Monday, 8 February 2016

२...


          रात्री चांदणं असं टिपूर फुलायला लागायचं. शेतातून परतलेली गुरंवासरं केंव्हाचीच आपल्या दावणीला गेलेली असायची. गोठ्यातून धारा काढल्याचा आवाज सुरू व्हायचा. एका लयीत चरवीमधील दुधाचा फेस सूर धरायचा. घराघरांतून चुली पेटलेल्या असत. लालबुंद निखार्‍यावर खरपूस भाजलेल्या भाकरीचा खमंग वास आणि तव्यावर दिलेल्या फोडणीचा चर्रचरित आवाज अंगणात पोहचला की, पोटातील भूक चुलीतल्या जाळासारखी जागी व्हायची. अंगणातच 'मूनलाईट' डिनर उरकायचे. आणि मग दिवसभरातला शेवटचा कार्यक्रम राहिलेला असे. आजीने अंगणात गोधडी पसरली की, आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपायचे. आजी बोलता बोलता दिवसभरात काय काय झाले याची बित्तमबात सगळी चौकशी करायची. बाल वयाला शोभेल एवढा आगाऊ होतो मी, नाही असे नाही. पण आजीला माझी भलतीच काळजी लागलेली असायची. दिवसातील तिचा बराचसा वेळ माझ्यावर लक्ष ठेवण्यातच जायचा. तरीही सगळा अहवाल तिच्या मनासारखा पोहचला की, मग गोष्ट. गोष्टी तरी कसल्या... रोज रोज कुठून आणायच्या नवीन नवीन गोष्टी? आजीही मग अशाच कुठल्यातरी गोष्टी सांगे. तिच्या जुन्या आठवणी सांगायची. आयुष्याच्या मावळतीला भविष्य फारसे उरलेले नसते. त्यामुळे मनही मग भूतकाळात रमू लागते. तिच्या गोष्टीसोबत चांदणं गडद होत जाई... आजीचा हात केसातून फिरत राही... अगदी मोरपिसारखी झोप अलगद कधी आली, तेही कळायचे नाही.
         डोळे उघडावेसे वाटत नव्हते. तरीही झोप झाल्यानंतर ते उघडतातच. आताही उघडले. रात्री मी घरी केंव्हा आणि कसा आलो, हेही फारसे आठवत नव्हते. आपण घरात आहे, हे समजायलाही काही सेकंद जावे लागले. पण हे काय? मी आजीच्या मांडीवर झोपलोय, असेच समजत होतो मी. अर्थात तिथे आजी नव्हे; तर माई होती. प्रत्यक्षात नेमका काय प्रकार झाला आहे, तो लक्षात आला. रात्री काहीशा धुंदीतच मी घरी आलो होतो. मला कुणाच्यातरी कुशीची गरज होती. माझा तोल जात होता म्हणून माईने आधार दिला. त्या काळजीयुक्त स्पर्शानेही मी हळवा झालो. त्या क्षणाला मला फक्त आजी आठवली. खूप दिवसांनी माईच्या रूपात आजीची मांडी मिळाली. माझ्यातील पोरकेपणा कुठेतरी सुखावला... आणि माझी झोपमोड होऊ नये; म्हणून रात्रभर माईही तशीच अवघडून बसून राहिली होती. पहाटे पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला असावा. पण मला थोपटणारा तिचा हात अद्याप माझ्या डोक्यावर तसाच होता. माझ्या एवढ्याशा हालचालीनेही तिचे डोळे टक्ककन उघडले असते. म्हणून हलक्या हातांनी तिचा हात बाजूला केला. एक शाल तिच्या अंगावर पांघरून चोरपावलांनी उठून बाहेर आलो.
          आपल्या आयुष्यातील अनंत क्षणांपैकी फार थोड्या क्षणांना स्वप्नांचा सुगंध असतो. रात्र सरली तरी दिवसभर तो दरवळत राहतो. एवढेच काय ते आपले आयुष्य. उर्वरित आयुष्य म्हणजे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळण्यात तळमळत घालवलेली अस्वस्थ रात्र असते.
रात्र सरते...
झोपही सरते...
येणाऱ्या जागेपणाबरोबर स्वप्नही विरून जातात. परंतु काही स्वप्नं रात्र सरली; तरी संपत नाहीत. दिवसभराच्या जागेपणातही एक अनामिक हूरहूर लावून जातात. त्यांचा गंध दरवळत राहतो. आयुष्य सरत राहते; तरी त्यातील आठवणींचा दरवळ कायम राहतो...
मुठीत पकडून ठेवलेल्या सोनचाफ्यासारखा! काही आठवणींचा दरवळ आपल्याही नकळत ओठांवरती स्मित उमटवून जातो. तर काही आठवणी शीळ बनून घुमत राहतात...
मंदिरातील वळचणीला बसलेल्या पारव्याप्रमाणे.
आजीचा हात असाच डोक्यावरून फिरायचा. तो स्पर्श अनेक वर्षांनी पुन्हा वाट्याला आला. माझ्या अस्थिर मनाला आधार देण्यासाठी तो समर्थ होता. वेदनेचेही सोने करण्याची ताकद त्या स्पर्शात होती.
