Monday, 1 February 2016

१...

आज खूप रडावंसं वाटतंय...!
मला माहितीय पुढचा प्रश्न काय असणार ते...!
काय झालं???
आणि मी सांगूनही कोणाचा विश्वास बसेल, असंही वाटंत नाही.
का बसावा?
बरं कोणाचा विश्वास बसावा; म्हणून मीही इत्यादी वगैरे स्पष्टीकरण देत का बसावं?
काहीच तर झालेलं नाही.
तरीही रडावंसं वाटतंय.
हे जरासं विचित्र आहे खरं.
ढग दाटून आले आणि पाऊस पडला... हे स्वाभाविकच आहे. परंतु आज आभाळ अगदी कोरडेफट्ट आहे. तरीही मन भरून आलंय.
फारसं काही घडलेलं नाही... विशेष काही घडण्याची शक्यताही नाही...
कदाचित आयुष्याचा लेखाजोखा करण्याएवढा निवांतपणा यापूर्वी कधीच मिळाला नसावा... मिळाला तरी त्याची तेवढी गरजही भासली नसावी. आज मिळाला.
मग मन भरून यायला एवढंसं कारण पुरेसं असेल. तेही अशाच निवांतपणाची वाट पाहत असेल... आज मिळाला. झालं!!!
          पण तरीही मी रडणार नाहीच.
का रडावं???
आजपर्यंत फार नाही, थोडेसेच असतील; पण काही आघात पचवले.
काही सोडून गेले... काहीना मी सोडून आलो...
काहीतरी गमावलं... काही मिळालंच नाही...
काही निसटून गेलं... काही सोडून दिलं...
काही हरवून गेलं... काही हिरावून नेलं...
पण...
तरीही मी रडलो नाही.
कोणासमोर रडावंसं वाटलं नाही... आणि एकांतात रडण्याचं धाडसच झालं नाही.
आजही रडणार नाहीच...
कारण...
रडण्यासाठी उशीची नाही; कुशीची गरज असते.
आणि आज...
या बाबतीतही मी करंटा आहे.
          या एकटेपणाची तर मला कायम भीती वाटत राहिली. त्याची जातकुळीच वेगळी! तो भर गर्दीतही तुम्हाला गाठू शकतो. सगळ्या जगाशी विसंवाद निर्माण झाला की, एकटेपणा वाटायला लागतो. सर्वांपासून आपण तुटत चाललोय, ही भावनाच कुठंतरी मनाला टोचत राहते. त्यातही जेंव्हा आपण आपला आपल्या स्वतःशीच संवाद हरवून बसतो; तेंव्हा तर एकटेपणाची दाहकता अनुभवण्यासाठी तो एक क्षणही पुरेसा आहे. एकटेपणा खायला उठणे इत्यादी वगैरे म्हणजे काय, हे तेंव्हाच कळते. म्हणूनच मीही मग कायम माणसं जोडत गेलो. काही ठिकाणी जुळले; तसे काही ठिकाणी जळलेही. या सर्वाचा विषाद न मानता आयुष्याची वाट चालत राहिलो... एकेक पाऊल टाकत राहिलो... एकेक शिखर चढत गेलो. खूप पुढे गेलो आणि लक्षात आले की, तोपर्यंत एक एक करत बाकीचे हात सुटत गेले होते. अत्युच्च शिखरावर पोहचलो; तेंव्हा तर एकटाच उरलो होतो. कोणताही इत्यादी नाही कि वगैरे नाही. एकटाच...!
          शेवटी जमून आलेला सगळा डाव सोडला. जे जे मी मिळवले होते; ते सर्व सोडले. अर्थात मी कधी ना कधी ते सोडणारच होतो. ते माझे नव्हतेच. तसे पूर्वीपासूनच मला कुठेतरी आत 'ते' नेहमी जाणवत राही. हे जे आपण करतोय, तो आपला खरा मार्ग नाही. 'माझं माझं' म्हणून जे आपण गोळा करत चाललोय; ते सर्व तकलादू आहे. या नश्वर गोष्टींचे ओझे वाहायला आपण जन्माला आलेलो नाही. आपण तर फक्त 'मुसाफिर' आहोत. इथला मुक्काम आज ना उद्या संपला की, आपण निघालोच. आपल्या प्राक्तनात काही वेगळेच लिहिलेले असावे. मला कुठलेही पाश नको होते. मला फक्त जगायचे होते. स्वतःला हवे तसे. मी कबूल करतो की, होय! या जगात मी सर्वांत जास्त प्रेम स्वतःवरच केले. म्हणूनही असेल कदाचित. पण मला स्वतःपुरता स्पेस हवा असायचा. आयुष्यभर तो मी मिळवत राहिलो. शेवटीही तो हवाच हवा, म्हणून तर मला दूर कुठेतरी निवांतपणा असणारं एक घर हवं होतं... छोटंसंच.
