Tuesday, 12 April 2016

१०...

          कोणी आजोबा वगैरे आपल्या नातवाच्या नावाने काही ठरावीक रक्कम 'फिक्स डिपॉझिट' करून ठेवतात. अनेक वर्षांनी सगळेच विसरून गेलेले असतात. नेमके मुद्दल किती? त्याची मुदत किती? व्याजदर काय? कशाचा कशाला काही म्हणता काही पत्ता नसतो. आयुष्याचे तरी यापेक्षा काय वेगळे असते हो! तो वर आभाळात बसलेला 'म्हातारा' तुमच्या नावाने काही 'फिक्स डिपॉझिट' करून तुम्हांला पाठवून देतो. तुमच्या जन्मापासून हे खाते सुरू होते. तेवढेच काय ते आपले ज्ञान... बाकी अज्ञान. बरं याचे व्याजदर तरी कुठे सरळव्याजाचे असतात! शेअर मार्केटप्रमाणे कायम चढउतार चाललेले असतात. या डिपॉझिटचा हिशोब आपल्याला कधीच लागत नाही. रक्कम खर्ची पडत राहते आणि शिलकीचा मेळ कधीही जुळत नाही.
           दिवाळी झाल्यावर माधवमामा पुण्याला परत गेला होता. कुठल्यातरी मोठमोठी बांधकामे करणाऱ्या कंपनीत काही दिवस तो नोकरी करणार होता. मुकूंदमामालाही त्याच्या कामात बर्‍यापैकी पैसा मिळू लागला होता. तशी माझीही प्रगती चांगलीच झाली होती. कोणाच्याही मदतीशिवाय उडी मारून पारावर चढता येऊ लागले होते. शाळेच्या कोपऱ्यातल्या उंबराच्या झाडावर मुंगळ्यांना चुकवून चढायला शिकलो होतो. उंबरे नसली तरी मुंगळे भरपूर होते. एकदा तर अंधार्‍या जिन्यातून जाण्याचे भलतेच धाडस करून शुभाताईबरोबर वरच्या मजल्यावर असलेल्या वर्गातून चक्कर मारून आलो होतो. लेखन आणि वाचनामध्येही चांगलीच प्रगती झालेली होती. संक्रांतीच्या वेळी मोठ्या मुलांच्या जोडीने पतंग उडवण्यातील प्राथमिक धडे गिरवले होते. विटीदांडू खेळताना जमिनीवर ठेवलेली विटी दांडूने वर उडवून फटके मारायला जमू लागले होते. फक्त एकाच गोष्टीचे वैषम्य होते. मनातून जुन्याच भितीने पुन्हा डोके वर काढले होते. अर्थात ही भीती वाढण्यामागे कारणही तसेच घडले होते.
          दिवाळीच्या सुट्टीतलीच घटना. मी शुभाताईसोबत अंगणात खेळत होतो. नेमके घरी दुसरे कोणीच नव्हते. फक्त एकटी आबई काय ती घरात काहीसे काम करत बसली होती. तेवढ्यात कोणीतरी एकजण दारात सायकल लावून आमच्याकडे आला. मळकट कपडे, वाढलेली दाढी, तांबारलेले डोळे आणि दारू पिणार्‍या माणसाचा येणारा पिकल्या बोरासारखा आंबूस वास. चालतानाही तोल जात होता. मात्र हातातील प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ दिसत होता. माई आणि शाळेतील मुलेही सांगायची, धरणारवाले म्हणजे मुलं पळवून नेणारी माणसं लहान पोरांना असंच काहीतरी खायला देतात आणि पळवून नेतात. त्यात गुंगीचे औषध असते. एकंदरीत त्या माणसाचा अवतारच असा होता की, त्या भितीने मी जागेवरच अर्धा गार झालो होतो. त्यात धरणारवाल्याच्या कल्पनेने उरले सुरले अवसानही गळून गेले. ओरडण्यासाठी तोंडातून आवाजही फुटेना. आबईला हाक मारण्यासाठी उघडलेले तोंड उघडेच राहिले. माझी ती अवस्था पाहून आणि त्या माणसाला पाहून शुभाताई मात्र ओरडत घराकडे पळाली. मी एकटा पडलो होतो. आबई बाहेर येईपर्यंत काही क्षणच लागले असतील. परंतु एकेक सेकंद माझ्यासाठी युगायुगांचा झाला होता. आबईला पाहताच ती व्यक्ती मागे सरकली. तेवढी संधी साधून मी तिच्या कमरेला मिठी मारली. तिच्या पदरात तोंड लपवून भितीने थरथरत मी तिला आणखीन बिलगलो. आबईच्या येण्याने मला धड श्वास घेता आला आणि तोंडातून आवाज फुटला.
