Monday, 14 March 2016

६...

          एक बैल, एक घोंगडी आणि गाठोड्यात मोजून चार भांडी घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. सोबत होती खांद्यावर घेतलेली चार वर्षाची मुक्ता... आणि तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला गोविंद हाताला धरून चालत होता. आज इथे तर उद्या तिथे... पोटाला चार घास मिळावे; म्हणून मिळेल तो कामधंदा करायचा. मन रमेना झाले की, पुढच्या वाटेला लागायचे. असे करत करत पैठणकडच्या कुठल्यातरी गावातून निघालेला एकनाथा दोन वर्षांनी पिंपळेश्वरमध्ये येऊन पोहचला. रात्र झाली म्हणून वेशीच्या आत चावडीत मुक्काम केला. गाव तर बरा वाटला. काही दिवस पोटाला कमी पडणार नाही. अजून किती दिवस असे बेवारशागत फिरायचे. एक तर पंढरपूर करून परत फिरायचे. नाहीतर कुठेतरी आता एका जागी स्थिर व्हायला पाहिजे.
            तीन दगडांच्या चुलीवर त्याने काहीबाही शिजवून लेकरांना खाऊ घातले. चार घास कसेबसे आपल्याही पोटात ढकलून तिथेच ऊबीला आडवा झाला. चावडीत तो एकटाच नव्हता. अजून एकदोघे बसलेले होते.
          "कोण गाव म्हनायचं पावनं?"
कोतवालाने चौकशी केली. थोडीफार जुजबी माहिती सांगून एकनाथा पुन्हा शांत झाला.
          एकनाथा म्हणजे पैलवान गडी. सकाळी उठावं, तालमीत मेहनत करावी. दिवसभर शेतीवाडीतली जमतील तेवढीच कामे करून आराम करावा. रात्री घाम निघेपर्यंत पुन्हा मेहनत करावी. कुस्त्या कराव्यात. खावे... प्यावे... निवांत मजेत राहावे. यात्रा... जत्रा... उरुसामधून कुस्त्यांचे आखाडे गाजवायचे... असे दिवस चालले होते. पुढे घरच्यांनी लग्न करून दिले. एक बापासारखाच गबरू मुलगा आणि एक नक्षत्रासारखी मुलगीही झाली. सगळे व्यवस्थित चाललेले असताना असे काय घडले कोणास ठाऊक? दुधात मिठाचा खडा पडावा, तसा एकनाथाचा संसार विस्कटला. बायको मरण पावली... घरदार, गाव सोडावे लागले. बायकोच्या मृत्यूने उघड्यावर पडलेला संसार सावरण्यासाठी धडपडणाऱ्या एकनाथाची संसाराच्या आखाड्यात मात्र पुरती दमछाक झाली होती.
           "आन! हे हाताला काय झालं म्हनं?" कोतवालाची चौकशी सुरूच होती.
          आपल्या मनगटापासून भुंड्या डाव्या हाताकडे पाहत एकनाथाने उसासा सोडला.
          "ऊसाच्या चरकात गेला. थोड्यावर भागलं... बरं तुमच्या या गावात कामाधंद्याची काय सोय हुईल का? काही दिवस राहावं म्हनतूय इथंच."
           दुसऱ्या दिवशी सकाळी तेल्याच्या घरी कामाची सोय झाली. तेल्याच्या घाण्याला बैल मिळाला आणि एकनाथाला बूड टेकवायला जागा. दिवसभर काम करून सकाळ संध्याकाळ तो तालमीत जाऊन बसू लागला. पुढील काही दिवसांत ओळखी पाळखी वाढत गेल्या. एकनाथाचे कसब लोकांपर्यंत पोहचू लागले. गावातील पांडूरंग देशमुख आणि शामराव पवार कारभारी या दोन मातब्बर असामी. त्यांच्या नजरेत एकनाथा आला. वर्षा दोन वर्षांतच तो त्या दोघांच्या गळ्यातील ताईत झाला. विशेषतः शामराव कारभार्‍याचा आणि एकनाथाचा तर चांगलाच दोस्ताना झाला. एकनाथा आता तालमीत बसून पोरांना डावपेच शिकवू लागला. मेहनत करून घेऊ लागला. पुढच्या पाच वर्षांत पोरांचा दबदबा वाढत गेला आणि एकनाथ आता पोरांचा वस्ताद झाला होता.