          आपली काही स्वप्नं असतात... लहान... मोठी... तशीच थोडीशी वेडीही. माझ्या एका छोटया मैत्रिणीचे असेच एक स्वप्न होते. समुद्रकिनारी एक छोटीशी झोपडी असावी. त्या झोपडीला दार नको. त्याऐवजी तिच्या आवडत्या लाल ओढणीचा पडदा असावा... मी माझ्या इवल्याशा नावेतून मासे पकडून आणावेत. आणि तिने ते आपल्या इवल्याशा स्टोव्हवर माझ्यासाठी बनवावेत. नारळाच्या झाडांना बांधलेल्या जाळीच्या झोक्यामध्ये बसून एकमेकांच्या डोळ्यांतील आभाळ शोधत... समुद्राच्या फेसाळ लाटांची गाज ऐकत... आभाळाच्या निळाईखाली... स्वप्नातले जीवन जगावे...!
          मीही असेच एक स्वप्न पाहिलेय. फरक इतकाच की, माझे स्वप्न जगण्याचे नाही; तर मरणाचे आहे. गावाबाहेरील टेकडीवर माझेही एक छोटेसे कौलारू घर असावे. घराभोवती सुरेख झाडी असावी. दारात मात्र प्राजक्त हवाच... फुलांचा सडा टाकणारा... आणि समोरच्या गुलमोहराला टांगलेला झोपाळा असावा. मंदिरापुढे असते तशीच एक दीपमाळ. मग एखाद्या रम्य सायंकाळी घरापुढील दीपमाळेवर दिवे पेटवून हातातील जॉनी वॉकरचा घोट घेत झोपाळ्यावर पडून राहावे. अगदी कायमचे...!
          वार्‍याने छान झोका द्यावा... शेवटच्या श्वासात मंद रातराणीचा सुगंध भरून जावा... गुलमोहराने फुलांची शाल पांघरूण घालावी... अन् निघावे...
          शांतपणे शेवटच्या प्रवासाला...!!!
          माझ्यामागे ते दिसतंय ना? ते घरटं माझंच. अगदी स्वप्न पाहिले होते तसेच. घराच्या पुढच्या बाजूला दिसतोय तो गुलमोहर जो मीच लावलाय. तुम्ही म्हणाल आता गुलमोहरच का? आणखी काही दिवसांनी येऊन पहा तो लालबुंद गेंदानी भरून गेल्यावर. दुपारच्या भर उन्हात तो तुमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून पेटून उठेल अन् तुम्हांला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. पलिकडे दूर एक पिंपळ जो पूर्वीपासूनच आहे. सायंकाळच्या संधीप्रकाशात याच्या पानांची थरथर पाहिली की, मनाचं पानही असंच कातर होऊन जातं. या दोघांच्याशिवाय दुसरी सोबत नाही. एकुलतं एक घर आहे या टेकडीवर.
          एकटेपणा घालवण्यासाठी इथे एकांतात राहायला आलो. दुनियेच्या सर्व धकाधकीपासून अलिप्त. इथून दिसतात जगाचे सर्व व्यवहार. पण आपण त्यात कुठेच नसतो. आपल्या सभोवतालच्या परिसरांत निःस्तब्धता असणे म्हणजे एकांत...!!! निःशब्द असूनही आपल्याला कधीतरी तो हवा असतो. व.पुं.च्या भाषेत सांगायचे तर एकांताचे नाते मौनाशी...!!! एकटेपणा तर माझ्या वाट्याला आला होता. पण तो नको होता. जेंव्हा या दोहोंपैकी एकाची निवड करण्याची वेळ माझ्यावर आली; तेंव्हा मी एकांत निवडला.
मी निवडला?