          माझी ती अवस्था पाहून आणि समोर त्या माणसाला पाहून आबई चवताळली. संकटाच्यावेळी कुठल्याही मातृप्राण्यामध्ये आढळून येणारी ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती.
"मागं सरका पहिलं...!"
"मालते, अगं! मी काय नाय केलं शेखरला. त्याला फक्त ही आणलेली मिठाई देत होतो."
           खरं म्हणजे एकूणच या प्रसंगाने तो माणूसही गोंधळून गेला होता.
"काय पोराचा जीव घेता का? घाबरून काय अवस्था झालीय बघा तुमच्या डोळ्यांनीच."
"अगं! पण...?"
या गोंधळाने शेजारची चारदोन माणसं गोळा झाली होती. तेवढ्यानेही आबईला आधार मिळाला. आबई फडाफडा बोलत राहिली. शेवटी तो माणूस गुपचूप सायकल घेऊन निघून गेला.
"तुला घाबरायला काय झालं एवढं? बाप होता तुझा. इथून पुढं एक लक्षात ठेव. तो एकवेळ माझा जीव घेईल. पण तुला काहीच करणार नाही. त्यामुळं असं घाबरायचं नाही."
           बस्स! बापाचे कळत्या वयातील ते पहिले दर्शन तरीही मला घाबरून टाकण्यासाठी पुरेसे होते. इतके दिवस ज्या 'बाप' शब्दाची भीती वाटायची; ती भीती आणि तो बाप पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवला होता. त्यामुळे पुढील काही दिवस मी घरापासून दूर जायचे कटाक्षाने टाळले. अर्थात थोडाबहुत बाहेरच्या जगात गेलो की, माई पाठोपाठ आलेली असायचीच. एवढे असूनही मोकळ्या हवेत म्हणावा असा श्वास काही घेता येत नव्हता. मनातून काही केल्या भीती जात नव्हती. अजूनही कुठूनतरी आपला 'बाप' येईल की काय याची धाकधूक असायचीच.
          संक्रांत झाली. शाळेत डी.एड.चे पाक्षिक शिबीर आले होते. चांगले पाच-पंचवीस सर आणि मॅडम पंधरा दिवस शाळेत तळ ठोकून होते. या दिवसांत शाळेची वेळ बदलून अकरा ते पाच अशी केलेली होती. आमचे नेहमीचे गुरुजी निवांत अॉफिसमध्ये बसून असायचे. ते कधीच वर्गात शिकवायला आले नाहीत. पण हे नवीन सर आणि मॅडम लई भारी शिकवायचे. एकाचवेळी दोघे, तिघे; तर कधी चौघेही वर्गात यायचे. खेळाचे तास मारुतीच्या मंदिरापुढे पटांगणात व्हायचे. कधीच न खेळलेले अनेक नवीन खेळ यावेळी त्यांनी आम्हांला शिकवले. काही खेळ माहीत होते; पण चुन्याची फक्की टाकून व्यवस्थित आखलेले मैदान आणि विशेषतः खेळाला नियम असतात, हे आम्हांला नवीन होते. खोखो, कबड्डी, हॉलीबॉल, लांब उडी, उंच उडी, रस्सीखेच, इत्यादी इत्यादी. एवढे मोठे बॉल पहिल्यांदाच हातात आले होते. अनेक गाणी, डान्स अशा बर्‍याच भारी भारी कार्यक्रमाची तयारीही चाललेली होती. आमच्या नेहमीच्या गुरुजींसारखी ही मंडळी कडक नव्हती. आम्हांला मारणे तर दूरच. साधं रागवायची पण नाहीत. उलट आमच्यासोबत हसून बोलायचे, खेळायचे, गाणी म्हणायचे. भारी गंमत करायचे. खूप मजा यायची. वर्षभर अशीच शाळा असावी. हे शिबीर कधी संपूच नये, असे वाटत होते. यांना पाहिल्यावर मला नेहमी माधवमामाची आठवण यायची. या शिबिरात आमच्या गावातलीच एकदोघे मोठी पोरंपोरीसुद्धा होती. त्यात मुसलमानाची शब्बूआपा होती. तिचे नाव तसे शबनम होते. पण सगळे तिला शब्बू म्हणायचे. ही शब्बूआपा तर माझे फार लाड करायची. बाकीचे काहीकाही सर आणि मॅडम आपापसात काहीतरी बोलत बसायचे. मोठ्या वर्गातील पोरं त्यांना हळूच हसायची. एकदा मी स्वतः ऐकले. "कायतरी जांगडगुत्ता हाय लेका!" म्हणून खूसफूस करत होती. पण मला त्यांच्या बोलण्यातील काहीच कळले नव्हते. तरीही मला या पोरांचाच राग आला. शब्बूआपा त्यात नसायची, हे एक बरं होतं. शब्बूअप्पा आणि तिच्या त्या मैत्रिणी खूप चांगल्या होत्या.