           गोविंद आणि मुक्ता मोठी होत होती. एकनाथही आता गावासाठी 'नाथाभाऊ' झाला होता. कारभार्‍यांनी दोस्तीला जागून आपल्या परड्याच्या पलीकडे असलेली जागा नाथाभाऊला देऊन तेल्याच्या अंगणातील त्याचा संन्याशाचा प्रपंच हक्काच्या जागेत वसवला. हाताशी आलेल्या गोविंदच्या जोडीने नाथाभाऊंनी हिश्याने दुसऱ्याची शेती कसायला सुरुवात केली होती. परिस्थिती पालटू लागली. देशमुखांच्या ओळखीने त्यांच्याच व्याह्याच्या गावात मुक्ताचे लग्न करून दिले. घरात उरले बापलेक. पण बापाप्रमाणेच गोविंदलाही तालमीचे वेड होते. त्यामुळे खाण्यापिण्याची सोय तालमीतच होऊन जाई. घरात चूल पेटली काय किंवा न पेटली काय? काय फरक पडणार...
          पूर्वी वाहतुकीच्या सोईसुविधा फारशा नव्हत्याच. एकतर पायी अथवा लांबचा पल्ला असेल; तर बैलगाडी. रात्री गावाजवळ तळ पडायचा. सकाळी उठून पुढे मार्गस्थ व्हायचे. असाच गावाबाहेरील कैकाड्याच्या लिंबाखाली तुळजापूरला निघालेल्या बैलगाड्यांचा तळ पडला होता. त्यात होती एक नऊ दहा वर्षाची चिमुरडी. गोरीगोरी पान... नाकीडोळी छान! इकडच्या तिकडच्या ओळखी निघाल्या. विषय निघाले. कोणीतरी नाथाभाऊला सुचवले. शामराव कारभार्‍यांनी पुढाकार घेतला. देशमुखांनी मुक्ताचे लग्न करून दिले होते; आता गोविंदच्या लग्नाचा बार कारभार्‍यांनी उडवून दिला. पुढच्या लग्नसराईत छोटीशी सून नाथाभाऊंच्या घरात नांदायला आली. नाथाभाऊ आपल्या या छोट्याशा सुनबाईला माई म्हणू लागले. गंमत म्हणजे गोविंदलाही आई नव्हती आणि माईलाही. लहान वयातच माईवर सगळी जबाबदारी पडली ती तिच्या शेवटापर्यंत. घर उभे राहत गेले... घराला घरपण येत गेले. चार जनावरे... शेळ्या... थोडीफार शेती होत होत ही मंडळी आता या गावचाच एक अविभाज्य भाग बनली होती.
          तो काळ हा माणूसकीचा होता. माणसांच्या अंगी नेकी होती, सच्चेपणा होता. माणसाला माणसाची कदर होती. दाराशी आलेल्या माणसाला तांब्याभर पाणी, बसायला पाट आणि जेवायला ताट देऊन मग कोण... कुठला... हे सवडीने विचारता येईल, असे साधे सोपे गाणित असायचे. नीतीमत्तेची चाड आणि पाप-पुण्याची भीडभाड पाळली जाई. एखाद्याचा सोयरा साऱ्या गावाचा सोयरा मानला जाई. त्यामुळेच आपला आब राखून जगणाराची गावात पत असे. नाथाभाऊची परिस्थिती तशी बेताचीच होती. तुमच्या दारातून येणारा जाणारा तुम्हांला नमस्कार घालत असेल; तर तुम्ही एक तर सत्तेवर पाहिजे किंवा तुमच्याकडे संपत्ती असायला हवी. हे नसूनही लोक तुमचा आदर करत असतील; तर तुम्ही विद्वान तरी आहात किंवा सच्चरित्र. नाथाभाऊकडे यांपैकी चौथी गोष्ट होती. नाथाभाऊंच्या नंतर गोविंदने हा वसा कसोशीने पाळला.