          जेंव्हा जेंव्हा मी माझा स्वतःशीच संवाद हरवून बसायचो; तेंव्हा तेंव्हा हा एकांतच मला निवडायचा. पुन्हा मग मी मलाच नव्याने सापडायचो. या एकांताने तर मला माझ्याशी बांधून ठेवले होते. भल्या मोठ्या बंगल्यात का कोण जाणे; पण माझा जीव गुदमरून जायचा. एकएक खोल्या अशा मोकळ्या पडलेल्या असायच्या. त्यांच्याकडे पाहिले की, आपला जबडा पसरून त्या मला गिळायला बसल्या आहेत, असंच वाटत राहायचं. म्हणून आवर्जून या एकांतवासात मी हे छोटं घरटं बांधून ठेवलं होतं. अगदी आवर्जून. कामातून थकून गेलो की, एकटाच इथे यायचो. एखादी रात्र, एखादा दिवस इथे काढून जगण्यासाठी एक ऊर्जा घेऊन पुन्हा जगाच्या गर्दीत हरवून जायचो. जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इत्यादी वगैरे इथे मी गोळा करून ठेवल्या आहेत. खूप सारी पुस्तके भिंतीवरच्या कपाटातून मांडून ठेवलेली आहेत. संगीत ऐकण्यासाठी सोय आहेच, पण बेसूर व्हावसं वाटलं तरी एक बासरी... एक व्हायोलीन आणि कमीजास्तीला एक हार्मोनियमही आहे. यातले एकही वाद्य मला कधी धडपणे वाजवता आले नाही. पण हौस दांडगी. रेकॉर्डरवर म्युजिक ट्रॅक लावून मन मानेल तशा ताना घेत कुठल्याही शास्त्रात न बसणारे माझे गायन चाललेले असते. फायदा एकच. ऐकायला कोणी नसल्यामुळे कोणालाही त्रास होण्याची सुतरामही शक्यता नाही.
          टेकडीच्या पायथ्यापासून एक सडक गेलीय. मी मुद्दामच सडक म्हणालो. गेल्या काही वर्षांत डांबराचा साधा वासही तिला मिळालेला नाही. दिवसा तासाभराच्या फरकाने एखादे वाहन येते जाते. रात्री तर तो रस्ताही शांत झोपलेला असतो. तिथून वळणे घेत वर घरापर्यंत आलेला रस्ता. दोन्हीही बाजूने रानगवत वाढलेले होते, ते पिवळे पडलेय. मधूनमधून आवर्जून लावलेली झुडपे उठून दिसताहेत. अध्ये मध्ये बसवलेले दगडी खुंट मैलाच्या दगडाचा आभास निर्माण करताहेत. खालच्या सडकेने असे सरळ पुढे गेले की, टेकडीच्या या बाजूला वस्ती आहे. घरापासून धावत गेलो; तरी दहा मिनिटे लागतील वस्तीत पोहचायला. गरीब बिचारे... टीचभर पोटासाठी हातभर शेतात दिवसभर खपणारे... गाईगुरं पाळणारे आणि त्यांना चारण्यासाठी जंगलात वणवण फिरणारे लोक राहतात इथे. इथून उंचावरून समोर भलामोठा समुद्र पसरावा तसे धरणातील पाणी पसरलेले दिसते आहे. इकडं यायचं म्हणजे या पाण्याला प्रदक्षिणा घालूनच यावे लागते. शहर इथून फार दूर आहे. त्यामुळे धावपळ या लोकांच्या स्वभावातच नाही. अलीकडे थोड्याफार सुधारणा इत्यादी वगैरे झाल्यापासून हे लोकही काहीसे बेचैन बनलेत. नाही असे नाही. पूर्वी मात्र खूप सुखी होते. कारण त्यांच्या गरजाही फार थोड्या होत्या. सुखी होण्यासाठी ते गरजा वाढवत गेले आणि गरजा वाढल्यापासून सुख मात्र हरवून बसले.
          धरणातील पाणी दिवसभर उन्हात चमचमत राहते. सूर्य कलू लागला की, काठावरल्या झाडांच्या सावल्या त्यात उतरून माशासारख्या पोहत राहतात. सायंकाळी आभाळाची लाली त्यात पसरते. एखादा लाजेने आरक्त झालेला सुंदर चेहरा मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये हरवून जावा; तसा काळोख पसरत राहतो. रात्री चांदणे पांघरून मग हे पाणीही झोपी जाते. कधीतरी त्यालाही झोप नाही आली की, मग मात्र तेही माझ्यासारखेच जागे राहते. आजही बहुधा त्याची माझ्यासारखीच गत झालेली दिसतेय. त्यालाही झोप येत नसावी. पाण्यावर एक दिवा तरंगताना दिसतोय. कोणीतरी मासे पकडणारा कोळी असावा आपल्या नावेतून जाळे पसरत चाललेला. त्याच्याच छोट्याशा नावेतील दिवा लुकलुकत असेल.
