपते. सिमोल्लंघनानंतर थकलेली देवी झोपून जाते, ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत. तिला झोपण्यासाठी हा पलंग असतो. तो उचलून खांद्यावरून तुळजापूरपर्यंत पोहचवला जातो. त्यांच्या जाण्याचा मार्ग पिंपळेश्वरातून आहे. खूप वर्षांपूर्वी नदीला पूर आल्यामुळे पलीकडे जाणे अवघड होऊन बसले होते. पलंग तर वेळेत पोहचणे आवश्यक होते. शेवटी तालमीतल्या पोरांनी वेडे धाडस केले. नदीतून एकमेकांचे हात पकडून दुहेरी साखळी तयार केली. त्या आधाराने पलंग पैलतीरावर पोहच झाला. या प्रसंगी तर तारून नेले. पण पुढच्या काळजीने तेल्याने पोरांना तुळजापूरपर्यंत येण्याची गळ घातली. त्याच्या विनंतीवरून पोरं पलंग सुखरूप तुळजापूरमध्ये पोहचवून आली. एवढेच नाही; तर पालखीला खांदा देऊन सिमोल्लंघनाचे सोने लुटून परत आली. बस् तेंव्हापासून तो मान मिळाला तो मिळालाच.
        नवरात्र संपून आता दिवाळीचे वेध लागले होते. सुनितामामी पहिलेच बाळंतपण असल्यामुळे माहेरी गेलेली होती. एके दिवशी त्यांच्या माहेरचा एक माणूस साखरपान घेऊन आला. सर्वांचेच चेहरे उजळलेले होते. कोणी काही कोणी काही बोलत होते. मी माधवमामाला गाठले. माधवमामा जाम खुशीत होता. त्याने मला उचलले आणि खांद्यावर टाकले.
"चल बेट्या! तुला पेढा खाऊ घालतो."
आणि खरेच बापूच्या हॉटेलात नेऊन पेढे घेऊनच घरी आलो. मुकूंदमामा 'बाप' झाला होता. याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मला मात्र थोडासाच आनंद झाला होता. कारण फार साधे होते. ज्या बाळाची मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत होतो; त्या बाळाचा जन्म होऊनही ते पाहायला मिळत नव्हते. बाळाला पाहण्यासाठी मी अधीर झालो होतो.
"मामा, आपण बाळाला बघायला कधी जायचं रं?"
"जाऊ... जाऊ! पण एवढ्यात नसतंय जायचं. कळ काढ थोडी. मग जाऊ."
ती कळ काढणेच अवघड झाले होते. बारशापर्यंत घरचे काय जायचं नाव घेत नव्हते. यात कसेबसे दोनचार दिवस गेले. शेवटी माधवमामालाच गटवला.
"घरच्यांना कळू न देता आपण किती गमाडीजंमत करतो. आताही गुपचूप सायकलवर जाऊन येऊ."
माधवमामाच्या डोक्यातही असेच काही चालले असावे. पण माईला कळले तर माई ओरडेल. म्हणून तो गप्प होता. मी उचल घेतल्यानंतर त्यालाही स्फुरण चढले. माईला त्याने सांगितले की, आपलं साखरपान घेऊन कोणाला पाठवण्यापेक्षा मीच जातो म्हणून. हो नाही करत शेवटी माई तयार झाली.
            इवलासा पांढरा गुलाबी कापसाचा गोळा मामीच्या कुशीत झोपलेला होता. डोळे मिटलेलेच होते. पण ओठ मात्र अगदी एवढेसेच रेषेएवढे होते. त्याची बोटे तर माझ्या पेन्सिलसारखीच होती. त्याला सोडून परत यायला पायच निघत नव्हता.
"चल बेट्या! पोरगं हाय ते. पोरगी असती तर दिली असती तुला."
सगळे हसू लागले. मला उगीचच लाजल्यासारखे झाले. मामींनी माझा गालगुच्चा घेतला आणि हळूच म्हणाल्या,
"तुमच्या मामाबरोबर पुन्हा या बरं का!"
मी होय म्हणून मान हलवली. निघताना माधवमामा तिला हळूच म्हणाला,
"सांगतो भाऊला. येईल तो."
"आता आगाऊपणा करताय, पण कळेल थोड्याच दिवसांत."
ते दोघेही का हसताहेत ते मला कळले नसले; तरी त्यांच्या सुरात सूर मिसळून मीही खुशीत हसत राहिलो. माझ्या आनंदाचे कारणही तसेच होते. आता घरात मला आणखी एक जोडीदार आला होता. घरी गेलो की, माईला, शुभाताईला आणि महत्त्वाचे म्हणजे वेणूला कधी एकदा सांगतोय, असे मला झाले होते.

(क्रमशः)

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. सर फारच छान लिहलय राव. अगदी चित्रपटच उभा राहतोय डोळ्यासमोर. Nostalgic झालो वाचुन. बालपणातल्या गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या. मस्तच. शुभेच्छा ।

    ReplyDelete
  3. सर फारच छान लिहलय राव. अगदी चित्रपटच उभा राहतोय डोळ्यासमोर. Nostalgic झालो वाचुन. बालपणातल्या गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या. मस्तच. शुभेच्छा ।

    ReplyDelete