आठवणींच्या या प्रवाहासोबत वाहत असताना काळाचे अनेक पदर उलगडत मी मागे मागे जातो. नकळत सुरू होतो पुन्हा एकदा स्वतःचाचा शोध... मी कोण आहे..? मी काय आहे..? मी कसा आहे..? यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मी का आहे...??? असे अनेक प्रश्न वाढत जातात. प्रश्नाच्या पतंगाला खेचता खेचता दोरा मागे साठत राहतो... प्रश्नांची भेंडोळी वाढत जातात. गुंता होत जातो. हा गुंता काही केल्या सुटत नाही. भारीच वाढत जातो. नदीच्या वरच्या अंगाला असाच कधीतरी मी पतंग उडवत राहायचो. खरं तर पतंग हा केवळ बहाणा असे. वेणू आलेली असायची नदीवर धुणे धुवायला. त्यासाठी खटाटोप चाललेला असे. कपडे सुकायला टाकण्यासाठी ती कुरणात यायची आणि मग पतंगाला ढिल मिळत राहायची. त्यावेळी दोरा सांभाळण्यासाठी सोबतीला बल्लू असायचा. आता हा गुंता एकट्यालाच सोडवावा लागतोय. चक्रव्युहात अडकलेला सौभद्र बनून मी त्याला भेदू पाहतोय... अन् मीच तो युगंधर श्रीकृष्ण बनून त्याचे उत्तर देतोय. माझ्या प्रत्येक श्वासातून भगवद्गीतेचे शब्द बाहेर पडताहेत...! प्रत्येकवेळी मी कोणीतरी असतो. कोणाचा नातू... कोणाचा तरी मुलगा... कोणाचा तरी मित्र... कोणाचा प्रियकरही असतो आणि कोणाचा शत्रूही असू शकतो... पुढे मी कोणाचा तरी पती होतो... अशाच गुंत्यात गुंतत जातो आणि कोणाचा तरी बापही बनतो. जरी कायम मी कोणाकडून काहीतरी शिकत राहतो... कोणाचा गुरू होतो. कोणाला मी चेस करत गेलो... कोणी मलाच फॉलो करत राहते. मी कोणाचा तरी कोणी असताना स्वतःपुरता कोण आहे? हेच कळलेले नसते. अगदीच मग स्वतःचा शोध सुरू राहतो.
चंद्रशेखर हे तर नाव झाले. पण हे लेबल चिकटण्याअगोदर मी होतोच की. पण फारसे काही आठवत नाही. मागे मागे जाताना जन्मापर्यंत जाऊन पोहचतो. कदाचित त्याच्याही अगोदर... त्याच्याही अगोदर. त्याच्याही अगोदर काहीतरी असेलच. पण सगळ्याच गोष्टी कुठे आपल्याला कळतात. आयुष्यभर तसे तर माणसाला काहीच कळत नाही. आपल्याला बरेच काही कळत नाही, हे मला मात्र फार लवकर कळले. असो. असेच मागे जायचे म्हटले तर... शिवरायांचा मावळा बनून कधीतरी सह्याद्रीच्या कडेकपारीतून फिरलो असेन... "बुद्धं सरणं गच्छामि!" म्हणत तथागतांचा संदेश घेऊन तिबेटमध्येही पोहचलो असेन... गुहांमधून राहणाऱ्या आदिम मानवांच्याही अगोदर... अगदी एका अणूचे शरीर धारण करण्याच्याही पूर्वी... ब्रह्मांडाची निर्मिती ज्या प्रलंयकारी स्फोटातून झाली तिथपर्यंत पोहचता येईल. कोणी सांगावे त्यापूर्वीही काही असेलच ना! पण आता काही काही आठवत नाही. तरीही कधीतरी अशाच एका आठवणींच्या गावात मी जाऊन पोहचतो.