          उन्हाळ्यात मी आणि माधवमामा खूप भटकायचो. शिकारीवर जायचो. मग पुढे तळ्याच्या रस्त्याने आमच्या शेतातही जायचो. त्या बाजूला मुसलमानांची शेती होती. तिथेच शब्बूआपाचे पण शेत होते. आम्ही एकदोनवेळा त्यांच्या शेतातून गेलो होतो. शब्बूआपा तेंव्हा शेतातच होती. आमच्याशी बोलली पण होती. ईदच्या वेळी मोठ्या मामांबरोबर मी त्यांच्या घरी शिरकुंबा आणि गुलगुलं खायला पण गेलो होतो. भारीच होते. पोट फुटेपर्यंत खाल्ले होते. अजून सांगायचे तर... माधवमामाच्या सायकलवरून चक्कर मारायला जायचो; तेंव्हा गंमतच झाली. शब्बूआपा पाणी भरत होती. आणि माधवमामाकडून तिला सायकलची धडक लागली. म्हणजे मोठी नाही काही. हळूच धक्का लागला होता. तिची कमरेवरची घागरच पडली आणि पाणी सांडले. मला तर वाटले होते, आता ती भांडणार आम्हांला. पण शब्बूआपा चांगली होती. ती भांडली नाहीच. उलट हसून बोलली होती. मग माधवमामाने तिला विहिरीतून घागर भरून दिली. पण माधवमामाने सांगितल्याप्रमाणे मी या गोष्टी कधीच कोणालाही सांगितल्या नाहीत. माईला आणि शुभाताईला पण नाहीत. फक्त वेणूला एकदाच सांगितल्या होत्या.
            एकदा मधल्या सुट्टीत शब्बूआपा आणि तिच्या मैत्रिणी एका वर्गात बसल्या होत्या. गप्पा मारत काहीतरी खायचे चालले होते. शब्बूआपामुळे मी त्या सर्वांचाच लाडका झालो होतो. मी खिडकीशी दिसताच त्यांनी मला आत बोलावले. एका छोट्या डब्यातून एका मॅडमनी गुलाबजामून आणले होते. मलाही 'खा' म्हटल्या. खरंतर जामून मला खूप आवडायचे. पण कोणी 'घे' म्हणाले म्हणून लगेचच हावरटपणा करायचा नाही, अशी घरातूनच शिकवण असल्यामुळे मी 'नको' म्हणून सांगितले.
शेवटी शब्बूआपाच म्हणाली, "आम्ही खाल्लेत सर्वांनी. तुलाच ठेवलेत. खा."
मग मी घेतले. सगळ्या मॅडमनी मलाही त्यांच्या गप्पात घेतले. असेच काहीतरी बोलताना एका मॅडमनी घरी कोण कोण असते, म्हणून विचारले. मी सांगितले.
"मग घरी बोलावणार आहेस कि नाही आम्हांला चहाला?" असे विचारल्यावर तर मला फार आनंद झाला. मी सर्वांनाच घरी बोलावले.
"आज नको. आज घरी विचारून ठेव. मग येतो आम्ही." चष्मेवाल्या मॅडमनी सांगितले.
          शाळा सुटल्यावर घरी जाताना मी शुभाताईला सर्व सांगितले. म्हणजे मी गुलाबजामून खाल्ल्याचे... मॅडमसोबत गप्पा मारल्याचे... शेवटी शुभाताईलाच म्हणालो मग, 'आपण मॅडमला चहाला घरी बोलावू' म्हणून. संध्याकाळी शुभाताईने घरची परवानगी मिळवली. दुसऱ्या दिवशी या सगळ्याजणी शब्बूआपाच्या घरी आल्यावर मी त्यांना आमच्याही घरी घेऊन गेलो. सगळ्या मॅडमनी माझे फारच कौतुक केले. शुभाताईचाही केले. पण माझे जरा जास्तच. त्यामुळे मी हवेतच होतो. आमची बैठकीची खोली पाहून तर त्या खूप खूश झाल्या.
