Tuesday, 8 March 2016

५...

भव्यतेने कायम मानवी मनावर भुरळ घातलेली दिसते. मग ती वस्तू असो वा वास्तू... मानवी असो वा प्राकृतिक. खरं म्हणजे मनातला अहंकार एकदा का गळून पडला की, अशा भव्यतेपुढे आपण किती क्षुद्र आहोत; याची प्रकर्षाने जाणीव होते.
          बाहेरून येणारा कोणीही माणूस गावात शिरण्यापूर्वी वेशीत थबकतोच थबकतो. हत्तीवर उभा राहूनही पुरुषभर शिल्लकच राहील, एवढ्या उंचीची चिरेबंदी वेस स्वागताला उभी असते. आज ही अवस्था आहे; तर कधीकाळी काय वैभवाचे दिवस पाहिले असतील या वेशीने! असा विचार त्याच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आज दरवाजे कुठे दिसत नसले तरी; कधीकाळी ते असल्याच्या खुणा आजही दिसतात. वेशीच्या भिंतीला बाहेरच्या बाजूने छोट्या चित्रलिपीत कोरलेले काही दगड आहेत. काय अर्थ असेल त्यांचा? काहीतरी असेलच की. मला तरी कायम गूढ अर्थ जाणवतो त्यामध्ये.टृचा वेशीत येताच आठवते... पोळ्याच्या दिवशी बैलांची मिरवणूक येथूनच सुरू व्हायची. वेशीतून जनावरे आत जाताना शेतकरी बैलांवरून नारळ ओवाळायचा आणि जोराने वेशीच्या दगडी भिंतीवर मारायचा. नारळाचे तुकडे इतरत्र उडायचे; रिमझिमत्या पावसात ते तुकडे पकडण्यासाठी आम्हा चिल्लरपार्टीची झुंबड उडायची. आताही वेशीतून आत जाताना एखादा नारळ जोराने या चिरेबंदी भिंतीवर आपटावा असे वाटते.
          माझ्या लहानपणी वेशीच्या आतल्या बाजूला आता जिथे नव्याने बांधलेली ग्रामपंचायतीची इमारत उभी आहे; तिथे चावडी होती. पूर्वी चावडीत अर्जुना येसकर बसलेला असायचा. कानावरच्या पांढऱ्या कल्ल्यात मिसळून गेलेल्या मुठभर मिशावरून कायम उजव्या हाताची पालथी मूठ फिरवायची सवय. बाभळीच्या गाठीगत शिसवी शरीराचा अर्जुना कानापर्यंत उंचीची घुंगरे लावलेली काठी घेऊन उभा राहिला म्हणजे बघणाराच्या छातीत धडकीच भरायची. पुराणातील दैत्याप्रमाणे आडदांड असणारा अर्जुना बघितला की, मला उगीचच चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील मावळे आठवायचे. सोनार गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टीतला संभाजी कावजी असाच असेल का? अफजुल्याचे मुंडके एका हातात धरून "खान संपला!" म्हणून ओरडत गडाकडे पळत सुटलेला संभाजी... घोड्याच्या पोटाखाली मान घालून धनगराने मेंढरू उचलावे तसे उचलून गनिमाच्या अंगावर धावत जाणारा संभाजी... असाच असणार. गोष्ट ऐकताना मला संभाजीच्या जागी अर्जुना दिसत राही. असा हा अर्जुना गावातून फिरून दवंडी देत असला की, ओरडताना त्याच्या घशातील घाटी वरखाली हलत राहायची. आम्ही आपले त्याकडेच गंमत बघावी, तसे पाहत राहायचो.