माई सांगायची गोष्टीत तसं... अगदी तसंच... एक होतं गाव. इतर चारदोन गावासारखंच. असं कशाला? तुम्हालाही एखादा गाव असेलच की. अगदी तसंच.
ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाचा एक चेहरा मोहरा असतो. काही माणसं नाकीडोळी तरतरीत असतात... काही सुबक देखणी असतात... तर काही चारचौघात मिसळून जातात... एवढं मात्र नक्की की, वेडावाकडा का असेना पण प्रत्येकाला एक चेहरा असतो. त्याप्रमाणे प्रत्येक गावाचाही तोंडवळा असतो.
कोणाच्या गावाला डोंगराची पार्श्वभूमी असेल... कोणाचा झाडाझुडपांच्या हिरवाईने नटलेला असेल... कोणाच्या डोक्यावर छपरांची गरिबी असेल... तर कोणाच्या कौलारू रूबाब असेल... कोणी टोलेजंग इमारतीचा डौल मिरवत असेल... कोणी एखाद्या नदीकाठी... अगदी ओढ्याकाठीही असेल. कोणाच्या उशाशी एखादे धरण... पाझरतलाव... अगदी समुद्रकिनाराही असेल. तर कोणी अगदीच ओसाड माळरानावर पसारा मांडला असेल. काही गावं वसल्यासारखी असतात.. तर काही विस्कटल्यासारखी.
असं म्हणतात, आपण जो चित्रपट पाहतो. तो बनवण्याच्याही आधी दिग्दर्शकाच्या डोक्यात असतो. त्याची प्रत्येक फ्रेम... प्रत्येक अँगल ठरलेला असतो. तालुक्याच्या गावाहून निघाल्यावर उत्तरेला चालता चालता पहिल्यांदा दूर मेंढशिंग माळावर पोहचतो तिथून गावाचे पहिले दर्शन होते. प्राकृतिक नकाशामध्ये मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला वेगळे करणाऱ्या सह्याद्रीच्याच बालाघाटच्या रांगा आहेत. यातीलच चारदोन डोंगर उशाशी घेऊन फिकट निळसर हिरव्या पार्श्वभूमीवर हिरव्या झाडाझुडपांची शाल पांघरून विसावलेली घरं दिसू लागतात. तिथेच पावलं थबकतात. माझ्यासमोर एक फ्रेम लागते... कॅमेर्याची जागा... त्याचा अँगल ठरलेला आहे. याच फ्रेममधून मी गावाकडं खूप वेळा पाहिलंय... प्रत्यक्षही आणि कल्पनेतही! याच मातीतून तयार झालेल्या शरीरातील कणन् कण एका अनामिक ओढीने मोहरून जातो. एक चुंबक मला खेचू लागतो. प्रत्यक्ष गावात पोहचण्याच्या अगोदरच जिथं माझे भावबंध जुळलेले आहेत, त्या जागा मला खुणावू लागतात. आपल्या मिठीत घेण्यासाठी हात पसरतात. तिथंच या चित्रपटाला सुरुवात होते...
सायलेन्स... साऊंड... कॅमेरा... अॅॅक्शन!!!
अंगावर पांघरूण घेऊन झोपलेला माणूस आपल्याला दिसतो. पण त्याच्या डोळ्यांत चाललेला स्वप्नाचा चित्रपट तो सोडून कोणालाही दिसत नाही. तसंच काहीसं होतं. दुरून झाडीत लपलेला गाव आपल्याला दिसतो. पण तिथं लपलेले माझे आठवणींचे साक्षीदार माझ्याशिवाय कोणालाच दिसत नसतील. काय नसते तिथे??? खूप... खूप काहीतरी असते. काळाच्या ओघात कदाचित त्याच्या पुसट पाणरेघाही उरल्या नसतील. सर्व पाऊलखुणा मिटून गेल्या असतील. पण मन मोठे वेडे असते. डोळ्यांनी न दिसणाऱ्या कितीतरी गोष्टी त्याला दिसतातच. माझी वाटही न पाहता केंव्हाच ते तिथे पोहचलेले असते...