         काळाची चाकं फिरत राहिली. देश स्वतंत्र झाला. पुढे राज्यघटना आली. आणखी काही वर्षांमध्ये पंचायत राजही आले. गोविंदची चार माणसांत ऊठबस वाढली होती. गोविंदचा गोविंदराव झाला. चार एकराचे दहाबारा एकर झाले. साध्या घराला दिमाख आला. घरातले गोकुळ फुलत गेले. तीन मुलांच्या पाठीवर चौथी मुलगी झाली. खरं म्हणजे गावातील भावभावकी नसलेले एकटे घर असूनही सगळ्यांनाच धरून राहिल्याने गावानेही यांना परके मानले नाही. स्वभाव लाघवी असल्याने सोयरिकी जुळवायला असो वा सुख-दुःखाला असो. गोविंदराव पुढे असत. गोविंदराव आबांच्या शब्दाला गावात... सोयर्‍याधायर्‍यांत... मान मिळू लागला.
          गावाचा कारभार बघता बघता घरचा कारभार सांभाळायला मुले हाताखाली येत गेली. थोरला मोहन घरची शेतीवाडी सांभाळू लागला. मधला मुकुंद उद्योग-व्यवसायात शिरला. तर धाकटा माधव अजून शहरात शिकत होता. थोरल्या मोहनचे लवकरच लग्नही उरकले. एवढ्यात मुलीसाठी म्हणजे मालतीसाठी स्थळ आले. पाहुणे पाहायला आले; ते पाहणाराला गार करतच. अंगठा सोडून बाकीच्या बोटात अंगठ्या... बगळ्यालाही लाजवतील असे स्टार्चचे कपडे... डोक्यावर पुढारी छाप झोकदार टोपी... कुठेतरी दूर तिकडच्या अकलूजकडंच्या साखर कारखान्यात मुकादम का काय होते. लोकांच्या पगारी करणं त्यांच्याच हातात होतं म्हणे. दोन मुले. एक लग्न होऊन गेलेली मुलगी. थोरला लवकरच बापाच्या जागेवर कारखान्यात चिकटणार होता आणि धाकटा कसलातरी कंत्राटदार. भिमा नदीच्या काठावर सलग पन्नास एकर बागायती शेती होती. दिली होती दुसऱ्याला हिश्याने करायला. खेड्यातील पानसुपारी, तंबाखू खाणार्‍या लोकांत बसून पांढऱ्या कागदाची सिगारेट फुकणारा हा माणूस म्हणजे भलताच गोष्टीवेल्हाळ होता. त्याच्या एकेक गोष्टी ऐकून गावातील एकेक माणूस चाट पडला. आजपर्यंत अख्ख्या गावात नसलेली अपूर्वाईची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे भल्यामोठ्या धुराची रेषा सोडणारी मोटारसायकल होती. शहरातील पाहुणा होता. अशी सोयरीक गोविंदरावांच्या घरी चालून आली होती. लोकांचे एकच मत झाले,
          "पार्टी एकदम जंक्शन हाय. सोडून चालणार नाही."
मग काय? लग्न ठरलेही आणि महिनाभरात उरकलेही.