           अर्जुना कधीमधी दारात आला की, माईला म्हणजे आजीला "वैनी!" म्हणून हाक मारायचा. हातातली काठी खाली टाकून डोक्यावरचे मुंडासे काखेत दाबून धरत सप्पय बैठक मारायचा. खरं म्हणजे देश स्वतंत्र होऊन आमचे आमच्याच बापाने लिहिलेल्या अधिकारांचे राज्य येऊनही अर्जुना बदलला नाही. माणसाला माणसापासून तोडणार्‍या अमानुष रूढींचा विटाळ अजूनही संपलेला नव्हता. आजीने पाणी दिलेल्या तांब्याला त्याने कधीच तोंड लावले नाही. डाव्या हाताने तांब्या धरून उजव्या ओंजळीने पाणी पिणारा अर्जुना चहा मात्र फुरक्या मारत प्यायचा. त्याचा अगदी साधा हिशेब होता. चहा जेवढा गोड; तेवढा फक्कड. मग भले तो वेगळ्या ठेवलेल्या कानफुटक्या कपातून असले म्हणून काय झाले! चहाला गोडी साखरेमुळे येते, कपबशी फक्त पिण्यासाठी. चहा पिऊन झाल्यावर लहान पोरांसारखी खुशीत मिटकी मारायचा; तेंव्हा तो पुन्हा वय विसरून लहान झालेला असायचा. घरातल्या लहानथोर सर्वांनाच आदराने तो 'अहो जाहो!' करून बोलायचा. आम्ही चिल्लरपार्टी जवळ गेलो की, पोटाला चिमटा घेऊन वाहणाऱ्या झर्‍यासारखा खळखळून हसायचा. एवढे निर्व्याज हसू मला पुन्हा कधीच पाहायला मिळाले नाही. मी मात्र या अर्जुनाकडूनच हसायला शिकलो. पण तेवढे तर अजूनही जमत नाही. एक गोष्ट तो न चुकता करायचा. तांब्यातल्या उरलेल्या पाण्याने कपबशी विसळून पालथी घालून ठेवायचा. दुर्दैवाने या प्रथेतील हीनता कळण्याचे ते वय नसल्यामुळे ती समज यायला पुढे काही वर्षे जावी लागली.
            भल्या जंगी वेशीमध्ये आणि तेवढयाच आडदांड अर्जुनामध्ये कमालीची एकरूपता होती. असं वाटावं की, त्या परमेश्वराने या दोन गोष्टी एकमेकांसाठीच बनविल्या असाव्यात. आज अर्जुना नाही आणि ती चावडीही; परंतु आठवणी कशालाही बांधील नसतात.
          वेशीतून सरळ आत आले की, बाजाराच्या पटांगणात एक तेवढाच मोठा दगडी पार बांधलेला आहे. त्यावर तेवढाच मोठा पिंपळ. पिंपळाखाली बुंध्याशी एक छोटी नरसोबाची घुमटी आहे. यामुळेच या पाराला नाव पडले 'नरसोबाचा पार.' हा नरसोबाचा पार कधीच रिकामा नसतो. अगदी भर दुपारी गावात शुकशुकाट असतो; पण या पारावर कोणी ना कोणी सापडणारच. पोरंठोरं खेळत असतील... म्हातारी कोतारी झोपलेली असतील... रिकामे टोळभैरव चकाट्या पिटताना दिसतील... अगदी कोणीच नसले; तर एखादा तळीराम कोणाच्या तरी नावाने शिमगा करताना आढळून येईल... यात्रा उरसाच्यावेळी पंचकमेटी घोंगड्या अंथरून येथेच बसणार. नोकरीधंद्याच्या निमित्ताने बाहेर असणारा कोणी गाडीतून उतरून गावात पोहचला की, आपलेपणाने स्वागताची सलामी येथेच मिळे. "आरं वा! आलं का गाव!" असे कोणी ना कोणी हमखास विचारणार. त्यात औपचारिकता नव्हती, आपुलकीची भावना असायची.
            याच पाराजवळ गोट्यांचे डाव रंगायचे. किरकोळ डावांना येथे संधी नव्हती. अटीतटीच्या लढती व्हायच्या. चांगल्या सातआठ गली आणि पिंपळाच्या सावलीत तेवढीच रिंगणे ओढलेली असायची. गोट्यावरून भांडणंही होत. पण पुन्हा डाव सुरू. गावात एखाद्याचे लेकरू सापडत नसेल; तर आईबाप फारसी काळजी करत नसायचे. चुकला फकीर मशिदीतच सापडणार. तसा मग जाणारा येणाराकडे निरोप जाई. तोही पाराजवळ येऊन नेमकं कार्टं शोधून काढायचा. आणि पालकाच्या भूमिकेतून चार शिव्या देऊन पोराची सन्मानाने घराकडे पाठवणी व्हायची. कधीकधी मोठी माणसं या पोरांवर रागवायची. पण कधीतरी कौतुकानं प्रेक्षक बनून खेळ पाहणारेही तुम्हांला येथे हमखास सापडले असते. गावभर फिरूनही गारेगारवाल्याचा जेवढा धंदा व्हायचा नाही; तेवढा तर नुसता पाराजवळच होई.