मी जिथे उभा असतो; तिथून माझ्या आणि गावाच्या दरम्यान जनसेवा हायस्कूल दिसू लागते. जोशी मॅडम, माझे जिवाभावाचे मित्र केशव, सुध्या, मनाचा हळवा कोपरा व्यापून टाकणारी वेणू, मी गाजवलेल्या स्पर्धा आणि अशा बर्याच गोष्टींचा ठेवा तिथे लपवून ठेवला आहे. थोडे पुढे गेले की, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र लागते. इथे काहीतरी हरवलेय माझे... त्याच्या थोडे पुढे ओढा आणि हायस्कूलमध्ये असताना मधल्या सुट्टीत बोरे खायला जायचो. वेणूसोबत खाल्लेल्या त्या ओढ्याच्या काठावरच्या बोरांची चव अजून जिभेवर आहे. गावाच्या दोन्ही बाजूंनी वाहत येऊन एकमेकींना बिलगणार्या नद्यांचा संगम... संगमाच्या जरा वरच्या अंगाला असलेल्या बामणाच्या मळ्यातील चाफ्याचे झाड... या झाडाला मी जेवढ्या वेळा भेटलो; ती कायम मावळतीची वेळ असायची. म्हणून असेल कदाचित. पण मला या झाडाचा रंग कायम मावळतीच्या सूर्यासोबत मिसळून गेलेला दिसतो. नदीच्या त्या अंगाला असणारा चिंचेखालचा महादेव... आणि ज्याच्या खांद्यावर मी खेळलो तो दगडी नंदी... अलीकडच्या बाजूची आमराई... साती आसरा असलेला मुंज्या डोह... डोहाच्या वरची टेकाडावरील दगडी चौपाळ... आठवणीमध्येसुद्धा गुढ धुके निर्माण करतात. असंच चालतचालत वर गेले की, भेटते भले मोठे बाभूळबन. त्याच्या आणखी थोडे पुढे पसरट पात्रात पसरलेले मोठमोठे खडक... या खडकांवरूनच कित्येक रात्री चांदण्यात मनमुराद पडून राहिलोय. तिथेच तर तारुण्यातील कित्येक नवथर स्वप्न रंगवलीत मी. एक ना अनेक अशी कितीतरी ठिकाणे मला खुणावत असतात.
जरासा कॅमेरा फिरवला की, याच पार्श्वभूमीवर इतरही चारपाच गावं दिसू लागतात... वडगाव, पिंपरी, चिंचवली, उंबरी, कारी, पांगरी. या सगळ्या गोतावळ्यात वसलेले हे गाव अगदी ठळकपणे उठून दिसते. या सगळ्या भाऊबंदातील थोरलेपणाचा मान त्याने कायम जपलाय. कायम एकमेकांची शेपटी धरून ही भावंडे मोठी झाली. यात्रा, जत्रा, उरुस, सणवार असो कि दुखले खुपलेपण. एकाला सर्दी झाली की, सर्वांचीच नाके गळायला सुरू व्हायची. आणि एखाद्याला पेपरमिंटची गोळी मिळाली तरी चिमणीच्या दाताने नखभर तुकडा प्रत्येकाच्याच जिभेवर पडायचा. एकेकाळी आठवडी बाजार याच गावात भरायचा. पिंपळेश्वराची अक्षयतृतीयेला भरणारी यात्रा आणि दिवाळीनंतर भरणारा सर्वांत मोठा उरुस अशा दोन उत्सवाचे हे गाव म्हणजे आसपासच्या पंचक्रोशीतील हे मध्यवर्ती गाव. शाळा, हायस्कूल इथेच... मोठा दवाखाना... बँका... सोसायट्या इथेच. त्यामुळे राजकारणाचं वारं इथूनच फिरू लागलं. कोणी उभे राहायचं आणि कोणी बसायचं हे इथेच ठरू लागलं. गावात देशमुख, जाधव, पवार, मोरे अशी तालेवार भावकीची घरं होती तशी कुणबावा करून पोट भरणार्या