          काशिनाथ अर्थात तात्यासाहेब... एक जबरदस्त वल्ली होती. आठ हात लाकूड असेल; तर बारा हाताची ढलपी निघणारच. बोलणे असे अघळपघळ असे की, खरं म्हणजे या माणसाला इंदिराजींनी परराष्ट्र खात्याचे मंत्रीपद दिले असते; तर नुसत्या चर्चेनेच या महाशयांनी भारत पाकिस्तान प्रश्न सोडवला असता. काश्मीर सोडाच, पाकिस्तानने लाहोर कराचीही भारताला देऊन टाकले असते. एकूणच तात्यासाहेब बोलबच्चन होते. कारखान्यात नोकरी होती ती मुनीमाची. पन्नास एकर वगैरे कधी काळी असलीच तरी त्यातील आता केवळ पाच एकर उरली होती. गावाकडं चौसोपी वाडा होता; पण तोही गहाणवट पडलेला. जहागिरी केंव्हाच गेली होती; फुगिरी मात्र कायम होती. कमाईच्या मानाने खर्च भन्नाट होते. जुगार, नशा हे शौक खानदानी लोकांनीच करावे, असा त्यांचा रुबाब होता. उधळपट्टीला माप नव्हते. बडेमियाँचे गुण दोन्ही चिरंजीवामध्येही उतरलेले होते. वरून शहरातील गुंडपुंड मित्रांची कमी नव्हती. या सगळ्यांच्या नाड्या मात्र तात्यासाहेबांच्या सौभाग्यवतीच्या हातात होत्या. एकछत्री अंमल. बाई अशी जहांबाज की, एखाद्या गड्याची गचांडी धरायला कमी करणार नाही. बाहेर डरकाळ्या फोडणारे वाघ घरात मात्र कान कापलेल्या कुत्र्यांसारखे शेपूट आत घेऊन असत. अशा घरात मालती आली. लांडग्यांच्या दावणीला शेळी आणून बांधली गेली.
          नव्याची नवलाई लवकरच संपली आणि वास्तवाचे चटके सुरू झाले. मालतीला सासूरवास सुरू झाला. बडेजावासाठी हे लोक एकेक खड्डा काढत होते. हे खड्डे एवढे वाढले होते की, आपण विनाशाच्या खोल गर्तेत चाललोय, याचेही भान राहिले नव्हते. डोक्यावर कर्ज वाढतच चालले होते. शेतीवाडी, वाडा हातात राहिला नव्हता. पण नाहीतरी कोण तिकडे खेड्यात मरायला जाणार? त्यापेक्षा गेला तर जाऊ द्या. अशीच बापलेकाची भावना झाली होती. तर मालतीच्या सासूचा एकच आक्षेप होता.
          "एवढ्या अडचणीत आम्ही सापडलोय अन् तुझ्या दरिद्री माहेरच्यांना त्याचं काय सोयरसुतक आहे का? आम्हीच फसलो ही सोयरीक करून. त्यापेक्षा दुसरी एखादी सून घरात आणली असती; तर ती वजनाएवढे सोनेनाणे घेऊन आली असती. तेवढ्यात सगळे कर्ज तरी फिटले असते."
          सगळ्या अडचणीच्या मुळाशी मालती आहे, यातून बाहेर पडण्यासाठी तिचा काहीच उपयोग नाही. असा समज करून घेऊन मग उपाशी ठेवणे... मारझोड करणे हे नित्याचेच होऊन मालतीची जागा फक्त घरातल्या एका मोलकरणीची राहिली होती. पण वर्ष उलटले आणि मालतीचा त्रास काहीअंशी संपला. संपला म्हणजे तेवढ्या पुरता तरी थांबला. कारण तसे होतेच. मालतीला दिवस गेले होते. यांना यांच्या बुडत्या साम्राज्यासाठी वारस हवा होता आणि तो येणार म्हणून सगळेच खूष होते. फक्त मालतीला आता वेगळीच धास्ती लागली होती... समजा मुलगी झाली तर...?
          माझ्या लहानपणी माईकडून मी जेवढ्या गोष्टी ऐकल्या; त्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट होती. या गोष्टीत तसे तर विशेष असे काहीच नाही. या सर्व घटना म्हणजे विश्वातील अफाट पसार्‍यात कशातच काही नाहीत. कितीतरी अशा घटना नित्यनेमाने घडत असतील. या घडल्यामुळे काही मोठा फरक पडलेला नाही. समजा या गोष्टी घडल्याच नसत्या; तरी काही फार मोठी उलथापालथ झाली नसती. अगणित असंख्य क्षणांपैकी हे काही सामान्य क्षण होते. पण या घटनेत पुढील अनेक गोष्टींची नांदी होती. दोन वेगवेगळ्या ध्रुवांच्या एकत्र येण्यामुळे... दोन भिन्न धर्मी प्रकृतीच्या एकत्र येण्यामुळे... लाखो पेशींमधील कुठल्यातरी एका पेशीतील गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या एका जीवात्म्याचे भवितव्य ठरवणार होत्या. त्याच्या या अमूर्त जगातून मूर्त जगातील प्रवेशाचा मार्ग सुकर करणार होत्या. निराकार स्वरुपातून सगुण साकार देहाला एक खूप सुंदर मानवी जीवन जगण्याची संधी मिळणार होती. इतर कोणाला त्याचे काय कौतुक असणार! एवढेच सांगतो... माझ्यासाठी त्याला महत्त्व असायलाच हवे होते; कारण तो जन्माला येणारा जीव म्हणजे 'मी' होतो.
           आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच. मी कोणताही फार मोठा ऐतिहासिक... सामाजिक... आध्यात्मिक... वगैरे वगैरे वारसा घेऊन आलो नव्हतो. या अथांग अफाट विश्वातील मी तर एक नगण्य जीव. माझ्या असण्याने किंवा नसण्याने काहीही फरक पडणार नाही. तसेही जिथपर्यंतची पाळेमुळे मला माहिती आहेत; त्याची सुरुवातच मुळात 'एका' प्रवासाने झालेली होती. जन्माला येताना आपल्या हातापायांवरती काही खुणाही आपण घेऊन येत असतो. ज्योतिष् हस्तरेषांमधले मला काही कळत नाही. परंतु उजव्या तळपायावर ना एक भोवरा आहे माझ्या. त्यामुळेही असेल कदाचित. पण मग एका जागेवर कधी स्थिर बसणे मला जमलेच नाही. कायम ओढ राहिली ती पुढच्या प्रवासाची...! रोज सूर्योदयासोबत एक नवीन प्रवास...! आयुष्याचा!
          चिरंतन नावीन्य म्हणजे जीवन. जीवनाच्या या आकर्षणाला अंत नाही... मला जीवनाचा लोभ आहे... मला जीवनाची ओढ आहे... त्याहून जास्त मला जीवनाचे वेड आहे... एक विलक्षण जिज्ञासा अाहे. जीवनाची विविध रूपे पाहण्याची तडफड आहे. म्हणूनच एका ठिकाणी फार वेळ थांबत नाही... जिथे रंगतो... तिथे थोडावेळ रेंगाळतो... कंटाळा अाला की, पुढचा रस्ता पकडतो...!
         कुठून अाला??? माहीत नाही... कुठे चालला??? माहीत नाही. तरीही मी 'कोणी' आहे, हा अहं गप्प बसू देत नाही.
         अगोदरच तुम्हांला काय हसायचे, ते हसून घ्या. "हे तुझे नेहमीचेच!" असेही म्हणून घ्या. हवं तर 'वेडा' वगैरे वगैरे म्हणून घ्या. पण तरीही हे मी तुम्हांला सांगतोय... अर्थात मी तुम्हांला सांगतोय हे निमित्त!!! तसा तर माणसाचा स्वतःचाच स्वतःशी संवाद चाललेला असतो. परंतु हे सर्व उघड सांगायची सोय कुठेय??? नाहीतर मग लोक हे असे 'वेडा' वगैरे म्हणतात. आणि गंमत म्हणजे हे वेड थोड्याफार प्रमाणात सगळ्यांमध्येच असते. हा! हा!! हा!!! आता नेमके कोणते वेगळे संचित सोबत घेऊन मी येणार होतो कोणास ठाऊक...!

(क्रमशः)


2 comments:

  1. माणसाचा स्वतःचाच स्वतःशी संवाद चाललेला असतो. परंतु हे सर्व उघड सांगायची सोय कुठेय??? नाहीतर मग लोक हे असे 'वेडा' वगैरे म्हणतात. आणि गंमत म्हणजे हे वेड थोड्याफार प्रमाणात सगळ्यांमध्येच असते. 

    pratyek bhagacha shewat asha kahi sundar shabdat zala ahe ki kahi chan vachalyacha anand milato.

    ReplyDelete