          चावडीच्या मागच्या अंगाला तालिम होती. पानटपरीवर गुटखा मावा खाऊन रूबाबात थुंकत बसणारी... आणि रात्री 'चियर्स!' करणारी परमीट बार-ढाबा संस्कृती गावात येईपर्यंत तालिम गजबजलेली होती. पाचपन्नास पोरं सकाळ संध्याकाळ तालमीतल्या तांबड्या मातीत घुमत होती. या पोरांना भल्या पहाटे छडीचे फटके मारून उठवायचे आणि हौदातील लाल माती घामाने ओली होईपर्यंत सकाळ संध्याकाळ त्यांच्याकडून मेहनत करून घ्यायचे काम वस्ताद म्हणून माझे आजोबा करत होते. त्यांना मात्र पोरं दबून असायची ती अर्थातच आदरापोटी... प्रेमापोटी...! पण कधीकधी तांबड्या अंगाने चावडीपुढे यायची, तेंव्हा ही पोरं आहेत कि भूतं असा प्रश्न पडायचा. या पोरांचा एकेकाळी काय दबदबा होता. सहजासहजी कोणी या पोरांच्या नादाला लागत नव्हते. कोणी नाद केलाच; तर बाद झालाच म्हणून समजा. तालुक्यात काय पार जिल्ह्यातले फड गाजवले. फड गप्पाचे असो वा कुस्त्याचे... रंगले नाहीत, असे झाले नाही. इब्लिसपणाही तेवढाच केला. यांचे एकेक किस्से असे इरसाल होते की, ऐकायला रात्र पुरणार नाही.
          वेशीतून आत पाराजवळ आल्यानंतर समोर गेलेला रस्ता म्हणजे बाजारपेठ. रस्त्याच्या दुतर्फा दुकांनाची गर्दी झालेली होती. किरणा मालापासून ते औषधे, कपडे, सोने सर्वकाही. अगरबत्तीपासून हत्तीपर्यंत उलाढाल चाले. रात्री नऊदहा वाजेपर्यंत पेठेत गजबज असायची. पुढे दुकाने आणि मागे चिकटूनच घर असलेल्या लिंगायत समाजाचे याठिकाणी चांगलेच बस्तान बसलेले होते. एखाद्या दुपारी जेवून खाऊन आळसावलेला वाणी बसलेला दिसला की, तालमीतली चारपाचजण उगीचच निमित्त काढून जाऊन बसायची. गप्पा मारण्याच्या कलेत चांगलेच मुरलेले असल्यामुळे विषयातून विषय निघत जायचे. हळूहळू एकेक गडी वाढत जायचा. बोलता बोलता यातला एक... त्यातला एक घास करत करत पाटीभर शेंगदाणे किलोभर गूळ आणि असंच काहीबाही संपलेले असे. पोरं गेल्यावर वाण्याला पत्ताही नसायचा, खोबरे किती कमी झाले आणि अजून काय पळवलेय. रात्री अपरात्री एखाद्याची बोरीची... द्राक्षांची... मोसंबीची बाग उतरून आणायची. तालमीत बसून संपवायचे आणि कचरा सगळा असाच कोणा तिसऱ्याच दारात नेऊन टाकायचा. अशीच ओढ्याला एकाने हातभट्टीची दारू काढण्याचा उद्योग सुरू केला होता. पोरांनी रात्रीच जाऊन सगळे कॅन भरून आणले आणि सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या टाकीत नेऊन टाकले. सकाळी नळाला पाणी सुटले खरे. पण पाण्याला दारूचा वास येत होता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली... 'नळाला पाणीपुरवठ्याऐवजी दारूपुरवठा!' वाचणारे हसले असतील; पण पोलीस खाते खडबडून जागे झाले.
           गावात एक पीराच्या नावाने सोडलेला वळू होता. तोही या तालमीतल्या पोरांसारखाच मस्तावलेला होता. त्याचा उपद्रव वाढतच चालला होता. कुणालाही जवळ येऊ देत नव्हता. जाणारा येणारालाही भिती वाटू लागली. एकदा त्याने सरपंचाच्याच बैलाला भोकसले. मग मात्र पोरांनी त्याला काढण्या लावूनच बांधून घातला. बरं देवाचा असल्याने मारताही येईना आणि विकताही येईना. दोन दिवस पाराजवळच बांधलेला होता. अन्न नाही आणि पाणी नाही. सरपंचाने तर कसायालाच बोलवायचे बाकी ठेवले होते. पोरांनाच मग त्याची दया आली. रात्रीत पोरांनी त्याला दूर फॉरेस्टात नेऊन सोडले. बरं एवढ्यावर थांबतील ती पोरं कसली! येताना तिथे कुंभाराचे गाढव आणून बांधले. सकाळी गावभर चर्चेला ऊत आला होता... 'कटाळ्याचं गाढाव झालं!'
           पोरांच्या असल्या उद्योगामुळे गावाला होणाऱ्या त्रासापेक्षा करमणूकच जास्त व्हायची. पोरं तशी दिलदार होती. एखाद्या सरळमार्गी माणसाला त्यांच्याकडून कधीच त्रास झाला नाही. पोरांच्या एकीमुळे तसा गावाला आधारही होता. तरी काहीजण पोरांवर नाराज होते. यांपैकी एक होता महालिंग सोनार. पोरं तालमीपुढे उघड्या अंगाने फिरतात याचा त्याला भलताच राग येई. अर्थात कारणही तसेच होते. या म्हाताऱ्याच्या घरात त्याची तरुण विधवा सून होती. दोष तर त्या बिचारीचाही नव्हता... आणि पोरांनीही कधी काही आगळीक केलेली नव्हती. तरीही काही निमित्त सापडले की, म्हाताऱ्या महालिंगाच्या तोंडाचा पट्टा सुरू होई. पोरांना तर शिव्या द्यायचाच वरून सुनेचाही उद्धार करून मोकळा होई. महालिंगाच्या शिव्याला पोरं वैतागली होती. त्याची खोड मोडण्यासाठी काय करावे, याचा विचार सुरूच होता. थोड्याच दिवसांत पोरांना संधी सापडली. थंडी असूनही म्हातारा दारात बाजले टाकून झोपला होता. कोणीतरी जाऊन हळूच अंगावर घोंगडी टाकून आला. ऊब लागेल तशी घरासमोर झोपलेल्या महालिंगाला गाढ झोप लागलेली पाहून पोरांनी एवढ्या अलगद त्याला उचलला की, त्यालाच काय बाजल्यालाही पत्ता लागला नाही. सकाळी म्हातारा जागा झाला ते स्मशानभूमीतच. बाजल्यासह पोरांनी त्याला पोहचवले होते. उशाशी एक मडके... कपाळावर अबीरबुक्यासह पोरांनी तयारी केली होती. पुढे काही दिवस गावाला हा टिंगलीचा विषय झाला होता. अशा एकेक गोष्टी मीठ मसाल्यासह ऐकवल्या जात. त्यातल्याच काही वार्‍यावर उडणार्‍या वावड्या चहूमुलखात पसरत गेल्या आणि गावाच्या वाट्याला प्रसिद्धीसोबत काही कुप्रसिद्धीही येऊ लागली. पण जेंव्हा फासेपारध्यांनी आसपासच्या गावाला चोऱ्यामाऱ्या करून घाईला आणले होते; तेंव्हा आमच्या गावातली माणसं मात्र या पोरांच्या जिवावर निर्धास्त झोपत होती. असो.
          बाजारपेठेतून पुढे गेले की, बाजारपेठेकडेच पाठ फिरवून बसलेल्या मारुतीचे मंदिर आहे. गाव जळाला; तरी हनुमान बाहेर, अशी एक म्हण आहे. पण आमचे हे बजरंगबली गावाच्या ऐन मध्यावर बसलेले आहेत. गावाची रचना पाहिली की, असे वाटते; ज्याने कुणी गाव वसवला असेल; त्याने या मंदिरावरच कंपासचे टोक ठेवून गावाचे वर्तुळ काढले असावे. मावळतीला तोंड असलेल्या या देवळापुढून एक सरळ रस्ता अगदी कडेपर्यंत गेला आहे. ही एक त्रिज्या आणि त्याला काटकोनात वेशीपासून अखंड गेलेला बाजारपेठेतील रस्ता म्हणजे व्यासच. पण तरीही केंद्रबिंदूवर बसलेल्या मारुतीरायानी पेठेकडे पाठ का बरे फिरवली असेल...? मारुतीचे हे मंदिर म्हणजे गावातील लोकांचे बसण्या उठण्याचे आणखी एक आवडीचे ठिकाण. रात्री जेवण उरकले की, तरुण मंडळाचे तरुण कार्यकर्ते गोळा होत. मध्यरात्रीपर्यंत सूरफाट्या म्हणजे आट्यापाट्याचा खेळ रंगे... लेझिम, झांजपथकाचे डाव चालत. मी मराठी शाळेत असतानाची गोष्ट आहे. दोन वर्षे पावसाने जरा ओढ दिली होती. गावकरी एकत्र आले. मारुतीचा आणि पिंपळेश्वराचा गाभारा पाण्याने भरायचा आणि सलग अकरा दिवस रात्री मारुतीवर अखंड धार धरायची ठरले. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचा खूप मोठा अपव्यय होणार होता; परंतु श्रद्धेपुढे बुद्धीचे काही चालत नाही, हेच खरे. गावाजवळ पुरेसे पाणी असणारी विहीर बामणाच्या मळ्यात होती. मानवी साखळी करून अकरा दिवस हा उद्योग चालला होता. आलटून पालटून मधली माणसं बदलत होती. आमच्यासारखी चिल्लरपार्टी देवघरातील तांब्या घेऊन हेलपाटे मारून मज्जाच मज्जा करत होती. गारठून गेलेल्या मारुतीरायांनी पाऊस पाडला शेवटी. हे एक बरे झाले. नाहीतर तेलही गेले आणि तूपही, अशातली गत झाली असती.
          गावाच्या पश्चिमेस नद्यांच्या संगमावर पिंपळेश्वर वसलेला आहे. जुने हेमाडपंती बांधणीचे मंदिर. त्याला जोडूनच आधुनिकीकरण झाले आहे, पण मुळचे सौंदर्य काही औरच आहे. आत गाभाऱ्यात अगदी गारगार अंधार जाणवायचा. डोक्यावर सदैव ठिबकणारी तांब्याची हंडी. महादेवाच्या पिंडीमागे असणारी नागाची पंचफड्याची दगडी प्रतिमा नंदादीपाच्या उजेडात अशी गूढ दिसायची की, वाटायचे क्षणात जिवंत होऊन डोलेल की काय! या पिंपळेश्वरावरूनच तर गावाचे नाव पडले पिंपळेश्वर. अशा एक ना एक आठवणी मनात दाटून येत होत्या. कॅमेर्‍याची फ्रेम लागली होती. कथा... पटकथा आधीच घडून गेलेली असल्यामुळे त्याचाही प्रश्न उरलेला नव्हता. जुन्या आठवणींनी हृदयाची वाढलेली धडधड कुठल्याही पार्श्वसंगितापेक्षा कुठेही तसूभरही कमी नव्हती. पात्रे ठरलेली होती. लोकेशन्स रेडी होती. आता फक्त फ्लॅशबॅकमध्ये कहाणी उलगडत जाणार होती. शेवट तर त्या विधात्याने केंव्हाचा ठरवून ठेवला आहे. फक्त तो कसा व्हावा, याची इच्छा बाळगण्याचा अधिकार माझा होता.
शेवट...
हं...!
या कहाणीचा शेवट तर माझ्यासोबतच होणार आहे. काही काळाचा मुक्काम संपवून आता पुढच्या प्रवासाला निघावे लागणार आहे...!

(क्रमशः)

5 comments:

  1. gavache varnan apratim ahe sir kharach ya sarv goshti mala kadhi anubhavayla nahi bhetalya kadhi gavakade rahiloch nahi pn ata ase vatate punha ekda bhutkalat jaun kahi goshti badalavyat shahra aivaji gavat rahun mothe vhave tase satara he kahi mothe shahr nahi pn shevati gav te gavach........................

    ReplyDelete
  2. मी माझ्या कल्पनेतील गावाला शब्दांतून उभा करू शकलो, त्यात मी थोडाबहुत यशस्वी ठरलो, असेच तुझ्या कमेंटमधून वाटतोय. छान...!!!

    ReplyDelete
  3. Waiting For Next.............

    ReplyDelete
  4. Junya athawanit harwun gelo mi. Vachatach rahave ase watate.

    ReplyDelete