मराठा समाजातील मंडळीही होती. महार, मांग, बारा बलुतेदार आणि अठरा पगडजातीची जशी घरे होती. तशीच मुसलमानांचीही बरीच घरे होती. हा गाव पावसाच्या आणि विहिरीतल्या पाण्यावर जगत होता. अस्सल शंभर नंबरी टपोरी ज्वारी, काबुली चणाही ज्याच्यापुढे झक मारेल असा हरभरा, तेवढ्याच कॉलिटीची तूर, जोडीला हळद, कांदा, मका पिकवणार्या मातीला पाण्यावाचून ऊसाची बाधा झाली नव्हती. पुढे दोन बाजूला दोन पाझरतलाव झाले आणि शिवार हिरवागार दिसू लागला. शिकून सवरून नोकरदार झालेल्यांचे पिक इथे भलतेच आले असल्यामुळे महिन्याच्या महिन्याला येणारा ताजा पैसा खुळखुळत होता. इरसालपणात तर हात धरावा असे तालुक्यात कोणी नव्हते.
हे गाव कोणी वसवलं कोणास ठाऊक! पण हा गाव नद्यांच्या संगमावर आखीवरेखीव वसवलेला आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले पिंपळेश्वराचे मंदिर आणि शिवकाळातील बांधकामाची आठवण करून देणारा सरकारवाडा, गावाच्या उत्तर आणि दक्षिणेस आपला आब राखून असलेल्या भल्या दांडग्या चिरेबंदी दोन वेशी... आणि चार कोपऱ्यावर असणारे चार भरभक्कम बुरूज गावाच्या जुनेपणाची साक्ष देतात. विजापूराहून तुळजापूरमार्गे निघालेला अफजुल्या या गावातूनच गेला असणार. इंग्रजी राजवटीत शिक्षणाचा फायदा या गावाने उचलला. मराठवाड्याच्या सरहद्दीवर असल्याने मुक्तिसंग्रामाच्यावेळी रझाकारांना ठेचायला आलेल्या सेनेला जशी इथूनच कुमक पुरवली गेली. तसे मराठवाड्यातील अनेक मुसलमानांना आश्रयही इथेच मिळाला. त्यावेळी निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन बराचसा माल आपल्या मांडीखाली दाबलेले चारदोघेजण गावात चांगलेच गब्बर झाले होते. शेवटपर्यंत अगदी मिशीला तूप लावून जगले.
कोणालाही हेवा वाटावा असा हा गाव माझ्या कॅमेर्यातून दिसू लागतो. तेंव्हा माझ्याही अगोदर माझे मन त्या आठवणीत केंव्हाच पोहचलेले असते. तसा तर हा माझा गाव नाही. हे माझे आजोळ. परंतु माझा जन्मच या गावात झाला. माझे बालपण इथेच गेले आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरही इथेच पोहचलो. बाहेरून आलेले हे बीज इथल्या मातीत पडले. रूजले आणि वाढलेही. या मातीनेही त्याला जवळ केले. परकेपणाची जाणीव कधीच होऊ दिली नाही. शेवटी मीही या मातीचाच झालो. त्यामुळेच असेल कदाचित पण या मातीशी जडलेले बंध सोडू म्हणता सुटत नाहीत... तोडू म्हणता तुटत नाहीत...!

Mastachh..... Waiting fr next Musafir....
ReplyDeleteआजच येतोय...
ReplyDeletePratyekachya manat asach ekhada gaw laplela asto. Fakt varnan karayala shabda sapdat nahit tumchyasarkhe. Lage raho.
ReplyDeleteआपल्या कौतुकभरल्या शब्दांसाठी धन्यवाद...!!!
ReplyDelete