          या दिव्यावरून आठवले. घरापुढे एक दीपमाळ आहे. मंदिरापुढे असते ना! अगदी तशी. तुम्हांला गंमत वाटेल कदाचित! पण तीही मी आवर्जून बांधून घेतलीय. अंधार्‍या रात्री मी त्यावर दिवे पेटवतो. आता सगळा हिशोब मांडलाच आहे; तर हे तरी कशाला लपवू? अंधार आणि एकटेपणा सोबत असले की, मला त्यांची नेहमीच भीती वाटत राहिली. अंधार कसा उगीचच अंगावर यायला नको. त्याचाही एक उत्सव व्हायला हवा. अंधारातही मनाला आधार वाटावा; म्हणून तर हा खटाटोप. दुसरे काय? हा माझा विक्षिप्तपणा वाटतो लोकांना. काहीजणांना कौतुकही वाटतं; पण बोलून दाखवायला कोण येणार इथे? तरीही कधीतरी येतं असंच उडत उडत कानावर. ऐकून मात्र बरं वाटतं.
          आज सायंकाळपासूनच मन थार्‍यावर नाही. मग त्याला थोडे शांत करण्यासाठी या दीपमाळेवर दिवे पेटवायचे ठरवले. हट्टाने वर चढलो. दिवे लावून झाल्यावर जरा थकल्यासारखं झालं. हात थोडे कापत होते. पायही लटपटू लागले. नेहमीच असे होते, असं नाही. पण अशी अस्वस्थता असली की, होते. दिव्यांच्या उजेडात अंगण मात्र सारे उजळून गेले होते. मनाची अस्वस्थता थोडी कमी झाली. तिथेच पायऱ्यांवर बैठक मारली. कितीतरी वेळ नुसताच बसून राहिलो. एकएक दिवा त्याचे हितगूज सांगत राहिला. मी शांतपणे ऐकत राहिलो. शब्दांच्या पलीकडे जाऊन आमचा संवाद चालला होता. मौनाचीही आपली अशी एक भाषा असते. कितीवेळ गेला कोणास ठाऊक. पण बसूनबसून पाय अवघडल्यासारखे वाटले; तेंव्हाच उठलो.
          भूक अशी फारशी नव्हतीच. घरात जाऊन 'टिचर्स'चा एक कडक पेग भरला. एक पेग मारल्यावर थोडी तरतरी आली. मग आणखी एक पेग. शेवटी लागणारा सर्व सरंजाम उचलला आणि इथे निवांत एका बाजूला येऊन बसलो. खुल्या चांदण्याची ओढ जुनीच आहे. होळी होऊन आठवडा होत आलाय. त्यामुळे थंडी बरीच कमी झालीय. तरीही एक सिगारेट तर हवीच. अजून पेटवलेली नाही. पेटवायला हवी. डोळे थोडे जड झालेत का? पण असे सगळे आभाळच पांघरून घेऊन पडून राहायला बरे वाटते. झोप नाही आली म्हणून काय झाले. सगळ्या रात्री झोपण्यासाठी थोडीच असतात. असा मस्त पसरत जाणारा धूर. सिगारेटच्या या धुरासारखेच आपणही कसे अलगद तरंगत असल्यासारखे वाटतेय. आकाश टिपूर चांदण्यांनी भरून गेलेय. आपणही त्या चांदण्यांचाच एक भाग होऊन मस्त पंख पसरून त्या चांदण्याचाच एक भाग होऊन जावं.
           आपल्याकडे जे नाही; ते मिळविण्यासाठी सामर्थ्य लागते. लहानांत लहान सुखापासून ते मोठमोठाली साम्राज्ये उभी राहिली; ती याच कर्तृत्वाच्या बळावर. परंतु सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना सत्ता, संपत्ती, स्त्री, संतती ही सर्व सुखाची परिसीमा असतानाही सर्वसंगपरित्याग करून संन्यस्त जीवनाचा स्वीकार करून समस्त दुःखाचे मूळ शोधायला तो बाहेर पडला. याला जे धाडस लागते; त्याबाबत तो अतुलनीय आहे. आपल्या अर्धोन्मलित पापण्यांमधून ममतेने पाहणारी त्याची ती तृप्त नजर कायम माझ्या मनाचा ठाव घेत राहिली. मी पहिल्यांदाच अजिंठ्याच्या लेण्यातून फिरत होतो; तेंव्हा त्या थंडगार अंधाऱ्या लेण्यांमधून ही नजर सतत आपला पाठलाग करतेय, असेच वाटत राहिले. या नजरेचे असे काय गारुड आपल्या मनावर झाले होते कोणास ठाऊक! पण नित्यनेमाने वारीला जावे तसे अजिंठ्याला जात राहिलो. प्रत्येकवेळी आपल्या आतमध्ये कुठेतरी तो भिनत राहिला. विपश्यना करताना तर शरीराच्याही पलीकडे जाऊन त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत राहिली.