          एकटेपणा घालवण्यासाठी इथे एकांतात राहायला आलो. दुनियेच्या सर्व धकाधकीपासून अलिप्त असे टेकडीवर घर बांधले. घरापासून धावत गेलो; तरी दहा मिनिटे लागतील वस्तीत पोहचायला. बराचवेळ मी झोपाळ्यावर बसून समोरच्या फुलणार्‍या गुलमोहराकडे पाहत होतो. माझ्यासारखेच आठवणींच्या धुक्यात कुठेतरी हरवून गेले होते सर्व. इथून उंचावरून दिसते की. पाठीमागे पाणी आहे. धरणातील पाणी दिवसभर ऊन्हात चमचमत राहते. रात्री चांदणे पांघरून झोपी जाते. कधीतरी त्यालाही झोप नाही आले की, माझ्यासारखेच जागे राहते. कोणीतरी मासे पकडणारा आपल्या नावेतून जाळे पसरत राहतो. त्याच्या नावेतील दिवा लुकलुकताना दिसतो. टेकडीच्या पायथ्यापासून एक सडक गेलीय. तासाभराने एखादे वाहन येते जाते. तिथून वळणे घेत वर घरापर्यंत आलेला रस्ता. दोन्हीही बाजूने रानगवत वाढलेले होते, ते पिवळे पडलेय. मधूनमधून आवर्जून लावलेली झुडपे उठून दिसताहेत. अध्ये मध्ये बसवलेले दगडी खुंट मैलाच्या दगडाचा आभास निर्माण करताहेत.
          खरं म्हणजे प्रत्येकाच्याच खांद्यावर आठवणींच्या शिदोरीचे गाठोडे असते... परंतु शिदोरी ही पुरेल इतपतच असावी, असे माझे प्रामाणिक मत आहे. शिदोरी चालण्यासाठी ऊर्जा पुरवते...
जर तिचेच ओझे होऊ लागले तर...
आपण मुसाफिर आहोत, हमाल नाही. भूतकाळातील आठवणी या मैलाच्या दगडाप्रमाणे मागे सोडायच्या असतात. तेंव्हाच त्यांची स्मारके होतात. मागच्यांसाठी पथदर्शक ठरतात.
म्हणूनच भल्याबुर्‍या सगळ्या आठवणींना मी खोल गाडून टाकले होते. मागचे सर्व दरवाजे बंद करतच मी कायम पुढे जात राहिलो होतो. आज माईच्या रूपाने मनाला पुन्हा संधी मिळाली होती भूतकाळात डोकावण्याची. वर्षानुवर्षे आत कुठेतरी दाबून ठेवलेल्या आठवणी अशा उफाळून वर येऊ लागल्या. मन असे अस्थिर झाले की, घट्ट लावून घेतलेली दारे किलकिली होतात. आणि मग वारूळातून असंख्य मुंग्या बाहेर पडाव्यात; त्याप्रमाणे आठवणींचेही मोहोळ उठू लागले होते.
         घरी असलो म्हणजे दिवसभर वेळ मोकळाच असायचा. कधी वाचण्यात... कधी गाणी ऐकण्यात... तो जाई. उरलेला वेळ भटकण्यातच जात असे. कुठलेही पाश उरलेले नव्हते. अशाच एका प्रवासात योगायोगानेच माई भेटली. चेहरा ओळखीचा वाटत होता. आजारी होती. तिकिटालाही पैसे नव्हते. उपाशीही असावी कधीची. पुढील स्टेशनवर उतरून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पुढे कुठे जाणार म्हणून चौकशी केली. पण उत्तराऐवजी डोळ्यांत पाणी आणि त्याहीपेक्षा अगतिकता दिसली. मग माझ्यासोबत घेऊन आलो. जोपर्यंत तिची इच्छा असेल; तोपर्यंत ती माझ्यासोबत राहू शकणार होती. तिने माझ्याविषयी काही विचारले नाही आणि तिच्याकडे कसलीही चौकशी करण्याची मला आवश्यकता वाटली नाही. तिचा निर्णय घेण्यासाठी ती स्वतंत्र आणि समर्थ होती. गेली काही वर्षे माझ्या एकटे राहण्यामुळे कोणाला काही फरक पडलेला नव्हता आणि आमच्या एकत्र राहण्यामुळे कोणाला काही वाटण्याचे कारण नव्हते. मुळात आम्ही दोघेही वयाच्या अशा टप्प्यावर होतो की, सर्व "किंतु-परंतु" तिथे गळून पडतात. लोकांना फुकटच्या चर्चा करण्यासाठी वयही तितकेच महत्त्वाचे असते.
          दुपारच्या वेळी एखादा गुराखी अथवा वाटसरू घराजवळ पाणी पिण्यासाठी... जेवण्यासाठी सावलीत थांबला की, त्याच्या शिदोरीवर माईच्या हातचे काही ना काही पडायचे. मी एकटा होतो; तोपर्यंत हा एका संन्याश्याचा आश्रम होता. माई आल्यापासून पुन्हा चैतन्य आले होते. कुत्री, मांजरं, कोंबड्या आणि अलिकडे एक मुंगूसही दिसतेय इकडेतिकडे जाता येता. दाराशी आलेला रिकाम्या हाती गेला नाही. ते सर्वजण तिला 'माई' म्हणू लागले. तेच तिचे नाव झाले. ती सर्वांचीच माई झाली.
          भानावर आलो; ते माईच्या आवाजाने. माई माझ्यासाठी चहा घेऊन आली होती. कप झोपाळ्यावर ठेवून ती जायला वळली; तेंव्हा मात्र मला राहवले नाही.
"माई, माफ करा मला. रात्री फारसा शुद्धीत नव्हतो मी. म्हणजे माझ्या विचित्र वागण्याचा तुम्हांला त्रास झाला. पण यापुढे असं काही होणार नाही. मी नक्कीच दक्षता घेईन. एक्स्ट्रिमली स्वारी...!!!"
"तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. रात्री तुम्ही नाही, तुमच्यातले लहान मूल जागे झाले होते. आणि आई कधी मुलांवर नाराज होत नाही."
           माई आली तशी निघूनही गेली. मी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत राहिलो. गमतीची गोष्ट अशी की, आजीलाही मी 'माईच' म्हणायचो. त्यामुळेही असेल कदाचित... आज माझ्यासाठीसुद्धा... ती माईच झाली होती.