मीही मग त्यांना रूबाबात सांगितले, "ही खोली माझी आणि माधवमामाची आहे!"
पूर्ण शिबिर संपेपर्यंत मी मग सारखे त्यांच्यासोबत राहू लागलो. त्या चष्मेवाल्या मॅडम तर नेहमी माझे गालगुच्चे घ्यायच्या, नाक ओढायच्या, केस विस्कटायच्या. मलाही लई भारी वाटायचे. 
          शिबिराच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. आम्ही मुलेच काय पण सगळे सर आणि मॅडम पण आज चांगले तयार होऊन आले होते. काहीतरी विशेष होते; परंतु शेवटपर्यंत मला एक गोष्ट समजली नव्हती. या शिबिरामध्ये शुभाताईने एका डान्समध्ये भाग घेतला होता. शब्बूआपाने तिला भारीच नटवले होते. आमचेही एक नाटक बसवले होते. आमच्या बालभारतीच्या पुस्तकात शेवटी 'भटक्या' नावाचे एक नाटुकले होते. भटक्या, अवडंबरशास्त्री व राजा अशी पात्रे होती त्यात. पात्र वाटप करताना अस्मादिकांची इच्छा राजा होण्याची होती. भारीच की! तो चमचमणारा मुकूट... ते लाकडी खूर्चीला कागद चिकटवून केलेले सिंहासन... ती कमरेची तलवार... काय रूबाब! वा! वा! वा! पण छे! सरांनी आमच्या स्वप्नावर पाणी टाकले. असे कुठे? सर्व स्वप्नेच पाण्यात बुडवून टाकली. मला पात्र मिळाले ते भटक्याचे. चित्रविचित्र पोशाख... काठीला अडकवलेले गाठोडे घेऊन वेड्यासारखे फिरणारा भटक्या! छे! आणि काय ते त्याचे संवाद... एखादा अवलिया फकीर बरा. पहिल्या प्रवेशापासून ते शेवटापर्यंत त्याचे बोलणे ऐकूनच लोक हसायचे. राजा कसा मध्ये मध्ये यायचा. काय त्याचा डौल होता. त्याचा जयजयकार करायचे लोक. हे सगळे भटक्याला कसे मिळणार? झाले नाटक संपले. शिबीरही संपले.
          आज मला जाणवतेय. तेच माझे प्राक्तन होते. आज खरोखरच मी भटक्या आहे... राजा नाही. पण आज मात्र या कुठल्याही गोष्टीचा विषाद माझ्या मनात नाही. उलट माझ्या आयुष्यातली खरी भूमिका तीच राहिली आहे. तेंव्हा माझ्यामध्ये शिरलेला भटक्या आजही तसाच आहे. त्यावेळी खर्च झालेल्या क्षणांचा हिशोब आज लागतोय एवढंच. हा प्रवास आता लवकरच संपेल तो माझ्या मृत्यूने. मृत्यूच्या नावाने का कोण जाणे उगीचच भीती वाटते माणसाला. पण त्यात भिण्यासारखे काय आहे?
मृत्यू तर एक अटळ सत्य आहे. तो कधी ना कधी येणारच.
फक्त कधी?
ते सांगणेच अवघड असते.
मृत्यू म्हणजे अंत नव्हे...
तो तर आरंभ...
पुन्हा नव्या प्रवासाचा...!
मरणाची भीती नाही वाटत मला. फक्त या आयुष्याचा लोभ जडला होता. पण या प्रवासातील अजून काही हिशोब अपुरे असावेत. ते पूर्ण करायलाच हवेत. त्याशिवाय जाता येणार नाही. पुढच्या प्रवासात ही 'सगळी' असतील का? का मागील प्रवासातील काही देणी आहेत? ज्यांची परतफेड या प्रवासात करतो आहे... कदाचित पुढील प्रवासातही करावी लागेल. तरीही ती संपेल कि नाही, हे तो आभाळतला 'म्हातारा'च जाणे...!