         आताही मिटलेल्या पापण्यांना छेदत नजरेसमोरच्या एवढ्याशा कणातून मोठा मोठा होत होत तो आकाशाएवढा झाला... नव्हे तर संपूर्ण आकाशच झाला. समोरच्या नक्षत्रांनी भरून गेलेल्या आकाशातून तो आपल्याकडेच पाहतोय, अशी जाणीव मनाला होतेय. डोळ्यांना दिसतेय तेवढेच सत्य कसे असेल? शरीराच्या पलीकडे जाऊन असे काहीतरी अस्तित्वात आहे, जे पाहण्यासाठी मनःचक्षूच उघडायला हवेत. ते उघडण्यासाठी हा एकांत आहे. आईच्या गर्भात असलेली ऊब या एकांताला आहे. तेवढ्यात त्याच्या डोळ्यातून एक थेंब ओघळावा; तसा आकाशात एक तारा निखळला. अशाच काही नक्षत्रांनी माझ्या पाठीमागे एक झाड भरून गेलेय. डोळ्यांना दिसत नसले; तरी नाकाला त्याची संवेदना जाणवतेय. कॉलेजमध्ये असताना कुसुमाग्रज यांच्या 'समिधा' या पुस्तकातली एक कविता वाचली होती... 'पारिजातक.' आपल्या कुरुप ओबडधोबड व पुष्पहिन जीवनाला वैतागून तो वृक्ष तपश्चर्येला बसला. सर्वांनाच हेवा वाटेल, असे खूप सुगंधीत सौंदर्य मिळवायचे, हाच एक ध्यास घेऊन. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अखंड साधना सुरूच राहिली. दिवसामागून दिवस आणि रात्रीमागून रात्री उलटून गेल्या. त्याच्या या अथक साधनेनंतर परमेश्वर प्रसन्न झाला. मनातील इच्छा फलद्रूप झाली. प्राजक्त पवित्र अशा पुष्पवैभवाने भरून गेला. पण जेंव्हा ग्लानीतून तो शुद्धीवर आला; तेंव्हा त्या सर्व वैभवाचा त्याने त्याग केला.
"अरे! मी तर तपस्वी... साधक... संन्यासी... हे सर्व वैभव माझ्या काय कामाचे...?"
त्या भल्या पहाटेपासून आजतागायत त्या स्वर्गीय फुलांचा सडा मातीमोल होऊन जातो.
            या दोघांमध्येही किती कमालीचे साम्य आहे. दोघेही व्रतस्थ. आणि आपले काय?
        आपणही यांच्यासारखाच तर वसा घेतला. उतलो नाही... मातलो नाही... घेतला वसा टाकला नाही. जीवनाचे व्रत कायम पाळले. अजूनही पाळतोय.

(क्रमशः)

23 comments:

  1. सूरूवात छानच

    ReplyDelete
  2. khup chaan aajichi athavan zali tasec aayushyat aalelya chad utaracha kram dolyapudhe aala

    ReplyDelete
  3. too good sir waiting for more..............

    ReplyDelete
  4. अभिनंदन मित्रा,
    मस्तच.

    ReplyDelete
  5. व्वा, अप्रतिम... खुप दिवसानी असं वाचलंय !!

    ReplyDelete
  6. व्वा, अप्रतिम... खुप दिवसानी असं वाचलंय !!

    ReplyDelete
  7. खूपच छान 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  8. खूपच छान 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  9. Suruvat tr dankyat zaliye...!!!

    ReplyDelete
  10. खुपच छान सर.
    खुप आवडल मला..

    ReplyDelete
  11. खुपच छान सर.
    खुप आवडल मला..

    ReplyDelete