(क्रमशः)

10 comments:

  1. खूपच छान लिहिले आहे. आवडले आपल्याला.

    ReplyDelete
  2. Nice sir
    Shevatache Don kadave vachatana man nakalat bharun ale

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. He Sarv Vachtana Dolyasamor Chitr Ubhe Rahatat Khupach Chhan Vatale Sir .........

    ReplyDelete
  5. Khupach Chhan Vatate he vachun pn ek prashn padto nehmi ki he sarv tumhi swatabaddal lihita ki tu,chya kalpanetil lihita mala jevde mahitiye tyamadhe tr tumche jivan ase nahi pn mala vatate ki ase rahayla tumhala avadat asave ............. mala hi avadel pudhil bhagachi vat pahatey


    tumchi vidyarthini
    Taslim

    ReplyDelete
  6. खरं म्हणजे प्रत्येकाच्याच खांद्यावर आठवणींच्या शिदोरीचे गाठोडे असते... परंतु शिदोरी ही पुरेल इतपतच असावी, असे माझे प्रामाणिक मत आहे. शिदोरी चालण्यासाठी ऊर्जा पुरवते...
    जर तिचेच ओझे होऊ लागले तर...
    आपण मुसाफिर आहोत, हमाल नाही. भूतकाळातील आठवणी या मैलाच्या दगडाप्रमाणे मागे सोडायच्या असतात. तेंव्हाच त्यांची स्मारके होतात. मागच्यांसाठी पथदर्शक ठरतात
    .
    .
    Awesome ...

    वाचल्यावर प्रसंग असे डोळ्यासमोर तरळुन येतात.लाजवाब

    ReplyDelete
  7. खरं म्हणजे प्रत्येकाच्याच खांद्यावर आठवणींच्या शिदोरीचे गाठोडे असते... परंतु शिदोरी ही पुरेल इतपतच असावी, असे माझे प्रामाणिक मत आहे. शिदोरी चालण्यासाठी ऊर्जा पुरवते...
    जर तिचेच ओझे होऊ लागले तर...
    आपण मुसाफिर आहोत, हमाल नाही. भूतकाळातील आठवणी या मैलाच्या दगडाप्रमाणे मागे सोडायच्या असतात. तेंव्हाच त्यांची स्मारके होतात. मागच्यांसाठी पथदर्शक ठरतात
    .
    .
    Awesome ...

    वाचल्यावर प्रसंग असे डोळ्यासमोर तरळुन येतात.लाजवाब

    ReplyDelete