          कार्यक्रम संपल्यावर सर्वांनीच खूप खूप फोटो काढले. शब्बूआपाने माझ्या आणि शुभाताईसोबत एक फोटो काढला. तेंव्हा अचानक माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली. शुभाताईच्या हातात बांगड्या होत्या; तशाच आज शब्बूआपाच्या हातात घातलेल्या बांगड्यासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि तिने मेंहदीपण लावलीय. मला आठवले. अजून एक आमची गमाडीजंमत होती ती. दिवाळी झाल्यावर आमच्या गावचा उरुस असतो. मी, शुभाताई आणि माधवमामा... उरूसाच्यावेळी खूप धमाल केली होती. उरूसात फिरताना आम्ही पाळण्यात बसण्यासाठी हट्ट करत होतो. माधवमामा मात्र तयार होत नव्हता. तो सारखं कोणालातरी शोधत होता. बहुतेक त्याचे मित्र येणार असावेत. आम्ही मात्र मनातून त्याचे मित्र लवकर येऊ नयेत, यासाठी प्रार्थना करत होतो. कारण मित्र आले की, माधवमामा आम्हांला घरी पोहचवणार आणि तो मित्रांसोबत निघून जाणार, हे नक्की होते.
तेवढ्यात माधवमामा शुभाताईला म्हणाला, "चल नकटे, आपण तुला बांगड्या घेऊ."
बांगड्या म्हटल्यावर शुभाताई खूश झाली. आम्ही बांगड्या घेताना नेमकी तिथे शब्बूआपा होती. मग तिने आणि शुभाताईनेच बांगड्या पसंत केल्या. मला आणि मामाला त्यातले काय कळणार?
निघताना मामा मला म्हणालाही, "गब्बरसिंग, पाळण्यात बसायचे ना बेट्या तुला? चला मग!"
मग मामा आम्हांला पाळण्यात बसायला घेऊन गेला. जमाडीगंमत म्हणजे शब्बूआपापण आली. ती एवढी मोठी असून तिला पाळण्यात बसायची भीती वाटत होती. म्हणून तिने तिच्याबरोबर आलेल्या तिच्या चाचाच्या मुलालाच फक्त आमच्याबरोबर पाळण्यात बसवले.
"नही बाबा! मैं नही बैठनेवाली।"
"घाबरतेस काय! मी आहे ना!" माधवमामा.
मग घाबरत घाबरत कशी तरी शब्बूआपा बसली पाळण्यात. पण हे पाळणे भलतेच मोठे होते. वरून खाली येताना पोटात कसंसच व्हायचं. आम्ही कोणीच घाबरलो नसलो तरी शब्बूआपा मात्र डोळे मिटून माधवमामाला घट्ट पकडून बसली होती. आम्ही तिला खूप हसलो. माधवमामाने घरी येताना लगेच बजावले. "पाळण्यात बसलेलं घरी सांगायचं नाही. नाहीतर घरचे चिडतील. परत उरुसात पाठवणार नाहीत."
छे! आम्ही कशाला सांगतोय कोणाला! माधवमामाची आणि आमची गमाडीजंमत आहे ती...
          शिबिर संपल्यावर उगीचच काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहिले. जत्रा उठून गेल्यावर मागे जी शिल्लक राहते; तशीच काहीशी अवस्था आता शाळेत जाणवत होती. एक पोकळी जाणवत राहिली. आता शाळेत जायला नकोच वाटत होते. अशाच रिकाम्या मानसिकतेत असताना मी शाळेच्या कोपऱ्यातल्या उंबराच्या झाडावर चढून बसलो. मुंगळ्यांना माझे तिथे बसणे रुचले नसावे. त्या गडबडीत मी घसरलो. पुढे महिनाभर हात गळ्यात अडकवून फिरत राहिलो. बरेच दिवस शाळेला दांडी मारता आली. हे एका अर्थाने बरे झाले. नाहीतरी शिरीषला घेऊन सुनितामामी घरी आल्या होत्या. त्याच्यासोबत खेळण्यामध्ये दिवस कसे पंख लावून उडून चालले होते. पण काही दिवसांतच कंटाळा आला. शुभाताई, वेणू सगळेच शाळेत जायचे. एकटा घरी किती दिवस काढणार. मग एका हाताने शाळा सुरू राहिली. लिहिणे शक्य नव्हतेच. फक्त वाचनच. पडल्यापासून मी उपद्वापी असण्यावर शिक्कामोर्तब झालेले. त्यामुळे माई माझी जास्तच काळजी घेऊ लागली होती. मी मात्र माधवमामाची वाट पाहणार होतो. सुट्टीला तो आला की, त्याला बर्‍याच गमतीजमती सांगायच्या होत्या. फक्त त्यालाच...! शब्बूआपाने तसे सांगूनच ठेवले होते.

(क्रमशः)

5 comments: